অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वस्तू आणि सेवा यांचे पुरवठा स्थान

वस्तू आणि सेवा यांचे पुरवठा स्थान

  1. GST अंतर्गत वस्तू/माल आणि सेवांच्या पुरवठा स्थानाची आवश्यकता आहे का?
  2. "पुरवठा स्थान" बाबतच्या तरतूदी वस्तू/माल आणि सेवा या संबंधी भिन्न का आहेत?
  3. व्यवहारात पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी कोणत्या प्रातिनिधीक बाबींचा किंवा अनुमानांचा (assumptions) वापर करता येईल?
  4. "B2B"(नोंदणीकृत व्यक्‍तीला केलेला पुरवठा) आणि "B2C" (नोंदणीकृत नसलेल्या व्यक्‍तीला केलेला पुरवठा) व्यवहाराच्या बाबतीत पुरवठ्याच्या स्थानासाठी वेगळे नियम असण्याची गरज काय ?
  5. वस्तू/माल काक्‍ल्यावर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  6. एका व्यक्‍तीला जेव्हां त्रयस्थ व्यक्‍तीच्या सांगण्यावरुन पुरवठादार मालाची पोच देतो तेव्हां पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  7. जेथे वस्तू/माल किंवा सेवांचा पुरवठा वाहतूकीच्या साधनांव्दारे केला जातो, जसे, जहाज, विमान, मालगाडी किंवा मोटरवाहन इत्यादी व्‍दारे, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  8. "B2B" सेवांच्या पुरवठ्यांबाबत पुरवठा स्थानासाठी मूलभूत अनुमान काय आहे?
  9. नोंदणीकृत नसलेल्या प्राप्तकर्त्यांच्या बाबतीत पुरवठा स्थानासाठी मूलभूत अनुमान काय ?
  10. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत पुरवठ्याची जागा स्थावर मालमत्तेचे ठिकाण/स्थान/स्थळ असते. समजा अनेक राज्ये व्यापलेला एक रस्ता दिल्लीपासून मुंबईपर्यंत बनवला आहे. तर पुरवठ्याचे स्थान काय असेल ?
  11. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांच्या पुरवठ्याचे स्थान कोणते असेल? उदा. अनेक राज्यांत आयोजित केली जाणारी IPL क्रिकेट मालिका.
  12. कुरिअर मार्फत परिवहनाने वस्तू/माल पाठविल्यास, याबाबत वस्तू/माल पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  13. जर एखादी व्यक्‍ती मुंबई ते दिल्ली आणि परत मुंबई असा प्रवास करीत असल्यास प्रवासी वाहतूक सेवेचे पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  14. समजा मे.एअर इंडियाने एका व्यक्‍तीला भारतात कोठेही प्रवास करण्यासाठी तिकिट/पास निर्गमित  केले, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  15. मोबाईल कनेक्‍शन (भ्रमणध्वनी जोडणी) बाबत पुरवठ्याचे ठिकाण कोणते असेल? ते पुरवठादाराचे स्थान असू शकेल कां ?
  16. गोव्यात वास्तव्यास असलेल्या व्यक्‍तीने NSE वरील दिल्लीच्या ब्रोकरकडून शेअर्स विकत घेतल्यास, पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  17. एक व्यक्‍ती मुंबईहून कुलू-मनालीला जाते आणि मनाली मधील आयसीआयसीआय बँकेकडून काही सेवा घेते. तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?
  18. गुरगांव येथे वास्तव्यास असलेली व्यक्‍ती एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते दिल्ली प्रवास करते आणि आपला प्रवास विमा मुंबईला काक्‍ते, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

GST अंतर्गत वस्तू/माल आणि सेवांच्या पुरवठा स्थानाची आवश्यकता आहे का?

GSTचे मूलभूत तत्त्व असे आहे की गन्‍तव्‍य स्थानी वापरण्यात आलेल्या सदर पुरवठ्यावर किंवा सदर पुरवठा जेव्हा वापरला गेला तेव्हा, त्या पुरवठ्यावर परिणामकारकरीत्या कर आकारला गेला पाहिजे. तरी पुरवठा स्थानाबाबतची तरतूद "पुरवठा स्थान" निश्चित करते म्हणजेच जेथे कर पोहोचतो असे अधिकार क्षेत्र निश्चित करते. व्यवहार राज्यांतर्गत आहे किंवा आंतर-राज्य आहे हे पुरवठ्याचे स्थान निश्चित करते. अन्‍य शब्दात, सदर पुरवठा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केला गेला त्या राज्यातील SGST अधिक CGST च्या अधीन आहे की आंतर-राज्य पुरवठा असल्यास त्याला IGST लागू होईल का? हे निश्चित करण्यासाठी वस्तू/माल व सेवा यांच्या पुरवठ्याचे स्थान आवश्यक आहे.

"पुरवठा स्थान" बाबतच्या तरतूदी वस्तू/माल आणि सेवा या संबंधी भिन्न का आहेत?

वस्तू/माल स्पर्शनीय (tangible) असल्यामुळे त्यांच्या वापराची जागा निश्चित करण्यात काही विशेष अडचणी येत नाहीत. सेवा अस्पर्शनीय (intangible) असल्यामुळे त्यांच्या पुरवठ्याची जागा निश्चित करण्यासाठी मुख्यत्वेकरून खालील अडचणी येतात :-

(i) ग्राहकांना सेवा देण्याच्या पध्दतीत सहजपणे बदल करता येतो. उदाहरणार्थ, दूरसंचार सेवांमध्ये विशेषत: पोस्ट-पेड किंवा प्री-पेड असे बदल करता येतात; बिलाचा पत्ता बदलता येतो, बिल अग्रेषित करणाऱ्याचा पत्ता बदलता येतो, संगणकप्रणालीची दुरुस्ती किंवा देखभाल ऑनसाईट ते ऑनलाईन बदलता येते, बँकिंग सेवेसाठी पूर्वी ग्राहकाला बँकेत जावे लागत असे, आता ग्राहक कोठूनही सेवांचा उपभोग घेऊ शकतो;

(ii) सेवा पुरवठादार, सेवा प्राप्तकर्ता आणि देण्यात येणाऱ्या सेवा या बाबतीत शहानिशा करणे शक्‍य नसते किंवा त्या सहजपणे दडपून टाकता येण्यासारख्या असतात, कारण काही स्पर्शनीय बदल होत नसल्याने, त्यांचा माग काढणे अशक्‍य असते;

(iii) सेवा पुरविण्यासाठी, सेवा पुरवठादाराचे निश्चित ठिकाण असणे बंधनकारक नाही आणि सेवा प्राप्तकर्त्याला तो फिरत असतानादेखील सेवा प्राप्त होते. तसेच, बिल पोहोचविण्याचे स्थान एका रात्रीत बदलता येते;

(iv) काहीवेळा एकच घटक एकापेक्षा अनेक ठिकाणी संक्रमित होत असतो, उदाहरणार्थ, बांधकाम किंवा रेल्वेमार्ग संबंधित सेवा, राष्ट्रीय महामार्ग किंवा नदीवरील पूल, ज्याची एका राज्यात सुरवात होते व दुसऱ्या राज्यात संपतो. त्याचप्रमाणे चित्रपट वितरण किंवा प्रदर्शित करण्याचा हक्‍क अनेक राज्यांसाठी एकाच व्यवहारात देता येतो किंवा एक जाहिरात किंवा एक कार्यक्रम ज्याचे प्रसारण एकाचवेळी देशभरात करण्यात येते. विमान कंपनीने निर्गमित,केलेली मुदती तिकिटे (seasonal tickets), साधारणपणे १० तिकिटांचा समावेश असतो, ज्याचा उपयोग देशातील कुठल्याही दोन ठिकाणामध्ये प्रवास करण्यासाठी करता येतो. दिल्ली मेट्रोने निर्गमित  केलेल्या कार्डाव्‍दारे नोयडा किंवा दिल्ली किंवा फरिदाबाद येथे राहणाऱ्या व्यक्‍तीला प्रवास करता येतो, देय रक्‍कम,स्वीकारतांना दिल्ली मेट्रोला ठिकाण किंवा प्रवास याबाबत फरक करता येत नाही;

(v) सेवा विकसित होत असतात अणि त्यामुळे सहाजिकच नवी आव्हाने निर्माण होत असतात. उदाहरणार्थ 15-20 वर्षांपूर्वी DTH बद्दल, ऑन लाईन माहिती, ऑनलाईन बँकिंग, तिकिटाचे ऑनलाईन आरक्षण, इंटरनेट, मोबाईल, दूरसंचार इत्यादीं बाबत कोणीही विचार केला नसता.

व्यवहारात पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी कोणत्या प्रातिनिधीक बाबींचा किंवा अनुमानांचा (assumptions) वापर करता येईल?

सेवांच्या व्यवहारात समाविष्ट असलेल्या विविध घटकांचा प्रातिनिधीक बाबी म्हणून पुरवठयाचे स्थान निश्चित करण्यासाठी वापर करता येईल. अनुमान किंवा प्रातिनिधीक बाबी ज्या अन्‍य कोणत्याही बाबींपेक्षा पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यास योग्य परिणामकारक आहेत, त्यांचा उपयोग पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी करता येईल. सदर बाबींची खाली चर्चा करण्यात आली आहे:-

(क) सेवा पुरवठादाराचे ठिकाण/स्थान/स्थळ;

(ख) सेवा प्राप्तकर्त्याचे ठिकाण/स्थान/स्थळ;

(ग) उपक्रम चालविले जातात/कार्यक्रम केले जातात ते स्थान/स्थळ;

(घ) सेवांचा उपभोग/वापर केला जातो ते स्थान/स्थळ; आणि

(ङ) स्थान/स्थळ/व्यक्‍ती ज्यांना प्रत्यक्ष फायदा पोहोचतो.

"B2B"(नोंदणीकृत व्यक्‍तीला केलेला पुरवठा) आणि "B2C" (नोंदणीकृत नसलेल्या व्यक्‍तीला केलेला पुरवठा) व्यवहाराच्या बाबतीत पुरवठ्याच्या स्थानासाठी वेगळे नियम असण्याची गरज काय ?

"B2B"व्यवहारात, अदा केलेल्या करांवरील इनपूट टॅक्‍स क्रेडिटचा लाभ प्राप्तकर्त्याला मिळतो त्यामुळे असे व्यवहार सहज प्रवाहित होतात. "B2B" पुरवठ्यांवरील GST संकलन परिणामकारकरित्या सरकारसाठी / शासनासाठी दायित्व निर्माण करते आणि सदर पुरवठ्याच्या प्राप्तीकर्त्यासाठी "मत्ता" निर्माण होते, असे असता, प्राप्तकर्त्याला भविष्यकालीन कर अदा करण्यासाठी इनपूट टॅक्‍स क्रेडिट वापरण्याचा हक्‍क प्राप्त होतो. "B2B" व्यवहारात प्राप्तकर्त्याचे ठिकाण/स्थान/स्थळ, सर्व परिस्थितीत, प्राप्तकर्त्याला अधिक इनपूट टॅक्‍स क्रेडिट मिळण्याकरिता जबाबदार ठरते. प्राप्तकर्ता प्राय: अन्‍य ग्राहकाला पुरवठा देत असतो. जेव्हा "B2B" व्यवहार "B2C" व्यवहारात परिवर्तित होतो, तेव्हा पुरवठ्याचा वापर केला जातो. "B2C" व्यवहारात, पुरवठा अंतिमत: वापरला जातो आणि अदा केलेले कर प्रत्यक्षपणे सरकार/शासनाकडे जमा होतात.

वस्तू/माल काक्‍ल्यावर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

प्राप्तकर्त्याला मालाची पोच देण्यासाठी वस्तू/मालाचे संचलन जेथे थांबेल, त्यावेळी जे वस्तू/मालाचे ठिकाण असेल, ते वस्तू/माल पुरवठ्याचे स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 10)

एका व्यक्‍तीला जेव्हां त्रयस्थ व्यक्‍तीच्या सांगण्यावरुन पुरवठादार मालाची पोच देतो तेव्हां पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

असे मानले जाईल की त्रयस्थ व्यक्‍तीला माल मिळाला आहे आणि अशा मालाच्या पुरवठ्याचे स्थान सदर व्यक्‍तीच्या व्यवसायाचे मुख्य स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 10)

जेथे वस्तू/माल किंवा सेवांचा पुरवठा वाहतूकीच्या साधनांव्दारे केला जातो, जसे, जहाज, विमान, मालगाडी किंवा मोटरवाहन इत्यादी व्‍दारे, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

वस्तू/मालाच्या बाबतीत, ज्या ठिकाणी वस्तू/माल वाहतूकीच्या साधनांवर लादला गेला, ते ठिकाण, सदर मालाच्या पुरवठ्याचे स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 10) सेवांच्या बाबतीत, वाहतुकींच्या साधनांव्‍दारे करण्यात येणाऱ्या प्रवासाचे प्रथम निर्गमन ठिकाण, सेवांचे पुरवठा स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 12 व कलम 13)

"B2B" सेवांच्या पुरवठ्यांबाबत पुरवठा स्थानासाठी मूलभूत अनुमान काय आहे?

 

IGST अधिनियमात "नोंदणीकृत करदाते आणि नोंदणीकृत नसलेले करदाते" अशा संज्ञा वापरल्या आहेत. नोंदणीकृत व्यक्‍तीला केलेल्या पुरवठ्याच्या बाबतीत त्या व्यक्‍तीचे ठिकाण हेच पुरवठ्याचे स्थान असे अनुमान करण्यात येते. प्राप्तीकर्ता नोंदणीकृत असल्याने, प्राप्तकर्त्याचा पत्ता नेहमीच उपलब्ध असतो आणि त्यामुळे पुरवठ्याच्या जागेसाठी तो प्रातिनिधीक पत्ता म्हणून घेता येतो.

नोंदणीकृत नसलेल्या प्राप्तकर्त्यांच्या बाबतीत पुरवठा स्थानासाठी मूलभूत अनुमान काय ?

नोंदणीकृत नसलेल्या प्राप्तकत्यांर्च्या बाबतीत, नेहमीचे पुरवठ्याचे स्थान हे प्राप्तकर्त्याचे स्थान आहे. तथापि बऱ्याच प्रकरणामध्ये, प्राप्तकर्त्याचा पत्ता उपलब्ध नसतो, अशा प्रकरणांमध्ये, सेवांच्या पुरवठादाराचे स्थान पुरवठ्याच्या जागेसाठी प्रातिनिधीक स्थान म्हणून घेता येईल.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत पुरवठ्याची जागा स्थावर मालमत्तेचे ठिकाण/स्थान/स्थळ असते. समजा अनेक राज्ये व्यापलेला एक रस्ता दिल्लीपासून मुंबईपर्यंत बनवला आहे. तर पुरवठ्याचे स्थान काय असेल ?

जेथे स्थावर मालमत्तेचे ठिकाण/स्थान/स्थळ एकापेक्षा जास्त राज्यात असते, तेथे पुरवठा संविदा किंवा मान्‍यता करारांच्या अटींनुसार, स्वंतत्रपणे संकलित करण्यात आलेल्या किंवा निश्चित करण्यात आलेल्या सदर सेवांच्या मूल्याच्या समप्रमाणात, प्रत्येक राज्यात सदर सेवेचा पुरवठा झाल्याचे मानण्यात येईल, किंवा सदर संविदा कराराचा अभाव असल्यास, याबाबत विहित केलेल्या इतर संयुक्ति क आधारावर सेवेचा पुरवठा झाल्याचे अनुमान करता येईल. (देशा-तर्गत पुरवठ्यांसाठी IGST अधिनियम कलम 12(3) मधील स्पष्टीकरण पोटकलम)

कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांच्या पुरवठ्याचे स्थान कोणते असेल? उदा. अनेक राज्यांत आयोजित केली जाणारी IPL क्रिकेट मालिका.

कार्यक्रमाच्या बाबतीत, जर सेवा प्राप्तकर्ता नोंदणीकृत असल्यास, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांच्या पुरवठ्याचे ठिकाण, सदर व्यक्‍तीचे स्थान असेल. तथापि जर प्राप्तकर्ता नोंदणीकृत नसेल, तर पुरवठ्याचे ठिकाण जेथे कार्यक्रम आयोजित केला जातो ते ठिकाण असेल. सदर कार्यक्रम अनेक राज्यांत आयोजित करण्यात येतात आणि अशा प्रकारच्या सेवांना एकत्रित रक्‍कम  अदा केली जाते, प्रत्येक राज्यात या बाबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांच्या मूल्याच्या प्रमाणात प्रत्येक राज्यातील पुरवठ्याचे स्थान गृहित धरले जाईल. (IGST अधिनियम कलम 12(7) मधील स्पष्टीकरण पोटकलम)

कुरिअर मार्फत परिवहनाने वस्तू/माल पाठविल्यास, याबाबत वस्तू/माल पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

देशा-तर्गत पुरवठ्यासाठी : प्राप्तकर्ता नोंदणीकृत असल्यास, प्राप्तकर्त्याचे स्थान पुरवठ्याचे स्थान असेल.

प्राप्तकर्ता नोंदणीकृत नसल्यास, जेथे माल परिवहनासाठी सुपूर्द केला, ते पुरवठ्याचे स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 12)

आंतरराष्ट्रीय पुरवठ्यासाठी : वाहतूक सेवांच्या पुरवठ्याचे स्थान, कुरीअर सेवांच्या खेरीज, वस्तू/मालाचे इष्ट/इच्छित (destination) स्थान असेल. कुरीअर सेवांसाठी, जेथे वस्तू/माल कुरीअरला सोपविण्यात आला, ते सेवांच्या पुरवठ्याचे ठिकाण/स्थान/स्थळ असेल. तथापि कुरीअर सेवा अंशत: जरी भारतात पुरविली गेली असेल तरीही, पुरवठ्याचे ठिकाण/स्थान/स्थळ "भारत" हेच मानले जाईल. (IGST अधिनियम कलम 13(3), 13(6) आणि 13(9))

जर एखादी व्यक्‍ती मुंबई ते दिल्ली आणि परत मुंबई असा प्रवास करीत असल्यास प्रवासी वाहतूक सेवेचे पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

जर व्यक्‍ती नोंदणीकृत असल्यास, प्राप्तकर्त्याचे स्थळ पुरवठ्याचे स्थान असेल. व्यक्‍ती नोंदणीकृत नसल्यास, मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या पुढील प्रवासासाठी पुरवठ्याचे स्थान मुंबई असेल, म्हणजेच जेथून प्रवासाला सुरूवात झाली ते ठिकाण. तथापि परतीच्या प्रवासासाठी, "दिल्ली" पुरवठ्याचे स्थान असेल, कारण परतीचा प्रवास हा एक अलग प्रवास मानला पाहिजे. (IGST अधिनियम कलम 12(9) मधील स्पष्टीकरण पोटकलम)

समजा मे.एअर इंडियाने एका व्यक्‍तीला भारतात कोठेही प्रवास करण्यासाठी तिकिट/पास निर्गमित  केले, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

उपरोक्‍त बाबतीत, बीजक निर्गमित  करतेवेळी प्रवासाचा हक्‍क भविष्यकाळात वापरला जाणार असल्यामुळे, प्रवास सुरू करण्याचे ठिकाण मिळणार नाही. तसेच पुरवठ्याचे स्थान प्रवास सुरू करण्याचे ठिकाण असू शकणार नाही. अशा प्रकरणांमध्ये मूलभूत नियम लागू होतात. (IGST अधिनियम कलम 12(9) मधील अटी व शर्ती पोटकलम)

मोबाईल कनेक्‍शन (भ्रमणध्वनी जोडणी) बाबत पुरवठ्याचे ठिकाण कोणते असेल? ते पुरवठादाराचे स्थान असू शकेल कां ?

देशा-तर्गत पुरवठ्यांसाठी : मोबाईल सेवांच्या पुरवठादाराचे स्थान पुरवठ्याचे ठिकाण होऊ शकत नाही, कारण मोबाईल कंप-या अनेक राज्यांमधे सेवा पुरवितात आणि त्यातील बऱ्याच सेवा आंतर-राज्य आहेत. पुरवठादाराचे स्थान पुरवठ्याचे ठिकाण म्हणून गृहित धरल्यास, उपभोग तत्त्वांचा भंग होईल आणि त्यामुळे सर्व महसूल फक्‍त काही राज्यांना मिळेल जेथे पुरवठादारांचे वास्तव्य आहे.

मोबाईल कनेक्‍शन बाबत पुरवठ्याचे स्थान, मोबाईल कनेक्‍शन पोस्ट-पेड किंवा प्री-पेड आहे यावर अवलंबून असेल. पोस्ट-पेड कनेक्‍शनच्या बाबतीत, सेवा प्राप्तकर्त्याच्या बिलावरील पत्ता मोबाईल सेवा पुरवठ्याचे स्थान असेल.

प्री-पेड कनेक्‍शनच्या बाबतीत, जेथे अशा कनेक्‍शनसाठी रक्‍कम,घेतली जाते किंवा प्री-पेड व्हाउचर्सची विक्री केली जाते, ते सेवा पुरवठ्याचे स्थान असेल. तथापि, रिचार्ज इंटरनेट/ई-पेमेंट व्‍दारे करण्यात आलेले असेल, तर सेवा प्राप्तकर्त्याचे रेकॉर्डवर असलेले स्थान, सेवा पुरवठ्याचे स्थान म्हणून गृहित धरले जाईल.

आंतरराष्ट्रीय पुरवठ्यांसाठी : सेवा प्राप्तकर्त्याचे स्थान, दूरसंचरण सेवेच्या पुरवठ्याचे स्थान असते.

गोव्यात वास्तव्यास असलेल्या व्यक्‍तीने NSE वरील दिल्लीच्या ब्रोकरकडून शेअर्स विकत घेतल्यास, पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

पुरवठ्याचे स्थान सेवा पुरवठादाराच्या लेखी नोंदीत असलेले सेवा प्राप्तकर्त्याचे स्थळ असेल. म्हणून गोवा हे पुरवठ्याचे स्थान होईल.

एक व्यक्‍ती मुंबईहून कुलू-मनालीला जाते आणि मनाली मधील आयसीआयसीआय बँकेकडून काही सेवा घेते. तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

सेवा त्या व्यक्‍तीच्या बँक खात्याशी जोडलेली नसल्यास, पुरवठ्याची जागा कुलू असेल जे सेवां पुरवठादाराचे स्थान आहे. जर सेवा त्या व्यक्‍तीच्या बँक खात्याशी जोडलेली असल्यास, पुरवठ्याचे स्थान मुंबई असेल, पुरवठादाराच्या लेखी नोंदीत असलेले प्राप्तकर्त्याचे स्थळ.

गुरगांव येथे वास्तव्यास असलेली व्यक्‍ती एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते दिल्ली प्रवास करते आणि आपला प्रवास विमा मुंबईला काक्‍ते, तर पुरवठ्याचे स्थान कोणते असेल?

विम्याची सेवा देणाऱ्या पुरवठादाराच्या लेखी नोंदीत असलेले सेवा घेणाऱ्या प्राप्तकर्त्याचे ठिकाण पुरवठ्याचे स्थान असेल. म्हणून गुरगांव हे पुरवठा स्थान असेल. (IGST अधिनियम कलम 11(13) मधील अटी व शर्ती पोटकलम)

 

स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate