অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतिचार

अतिचार

समाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वागणे. समाजसंमत उद्दिष्टे गाठण्याकरिता असंमत असलेल्या मार्गाचा अवलंब होऊ लागला म्हणजे समाजात अतिचार (ॲनॉमी) निर्माण झाला, असे म्हटले जाते. येथे ‘अतिचार’ ही संकल्पना मूल्ये आणि आचार-नियमाच्या अभावी समाजात निर्माण होणारी अनियंत्रितता या अर्थी वापरली आहे.

कोणताही समाज घेतला, की त्याच्या घटकांमध्ये त्यांच्या परस्परभूमिकेसंबंधी काही अपेक्षा अभिप्रेत असतात. त्याचप्रमाणे व्यक्तिव्यक्तींमधील व गटागटांमधील संबंध यांविषयीही काही विशिष्ट अपेक्षा असतात. समाजरचनेचे महत्त्वाचे घटक असलेले सामाजिक संकेत, रुढी, नीतिनियम, कायदे यांवर त्या अपेक्षा आधारलेल्या असतात. त्यांनुसार सामाजिक संबंध ठेवले जातात; परंतु काही वेळा विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्याकडून अपेक्षित भूमिका वठविली जात नाही, त्या वेळी साहजिकच परस्परसंबंध किंबहुना सर्व संकेत कोलमडून पडतात. त्यामुळे सामाजिक संबंधांत व नैतिक मूल्यांत एक प्रकारची पोकळी निर्माण होते. समाजात बळावणाऱ्या असंमत वर्तनाची ही शेवटची पायरी समजली जाते. अशा वेळी व्यक्ती व समाज यांची फारकत होऊन समाज विघटित होण्याची प्रक्रिया बळावते. असा प्रसंग येऊ नये म्हणून सामाजिक संकेत, रुढी, नीतिनियम, आचार इत्यादींच्या आदानप्रदानाची म्हणजे योग्य अशा सामाजीकरणाची प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे. बहुतेक समाजांतून अशा आदानप्रदानाची विशेष खबरदारी घेतली जाते; कारण समाजरचनेचा कल समाज सुसंघटित करण्याकडे असतो.

प्रसिद्ध फ्रेंच समाजशास्त्रज्ञ द्यूरकेम याने अतिचाराची मीमांसा व्यक्तीच्या विश्लेषणातून केली आहे. त्याने असे प्रतिपादिले, की विशिष्ट परिस्थितीचा ताण विशिष्ट व्यक्तींवर अतिशय पडल्यामुळे त्या व्यक्ती अतिचारी होतात. तसेच माकायव्हर व डेव्हिड रीझमन यांनीही या दृष्टिकोनातून अतिचाराची मीमांसा केली आहे. परंतु मर्टन याने अतिचाराची मीमांसा सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात केली आहे. त्याचे म्हणणे असे, की प्रत्येक समाजात विशिष्ट उद्दिष्टांना मान्यता दिली जाते; परंतु समाजाला संमत असलेल्या मार्गाने ती उद्दिष्टे गाठणे हे सर्व स्तरांतील लोकांना शक्य होत नाही. उद्दिष्टे कोणत्या पद्धतीने गाठावयाची याविषयीही काही संकेत, नीतिनियम व कायदे असतात. उदा., संपत्ती मिळविणे हे ज्या समाजात योग्य उद्दिष्ट मानले गेले आहे, त्या समाजातही संपत्ती मिळविण्याच्या मार्गांसंबंधी काही सामाजिक संकेत, नीतिनियम, कायदे इ. अभिप्रेत असतात.

साहजिकच निव्वळ उद्दिष्ट गाठणे एवढाच हेतू नसून ते उद्दिष्ट विशिष्ट चौकटीत समाजाला संमत अशा मार्गानेच गाठले पाहिजे, असा समाजाचा कटाक्ष असतो. परंतु काही स्तरांतील लोकांना समाजसंमत मार्गांनी उद्दिष्ट गाठण्यास ज्या संधी आणि सवलती लागतात त्या मिळत नाहीत, त्यामुळे व समाजात चालू असलेल्या स्पर्धेमुळे ते कोणत्याही मार्गाने उद्दिष्ट गाठण्यास उद्युक्त होतात. समाजमान्य उद्दिष्ट व समाजाला संमत अशा मार्गांचे पालन या दोन्होंच्या कात्रीत ते सापडतात. अशा परिस्थितीत ते अतिचाराकडे वळण्याची व सामाजिक उद्दिष्टे व संकेत हे दोन्हीही डावलले जाण्याची शक्यता असते.

हा प्रकार गतिशीलतेस वाव असलेल्या समाजातसुद्धा उद्दिष्टे येनकेनप्रकारे लवकर गाठण्याच्या प्रयत्नामुळे घडू शकतो. सामाजिक व आर्थिक विषमता व त्यामुळे माणसामाणसांत पडणारी तफावत यांतूनही अतिचार उद्भवतो. या परिस्थितीस व्यक्तीपेक्षा सामाजिक परिस्थितीच जास्त जबाबदार असण्याचा संभव असतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा उद्दिष्ट गाठण्याबाबत नवी मूल्येही निर्माण केली जातात. त्यामुळे मूल्यांसंबंधी निर्माण झालेली पोकळी भरून निघत असते. अतिचारी व्यक्तींचे प्रमाण आणि समाजातील त्यांचे महत्त्व यांनुसार ही नवी मूल्ये समाजात स्वीकारली जातात. साहजिकच अतिचार उद्भवेल अशी परिस्थिती काही मर्यादित काळच टिकते व नवीन मूल्यांनुसार समाजाची संघटना होत राहते. ही सामाजिक विघटन-संघटनाची प्रक्रिया सामाजिक परिवर्तनाची द्योतक आहे.

संदर्भ : 1. Durkheim, Emile; Trans, Spaulding, J. A.; Simpson, George,Suicide, London, 1952.

2.Merton, R. K. Social Theory and Social Structure, Glencoe (Ιllinois), 1961.

लेखक: य. भा. दामले

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate