অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इनपूट टॅक्‍स क्रेडिट

इनपूट टॅक्‍स क्रेडिट

  1. "इनपूट टॅक्‍स" म्हणजे काय?
  2. रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेल्या GSTला इनपूट टॅक्‍स मानता येते का?
  3. इनपूट वस्तू/माल (Input goods), इनपूट सेवा, आणि/किंवा भांडवली वस्तू/माल यावर अदा केलेला कर (CGST / IGST / SGST) इनपूट टॅक्‍समध्ये समाविष्ट असतो का?
  4. वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यावर आकारलेल्या सर्व इनपूट टॅक्‍सचा लाभ घेण्याची GST अंतर्गत अनुमती आहे का?
  5. ITCचा लाभ प्राप्त करून घेण्यास कोणत्या अटी आवश्यक आहेत?
  6. जेथे एका बीजकातील वस्तू/माल एकगठ्ठा किंवा विलगपणे (lots or instalments) प्राप्त होतात, तेव्हा नोंदणीप्राप्त करपात्र व्यक्‍तीला इनपूट क्रेडिट टॅक्‍सचा (ITC) लाभ घेण्याचा हक्‍क कधी प्राप्त होईल?
  7. पुरवठयासाठी पुरवठाकर्त्याला करासह मोबदला अदा न करता व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकते का?
  8. बीजक निर्गमित  केलेल्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत करासह मोबदला अदा केला नाहीतर नोंदणीकृत व्यक्‍तीने घेतलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे (ITC) काय होईल?
  9. करपात्र व्यक्‍तीच्या खेरीज अन्‍य व्यक्‍तीकडे जेव्हा वस्तू/मालाची पोचवणी करण्यात येते, तेव्हा ITC चा लाभ कोणाला प्राप्त होईल? ("देयक प्राप्तकर्ता (bill to) - "पुरवठा प्राप्तकर्ता" (ship to) अशा परिस्थितीत).
  10. इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ प्राप्त करून घेण्याची कालमर्यादा काय आहे आणि त्याची कारणे काय आहेत?
  11. आयकर अधिनियम, 1961 च्या तरतूदींतर्गत जेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती भांडवली मालाच्या किमतीतील कर घटकावर घसा-याचा (depreciation) दावा करते, अशा बाबतीत ITC चा लाभ दिला जातो का?
  12. करयोग्य वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी वापरलेल्या प्रत्येक कच्च्या मालावर अदा केलेल्या कराचा लाभ (Credit) GST अंतर्गत अनुज्ञेय आहे का?
  13. एक करपात्र व्यक्‍ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करते. सदर व्यक्‍तीने त्याच्या कार्यकारी संचालकांसाठी वाहनाची खरेदी केली. तर या व्यक्‍तीला वाहन खरेदीवर अदा करण्यात आलेल्या GST बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येतो का?
  14. काहीवेळा वस्तू/माल विविध कारणांमुळे नष्ट होतो किंवा गहाळ होतो?अशा वस्तू/मालाच्या प्रमाणात व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेऊ शकते का?
  15. नोंदणीकृत व्यक्‍तीला व्यावसायिक हेतूने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामात वापरलेल्या वस्तू/माल किंवा सेवां बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेता येते का?
  16. नवीन नोंदणीप्राप्त झालेल्या व्यक्‍तीची इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी (ITC) पात्रता काय आहे?
  17. एक व्यक्‍ती 1 ऑगस्ट, 2017 रोजी करपात्र होते, आणि 15 ऑगस्ट, 2017 रोजी नोंदणी प्राप्त करून घेते. तर सदर व्यक्‍ती कच्च्या मालाच्या साठ्यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी कोणत्या दिनांकापासून पात्र ठरणार? (क) 1 ऑगस्ट, 2017.(ख) 31 जुलै,2017. (ग) 15 ऑगस्ट, 2017.(घ) ती व्यक्‍ती भूतपूर्व कालावधीसाठी लाभ घेऊ शकत नाही.
  18. ऐच्छिक नोंदणी प्राप्त करून घेतलेल्या व्यक्‍तीची कच्च्या मालाच्या साठयावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी पात्रता काय आहे?
  19. नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीच्या संस्थापनेत परिवर्तन घडून आल्यास, अशा बाबींमध्ये इनपूट टॅक्‍सची पात्रता काय असेल?
  20. जेव्हा करपात्र व्यक्‍ती प्राप्त झालेल्या वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दो-हींचा उपयोग करयोग्य आणि करयोग्य नसलेल्या पुरवठ्यांसाठी करते, तेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट उपलब्ध केले जाते का?
  21. केवळ करयोग्य पुरवठा करण्यासाठी वस्तू/माल किंवा सेवा किंवा दो-हीं यावर इनपूट टॅक्‍स क्रेडिट अनुज्ञेय केले, तर या बाबीमुळे करमुक्‍त पुरवठा जेव्हा निर्यात केला जातो त्यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा तोटा होणार नाही का?
  22. क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्याच्या उद्देशाने निम्ननिर्देशित बाबींपैकी कोणत्या बाबीचा करयोग्य पुरवठा परिगणित करताना समावेश केला आहे? (क) शुन्‍य दर पुरवठा; (ख) करमुक्‍त पुरवठा; (ग) कि दोन्‍ही?
  23. जेव्हा करपात्र व्यक्‍ती प्राप्त झालेल्या वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा उपयोग अंशत: व्यावसायिक प्रयोजनासाठी करते आणि अंशत: इतर प्रयोजनासाठी करते, तेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट उपलब्ध केले जाते का?
  24. संयुक्‍त कर (Compounding Scheme) आधारित कर अदा करणा-या एका व्यक्‍तीने संयुक्‍त कराची सीमित मर्यादा पार केली आणि नियमित करपात्र व्यक्‍ती झाला, तर त्याला इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येईल का? आणि जर असे असेल तर कोणत्या दिनांकापासून?
  25. बँकिंग कंप-याबाबत विशेष तरतुदी आहेत का?
  26. "श्री.अ" ही नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती संयुक्‍त कर योजनेंतर्गत (composition scheme) अंतर्गत 30 जुलै, 2017 पर्यंत कर अदा करीत होती. तथापि 31 जुलै, 2017 पासून "श्री.अ" ही व्यक्‍ती नियमित कर योजनेतंर्गत  कर अदा करण्यास पात्र झाली. तर ती व्यक्‍ती ITC साठी पात्र आहे का?
  27. "श्री.ब" यांनी दिनांक 5 जून, 2017 रोजी ऐच्छिक नोंदणीसाठी अर्ज केला आणि दिनांक 22 जून, 2017 रोजी नोंदणी प्राप्त झाली. तर "श्री.ब" कोणत्या तारखेला कच्च्या मालाच्या साठयावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिट साठी पात्र ठरतील?
  28. नोंदणीकृत व्यक्‍ती जी संयुक्‍त कर योजनेचा पर्याय निवडते, किंवा त्या व्यक्‍तीने केलेला वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दोन्‍हीचा पुरवठा संपूर्णत: करमुक्‍त होतो, तेव्हा त्या व्यक्‍तीने उपभोगलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे काय होईल?
  29. इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा उपभोग घेण्यासाठी कालावधीवर कोणतेही निर्बंध आहेत का?
  30. प्राप्तकर्त्याने सादर केलेले आवक पुरवठ्यांचे तपशील, पुरवठाकर्त्याने त्याच्या वैध विवरणात सादर केलेले जावक पुरवठ्याचे तपशील एकमेकांशी जुळले नाही तर काय होईल?
  31. केवळ जुळल्यानंतर इनपूट टॅक्‍स क्रेडिट अनुज्ञेय होईल का?
  32. तात्पुरते (provisionally) अनुज्ञेय केलेले इनपूट टॅक्‍स क्रेडिट सर्व दायित्वांच्या (liabilities) अधिदानासाठी वापरता येते का?
  33. इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्यात आलेल्या भांडवली वस्तू/मालाचा करपात्र व्यक्‍तीने पुरवठा केला तर करावर त्याचा काय परिणाम होईल?
  34. नोंदणीकृत व्यक्‍तीने इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतलेल्या भांडवली वस्तू/मालाचा पुरवठा केला तर कर अदायगी कशी करावी लागेल?

"इनपूट टॅक्‍स" म्हणजे काय?

इनपूट टॅक्‍स म्हणजे केंद्रीय कर (CGST), राज्य कर (SGST), एकात्मिक कर (IGST) किंवा केंद्रशासित प्रदेश कर (UTGST), जो नोंदणीकृत व्यक्‍तीला करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या किंवा दो-हींच्या पुरवठ्यांवर आकारला जातो. यामध्ये रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेला कर आणि वस्तूंच्या आयातीवर आकारलेले एकात्मिक कर (IGST), वस्तू/माल आणि सेवा कर यांचा समावेश आहे. संयुक्‍त कर आकारणी अंतर्गत अदा केलेला कर यात अंतर्भूत नाही.

रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेल्या GSTला इनपूट टॅक्‍स मानता येते का?

होय. इनपूट टॅक्‍सच्या व्याख्येत रिव्हर्स चार्ज अंतर्गत "देय कर" अंतर्भूत आहे.

इनपूट वस्तू/माल (Input goods), इनपूट सेवा, आणि/किंवा भांडवली वस्तू/माल यावर अदा केलेला कर (CGST / IGST / SGST) इनपूट टॅक्‍समध्ये समाविष्ट असतो का?

होय, इनपूट टॅक्‍समध्ये इनपूट वस्तू/माल, इनपूट सेवा, आणि/किंवा भांडवली वस्तू/माल यावर अदा केलेला कर (IGST / CGST / SGST) समाविष्ट असतो. भांडवली मालावरही अदा केलेल्या कराचा लाभ एक रक्‍कमी उपभोगण्याची अनुमती आहे.

वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यावर आकारलेल्या सर्व इनपूट टॅक्‍सचा लाभ घेण्याची GST अंतर्गत अनुमती आहे का?

अन्‍य अटीं आणि निर्बंधांच्या अधीन राहून नोंदणीकृत व्यक्‍ती त्याला करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यावर आकारण्यात आलेल्या इनपूट टॅक्‍सचा लाभ घेण्यास पात्र आहे, जो पुरवठा व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसाय वृद्धीसाठी वापरण्यात येतो किंवा वापरण्याचा हेतू असतो.

ITCचा लाभ प्राप्त करून घेण्यास कोणत्या अटी आवश्यक आहेत?

ITCचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीने खालील चार अटींची पूर्तता केली पाहिजे.  (क) नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीच्या ताब्यात कर बीजक (tax invoice) किंवा डेबिट नोट किंवा विहित केल्यानुसार असे इतर कर अदा केलेले दस्तऐवज असले पाहिजेत;  (ख) करपात्र व्यक्‍तीला वस्तू/माल आणि/किंवा सेवांची प्राप्ती होणे आवश्यक आहे; (ग) पुरवठाकर्त्याने पुरवठ्यावर आकारण्यात आलेला कर शासनाला प्रत्यक्ष अदा केला पाहिजे; आणि (घ) करपात्र व्यक्‍तीने कलम 39 अंतर्गत विवरण सादर केले असले पाहिजे.

जेथे एका बीजकातील वस्तू/माल एकगठ्ठा किंवा विलगपणे (lots or instalments) प्राप्त होतात, तेव्हा नोंदणीप्राप्त करपात्र व्यक्‍तीला इनपूट क्रेडिट टॅक्‍सचा (ITC) लाभ घेण्याचा हक्‍क कधी प्राप्त होईल?

त्या बीजकातील मालाचा अंतिम गठ्ठा किंवा अंतिम विलग भाग (last lot or instalment) प्राप्त झाल्यानंतर, नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेऊ शकते.

पुरवठयासाठी पुरवठाकर्त्याला करासह मोबदला अदा न करता व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकते का?

होय, प्राप्तकर्ता इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकतो. परंतु प्राप्तकर्त्याने बीजक निर्गमित  केलेल्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत करासह मोबदला अदा करणे आवश्यक आहे. सदर अट लागू नाही जेथे रिव्हर्स चार्ज आधारित कर अदा केला जातो.

बीजक निर्गमित  केलेल्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत करासह मोबदला अदा केला नाहीतर नोंदणीकृत व्यक्‍तीने घेतलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे (ITC) काय होईल?

इनपूट टॅक्‍स क्रेडिटची (ITC) रक्‍कम  व्यक्‍तीच्या उत्पादन कर दायित्वामध्ये जोडली जाईल. त्याला व्याजही अदा करणे आवश्यक असेल. तथापि मोबदला आणि कर यांच्या अधिदानानंतर (payment) सदर व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) पुन्‍हा घेता येईल.

करपात्र व्यक्‍तीच्या खेरीज अन्‍य व्यक्‍तीकडे जेव्हा वस्तू/मालाची पोचवणी करण्यात येते, तेव्हा ITC चा लाभ कोणाला प्राप्त होईल? ("देयक प्राप्तकर्ता (bill to) - "पुरवठा प्राप्तकर्ता" (ship to) अशा परिस्थितीत).

सदर करपात्र व्यक्‍तीच्या सूचनेवरून वस्तू/मालाची पोच त्रयस्थ व्यक्‍तीकडे केली जाते, तेव्हा नोंदणीकृत व्यक्‍तीला वस्तू किंवा माल प्राप्त झाला असे मानण्यात येईल. ज्याच्या आदेशानुसार वस्तू किंवा मालाची पोचवणी त्रयस्थ व्यक्‍तीला करण्यात आली, त्या व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ प्राप्त होईल.

इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ प्राप्त करून घेण्याची कालमर्यादा काय आहे आणि त्याची कारणे काय आहेत?

नोंदणीकृत व्यक्‍तीला वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी निर्गमित  केलेल्या कोणतेही बीजक किंवा डेबिट नोट संबंधी इनपूट टॅक्‍स क्रेडिट, कलम 39 अंतर्गत वार्षिक विवरण दाखल करावयाच्या देय तारखेनंतर, ज्या आर्थिक वर्षाशी संबंधित सदर बीजक/बीजकाशी संबंधित डेबिट नोट आहे, त्या आर्थिक वर्ष समाप्तीनंतर येणारा आगामी सप्टेंबर महिना किंवा वार्षिक विवरण दाखल केल्याची तारीख, यापैकी जे अगोदर असेल ते, त्यानंतर इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येणार नाही. तरी, इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेण्यासाठी सर्वात जास्त कालमर्यादा आगामी आर्थिक वर्षातील 20 ऑक्‍टोबर आहे किंवा वार्षिक विवरण दाखल केल्याची तारीख, यापैकी जी अगोदर असेल ती आहे. या निर्बंधाचे मूलभूत कारण असे आहे की आगामी आर्थिक वर्षातील सप्टेंबर महिन्‍यानंतर विवरणपत्रात बदल करण्याची अनुमती नाही. तसेच जर वार्षिक विवरण सप्टेंबर महिन्‍याच्या अगोदर दाखल झाले असले तर, वार्षिक विवरणपत्र दाखल केल्याच्या तारखेनंतर कोणताही बदल करता येत नाही.

आयकर अधिनियम, 1961 च्या तरतूदींतर्गत जेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती भांडवली मालाच्या किमतीतील कर घटकावर घसा-याचा (depreciation) दावा करते, अशा बाबतीत ITC चा लाभ दिला जातो का?

ज्याबाबत घसाऱ्याचा दावा केला आहे त्या उपरोक्‍त कर घटकावर इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ दिला जाणार नाही.

करयोग्य वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी वापरलेल्या प्रत्येक कच्च्या मालावर अदा केलेल्या कराचा लाभ (Credit) GST अंतर्गत अनुज्ञेय आहे का?

होय, कायद्यात दिलेली काही बाबींची लहान यादी वगळता, सर्व बाबींवर लाभ (credit) अनुज्ञेय आहे. यादीमध्ये प्रामुख्याने व्यक्तिगत उपभोगाच्या बाबींचा समावेश आहे, कच्च्या मालाचा वापर ज्याव्‍दारे परिणामत: स्थिर मालमत्तेची निर्मिती होते (कारखाना व यंत्रसामग्री वगळून), दूरसंचरण मनोरे (telecommunication towers), कारखा-याच्या बाहेर घातलेली पाईप लाईन, इत्यादी आणि कराच्या चुकवणूकीचा तपास लागल्यानंतर परिणामत: अदा केलेला कर.

एक करपात्र व्यक्‍ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करते. सदर व्यक्‍तीने त्याच्या कार्यकारी संचालकांसाठी वाहनाची खरेदी केली. तर या व्यक्‍तीला वाहन खरेदीवर अदा करण्यात आलेल्या GST बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येतो का?

नाही. जर करपात्र व्यक्‍ती प्रवासी परिवहन किंवा मालवाहतूक व्यवसायात असल्यास किंवा त्या वाहनांचा प्रशिक्षणादी सेवा पुरविण्यासाठी वापर करत असेल तरच त्या करपात्र व्यक्‍तीला वाहनांवर इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ उपभोगता येतो.

काहीवेळा वस्तू/माल विविध कारणांमुळे नष्ट होतो किंवा गहाळ होतो?अशा वस्तू/मालाच्या प्रमाणात व्यक्‍ती इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेऊ शकते का?

नाही, गहाळ झालेल्या, चोरीला गेलेल्या, नष्ट झालेल्या किंवा निकाली काक्‍लेल्या वस्तू/मालाच्या बाबत व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेता येत नाही. भेटवस्तू (gifts) किंवा विनामूल्य नमुने (free smaples) म्हणून देण्यात आलेल्या वस्तू/मालावर इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) अनुज्ञेय नाही.

नोंदणीकृत व्यक्‍तीला व्यावसायिक हेतूने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामात वापरलेल्या वस्तू/माल किंवा सेवां बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेता येते का?

नाही. कारखाना आणि यंत्रसामग्री वगळता, व्यक्‍तीने स्थिर मालमत्तेच्या उभारणीसाठी वापरलेल्या वस्तू/माल किंवा सेवांवर इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) अनुज्ञेय नाही. कारखाना आणि यंत्रसामग्री मध्ये पायाव्‍दारे किंवा संरचनेच्या आधाराने जमिनीला पक्‍की जोडलेली उपकरणे/साधने, साधन सामग्री, आणि यंत्रसामग्री याचा समावेश आहे, आणि इतर गोष्टींबरोबर जमीन आणि इमारत वगळण्यात आले आहे.

नवीन नोंदणीप्राप्त झालेल्या व्यक्‍तीची इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी (ITC) पात्रता काय आहे?

नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेली व्यक्‍ती, नोंदणी मान्‍य झाल्याच्या दिनांकापूर्व लगतच्या दिवशी ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा आणि अर्ध-उत्पादित किंवा उत्पादित वस्तू/मालाच्या साठ्यात समाविष्ट असलेला कच्चा माल, यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकते. जर व्यक्‍ती नोंदणीसाठी पात्र झाली आणि त्या व्यक्‍तीने नोंदणीसाठी पात्र झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी अर्ज दाखल केला असेल तर, ज्या दिनांकापासून ती व्यक्‍ती करपात्र होते, त्या दिनांकापूर्व लगतच्या दिवशी ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा आणि अर्ध-उत्पादित किवा उत्पादित वस्तू/मालाच्या साठ्यात समाविष्ट असलेला कच्चा माल, यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेऊ शकते.

एक व्यक्‍ती 1 ऑगस्ट, 2017 रोजी करपात्र होते, आणि 15 ऑगस्ट, 2017 रोजी नोंदणी प्राप्त करून घेते. तर सदर व्यक्‍ती कच्च्या मालाच्या साठ्यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी कोणत्या दिनांकापासून पात्र ठरणार? (क) 1 ऑगस्ट, 2017.(ख) 31 जुलै,2017. (ग) 15 ऑगस्ट, 2017.(घ) ती व्यक्‍ती भूतपूर्व कालावधीसाठी लाभ घेऊ शकत नाही.

31 जुलै,2017.

ऐच्छिक नोंदणी प्राप्त करून घेतलेल्या व्यक्‍तीची कच्च्या मालाच्या साठयावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी पात्रता काय आहे?

ऐच्छिक नोंदणी प्राप्त करून घेतलेली व्यक्‍ती, नोंदणी दिनांकानंतर लगेच येणा-या दिवशी ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा, कच्च्या मालाचा समावेश असलेला अर्ध-उत्पादित माल आणि उत्पादित मालाचा साठा यावरील इनपूट टॅक्‍सच्या लाभासाठी ( ITC) साठी पात्र ठरेल.

नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीच्या संस्थापनेत परिवर्तन घडून आल्यास, अशा बाबींमध्ये इनपूट टॅक्‍सची पात्रता काय असेल?

दायित्वांच्या हस्तांतरणासाठी तपशीलवार व अचूक तरतूद आहे या अटीच्या अधीन राहून, नोंदणीकृत व्यक्‍तीला त्याच्या इलेक्‍ट्रॉनिक  क्रेडिट लेजरमधील "न वापरता राहिलेले इनपूट टॅक्‍स क्रेडिट" नवीन व्यक्‍ती/संस्थेस हस्तांतरित करण्याची अनुमती देण्यात येईल.

जेव्हा करपात्र व्यक्‍ती प्राप्त झालेल्या वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दो-हींचा उपयोग करयोग्य आणि करयोग्य नसलेल्या पुरवठ्यांसाठी करते, तेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट उपलब्ध केले जाते का?

केवळ करयोग्य पुरवठ्याशी संबंधित वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दोन्‍ही यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा लाभ नोंदणीप्राप्त करपात्र व्यक्‍तीला घेता येईल. योग्य लाभ परिगणित करण्याची पद्धती नियमांव्‍दारे विहित करण्यात येईल.

केवळ करयोग्य पुरवठा करण्यासाठी वस्तू/माल किंवा सेवा किंवा दो-हीं यावर इनपूट टॅक्‍स क्रेडिट अनुज्ञेय केले, तर या बाबीमुळे करमुक्‍त पुरवठा जेव्हा निर्यात केला जातो त्यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा तोटा होणार नाही का?

इनपूट टॅक्‍स क्रेडिट अनुज्ञेय करण्याच्या हेतूने शुन्‍य दर पुरवठ्यांचा समावेश करयोग्य पुरवठ्यात करण्यात आला आहे. शुन्‍य दर पुरवठ्याच्या व्याप्तीची तरतूद एकात्मिक वस्तू आणि सेवा अधिनियमात (Integrated Goods and Services Tax Act) करण्यात आली आहे, यामध्ये करमुक्‍त पुरवठ्यांचाही समावेश आहे.

क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्याच्या उद्देशाने निम्ननिर्देशित बाबींपैकी कोणत्या बाबीचा करयोग्य पुरवठा परिगणित करताना समावेश केला आहे? (क) शुन्‍य दर पुरवठा; (ख) करमुक्‍त पुरवठा; (ग) कि दोन्‍ही?

शुन्‍य दर पुरवठा.

जेव्हा करपात्र व्यक्‍ती प्राप्त झालेल्या वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा उपयोग अंशत: व्यावसायिक प्रयोजनासाठी करते आणि अंशत: इतर प्रयोजनासाठी करते, तेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट उपलब्ध केले जाते का?

केवळ व्यावसायिक प्रयोजनासाठी केलेल्या पुरवठयाशी संबंधित वस्तू/माल आणि/किंवा सेवा यावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला घेता येईल. योग्य लाभ परिगणित करण्याची पद्धती नियमांव्‍दारे विहित करण्यात येईल.

संयुक्‍त कर (Compounding Scheme) आधारित कर अदा करणा-या एका व्यक्‍तीने संयुक्‍त कराची सीमित मर्यादा पार केली आणि नियमित करपात्र व्यक्‍ती झाला, तर त्याला इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेता येईल का? आणि जर असे असेल तर कोणत्या दिनांकापासून?

ती व्यक्‍ती, संयुक्‍त कर आधारित कर अदा करण्यास पात्र न राहिलेल्या दिनांकापूर्व लगतच्या दिवसापासून, ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा आणि अर्ध-उत्पादित/उत्पादित मालाच्या साठयात समाविष्ट असलेला कच्चा माल आणि भांडवली माल (विहित टक्‍केवारी बिंदूने (percentage point) कमी केलेला) या बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेऊ शकते. योग्य लाभ परिगणित करण्याची पद्धती नियमांव्‍दारे विहित करण्यात येईल.

बँकिंग कंप-याबाबत विशेष तरतुदी आहेत का?

विहित सेवांचा पुरवठा करण्यात कार्यरत असलेल्या बँकिंग कंपनी किंवा वित्तीय संस्था नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीसह, यांना योग्य प्रमाणात करदेयतेच्या (ITC) लाभाचा वापर करता येईल किंवा योग्य इनपूट टॅक्‍स क्रेडिटच्या 50% लाभ घेता येईल.

"श्री.अ" ही नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती संयुक्‍त कर योजनेंतर्गत (composition scheme) अंतर्गत 30 जुलै, 2017 पर्यंत कर अदा करीत होती. तथापि 31 जुलै, 2017 पासून "श्री.अ" ही व्यक्‍ती नियमित कर योजनेतंर्गत  कर अदा करण्यास पात्र झाली. तर ती व्यक्‍ती ITC साठी पात्र आहे का?

"श्री. अ" दिनांक 30 जुलै 2017 रोजी ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा आणि अर्ध-उत्पादित/उत्पादित मालाच्या साठयात समाविष्ट असलेला कच्चा माल आणि भांडवली माल (विहित टक्‍केवारी बिंदूने (percentage point) कमी केलेला) या बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) घेण्यास पात्र आहे.

"श्री.ब" यांनी दिनांक 5 जून, 2017 रोजी ऐच्छिक नोंदणीसाठी अर्ज केला आणि दिनांक 22 जून, 2017 रोजी नोंदणी प्राप्त झाली. तर "श्री.ब" कोणत्या तारखेला कच्च्या मालाच्या साठयावरील इनपूट टॅक्‍स क्रेडिट साठी पात्र ठरतील?

"श्री. ब" दिनांक 21 जून, 2017 रोजी ताब्यात असलेला कच्च्या मालाचा साठा आणि अर्ध-उत्पादित/उत्पादित मालाच्या साठयात समाविष्ट असलेला कच्चा माल बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिटसाठी (ITC) पात्र ठरतो. "श्री.ब" यांना भांडवली वस्तू/मालाच्या बाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेता येणार नाही.

नोंदणीकृत व्यक्‍ती जी संयुक्‍त कर योजनेचा पर्याय निवडते, किंवा त्या व्यक्‍तीने केलेला वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दोन्‍हीचा पुरवठा संपूर्णत: करमुक्‍त होतो, तेव्हा त्या व्यक्‍तीने उपभोगलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे काय होईल?

नोंदणीप्राप्त करपात्र व्यक्‍तीला पर्याय निवडलेल्या दिनांकापूर्व किंवा करमुक्‍तता दिनांकापूर्व लगतच्या दिवशी ताब्यात असलेला साठ्याबाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट समतुल्य रक्‍कम  अदा करावी लागेल. भांडवली मालाच्या बाबतीत विहित टक्‍केवारी बिंदूने (percentage point) कमी करून देय रक्‍कम  परिगणित केली जाईल. अधिदान इलेक्‍ट्रॉनिक  क्रेडिट लेजर मध्ये पुरेशी रक्‍कम  शेष असल्यास, इलेक्‍ट्रॉनिक  क्रेडिट लेजर मध्ये वर्ग करून किंवा इलेक्‍ट्रॉनिक  कॅश लेजर मध्ये वर्ग करून करता येईल. इलेक्‍ट्रॉनिक  क्रेडिट लेजर मध्ये काही शेष रक्‍कम  असल्यास ती रद्द होईल.

इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा उपभोग घेण्यासाठी कालावधीवर कोणतेही निर्बंध आहेत का?

नवीन नोंदणी, संयुक्‍त कर योजनेतून नियमित कर योजनेमध्ये बदल व करमुक्‍त पुरवठ्यातून करयोग्य पुरवठ्यामध्ये बदल इत्यादी प्रकरणात, संबंधित व्यक्‍तीला सदर पुरवठ्याशी संबंधित निर्गमित करण्यात आलेल्या कर बीजकाच्या दिनांकापासून एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्या व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिट उपभोगता येणार नाही.

प्राप्तकर्त्याने सादर केलेले आवक पुरवठ्यांचे तपशील, पुरवठाकर्त्याने त्याच्या वैध विवरणात सादर केलेले जावक पुरवठ्याचे तपशील एकमेकांशी जुळले नाही तर काय होईल?

दोन्‍ही पक्षांना विसंगती बाबत सूचित केले जाईल. जर विसंगती दुरुस्त केली नाही तर, ज्या महिन्‍यात सदर विसंगती कळविण्यात आली, त्या महिन्‍याच्या पुढील महिन्‍यातील प्राप्तकर्त्याच्या विवरणामध्ये उत्पादन कर दायित्वात (output liability) सदर रक्‍कम  जोडली जाईल.

केवळ जुळल्यानंतर इनपूट टॅक्‍स क्रेडिट अनुज्ञेय होईल का?

नाही. इनपूट टॅक्‍स क्रेडिट दोन महिन्‍यासाठी तात्पुरते अनुज्ञेय असते. पुरवठ्याचे तपशील प्रणालीव्‍दारे जुळविले जातात आणि संबंधित पुरवठाकर्ता आणि प्राप्तकर्ता यांना विसंगती कळविण्यात येतात. विसंगती तशीच राहिली, तर घेतलेले इनपूट टॅक्‍स क्रेडिट स्वयंचलनाने परत फिरविले जाईल.

तात्पुरते (provisionally) अनुज्ञेय केलेले इनपूट टॅक्‍स क्रेडिट सर्व दायित्वांच्या (liabilities) अधिदानासाठी वापरता येते का?

नाही, तात्पुरते अनुज्ञेय केलेले इनपूट टॅक्‍स क्रेडिट केवळ विवरणातील स्वयं-निर्धारित उत्पादन कर अधिदानासाठी वापरता येते.

इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्यात आलेल्या भांडवली वस्तू/मालाचा करपात्र व्यक्‍तीने पुरवठा केला तर करावर त्याचा काय परिणाम होईल?

इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा लाभ घेतलेल्या भांडवली वस्तू/मालाच्या पुरवठा किंवा कारखाना (plant) आणि यंत्रसामग्री (machinery) बाबतीत, भांडवली वस्तू/मालावर किंवा कारखाना आणि यंत्रसामग्रीवर घेतलेल्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटच्या समतुल्य रक्‍कम , जी रक्‍कम  याबाबत विहित करण्यात आलेल्या टक्‍केवारीच्या गुणानुसार कमी करण्यात आलेली आहे किंवा सदर भांडवली वस्तू/मालाच्या व्यवहार मूल्यावरील कर, यामध्ये जी जास्त असेल ती रक्‍कम  नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीला अदा करावी लागेल.

नोंदणीकृत व्यक्‍तीने इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतलेल्या भांडवली वस्तू/मालाचा पुरवठा केला तर कर अदायगी कशी करावी लागेल?

नोंदणीकृत व्यक्‍तीला इनपूट टॅक्‍स क्रेडिटच्या समतुल्य रक्‍कम , जी रक्‍कम  याबाबत विहित करण्यात आलेल्या टक्‍केवारीच्या गुणानुसार कमी करण्यात आलेली आहे किंवा व्यवहार मूल्यावरील कर, यामध्ये जी जास्त असेल ती रक्‍कम  अदा करावी लागेल. परंतु भाजलेल्या विटा (refractory bricks), साचे (moulds) आणि ठसे (dies), ठोकळे (jigs) आणि स्थायी सामग्री (fixtures) बाबतीत, जेव्हा या वस्तू भंगार म्हणून पुरविल्या जातात, तेव्हाव्यक्‍तीला व्यवहार मूल्यावर कर अदा करावा लागेल.

स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate