অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट)

अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट)

एखाद्या समाजाने, विशिष्ट वा निकटच्या नात्यांमधील निषिध्द ठरविलेल्या लैंगिक संबंधाबद्दलच्या नियमांचा भंग होणे म्हणजे अगम्य आप्तसंभोग. समाजाला संमत नसलेल्या विवाहालाही ही संज्ञा लावण्यात येते.

एकाच कुटुंबातील स्त्रीपुरूषांमधील किंवा अन्य जवळच्या नात्यांमधील लैंगिक संबंध हे आदिवासी समाजांत, लहानमोठ्या प्राचीन संस्कृतींत आणि आधुनिक समाजांत वर्ज्य मानले गेले आहेत. ही नाती रक्ताची असतील (उदा., बाप-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहिण), वा मानलेली असतील (उदा., गुरूबंधु-भगिनी, रक्षाबंधन-बंधु-भगिनी). या निषिद्ध संबंधांबाबत लोकांच्या मनामध्ये तीव्र तिरस्कार, भीती आणि पापभावना असते. तुलनेने पाहता, विवाहसंस्थेतील इतर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनांबाबत तुलनेने पाहता, विवाहसंस्थेतील इतर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनांबाबात लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या तीव्र नसतात. याचे गमक असे, की अगम्य आप्तसंभोगाबद्दलच्या गुन्ह्यांना निरनिराळ्या समाजांत शिक्षा केल्या जातात. काही आदिवासी समाजांत शिक्षा केल्या जातात. काही आदिवासी समाजांत त्या त्या व्यक्तींना देहदंड होतो किंवा त्यांना त्यांच्या गटांतून बहिष्कृत केले जाते. यूरोपमधील मध्ययुगीन समाजातही अशा स्वरूपाचे शासन त्यांना भोगावे लागत असे. हिंदू समाजात अशा व्यक्तींची गणना चांडाळ जातीत होई. हे संबंध रूढिबाह्य मानले जात असल्यामुळे त्या संबंधातून झालेल्या संततीला तिच्या सामाजिक दर्जाबाबत समाजाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवहेलना नेहमीच सहन करावी लागते. पूर्वीच्या समाजापेक्षा आधुनिक समाज अगम्य आप्तसंभोगातून निर्माण झालेल्या संततीबाबत अधिक सहिष्णू आहे.अशा व्यक्तीच्या नागरी हक्कांवर तो कोणत्याही प्रकारची बंधने घालीत नाही; तथापि या व्यक्तींची होणारी सामाजिक अवहेलना आधुनिक समाजातही चुकत नाही.

अगम्य आप्तसंभोगाचे नियम सर्व काळांत आणि सर्व समाजांत आढळत असले,तरी वर्ज्यसंबंधीची व्याप्ती, मर्यादा आणि त्याविरूद्ध असलेल्या भावना निरनिराळ्या समाजांत वेगळ्या आणि परस्परविरोधीही असतात, असे दिसून येते. काही आफ्रिकी तसेच हवाई बेटांतील आदिवासींत चुलती, सावत्र बहिण, मावशी आणि नात यांच्याशी लग्न करण्याची मुभा आहे. केवळ आपद्धर्म म्हणून हिंदूंच्या पुराणात उल्लेखलेले जवळच्या रक्तसंबंधितांतील विवाह आणि राजवंशाचे रक्त शुद्ध रहावे म्हणून प्राचीन ईजिप्तच्या राजघराण्यातील सख्ख्या भावबहिणींचे प्रचलित असलेले विवाह हे समाजमान्य होते. काही समाजांत मेव्हणीशी, भाचीशी किंवा पुतणीशी विवाह हा अधिमान्य असतो. काहींत तो अमान्य असतो. उदा., उत्तर भारतात आते-मामे बहिणीशी विवाह होऊ शकत नाही; परंतु दक्षिणेत हा संबंध अधिक पसंत केला जातो. हिंदूंत चुलत भावंडांचे लग्न मान्य नाही; पण मुसलमानांत ते चालते. सगोत्र, सप्रवर व सपिंड विवाहांना सूत्रकाळात आणि स्मृतिकाळात मज्जाव करण्यात आला. उलट अनेक शतकांनंतर एका कुटुंबाच्या पिढ्या दूर पांगत जातात, या निकषावर सगोत्र विवाह आधुनिक ब्राह्मण समाजात पूर्वीइतके आक्षेपार्ह मानले जात नाहीत. महाराष्ट्र राज्यात तर सगोत्र विवाह हे न्यायालयाने पूर्णपणे कायदेशीर ठरविले आहेत.

वरील पुराव्यावरून मातृवंशीय, पितृवंशीय, एकपत्नीक, बहुपतिपत्नी आणि बहुपती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबरचना असलेल्या समाजांमध्ये अगम्य आप्तसंभोगाची व्याप्ती आणि स्वरूप वेगवेगळी असतात, असे दिसून येते. त्याबरोबर काळ आणि परिस्थिती यांच्या गरजांनुसार त्याबद्दलच्या नियमांत लवचिकपणाही आलेला दिसतो आणि त्याविरूद्ध असलेल्या भावनाही कमीजास्त तीव्र होताना किंवा बदलताना दिसतात.

अगम्य आप्तसंभोगाचे आणि त्यांतून विस्तारत गेलेले बहिर्विवाहाबद्दलचे नियम वेगवेगळे असले, तरी ते सार्वत्रिक का, याबद्दल भिन्न दृष्टिकोनांतून काही सिद्धांत मांडले गेले आहेत. जवळच्या नात्यांतील लैंगिक संबंधाबद्दल माणसांना एक नैसर्गिकच किळस वाटत असते, असे काही सहजप्रेरणावाद्यांचे या बाबतीतले स्पष्टीकरण आहे; तथापि ते बरोबर वाटत नाही. कारण सगळ्याच माणसांमध्ये जर ही नैसर्गिक किळस असेल, तर बहिर्विवाहामागचे नियम वेगवेगळ्या समाजांत वेगवेगळे का, या प्रश्नाचे उत्तर त्यामुळे मिळत नाही. अतीव अंतर्विवाह आणि अंत:प्रजननामुळे संतती विकृत अगर नि:सत्त्व होईल, या भीतीमुळे जवळच्या नात्यांतील विवाहसंबंध टाळले जातात, असेही एक कारण दिले जाते. पण आनुवंशिकीचा पुरावा उलटसुलट असल्याने त्याला निर्णायक आधार नाही. अशी एखादी घातक आनुवंशिक प्रक्रिया जरी खरी मानली, तरी या आनुवंशिकीय ज्ञानामुळेच अशी बंधने स्वीकारली गेली होती, असे म्हणता येत नाही. आदिवासी समाजाला अगर इतर समाजांनाही याचे शास्त्रीय ज्ञान होतेच, असे नाही. वर्षानुवर्षे एकत्र वाढल्यामुळे भावाबहिणीमध्ये अगर अन्य कुटुंबियांमध्ये एकमेकांविषयी लैंगिक आकर्षक निर्माण होत नाही, त्यामुळे व्यक्ती आपल्या विवाहासाठी कुटुंबाबाहेरचे जोडीदार बघतात, अशी आणखी एक मानसशास्त्रीय कारणमीमांसा आहे. पण त्याला प्रत्यक्षात भक्कम आधार नाही या बाबतीत उपलब्ध असलेला पुरावाही त्याविरूद्ध आहे. अगम्य आप्तसंभोगावरील बंधनामागची फ्रॉइडवादी मीमांसा लक्षणीय मानली जाते : शिशुवयात मुलाला आईबद्दल, मुलीला वडिलांबद्दल वाटणाऱ्या‍ शारीरिक आकर्षणातून ईडिपस गंड आणि इलेक्ट्रा गंड निर्माण होतात, असे फ्रॉइडचे म्हणणे आहे. जवळच्या नात्यातील लैंगिक संबंधाचे वासना म्हणून व्यक्तीला एकीकडे चोरटे, सुप्त किंवा उघड प्रेम वा आकर्षण असते; पण त्याच वेळी समाजाच्या त्याविरूद्ध असलेल्या कडक नीतिनियमांच्या दडपणामुळे या संबंधांबद्दल राग, तिरस्कार आणि भीतीही असते. या संघर्षातून प्रेम आणि आकर्षण दडपले जाऊन असल्या संबंधात काहीतरी अघटित आहे, घोर पाप आहे ही कल्पना त्यांच्या अंतर्मनात घर करून बसते, अशी ही मीमांसा आहे. फ्रॉइडच्या या मीमांसेमुळे अगम्य आप्तसंभोगासंबंधीच्या भीती, तिरस्कार, पाप इ. भावनांवर प्रकाश पडत असला, तरी विविध समाजांतील याबाबतचे भिन्न भिन्न नियम आणि त्यांचा झालेला भिन्न भिन्न विस्तार यांचा उलगडा होत नाही, असा आक्षेप राहतोच. मरडॉक यांच्या मते मानसशास्त्र, मनोविश्लेषण मानवशास्त्र आणि समाजशास्त्र ह्या सर्व शास्त्रांनी सांगितलेल्या घटकांचा एकत्रित विचार केला, तरच या नियमांचे स्वरूप पूर्णपणे कळणे शक्य आहे.

अगम्य आप्तसंभोगामागची कारणे काहीही असोत, एकाच कुटुंबात राहणाऱ्या‍ व्यक्तींमध्ये लैंगिक द्वेष, मत्सर किंवा स्पर्धा वाढणे कौटुंबिक स्वास्थ्याच्या आणि स्थिरतेच्या दृष्टीने हिताचे नसते. अशा नियमांअभावी नात्याच्या संबंधात गुंतागुंत होऊन, त्यात व्यक्तीचे कुटुंबातील स्थान आणि दर्जा यांबाबत कोणताच स्पष्टपणा राहणार नाही. कुटुंबाच्या मालमत्तेबाबतही अनेक हक्क उपस्थित होऊन कुटुंबाची आर्थिक एकात्मता त्यामुळे नष्ट होईल. कुटुंबाच्या आणि जवळच्या नात्यांबाहेर विवाहसंबंध जोडल्यामुळे भिन्न भिन्न गटांतील कुटुंबे एकत्र आणली जातात आणि त्यांच्यात स्थिर स्वरूपाचा एकोपा निर्माण होतो. शेवटी समाज आणि संस्कृती यांची वाढ, विविधता आणि विस्तार अगम्य आप्तसंभोगाबद्दलच्या नियमांमुळेच शक्य झाला, हे ऐतिहासिक सत्यही या संदर्भात ध्यानात ठेवले पाहिजे.

लेखक: मा. गु. कुलकर्णी; विद्याधर पुंडलीक

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate