অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसहभागातून प्रगतीकडे

लोकसहभागातून प्रगतीकडे

नाविन्यपूर्ण नवनवीन संकल्पनांची नियोजनबध्द आखणी करुन त्या प्रभावीपणे राबवित शासकीय योजना लोकाभिमुख होण्याकरिता चाकोरी बाहेर जाऊन अविश्रांत परिश्रम घेतलेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि सद्या नोंदणी महानगर, पुणे या पदावर बदली झालेले अनिल कवडे यांना महाराष्ट्र शासनाने 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी गौरव पुरस्काराने' सन्मानित केले. दीपस्तंभ ठरलेल्या त्यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध....

जिल्हाधिकारी समाजाच्या सर्व स्तरामध्ये पोहोचले तर शासकीय योजना वनवासी दुर्गम भागातही पोहोचणे सुकर होते, हे जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांनी स्वकृतीतून दाखवून दिले. नगर जिल्हयातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानने आयोजित केलेले गर्भगिरीतील पहिले नाथ संमेलन, किर्तन-प्रवचनादी अखंड हरिनाम सप्ताहाचे सोहळे, मराठी शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, शेतकरी गट, अशा अनेकविध स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी ३०० च्या वर दौरे करुन मानवी जीवनमुल्ये व संस्काराची गरज प्रतिपादन करताना शासकीय योजनांमधील लोकसहभागात लोककल्याण सामावलेले आहे, हे त्यांनी पटवून दिले. 

समाजाभिमुख योजनांमधून चांगली सुव्यवस्था अनुभवायला मिळणार आहे. शाश्वत आनंद लाभणार आहे. सामाजिक समरसतेतून आर्थिक समानता येणार असल्याने त्याकरिता आचार व विचारांची समानता आवश्यक आहे. पाऊस पडण्याचे प्रमाण आपण बदलवू शकत नसलो तरी पडलेल्या पावसाचे पाणी जिरवणे, मुरवणे - पाण्याची गळती रोखणे आपल्या हाती आहे. मातीची सकसता कायम ठेवणेही आपल्या हाती आहे. पाण्याच्या उपलब्धते आधारे पीक पध्दती ठरवा. सकस चाऱ्याची निर्मिती करुन दुधाचे उत्पादन वाढवा. अंगणवाड्यामधील मुले कुपोषित राहणार नाहीत, याची काळजी घ्या.

पुस्तकी शिक्षणापेक्षा आनंददायी कृतीयुक्त अध्ययन पध्दतीचा अवलंब करा. आपला जिल्हा कृषीप्रधान असल्याने कृषी व पशुसंवर्धनावर भर द्या. कचऱ्यातून खत निर्मितीचा उपक्रम राबवा. स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छतेची सप्तपदी घरोघरी पोहोचवा. स्त्रीभ्रृणहत्या करण्याचे पाप करु नका. मुलींना वाचवा व शिकवा. व्यसनमुक्त जीवन जगा, आपल्याकडून कोणाचीही फसवणूक होणार नाही, याची डोळयात तेल घालून काळजी घ्या, असे मौलिक सल्ले मोठ्या खुबीने देण्याचे कसब जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी साधल्यामुळेच ते शासकीय योजनांना वाढता लोकसहभाग मिळवण्यात यशस्वी झाले.

आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा व जलसंवर्धन, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सद‌्भावना जागृती, विविध शासकीय उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, घन कचरा व्यवस्थापन, पाणी टंचाई व हिरवा चारा प्रकल्प, मोबाईल ॲप असे अनेकविध उपक्रम जिल्हाभर राबवत त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा जिल्हयावर उमटवला. उच्च जीवनमूल्यांचा अंगीकार करण्याची प्रेरणा विविध शासकीय बैठका व चर्चासत्रांमधून दिली. जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयात ग्रामसभा, घोंगडी बैठका, रॅली, मेळावे या माध्यमातून जनजागृती केली. त्यामुळे जिल्हयातील २७९ गावांमधून १४,६४८ कामे हाती घेण्यात आली. या कामांनी जिल्हयातील पाणीसाठ्यात ५९,३३४ टीसीएम अतिरिक्त वाढ करण्याची कामगिरी बजावली. १.१८ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले. चारा व फळबागा उत्पादनात वाढ होऊन पर्यावरणीय फायदे झाले. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने जिल्हयातील पाण्याच्या टँकरची संख्या घटली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. 

जलयुक्त शिवार योजनेच्या विशेष प्रयत्नांबद्दल नाशिक विभागात नगर जिल्हयाला प्रथम क्रमांकाचा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार मिळाला तर गांवपातळीवरील राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार कर्जत गावाला प्राप्त झाला, याचे संपूर्ण श्रेय श्री.कवडे यांनाच जाते. प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत नगर जिल्हयातील नगरपालिका व ग्रामपंचायत अशा एकूण ४७ ठिकाणी जलमापक यंत्रे बसवल्याने पाणी वापरानुसार पाणीपट्टी भरणे बंधनकारक होऊन पाणी वापरावर नियंत्रण आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आर्थिक सुसूत्रता व समन्वय निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला.

श्री.कवडे यांनी शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रशिक्षण आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम ठरवून प्रशासनात पारदर्शीपणा, गतीमानता, लोकाभिमुखता व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यावर भर दिला. त्याकरिता त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशिक्षण प्रबोधिनीची पायाभरणी केली. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना राहुरी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात उपग्रहाव्दारे सर्व्हेक्षण करुन मालमत्तेचे इंडेक्स व नकाशे तयार करण्याचे ठोस पाऊल उचलले. परिणामी नोंदणीकृत मालमत्तांची संख्या ७४५६ वरुन १२५४८ पर्यंत वाढलेली दिसली. महसूलात ३० ते ४५ % वाढ झाली. शहर सीमारेषा व विकास सीमारेषा निश्चित होऊन समतोल आणि समयबध्द विकास साधणे शक्य झाले.

शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, कृषी, पशुसंवर्धन आदी क्षेत्रात विकास योजना राबवताना त्याची अंमलबजावणी सोप्या पध्दतीने होण्यासाठी अनिल कवडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मोबाईल ॲप्लिकेशन निर्माण करण्यात आले. त्यामुळे सर्व मंजूर कामांची तपशीलवार सचित्र माहिती उपलब्ध होऊन कामांमध्ये लोकाभिमुखता निर्माण होण्यास मोठी मदत झाल्याचे स्पष्ट झाले. आनंददायी कृतीयुक्त अध्ययन पध्दती मुलांमधील अभ्यासाची भिती कमी करण्यास व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास उपयुक्त ठरली. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास ही पध्दती सहाय्यभूत ठरल्याने राज्यात सर्वाधिक संख्येने नगर जिल्हयातील १०७८ शाळांची प्रगत शाळा म्हणून निवड झाली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी तारांगण हा शैक्षणिक प्रकल्प कार्यान्वित करण्यातही श्री.कवडे अग्रेसर राहिले. या प्रकल्पात अवकाश निरीक्षणाची उपकरणे बसवून विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांची सखोल वैज्ञानिक माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शैक्षणिक पर्यटनस्थळ म्हणून आकारास येणाऱ्या या प्रकल्पाचे शिल्पकार अनिल कवडे ठरले आहेत. 

पोलीस यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचीही दक्षता श्री.कवडे यांनी जाणिवेने घेतली. पोलीस वाहनांना व्हेईकल ट्रेकींग प्रणाली बसवली. त्यामुळे वाहनांचे लोकेशन मिळून घटनास्थळी तात्काळ मदत पोहोचवणे शक्य होऊ लागले. अल्कोहोल प्रमाण तपासणीसाठी पोलीस दलाला "ब्रेथ ॲनालायझर" पुरवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होण्यास फार मदत झाली. ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनीमापक यंत्रही पुरवली. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची मदत घेवून हिरवा चारा व मुरघास प्रकल्प मार्गी लावला. हा प्रकल्प सीमारेषा तील पशुधनासाठी संजीवनी ठरला. शहराचा व जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याकरिता नगरमधील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे पदसिध्द अध्यक्ष या नात्याने संग्रहालयाच्या नूतनीकरणाचा विडा उचलून संग्रहालयातील दुर्मिळ कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि डिजिटलायझेशनचे काम पूर्ण करुन घेतले. अंगणवाडीतील कुपोषित बालकांवर वेळीच उपचार करण्याची खबरदारी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना वजनमाप यंत्रे पुरवली. त्यामुळे शाश्वत कुपोषणमुक्ती करणे शक्य झाले.

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान जिल्ह्यात राबवण्यासाठी श्री. कवडे यांनी घनकचऱ्याचे वैशिष्टयपूर्ण व्यवस्थापन केले. देवळालीप्रवरा, शिर्डी आणि कोपरगाव नगरपरिषद व बुरुडगाव ग्रामपंचायत क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांना घनकचरा पासबुक देण्याचा अभिनव उपक्रम राबवला. त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रदुषणाबाबत जागृती निर्माण होऊन ओला व सुका कचरा व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत झाली. विस्तारित समाधान योजने अंतर्गत जिल्हयातील ३६० महा-ई-सेवा केंद्रांव्दारे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ३,६५,७५७ दाखले दिले गेले.

जलयुक्त शिवार योजना, स्वच्छता अभियान, आधारकार्डाची नोंदणी, मतदार ओळखपत्र वाटप, बेटी बचाओ-बेटी पढाओ, योगदिन, कॅशलेस सुविधा हे विविध उपक्रम जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांनी प्रभावीपणे राबवण्यास प्रोत्साहन दिल्याने "जनतेला शासन आपल्या दारी" आल्याचे पहावयास मिळाले. श्री. कवडे यांच्या प्रेरणेने महसूल विभागातील एकूण १४०० अधिकारी व कर्मचारी यांनी अवयव आणि नेत्रदानाचा संकल्प करुन लोकांसमोर आदर्श उभा केला. रक्तदानातही लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला.

खादी ग्रामोद्योगाला चालना व आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून शासनाने सर्व शासकीय विभागांना आठवड्यातून एकदा खादीचा वापर करण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी सर्व प्रथम नगर जिल्हयाने श्री.कवडे यांच्या कृतीशील आदेशामुळे केली. महसूल विभागातील २३०० अधिकारी - कर्मचारी दर आठवडयातील सोमवारी खादीचा पोषाख वापरताना दिसतात. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सातबारा, ग्रंथालयाची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली. गतीमान, पारदर्शी व लोकाभिमुख प्रशासनासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम ठेवण्याची कामगिरी श्री.कवडे यांनी बजावली.

केंद्र व राज्य शासनाचे स्वच्छ भारत अभियान नगरच्या ऐतिहासीक भुईकोट किल्ला परिसरात प्रभावीपणे राबवले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध संस्था अशा एकूण ८००० जणांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा उपक्रम शहरातील प्रत्येक वार्डात राबवला. नगर जिल्हयातील राहुरी, देवळालीप्रवरा, राहाता, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा, पाथर्डी या ९ नगरपालिका क्षेत्रात १००% हागणदारी मुक्तीचे कार्य पार पाडले. पाणी टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी पाणी वाटपाचे कोटेकोर नियोजन करताना चारा टंचाईची सद्यस्थिती जाणून घेऊन जनावरांच्या ३९ छावण्या उघडल्या. त्याद्वारे ४८,३९९ जनावरे वाचवण्याचे पुण्यकार्य पार पाडले. जिल्हयासमोर १६ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट असताना प्रत्यक्षात १७.५ लक्ष वृक्ष लागवड करुन त्यांच्या देखभालीचेही प्रमाण उत्तम ठेवण्यात यश मिळवले.

"बेटी बचाओ - बेटी पढाओ" हा उपक्रम जिल्ह्यामध्ये प्रभावीप्रणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील किर्तनकारांची कार्यशाळा घेऊन श्री. कवडे यांनी केलेल्या जनप्रबोधनामुळे २०१४-१५ मध्ये असलेले स्त्रीजन्मदराचे प्रती हजारी असलेले ९१४ हे प्रमाण २०१६-१७ मध्ये प्रती हजारी ९२७ वर पोहोचले. जिल्हाधिकारी श्री. कवडे यांनी जिल्ह्याचा भौगोलिक, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्व स्तराचा बारकाईने अभ्यास करत सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनातून नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवले. यासाठी त्यांनी जिल्हावासियांचीही साथ मिळविली.

लोकाभिमुख प्रशासनासाठी शासकीय अधिकारीही लोकांशी समरस झाले पाहिजेत, हे कृतीतून दाखवून देणाऱ्या जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या पाठीवर महाराष्ट्र शासनाने शाबासकीची थाप देत "उत्कृष्ट जिल्हाधिकारी गौरव पुरस्कार" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान केला. या पुरस्काराचे जिल्हाभरातून स्वागत होऊन अनिल कवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. नित्यनैमित्तीक कामकाज पूर्ण करताना स्वयंस्फूर्तीने अनेकविध क्षेत्रात लोकोपयोगी कार्य करता येते, हे जिल्हाधिकारी श्री.कवडे यांनी जिल्हयास दाखवून देत कार्याचा दीपस्तंभच सर्वांसमोर उभा केला. त्यांच्या बहुपयोगी व दिर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या कार्यास सलाम !

लेखक - मिलिंद सदाशिव चवंडके, पत्रकार

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate