অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आत्महत्या

स्वतःच्या जीवाचा अंत

स्वतःच स्वतःच्या जीवाचा अंत घडवून आणणे म्हणजे आत्महत्या. आत्महत्येचे दोन प्रकार आहेत: समाजपुरस्कृत, समाजाला संमत अगर अभिप्रेत असलेली आत्महत्या हा पहिला प्रकार. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ एमील द्यूरकेमच्या मते ही परार्थाकरिता किंवा परहिताकरिता केलेली असते. समाधी घेणे, पतीच्या पश्चात त्याच्या पत्‍नीने सती  जाणे, राजपूत स्त्रियांचे जोहार करणे, जपानी युद्धवीरांची हाराकिरी, तसेच काही उद्दिष्टे साध्य करून घेण्याचे अगर काही गोष्टींचा निषेध व्यक्त करण्याचे साधन म्हणून आधुनिक काळात करण्यात येणारे आत्मबलिदान हे सर्व पहिल्या प्रकारात मोडतात. अशा आत्मबलिदानांना धार्मिक अगर नैतिक अधिष्ठान असते. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांनी आत्महत्या त्याज्य मानलेली आहे. परंतु हिंदुधर्मात प्रसंगानुरूप आत्मबलिदान हे इष्ट, ग्राह्य अगर क्षम्य मानले जाते. सामाजिक व नैतिक मूल्ये उचलून धरण्याकरिता अगर त्यांच्या संरक्षणाकरिता दिलेली आत्माहुती, ही ‘आत्महत्या’ ठरण्याचा संभव कमी; उलट तो एक समाजात कौतुकाचा, गौरवाचा आणि आदर्शप्राय विषय ठरण्याची शक्यता अधिक असते. अशा आत्माहुतीला समाज गुन्हा मानीत नाही. समाज किंवा त्यातील घटकगट एकजिनसी असला आणि त्या समाजाचा अगर त्यातील गटाचा सदस्य असलेली व्यक्ती त्या समाजाशी अगर गटाशी एकजीव झाली, म्हणजे अशा प्रकारची आत्महत्या अधिक संभवते. परंपरागत आदिवासी समाजात, सैन्यात अगर तत्सम समविचार-उद्दिष्टाने प्रभावित झालेल्या गटांत याचे प्रमाण अधिक असते. अर्थात सामाजिक मूल्ये बदलली, की तीच आत्महत्या समाजदृष्ट्या त्याज्य ठरून ‘गुन्हा’ अगर ‘पाप’ म्हणून गणली जाते. केवळ वैयक्तिक हित नजरेसमोर ठेवून, काही कारणास्तव स्वतःच्या जीवाला कंटाळून, सामाजिक मूल्ये व जबाबदारी झुगारून केलेली आत्महत्या दुसऱ्या प्रकारात मोडते. ही आत्महत्या समाजदृष्टीने निंद्य मानली आहे. अशा आत्महत्येचा प्रयत्‍न करणाऱ्यांना कायद्याने शिक्षाही होते.

कारण

आत्महत्येच्या कारणांची मीमांसा मुख्यतः व्यक्तीचे व समाजाचे विघटन अशा दोन दृष्टिकोनांतून झालेली आहे. व्यक्तिजीवन आणि समाजजीवन, वैयक्तिक मूल्ये आणि सामाजिक मूल्ये यांच्यात विसंवाद निर्माण झाला, की व्यक्ती आणि समाज यांच्यात एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. व्यक्ती समाजापासून अलग पडते. समाजाच्या कोणत्याही घटकगटात मनाने वा संस्कृतीने ती एकरूप होऊ शकत नाही. त्यामुळे ती एकाकी बनते. व्यक्तीचे सामाजीकरण समाजाला अपेक्षित अशा रीतीने झाले नसल्यास, अपुरे झाले असल्यास अगर सामाजीकृत व्यक्तीची मूल्ये आणि सामाजिक मूल्ये यांत फरक असल्यास अशी परिस्थिती संभवते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याकरिता व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. आत्महत्येचे व्यक्तिविघटनात्म विश्लेषण वरीलप्रमाणे आहे. यात व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व स्वयंक्रेंद्रित असते आणि समाजाशी समरस होण्याच्या वृत्तीचा तीत अभाव असतो, म्हणून द्यूरकेमने याला ‘अहंवाद’ असे म्हटले आहे. समाजाची मूल्ये, आचार-नियम, घटकगट आणि व्यक्तींचे वर्तन यांत विसंवाद निर्माण झाला, समाजरचनेतील समतोल बिघडला, म्हणजे प्रचलित नैतिक मूल्ये कोसळतात आणि समाजधारणेत अराजकता निर्माण होते. म्हणजेच अतिचार संभवतो. याही परिस्थितीत आत्महत्येचे प्रमाण अधिक असते. द्यूरकेमने यास अतिचारी आत्महत्या असे संबोधिले आहे. दिवाळे वाजण्यासारख्या अनपेक्षित आर्थिक संकटांच्या वेळी माणूस आत्महत्येस उद्युक्त होतो ते गरीबीमुळे नव्हे, तर अगतिकतेमुळे असा त्याचा निष्कर्ष आहे.

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते कुठली तरी मानसिक विकृती आत्महत्येस कारणीभूत होते. एखाद्या व्यक्तीबद्दलचे किंवा वस्तूबद्दलचे अतीव प्रेम असफल झाल्यास प्रेमाचे रूपांतर राग व द्वेष यांत होऊन या भावना प्रेम करणाऱ्या व्यक्तीवरच उलटतात. त्यामुळे व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते, असे मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड याचे म्हणणे आहे. द्वेष किंवा सूड या एकाच भावनेच्या आधारे आत्महत्येचे केलेले हे विश्लेषण तितकेसे पटणारे नाही; कारण आत्मघृणा, न्यूनगंड, भीती इ. इतर भावनाही आत्महत्येस कारणीभूत होतात, हे आता स्पष्ट झाले आहे. मेनिंगरच्या मते, ठार मारण्याची, ठार होण्याची व मरण्याची अशा तीनही इच्छा आत्महत्येच्या प्रेरणेमागे असतात.

वरील विवेचनावरून हा विषय अजून संशोधनाधीन असून त्यावर सर्वमान्य निष्कर्ष निघालेला नाही, हे स्पष्ट आहे. सामाजिक-मानसिक कारणांच्या विश्लेषणापूर्वी आनुवंशिक, मानववांशिक, भौगोलिक कारणे सांगण्यात येत होती; परंतु ती निराधार म्हणून त्याज्य ठरली.

आत्महत्येची समस्या

आत्महत्येची समस्या जरी बिकट असली, तरी भारतात इतर देशांशी तुलना करता आत्महत्येचे प्रमाण फार कमी आहे. १९६१ सालातील आकडेवारीप्रमाणे सर्वांत जास्त म्हणजे प्रतिलक्ष लोकसंख्येस २५ पेक्षा अधिक आत्महत्या हंगेरीमध्ये दिसून येतात. हे प्रमाण ऑस्ट्रिया, चेकोस्लोव्हाकिया आणि फिनलंडमध्ये २० ते २२, डेन्मार्क, फ्रान्स, पश्चिम जर्मनी, जपान, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांत १५ ते २० आणि ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका (गोऱ्या लोकांपुरते), इंग्‍लंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत १० ते १५ होते. सर्वांत कमी म्हणजे प्रतिलक्ष लोकसंख्येस ३·२ हे प्रमाण आयर्लंडमध्ये होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत आणि दक्षिण आफ्रिकेत निग्रोंपेक्षा गोऱ्या लोकांत आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील गोऱ्या लोकांचे आणि निग्रो लोकांचे आत्महत्येचे प्रमाण प्रतिलक्ष ११·३ व ३·३ आहे आणि तेच दक्षिण आफ्रिकेत अनुक्रमे १४·१ व ४·३ आहे. १९६४ ते १९६८ या काळात भारतातील आत्महत्येचे प्रमाण प्रतिलक्ष ६·३ वरून ७·६ पर्यंत वाढले. आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ३३% ने वाढली. १९६६ मध्ये ३७, ८४८ लोकांनी, तर १९६८ मध्ये ४०,००० पेक्षा अधिक लोकांनी आत्महत्या केल्या. पश्चिमी देशांत आत्महत्या करणाऱ्यांत पुरूषांचे प्रमाण अधिक आढळून येते. उदा., इंग्‍लंडमध्ये १९६१ साली प्रतिलक्ष पुरुषांपैकी १३·५ व प्रतिलक्ष स्त्रियांपैकी ९·१ असे आत्महत्येचे प्रमाण होते. पश्चिमी देशांत ग्रामीण भागांपेक्षा शहरांत, तरुणांपेक्षा वयस्कर माणसांत आणि श्रीमंत व अधिक उत्पन्नाच्या व्यावसायिकांत तसेच अगदी खालच्या थरांतील लोकांत आत्महत्येचे प्रमाण अधिक दिसून येते.

भारतात १९६५ साली सर्वांत जास्त आत्महत्या पश्चिम बंगालमध्ये (३,९९२) व त्याखालोखाल आत्महत्या महाराष्ट्रात (३,९२६) झाल्या. १९६७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक (शे. १६·७७) होते. त्यानंतर तमिळनाडू, उत्तर प्रदेश व आंध्रप्रदेश अशी क्रमवारी लागते. गुजरातेत आत्महत्येचे प्रमाण सर्वांत कमी (शे. ३·८२) होते. वयाच्या दृष्टीने विचार केला, तर भारतात आत्महत्या करणाऱ्यांपैकी १८ ते ३० वर्षांतील लोक सर्वांत जास्त (४३·५%)आहेत; महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण जवळजवळ ४०% आहे आणि ३० वर्षांवरील वयाच्या लोकांचे प्रमाण ३५·७% आहे.

उपलब्ध पुराव्यावरून आत्महत्येची कारणे निश्चित केली जातात. त्या कारणांना निर्णायक म्हणता येत नाही. पुष्कळ वेळा आत्महत्येचा हेतू सिद्ध होत नाही. भारतातील १९६५ सालातील एकूण आत्महत्यांपैकी  ३८·३% उदाहरणे अशी आहेत. जी काही कारणे दिली आहेत, त्यांत असाध्य रोगामुळे ६,९६८ (२४·९%), आईवडील, सासूसासरे यांच्याशी भांडण झाल्यामुळे २,६६८ (९·५%), आणि पती अगर पत्‍नीशी भांडण झाल्यामुळे २,२२२ (७·९%) आत्महत्या झालेल्या आहेत. आईवडील, सासूसासरे यांच्याशी आणि पतिपत्‍नींत भांडण झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांत स्त्रिया आणि त्याही १८ ते ३० वर्षांच्या वयोगटातील अधिक आहेत. इतर कारणांमध्ये दारिद्र्य, परीक्षेत अपयश आणि वेड ही प्रमुख आहेत. आत्महत्येच्या पद्धतींपैकी बुडून जीव देणे, गळफास लावून घेणे आणि विष घेणे ह्या मुख्य आहेत.

या विषयासंबंधी माहिती गोळा करावी आणि त्यावर काही उपाययोजना करावी म्हणून पूर्वीच्या मुंबई राज्यशासनाने एक समिती नेमली होती. या समितीने १९५४ ते १९५७ या सालांतील आत्महत्यांची पाहणी करून काढलेले निष्कर्ष : (१) नागपूर विभागात व अमरावती जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. (२) आत्महत्या

करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण नागपूर व राजकोट या भागांतजास्त आहे. (३) आत्महत्येचे प्रमाण शहर व ग्रामीण भागांत जवळजवळ सारखे आहे. (४) एप्रिल-मे व सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत आत्महत्या अधिक होतात, तर जुलै व डिसेंबर या महिन्यांत त्या सर्वांत कमी होतात. (५) आत्महत्या करणाऱ्या अधिक व्यक्ती एकंदर २० ते २४ वर्ष या वयांतील आहेत आणि स्त्रिया १५ ते २४ वर्ष या वयांतील अधिक आहेत. (६) असाध्य रोग, कौटुंबिक बेबनाव, मानसिक विकृती व गरीबी ही आत्महत्येची प्रमुख कारणे होत.

आत्महत्या हा गुन्हा आहे, पाप आहे, यांसारखे दृष्टिकोन हळूहळू लोप पावत असून, आत्महत्येचा प्रयत्‍न करणाऱ्याकडे सहानुभूतीने पहावे ही दृष्टी बळावत आहे. अशा माणसांना त्यांच्या आत्मघातकी मनोवृत्तीपासून परावृत्त करून त्यांना समाजात सुस्थिर होण्यासाठी मदत करणारी ‘गुड सॅमॅरिटन’ नावाची एकच संस्था आज महाराष्ट्रात आहे. अप्रत्यक्ष रीतीने अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते हे काम करतात.

संदर्भ : 1. Durkheim, Emil; Trans. Spaulding, J. A. & Simpson, G. Suicide, London, 1952.

2. Merton, R. K. Social Theory and Social Structure, Glencoe (Illinois), 1961.

3. Strengel, Erwin, Suicide and Attempted Suicide, Middlesex, 1964.

लेखक : मा. गु. कुलकर्णी ; शरच्चंद्र गोखले

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate