অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मैत्री ‘देण्या’शीही

आम्ही ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांनी मिळून २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या दिवशी घराघरातून रद्दी गोळा केली. तो रविवारचा दिवस होता. सकाळच्या दोन तासांत वृत्तपत्रांची ७८० किलो रद्दी आम्ही गोळा केली. ती विकून आलेले ८ हजार रुपये मधूकोश सोसायटी, धायरी, पुणेतर्फे काळवीट काकांनी मदतनिधी म्हणून ‘मैत्री’च्या खात्यात जमा केले.

त्या दिवशी ११० गृहसंकुलांमधून ३०० स्वयंसेवकांनी २६ टन रद्दी गोळा केली. त्यातून अडीच लाखांवर जमा झालेला निधी मैत्रीने मेळघाटच्या कामी लावला.

‘मैत्री' स्वयंसेवी संस्था

‘मैत्री' - १९९७ पासून कार्यरत असलेली पुण्याची स्वयंसेवी संस्था. प्रामुख्याने मेळघाटातल्या आदिवासींसाठी आणि त्यासोबतच इतर सामाजिक समस्यांवर काम करणारी. विदर्भातल्या अमरावतीच्या जिल्ह्यातला इवलासा मेळघाट लोकांना माहीत आहे, तो तिथल्या बालमृत्यू आणि कुपोषणाच्या प्रश्नामुळे! सहाजिकच स्वयंसेवी संस्थांसाठी महत्वाचा. सातपुड्याच्या पर्वतरांगांमधल्या चिखलदारा आणि धारणी या दोन तालुक्यांमधली ३३४ गावं म्हणजे मेळघाट. त्यातल्या ७० गावांच्या आरोग्याची,शिक्षणाची काळजी घेण्याचं काम ‘मैत्री’चे स्वयंसेवक लोकसहभागातून करतात.

महाराष्ट्रात, भारतात किंवा जगात कोणत्याही ठिकाणी आपत्तीनिवारणाचं काम करणाऱ्या 'मैत्री'चा एक प्रभावी उपक्रम 'रद्दीतून सद्दी'. सद्दी म्हणजे सुबत्ता, जयश्रीताई सांगतात. मैत्रीच्या एक संस्थापक जयश्री शिदोरे यांनी विनिता ताटकेंसोबत 2006 साली सुरू केलेला रद्दीसंकलन उपक्रम गेली १० वर्ष अखंड चालू आहे.

असं काम करताना लोकांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया अनुभवायला मिळतातच. “कसली रद्दी, तुम्हाला का द्यायची? तुम्ही रद्दीवाले का मग? सरकार करेल ना त्या आदिवासींसाठी काम. माळशेजजवळच आहे का हे मेळघाट? ही कोणती संस्था 'मैत्री'?..वगैरे.

मैत्रीचे स्वयंसेवक

पण ‘मैत्री’च्याच भाषेत सांगायचं तर तुम्ही-आम्ही हीच मैत्री. असा भावनिक बंध हळूहळू बांधला जातो आणि काम चालू रहातं. शहरातली नोकरदार, सुस्थित मंडळी आपापली कामंधामं, रविवारची सुट्टी, आराम सांभाळून, घरबसल्या, खिशाला फार ताण न देता, वाचून झाल्यावर घरातली अडगळ ठरणारी वृत्तपत्रांची रद्दी दान करून मोठा मदतनिधी उभा करू शकतात याचं हे उदाहरण!
पुण्यातल्या इच्छुक गृहसंकुलांकडून आणि शाळांकडून महिन्याच्या एका रविवारी हे संकलन होतं. आदल्या दिवशी त्या त्या गृहसंकुलाचे कार्यकारणी सदस्य किंवा मैत्रीचे स्वयंसेवक रद्दी जमा करण्याचे उद्देश, वेळ, ठिकाण असे सर्व तपशील देतात. आधीच घरोघरी पुरवलेल्या ठराविक मापाच्या दोऱ्यात बांधून लोकं आपापले गठ्ठे आणून देतात. ते जमा करून आणि विकून पैसे मैत्रीच्या खात्यात जमा केले जातात. मैत्रीकडून त्याची पावती त्या गृहसंकुलाच्या नावे दिली जाते. काम तर होतंच. ते करता करता सामाजिक कामाचा संस्कारही नव्या पिढीवर होतो.

अशी आमची मैत्री एकमेकांशी, सामाजिक कामाशी, मैत्री ग्रामीण, वंचित लोकांशी. मैत्री ‘देण्या’शीही.

website : www.maitripune.net / फोन: 020 - 25450882

लेखिका : गीतांजली रणशूर, जयश्री शिदोरे, विनिता ताटके

स्रोत : नवी उमेद नेटवर्क

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate