অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जॉब वर्क

जॉब वर्क

  1. जॉब वर्क म्हणजे काय?
  2. करपात्र व्यक्‍तीने जॉब वर्करला पाठविलेला माल "पुरवठा" मानला जाईल का आणि त्यावर GST कर दायित्व असेल का? कारण काय?
  3. जॉब वर्करला नोंदणी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे का?
  4. प्रमुख व्यक्‍तीच्या मालाचा पुरवठा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून थेट करण्यात आला, तर तो माल जॉब वर्करच्या एकूण उलाढालीत समाविष्ट करण्यात येईल का?
  5. प्रमुख व्यक्‍ती कच्चा माल/भांडवली माल स्वत:च्या कार्यस्थानी न आणता थेट जॉब वर्करच्या कार्यस्थानात पाठवू शकतो का?
  6. प्रमुख व्यक्‍ती वस्तू/माल स्वत:च्या कार्यस्थानाकडे न आणताजॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्या वस्तू/मालाचा थेट पुरवठा करू शकतोका?
  7. जॉब वर्करचे कार्यस्थान त्याचे अतिरिक्‍त व्यवसाय स्थान असल्याचे घोषित न करता, प्रमुख व्यक्‍ती जॉब वर्करच्या कार्यस्थानातून वस्तू/मालाचा थेट पुरवठा कोणत्या परिस्थितीत करू शकते?
  8. जॉब वर्करला पाठविण्यात आलेला कच्चा माल (Inputs)/भांडवली माल (Capital goods) याबाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) प्राप्त करण्यासाठी असलेल्या संबंधित तरतूदी कोणत्या आहेत?
  9. जेव्हा विहित कालावधीत कच्चा माल (Inputs) किंवा भांडवली माल (Capital goods) परत प्राप्त होत नाही किंवा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्याचा पुरवठा केला जात नाही, तेव्हा काय होते?
  10. काही भांडवली वस्तू/माल जसे ठोकळे (jigs) आणि स्थिर साहित्य/वस्तू (fixtures) त्यांच्या वापरानंतर निरुपयोगी होतात आणि सामान्‍यतः  भंगार म्हणून विकल्या जातात. जॉब वर्क तरतुदींमध्ये सदर बाबी कशा प्रकारे हाताळण्यात आलेल्या आहेत?
  11. जॉब वर्कच्या काळात निर्माण झालेला टाकाऊ माल (waste) आणि भंगार (scrap) कसे हाताळले जातात?
  12. संक्रमित (intermediate) वस्तू/माल देखील जॉब वर्कसाठी पाठविता येतो का?
  13. जॉब वर्क संबंधित योग्य लेखे ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे?
  14. जॉब वर्कच्या तरतुदी वस्तू/मालांच्या सर्व प्रवर्गांना लागू होतात का?
  15. प्रमुख व्यक्‍तीने जॉब वर्क तरतुदी अनुसरल्या पाहिजेत, हे बंधनकारक आहे का?
  16. जॉब वर्कर आणि प्रमुख व्यक्‍ती एकाच राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थित असले पाहिजेत का?

जॉब वर्क म्हणजे काय?

जॉब वर्क म्हणजे एका व्यक्‍तीने दुस-या नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीच्या मालकीच्या वस्तू/मालावर संस्करण किंवा प्रक्रिया करण्याचे स्वीकारलेले कार्य. जी व्यक्‍ती अन्‍य व्यक्‍तीच्या मालकीच्या वस्तू/मालावर संस्करण किंवा प्रक्रिया करते त्या व्यक्‍तीला जॉब वर्कर असे संबोधिले जाते आणि ज्या व्यक्‍तीच्या मालकीच्या वस्तू/माल असतो, त्या व्यक्‍तीला "प्रमुख" असे संबोधिले जाते. सुधारित अधिसूचना क्रमांक-214/86-सीई दिनांक 23 मार्च,

1986 मध्ये विहीत व्याख्येपेक्षा उपरोक्‍त अर्थ जास्त विस्तृत आहे. अधिसूचनेत जॉब वर्क कार्य याचा अर्थ ते "उत्पादन" मानले जाईल अशा पध्दतीने सुनिश्चित केला गेला आहे. अशा रीतीने जॉब वर्क शब्दाची व्याख्याच प्रस्तावित GST करप्रणालीत जॉब वर्क संबंधित मूलभूत कर-आकारणी पध्दतीत परिवर्तन दर्शवित आहे.

करपात्र व्यक्‍तीने जॉब वर्करला पाठविलेला माल "पुरवठा" मानला जाईल का आणि त्यावर GST कर दायित्व असेल का? कारण काय?

सदर बाब "पुरवठा"असे मानले जाईल कारण पुरवठ्यामध्ये पुरवठ्याच्या सर्व प्रकारांचा समावेश असतो उदा. विक्री, हस्तांतरण इत्यादी. तथापि नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती (प्रमुख), सूचना देऊन आणि याबाबत सदर विहित अटींच्या अधीन राहून, कोणताही कच्चा माल (inputs) आणि/किंवा भांडवली वस्तू/माल, कर अधिदान न करता, जॉब वर्कसाठी जॉब वर्करकडे आणि त्यानंतर तेथून अन्‍य जॉब वर्कर/वर्कर्स कडे पाठवू शकतो आणि जॉब वर्क पूर्ण झाल्यानंतर सदर कच्चा माल/भांडवली माल परत आणील किंवा अन्‍यथा सदर माल बाहेर पाठविल्याच्या 1 वर्ष/3 वर्षाच्या आत परत आणील किंवा जॉब वर्क पूर्ण झाल्यानंतर सदर कच्च्या मालाचा/भांडवली मालाचा पुरवठा करील किंवा अन्‍यथा सदर माल बाहेर पाठविल्याच्या 1 वर्ष/3 वर्षाच्या आत सदर मालाचा पुरवठा करील, जॉब वर्करच्या व्यवसायाच्या स्थानातून भारतामध्ये कर अदा करून किंवा निर्यातीसाठी कर अदा करून किंवा कर अदा न करता पुरवठा करील.

जॉब वर्करला नोंदणी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे का?

होय. जॉब वर्क हा सेवांचा पुरवठा असल्याने, पुरवठाकर्त्याची एकूण उलाढाल विहित सीमित मर्यादा पार करीत असेल तर त्याने नोंदणी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

प्रमुख व्यक्‍तीच्या मालाचा पुरवठा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून थेट करण्यात आला, तर तो माल जॉब वर्करच्या एकूण उलाढालीत समाविष्ट करण्यात येईल का?

नाही. प्रमुख व्यक्‍तीच्या एकूण उलाढालीत तो माल समाविष्ट केला जाईल. तथापि, जॉब वर्करने जॉब वर्कसाठी वापरलेल्या वस्तू/माल किंवा सेवांचे किंमत/मूल्य, जॉब वर्करने पुरविलेल्या सेवांच्या किमतीत/मूल्यात अंतर्भूत केले जाईल.

प्रमुख व्यक्‍ती कच्चा माल/भांडवली माल स्वत:च्या कार्यस्थानी न आणता थेट जॉब वर्करच्या कार्यस्थानात पाठवू शकतो का?

होय, प्रमुख व्यक्‍तीला असे करण्याची अनुमती आहे. या परिस्थितीत, कच्चा माल किंवा भांडवली माल यावर अदा केलेल्या कराचे इनपूट टॅक्‍स क्रेडिटही प्रमुख व्यक्‍ती वापरू शकते. कच्चा माल किंवा भांडवली माल अनुक्रमे एका वर्षात किंवा तीन वर्षात परत प्राप्त झाले पाहिजेत, असे न केल्यास मूळ व्यवहार "पुरवठा" मानला जाईल आणि त्यानुसार कर अदा करण्यास प्रमुख व्यक्‍ती जबाबादार असेल.

प्रमुख व्यक्‍ती वस्तू/माल स्वत:च्या कार्यस्थानाकडे न आणताजॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्या वस्तू/मालाचा थेट पुरवठा करू शकतोका?

होय. परंतु प्रमुख व्यक्‍तीने नोंदणीकृत नसलेल्या जॉब वर्करचे कार्यस्थान आपल्या व्यवसायाचे अतिरिक्‍त स्थान असल्याचे घोषित केले पाहिजे. जॉब वर्कर नोंदणीप्राप्त व्यक्‍ती असेल तर, जॉब वर्करच्या कार्यस्थानातून थेट वस्तू/मालाचा पुरवठा करता येतो. आयुक्‍त वस्तू/माल अधिसूचित करतील, अशा प्रकरणात जॉब वर्कसाठी पाठविलेला वस्तू/मालाचा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून थेट पुरवठा करता येईल.

जॉब वर्करचे कार्यस्थान त्याचे अतिरिक्‍त व्यवसाय स्थान असल्याचे घोषित न करता, प्रमुख व्यक्‍ती जॉब वर्करच्या कार्यस्थानातून वस्तू/मालाचा थेट पुरवठा कोणत्या परिस्थितीत करू शकते?

अतिरिक्‍त व्यवसाय स्थान असल्याचे घोषित न करता, प्रमुख व्यक्‍ती जॉब वर्करच्या कार्यस्थानातून वस्तू/मालाचा थेट पुरवठा दोन परिस्थितीत करू शकते, त्या म्हणजे जेथे जॉब वर्कर नोंदणीकृत करपात्र व्यक्‍ती असते किंवा जेथे प्रमुख व्यक्‍ती आयुक्‍तांनी अधिसूचित केलेल्या सदर वस्तू/मालाचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत आहे.

जॉब वर्करला पाठविण्यात आलेला कच्चा माल (Inputs)/भांडवली माल (Capital goods) याबाबत इनपूट टॅक्‍स क्रेडिट (ITC) प्राप्त करण्यासाठी असलेल्या संबंधित तरतूदी कोणत्या आहेत?

जॉब वर्करकडे पाठविलेला कच्चा माल (inputs) किंवा भांडवली माल (Capital goods) यावर अदा केलेल्या कराचा लाभ (ITC) घेण्यास प्रमुख व्यक्‍ती पात्र असेल, सदर कच्चा माल किंवा भांडवली माल त्याच्या व्यवसाय स्थानात प्राप्त झाल्यावर पाठविण्यात आलेला असेल किंवा प्रथम त्याच्या व्यवसाय स्थानात न आणता, सदर कच्चा माल किंवा भांडवली माल थेट जॉब वर्करकडे पाठविलेला असला तरीही. तथापि, सदर कच्चा माल किंवा भांडवली माल बाहेर पाठविल्यापासून एका वर्षाच्या कालावधीत किंवा तीन वर्षाच्या कालावधीत, जॉब वर्क पूर्ण झाल्यावर परत प्राप्त होणे आवश्यक आहे किंवा परिस्थितीनुसार जॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

जेव्हा विहित कालावधीत कच्चा माल (Inputs) किंवा भांडवली माल (Capital goods) परत प्राप्त होत नाही किंवा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्याचा पुरवठा केला जात नाही, तेव्हा काय होते?

जर विहित कालावधीत कच्चा माल किंवा भांडवली माल प्रमुख व्यक्‍तीला परत प्राप्त झाला नाही किंवा जॉब वर्करच्या कार्यस्थानातून त्याचा पुरवठा केला नाही, तर असे मानले जाईल की सदर कच्चा माल किंवा भांडवली माल प्रमुख व्यक्‍तीद्वारा जॉब वर्करला त्या दिवशी पुरविला गेला, जेव्हा प्रमुख व्यक्‍तीने पूर्वोक्‍त कच्चा माल किंवा भांडवली माल बाहेर पाठविला होता (किंवा जॉब वर्करला सदर माल प्राप्त झाल्याची तारीख जेथे कच्चा माल किंवा भांडवली माल जॉब वर्करच्या कार्यस्थानात थेट पाठविण्यात आला होता). परिणामत: प्रमुख व्यक्‍ती त्यानुसार कर अदा करण्यास जबाबदार असेल.

काही भांडवली वस्तू/माल जसे ठोकळे (jigs) आणि स्थिर साहित्य/वस्तू (fixtures) त्यांच्या वापरानंतर निरुपयोगी होतात आणि सामान्‍यतः  भंगार म्हणून विकल्या जातात. जॉब वर्क तरतुदींमध्ये सदर बाबी कशा प्रकारे हाताळण्यात आलेल्या आहेत?

भांडवली वस्तू/माल तीन वर्षात परत आणला पाहिजे ही अट साचे (moulds), ठसे (dies), ठोकळे (jigs) आणि स्थिर साहित्य/वस्तू (fixtures) किंवा हत्यारे/अवजारे (tools) यांना लागू नाही.

जॉब वर्कच्या काळात निर्माण झालेला टाकाऊ माल (waste) आणि भंगार (scrap) कसे हाताळले जातात?

जॉब वर्कर नोंदणीकृत असेल तर, कर अदा केल्यानंतर, जॉब वर्कर जॉब वर्कच्या काळात निर्माण झालेला टाकाऊ माल आणि भंगार यांचापुरवठा थेट त्याच्या कार्यस्थानातून करू शकतो. जर जॉब वर्कर नोंदणीकृत नसेल तर कर अदा केल्यानंतर प्रमुख व्यक्‍ती सदर बाबींचा पुरवठा करील.

संक्रमित (intermediate) वस्तू/माल देखील जॉब वर्कसाठी पाठविता येतो का?

होय. जॉब वर्कच्या प्रयोजनार्थ, कच्चा माल (inputs) या संज्ञेत प्रमुख व्यक्‍ती किंवा जॉब वर्कर यांनी कच्च्या मालावर केलेल्या उपचार किंवा प्रक्रियेमूळे निर्माण होणाऱ्या "संक्रमित वस्तू/माल" यांचा समावेश आहे.

जॉब वर्क संबंधित योग्य लेखे ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे?

कच्चा माल आणि भांडवली माल संबंधित जॉब वर्कचे योग्य लेखे ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी प्रमुख व्यक्‍तीची आहे.

जॉब वर्कच्या तरतुदी वस्तू/मालांच्या सर्व प्रवर्गांना लागू होतात का?

नाही. जॉब वर्क संबंधित तरतुदी तेव्हाच लागू होतात, जेव्हा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीचा करयोग्य वस्तू/माल पाठविण्याचा उद्देश असतो. अन्‍य शब्दात, या तरतुदी करमुक्‍त किंवा करयोग्य नसलेल्या वस्तू/मालाला किंवा जेव्हा माल पाठविणारी व्यक्‍ती नोंदणीकृत करपात्र नसून अन्‍य व्यक्‍ती असते, तेव्हा लागू होत नाहीत.

प्रमुख व्यक्‍तीने जॉब वर्क तरतुदी अनुसरल्या पाहिजेत, हे बंधनकारक आहे का?

नाही. प्रमुख व्यक्‍ती, GST अधिदानानंतर, विशेष कार्यपद्धतीचा अवलंब न करता, कच्चा माल किंवा भांडवली माल पाठवू शकते. अशा प्रकरणात, GSTच्या अधिदानावर जॉब वर्कर इनपूट टॅक्‍स क्रेडिट घेईल आणि प्रक्रियाकृत वस्तू/मालाचा पुरवठा करील (जॉब वर्क पूर्ण झाल्यानंतर).

जॉब वर्कर आणि प्रमुख व्यक्‍ती एकाच राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थित असले पाहिजेत का?

नाही, याची आवश्यकता नाही, कारण जॉब वर्क संबंधित तरतुदी IGST अधिनियम तसेच UTGST अधिनियमातही स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि म्‍हणून जॉब वर्कर आणि प्रमुख व्यक्‍ती एकाच राज्यात किंवा एकाच केंद्रशासित प्रदेशात स्थित असू शकतात किंवा भिन्न राज्यांत किंवा केंद्रशासित प्रदेशांत स्थित असू शकतात.

स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate