অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खरे पालक व्हा..

खरे पालक व्हा..

कोवळी मने सावरणारे हात

पालकत्व सुजाण असावे लागते. हा विचारच मुळी कित्येक जणांना न पटणारा आहे. "मुलं वाढवावी कशी, म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला. अहो मुलं त्यांची ती मोठी होतात. आपल्याला काही करावं नाही लागत. हे आणि अशाप्रकारचे शेरे आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यामागची भावना असते "नसती थेर!"

ज्या देशात पोटाला पुरेसे अन्न मिळेल याची शाश्वती नसते, अशा गरीब आणि विकसनशिल देशामध्ये बालमानसशास्त्र म्हणजे "नसती थेर ! मुलांची शारिरीक आबाळ झाली, अपुरा आहार अथवा रोगराई यामुळे ती दगावली तर मन सुन्न होते. पण अपुऱ्या मानसिक पोषणामुळे घरात निरोगी वातावरणाच्या अभावामुळे जर ती कोमेजली. त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण जर न फुलता घुसमटून गेले तर त्याची दखल आपणाकडून घेतली जात नाही.

कधी तर काही पालकांचा असा प्रश्न असतो. मुले का बिघडतात ? मुले खरेच बिघडतात का ? का आपल्या परस्पर संबंधामध्ये काही बिघाड झालेला असतो ? या प्रश्नांकडे नजर टाकली की लक्षात येते की जोपर्यंत आपल्याला समस्याच नीट समजली नाही तोपर्यंत उत्तर सापडणे कठीण आहे. कधी कधी आपल्या मुलाकडे पालक आपले "एक्स्टेंशन" म्हणून पहायला लागली की मुलांच्या साऱ्या समस्या, सारे प्रश्न सोडविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकांचीच बनून जाते. मूल अगदी तान्हे असताना त्याचे संगोपन म्हणजे संरक्षण असा एक अर्थ असतो. मुलं जेव्हा मोठी व्हायला लागतात तेव्हा संरक्षणाचे अर्थ बदलतात. मुलं तरुण होण्याच्या वाटेवर असताना त्यांना एकदम स्वातंत्र्य देवून चालत नाही. ते स्वातंत्र्य क्रमाक्रमानं देणं व त्याची जबाबदारी घ्यायला लावणं ही प्रक्रिया करायची असेल तर पालकाच्या मनातली भूमिका स्पष्ट हवी. माझं मूल हे जरी माझे काही गुणधर्म घेऊन जन्माला आलं असलं व त्याच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर असली तरी व्यक्ती म्हणून त्याच्या वेगळेपणाचा आदर मला करायला हवा. मुलाचे सगळे विचार सगळं वागण माझ्या मताप्रमाणे असेलच असं नाही.

माझ्या दृष्टिकोनापेक्षा माझ्या मुलाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. हे सत्य मला प्रथम स्वीकारायला हवे. त्याशिवाय अशी दृष्टी बदलण्याचे माझे प्रयत्न योग्य दिशेने होणार नाहीत. आणि मग आपण बोलू लागतो मूल बिघडले. तेव्हा दोष मुलाचा असतोच असे नाही. भोवतालचे वातावरण अगर घरातील परिस्थिती बिघडलेली असती तर त्या परिस्थितीला स्वाभाविक असा प्रतिसाद मूल देतं. मुलाने त्रस्त होऊन वाईट परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादालाच आपण मूल बिघडले असे म्हणतो.

एक उदाहरण देवून थोडक्यात सांगायचे झाले तर दुधात मीठ टाकले तर दूध नासते. पण तो दोष दुधाचा नसून ते दूध ज्याने व्यवस्थित झाकून ठेवले नाही त्याचा असतो किंवा जाणून-बुजून खोडसाळपणे मीठ टाकणाऱ्याचा असतो. कधी कधी आपल्याला दूध नासणार आहे असा अंदाज येऊन आपण योग्य ती पावले उचलतो. पण बरेचसे पालक अशी खबरदारी घेतानाही आढळत नाहीत.

दूध नासले तर आपण ते टाकून न देता त्याचे दही, पनीर किंवा आपल्याला जे जमेल ते बनवतो. आपण नासलेल्या दुधाकडून बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसाच काहीसा दृष्टिकोन आपल्या बिघडलेल्या मुलांच्या बाबतीत ठेवणे गरजेचे आहे. बिघडलेले मूल सुधारु शकते पूर्ववत होऊ शकते. खरे तर आपण सर्वांना बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याचा मुलांच्या क्षमतेबद्दल आदर वाटायला हवा. आपल्याला सततच्या वाढत्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर ताण येतोच. याव्यतिरिक्त घरातले वातावरण, माध्यमांचा वाढता प्रभाव, चैन व भपका यांचे वाढते आकर्षण या साऱ्यांना तोंड देण्यासाठी खरेतर त्यांना सक्षम करायला हवे. त्याऐवजी आपल्याला असे आढळते की मुले आपल्याच बळावर या साऱ्याला तोंड देत आहेत. ही तारेवरची कसरत करत असताना त्यांच्या वागण्यात काही कमी अधिक झाले की मग मात्र आपण खडबडून जागे होतो आणि काळजी करु लागतो.

माझे मूल वाईट वागते. माझे मूल अभ्यास करीत नाही, अशा तक्रारी आपण करायला सुरुवात करतो तोपर्यंत मूल आणखी मोठे होते आणि रात्री उशिरा येणे, सततचे फोन, वाईट संगत असे नवे प्रश्न उभे राहतात. त्याही पुढे जाऊन तरुण मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागतो. म्हणून पालकत्वाच्या या दोन बाजू आपण लक्षात घ्यायला हव्यात. मूल झाल्यामुळे मिळणारा निर्भळ आनंद आणि समस्या उभ्या राहिल्या की होणारी मनाची उलघाल यांची दुहेरी गुंफण म्हणजे पालकत्व. पालक मुलांना 'वाढवतात' असं म्हणण्यापेक्षा पालक मुलांना 'विकासासाठी मदत करतात' हे वाक्य मनात घोळवायला अनुरुप वाटत.

मूल मोठे होत राहणार असते आणि समस्येचे स्वरुप बदलत राहते. परिकथेतला राक्षस जसा वेगवेगळी मायावी रुपे घेऊन समोर उभा राहतो अगदी तसेच. इंग्रजीत म्हणतात "To him you can not answer tomorrow his name is today." म्हणूनच समस्येची उकल उद्यावर ढकलून चालणार नाही. कारण आज हातून निसटून गेलेले दिवस उद्या पुन्हा मिळणार नाहीत. आपल्याला मुलाच्या काही विशेष गरजा आहेत. हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. समस्यांवर प्रेमळ पण जागरुक नजर ठेवणे गरज वाटल्यास वेळेवर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि समुपदेशन यावेळी महत्वाचे ठरते.

लेखिका - रेश्मा भाईप,

चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate