অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान

दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान

केंद्र शासनाने एप्रिल 1999 पासून दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना (एसजी एसवाय ) सुरू केली. या योजनेचे केंद्र शासनाने विविध संस्थाकडून मुल्यमापन केले असता सदर योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी काहीअंशी यशस्वी ठरली असली तरी बऱ्याच उणिवा केंद्र शासनाच्या निदर्शनास आल्या. म्हणून केंद्र शासनाने गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यासाठी प्राध्यापक आर. राधाकृष्ण समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन 18 जुलै 2011 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( NRLM) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानात गरिबांच्या स्वयंसहाय्यता गटांचे संघटन करून त्याद्वारे स्वयंरोजगार मिळवणे हा मूलभूत घटक मानण्यात आला आहे.
राज्यातील सर्व गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना कायमस्वरुपी उपजिविकेच्या संधी उपलब्ध करणे व गरिबी रेषेच्या वर येईपर्यंत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. 
या योजनेत केंद्र शासन हिस्सा 75 टक्के तर राज्य शासन हिस्सा 25 टक्के आहे. ग्रामीण भागातील गरिबातील गरीब (स्वरोजगारी लक्ष्य गटांची निवड) विधवा व परितक्त्या महिला, अपंग, अनुसुचित जाती/जमाती, अल्पसंख्याक, वयोवृध्द, आदिवासी इ. सारखे दुर्लक्षित घटकांची लोकसहभागातून गरीबी निर्धारण या प्रक्रियेतून करण्यात येणार आहे. या अभियानात संवेदनशील सहायक संरचना, सर्वसमावेशन सामाजिक सहभाग, दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारीचे उन्नतीकरण, मागणी आधारित योजना, प्रशिक्षण क्षमता बळकटीकरण, फिरता निधी व अर्थ सहाय्य, व्याज दरासाठी अनुदान, अन्य योजनांचे एकत्रिकरण व समन्वय आणि कौशल्य वृध्दी, नोकरी देणारे प्रशिक्षणाचे विशेष प्रकल्प हे घटक महत्वाचे आहे.
बचत गट सक्रिय राहण्याच्या दृष्टीने बचत गटातील सदस्यांनी निरंतर दशसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. आर्थिक क्षमता वृध्दीसाठी नियमित बैठक, नियमित बचत, अंतर्गत कर्ज वितरण, कर्जाची नियमित परतफेड, गटाचे लेखे अद्ययावत ठेवणे या पंचसूत्रीचा अवलंब केला जातो. सामाजिक विकासासाठी नियमित आरोग्याची काळजी घेणे, शिक्षणाविषयक जागरूकता वाढविणे, पंचायत राज संस्थाबरोबर नियमित सहकार्य, शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग, शाश्वत उपजिवीकेसाठी उपाययोजना या पंचसुत्रीचा अवलंब होईल.
स्वयंसहायता गटास केवळ सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मागणी करण्याची अट राहणार नाही. गटातील वैयक्तिक सदस्यालादेखील व्यवसाय कर्ज मिळणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ निर्माण करणारे स्वयंरोजगार व कौशल्यवृध्दी व्यवसाय प्रशिक्षण देणे. शिवाय कुशल मनुष्यबळ निर्माण करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खेळते भांडवल / फिरता निधी साधारणत: दशसुत्रीचे पालन करणाऱ्या व 3 ते 6 महिने कालावधी पूर्ण केलेल्या स्वयंसहाय्यता समुहाला (बचत गटाला) प्रथम श्रेणीकरणानंतर प्राप्त गुणांच्या प्रमाणात 10 ते 15 हजार रूपये एवढा फिरता निधी बँकेमार्फत थेट स्वयंसहाय्यता समुहाच्या बचत खात्यात वर्ग करण्यात येतो.
केंद्र शासनाने राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाच्या पुनर्रचनेत भांडवली अनुदान बंद केले आहे. त्याऐवजी व्याज अनुदानाची तरतूद उपलब्ध केली आहे. अभियानांतर्गत नवीन स्वयंसहाय्यता समुहाला फिरता निधी मिळाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यानंतर किंवा जुना गट असल्यास त्याला अगोदरच खेळते भांडवल मिळालेले असेल आणि किमान तीन महिन्यापासून पंचसूत्रीचे अनुपालन करणाऱ्या गटास दुसरे श्रेणीकरणानंतर अर्थसहाय्य देण्यात येते. अर्थसहाय्य किमान चार वेळा करण्यात येणार आहे. त्याचे निकष, अर्थसहाय्य रक्कम मर्यादा व परतफेडीचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.
पहिले अर्थसहाय्य/पतपुरवठा-द्वितीय श्रेणीकरणानंतर पात्र स्वयंसहाय्यता गटांना त्याच्या एकूण बचतीच्या 4 ते 8 पट किंवा किमान 50 हजार यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढे अर्थ सहाय्य देण्यात येते.
अर्थसहाय्यासाठी खालील प्रमाणे निकष आहेत. 
अ) 80 ते 100 गुण प्राप्त गटास नाबार्ड निकषानुसार पंचसूत्रीचे पालन करणाऱ्या गटांना त्याच्या एकूण बचतीच्या 7 ते 8 पट किंवा 50 हजार रूपयांपैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम आणि दशसूत्रीमधील सामाजिक मुद्यांच्या अनुपालनानंतर प्राप्त गुणांच्या आधारे अधिकचे 25 हजार रूपये मिळू शकतील. ब) 60 ते 79 गुण प्राप्त गटास नाबार्ड निकषानुसार पंचसूत्रीचे पालन करणाऱ्या गटांना त्याच्या एकूण बचतीच्या 5 ते 6 पट किंवा 50 हजार रूपयांपैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम आणि दशसूत्रीमधील सामाजिक मुद्यांच्या अनुपालनानंतर प्राप्त गुणांच्या आधारे अधिकचे 20 हजार मिळू शकतील.
क) 50 ते 59 गुण प्राप्त गटास नाबार्ड निकषानुसार पंचसूत्रीचे पालन करणाऱ्या गटांना त्याच्या एकूण बचतीच्या 4 पट किंवा 50 हजार रूपयांपैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम आणि दशसूत्रीमधील सामाजिक मुद्यांच्या अनुपालनानंतर प्राप्त गुणांच्या आधारे अधिकचे 15 हजार मिळू शकतील.
दुसरे अर्थसहाय्य पहिल्या अर्थसहाय्याची संपूर्ण परतफेड करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटास एकूण बचतीच्या् 5 ते 10 पट किंवा एक लाख यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे हे अर्थसहाय्य असेल. 12 ते 24 महिन्यांच्या कालावधीत परतफेड करण्यात यावे.
तिसरे अर्थसहाय्य स्वयंसहाय्यता गटांच्या प्रकल्प आराखड्याच्या (अक्टिव्हिटी) किंमतीनुसार किंवा 2 ते 5 लाख रूपये. रकमेएवढे हे अर्थसहाय्य दशसूत्रीचे सर्वसाधारण पालन करणाऱ्या गटास दुसरे अर्थसहाय्य 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची परतफेड केल्यानंतर देण्यात यावे. हे कर्ज 2 ते 5 वर्षांच्या कालावधीत परतफेड करण्यात यावे.
चौथे अर्थसहाय्य स्वयंसहाय्यता गटांच्या प्रकल्प आराखड्याच्या किंमतीनुसार किंवा किमान 5 ते 10 लाख रक्कमेएवढे. हे अर्थसहाय्य दशसूत्रीचे सर्वसाधारण पालन करणाऱ्या गटास तिसरे अर्थसहाय्य 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची परतफेड केल्यानंतर देण्यात यावे. हे कर्ज 3 ते 6 वर्षांच्या कालावधीत परतफेड करण्यात येते.
अधिक माहितीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अभियान व्यवस्थापक (ग्रामीण विकास यंत्रणा) किंवा तालुका अभियान व्यवस्थापक (तालुका पंचायत समिती) यांच्याकडे संपर्क साधावा.
- जिल्हा माहिती कार्यालय,
सोलापूर

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate