समाजधारणेच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी कसे असावे, याविषयी समाजात रूढ असलेल्या संकेत सूचकांची एक अमूर्त आणि सर्व समावेशक अशी चौकट. या चौकटीत शिष्टाचार, लोकाचार, लोकनिती, लोकरूढी, कायदे, संस्था इ. समाविष्ठ झालेली असतात. आचारनियमांची ही चौकट सर्व समाजाला आधारभूत असते. म्हणून समाजशास्त्रात तिला महत्व प्राप्त झाले आहे.
निरनिराळ्या व्यक्तींतील व गटांतील संबंध नियमाने निबद्ध नसले, तर समाजात अस्थिरता उत्पन्न होईल. व्यक्तीव्यक्तींतील संबंध किंवा व्यक्ती व समाज यांतील संबंध हे निर्दिष्ट आचारांच्या पालनामुळेच प्रस्थापित होतात. परस्परसंबंध येणाऱ्या व्यक्तिव्यक्तींच्या सामाजिक स्थानास अनुसरून त्यांच्या भूमिकेविषयी व परस्परवर्तनाविषयी एकमेकांच्या अपेक्षा यामुळेच ठरलेल्या असतात. या अपेक्षापूर्ती करण्याचे आचार हे एक साधन आहे.
निरनिराळ्या स्थांनावरील व्यक्ती व समाजाचे निरनिराळे घटक यांतील संबंध योग्य राहण्याकरिता आचारांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. कुटुंब या लहान सामाजिक गटापासून तो मोठमोठ्या गटापर्यंत सर्वत्र आचारांचे पालन होणे इष्ट व आवश्यक असते. कारण वर्तन हे स्थल, काल, स्थान आणि प्रसंग इत्यादींशी निगडीत असते. यांच्या संदर्भात अपेक्षांनुरूप वर्तन करणे म्हणजेच आचारधर्माचे पालन होय.
एखाद्याकडून आचारधर्म पाळला गेला नाही तर तत्संबंधित व्यक्तींचा अगर गटांचा अपेक्षाभंग होतो व सामाजिक संबंधाना धोका उत्पन्न होतो. साहाजिकच त्यातून सामाजिक अस्थिरता उद्भवते. ही अस्थिरता आचार–नियमांच्या पालनाने टाळता येते. सामाजीकरणाच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक पिढीस आचारधर्माचे शिक्षण योग्य तऱ्हेने मिळू शकते.
मनुष्य जन्माला आल्यापासून सामाजीकरणामुळे त्याचे आयुष्य आचारयुक्त बनते व त्या दृष्टीने व त्या दृष्टीने त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तशी समजही दिली जाते. आचारनियम हे अनौपचारिक प्रसंग किंवा गट आणि औपचारिक प्रसंग किंवा गट यांच्या बाबतीत वेगवेगळे असतात. तसेच नियमबाह्य वर्तनाची दखलही या दोन्ही बाबतीत भिन्न रीतीने घेतली जाते.
कुटुंबासारख्या प्राथमिक व अनैच्छिक गटापासूनच व्यक्तिला आचारधर्माची जाणीव सुलभ व अनौपचारिक पद्धतीने होते; कारण कुटूंबातील वातावरण हे प्रेमाच्या भावनेवर आधारित असते. तसेच घनिष्ठ मैत्रीमुळेही आचारधर्माचे शिक्षण व पालन सहज शक्य होते. याव्यतिरिक्त निरनिराळ्या औपचारिक सामाजिक व आर्थिक घटना आणि गट यांच्या बाबतीत त्या त्या प्रसंगांस योग्य अशा आचारधर्माचे पालन करणे आवश्यक ठरते. अशा प्रसंगी लिखित नियमांचा व कायद्यांचाही आधार घेतला जातो. उदा, दोन व्यक्तींमधील अर्थिक संबंधाबाबतीत करार केला गेला असेल, तर त्या व्यक्तींकडून विशिष्ट आचारधर्म योग्य रीतीने पाळला गेला पाहिजे. नाहीतर त्यासंबंधी कायदा हस्तक्षेप करतो. परंतु पुष्कळ प्रसंगी अनौपचारिक तऱ्हेने आचारधर्माच्या पालनाची व्यवस्था केली जाते. सहाजिकच आचारधार्माची दंडात्मक बंधनेही सुसह्य होतात. प्रत्येक समाजात आचारनियमाच्या उल्लंघनाविरुद्ध खबरदारी घेतली जाते. तसेच श्रद्धा व विश्वास यांमुळेही आचारधर्माचे पालन करणे सोपे जाते. परंतु पुष्कळ वेळा निराळ्या संस्कृतीशी संबंध आल्यामुळे प्रचलित आचारधर्मासंबंधी शंका उत्पन्न होते. ज्ञान व कल्पना यांच्या आदानप्रदानाच्या क्रियेमुळे आचारधर्मासंबंधी नवीन नवीन कल्पना प्रसूत होतात, इतकेच नव्हे तर त्या मान्यताही पावतात. यातूनच सामाजिक बदलाचा उगम होतो. अर्थात सत्ताधारी वर्गाच्या दृष्टीने प्रचलित आचारधर्म पाळला जाणे हे अत्यावश्यक असते व त्यानुसार कायद्याची योजनाही आखली जाते. परंतु समाजात जसजसे ज्ञान उपल्बध होईल व बुद्धिवादी निष्ठेचा विकास होईल अगर जुन्या श्रद्धांच्या स्थानी नव्या श्रद्धा निर्माण होतील, त्याप्रमाणे प्रचलित आचारधर्म शिथिल होऊन त्या जागी नवीन आचारधर्म प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केला जाईल.
आचारधर्म हा सामाजिक रचनेशी निगडीत आहे. उदा., सामाजिक स्तरीकरण, सत्तेचे विभाजन इत्यादींमुळे स्तरास्तरांच्या आणि गटागटांच्या विशिष्ट आचारधर्मावर विशेष भर दिला जातो. समाजातील संबंध विशिष्ट तऱ्हेने पाळले जावेत, या विषय विशेष दक्षता घेण्यात येते. आचारधर्म कितपत पाळला जातो. समाजातील संबंध विशिष्ट तऱ्हेने पाळले जावेत, याविषयी विशेष दक्षता घेण्यात येते. आचारधर्म कितपत पाळला जातो, यावर सामाजिक स्थैर्य व गतिशीलता अवलंबून असते. नवीन आचारधर्म प्रस्थापित होणे म्हणजेच समाज गतिशील बनणे. ही गतिशीलता काही वेळा नवा आचारधर्म स्वीकारून त्याचा पुरस्कार करणाऱ्या अभिजनांमुळे अगर विशेष गुण आणि मान्यता असलेल्या व्यक्तिमुळे ही निर्माण होते.
लेखक: य. भा. दामले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
समाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वाग...