অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिकीकरण

आधुनिकीकरण

आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन) म्हणजे विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी गतिमान आणि सर्वस्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया होय. आधुनिकीकरण ही प्रक्रिया आहे, फलित नव्हे. ही प्रक्रिया केव्हा आणि समाजाच्या कोणत्या अवस्थेत थांबेल आणि परिणामी समाज कोणत्या अवस्थेस जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. अमेरिका, इंग्‍लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान इ. विकसित राष्ट्रांमध्ये प्रकर्षाने दिसून येणारी आणि अविकसित राष्ट्रांना आदर्शवत ठरलेली प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरणाची प्रक्रिया, असे सामान्यपणे समजले जाते. त्यामुळे या विकसित राष्ट्रांतील समाजात घडलेली व सध्या घडत असलेली स्थित्यंतरे ही आधुनिकीकरणाची प्रमाणभूत लक्षणे मानली जातात. याच अर्थाने आधुनिकीकरणाची प्रक्रिया अठराव्या शतकापासूनच मुख्यतः इंग्‍लंड व फ्रान्स या देशांतील समाजांत या ना त्या रूपाने सुरू झाली,

असे म्हटले जाते. कालांतराने जर्मनी, हॉलंड इ. यूरोपीय राष्ट्रांत ही प्रक्रिया सुरू झाली. या राष्ट्रांची साम्राज्ये आशिया व आफ्रिका खंडांत पसरलेली होती. साहजिकच साम्राज्यांतर्गत अविकसित देशांत सत्ताधारी समाज हा आदर्श समजला जात असे आणि त्याच्या आचारविचारादी अनेक वैशिष्ट्यांचे अनुकरण चालू असे. या अनुकरणाला पूर्वी ‘आंग्‍लीकरण’ किंवा ‘पश्चिमीकरण’ असे म्हटले जाई व आता आधुनिकीकरण असे म्हटले जाते. म्हणजे अविकसित देशांच्या संदर्भात आधुनिकीकरण हे एका जुन्या प्रक्रियेला दिलेले नवे नाव आहे.

कारणे व लक्षणे : आधुनिकीकरणाची नेमकी लक्षणे कोणती, याविषयी एकमत दिसून येत नाही. याचे कारण असे, की या प्रक्रियेतून उद्‍भवणाऱ्या अनेक स्थित्यंतरापैकी काही मूलभूत मानली जातात आणि काहींना त्या मूलभूत स्थित्यंतरांमुळे चालना मिळाली, असे समजले जाते. परंतु आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही एकाच वेळी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि वैचारिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चालू असते. संस्कृती, समाजव्यवस्था आणि व्यक्ती यांच्या परिवर्तनाच्या संदर्भात कमीअधिक तीव्रतेने ती कार्यप्रवण असते. समाजातील या सर्व क्षेत्रांतील घटक हे परस्परसंलग्‍न व परस्परावलंबित असल्यामुळे एकमेकांवर सतत प्रभाव पाडत असतात. म्हणून त्यांच्यात होणाऱ्या स्थित्यंतरामागील कार्यकारणभाव नेमका शोधून काढणे अवघड ठरते. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेची तीन मूलभूत कारणे दिली जातात:

ऐहिक संपत्ती वाढविण्याची राष्ट्रीय प्रवृत्ती आणि उपभोग्य वस्तूंचा अधिकाधिक संग्रह करण्याची व्यक्तीची अभिलाषा. यांत्रिकीकरणाचा उद्‍गम आणि त्यामुळे व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात यांत्रिक साधनांचा झालेला प्रसार; म्हणजे जैव शक्तीच्या ऐवजी अधिक परिणामकारी व कार्यक्षम ठरलेल्या अजैव शक्तीचा वाढता अवलंब. सर्व व्यवहारक्षेत्रांत तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य इ. मूल्यांना मिळालेले प्राधान्य. खरे पाहता ही तीनही कारणे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ऐतिहासिक दृष्ट्या ती एकाच वेळी उदयास आलेली आहेत. नवनवीन यांत्रिक उपकरणांच्या शोधामुळे जशी औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, तशी दळणवळणाची, वाहतुकीची आणि आचारविचारांच्या प्रसाराची अनेक प्रभावी साधनेही उपलब्ध झाली. यातूनच   नागरीकरण वाढीस लागले.  औद्योगिकीकरणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनांतील सुखसोयींची अनेक नवी साधने उपलब्ध झाली. उपभोग्य वस्तूंचे उत्पादन वाढू लागले आणि जीवनमान उंचावण्याचे राष्ट्रीय व व्यक्तिगत प्रयत्‍न हेही एकमेकांना पुरक म्हणून उदयास आले.

औद्योगिकीकरण व नागरीकरण या दोन प्रक्रियांमुळे सर्व मानवी व्यवहारांचे क्षेत्र व प्रमाण वाढू लागले. उत्पादन, वितरण व उपभोग या आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या. राजकीय सत्तेचे प्रभावक्षेत्रही विस्तारले. अधिकाधिक लोक या सत्तेच्या वर्चस्वाखाली येऊ लागले. कायदे करणे, त्यांची अंमलबजावणी करणे व न्यायदान ही राज्यकारभाराची कामेही मोठ्या प्रमाणावर व केंद्रीकृत संस्थांद्वारा होऊ लागली. झपाट्याने होत असलेल्या सामाजिक परिवर्तनास अनुसरून जुन्या आचारविचारांच्या जागी नवे आचारविचारही समाजात रुजू लागले. यांत्रिकीकरणामुळे व व्यापक औद्योगिकीकरणामुळे श्रमविभागणीचा पायाच बदलला. व्यक्तीच्या व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रशिक्षणावरून अगर कौशल्यावरून तिचे  सामाजिक स्थान निश्चित झाले. समाज व व्यक्ती दोन्हीही गतिशील बनली. यामुळे   सामाजिक संबंधही बदलले. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेस ही सर्व परिस्थिती जबाबदार असल्याने, अमुकच एक गोष्ट तिचे मूलभूत कारण आहे, असे ठामपणे म्हणता येत नाही.

वरील सर्वच कारणांमुळे विकसित राष्ट्रांत सर्वसाधारणपणे दिसून येणारी वैशिष्ट्ये आधुनिकीकरणाची लक्षणे मानली जातात. आधुनिक विकसित समाजात व्यक्तीच्या आणि संघ-संस्थांच्या कार्याचे म्हणजे त्यांच्या सामाजिक भूमिकेचे प्रभेदन झाले आहे. हे प्रभेदन कार्याच्या विशेषीकरणावर आधारित आहे. सामान्यतः सामाजिक श्रमविभागणीतील कोणतीही भूमिका व्यक्तीस आयतीच म्हणजे जन्मतः प्राप्त होणाऱ्या कौटुंबिक, जातीय अगर संरजामी स्थानामुळे पतकरता येत नाही. तिच्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागते. या परिस्थितीस अनुरूप अशा आर्थिक व राजकीय संस्था समाजात निर्माण होतात. या प्रभेदनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीच्या वेगवेगळ्या भूमिकांचे होणारे पृथक्करण. व्यक्तीची व्यावसायिक, राजकीय अगर अन्य कोणतीही भूमिका तिच्या कुटुंबावर अगर कौटुंबिक भूमिकेवर अवलंबून राहत नाही. त्यामुळे व्यावसायिक अगर राजकीय गट आणि कौटुंबिक गट यांच्यात उद्दिष्टांच्या व हितसंबंधांच्या बाबतींत फारकत होणे सहज शक्य असते.

त्यामुळे त्या त्या गटातील उद्दिष्ट व हितसंबंध यांस अनुसरून बनलेल्या नियमांवर व्यक्ती-व्यक्ती-संबंध आधारित असतात. आर्थिक व्यवहार हा प्रथमतः उत्पादन क्षेत्रातील वैज्ञानिक ज्ञानाच्या उपयोजनावर, नंतर त्यामुळे निर्माण होणाऱ्या औद्योगिक व व्यापारी संस्थांवर आणि शेवटी अनेक स्तरांतील व अनेक संस्थांतील नोकरचाकरांवर व मजूरवर्गावर अवलंबून असतो. राजकीय क्षेत्रात केंद्रसत्तेच्या विस्ताराबरोबरच त्या सत्तेचे अनेक संस्थांद्वारा   विकेंद्रीकरणही होते. हे कामाच्या वाढत्या व्यापामुळे व विशेषीकरणामुळे अपरिहार्य बनते. त्याचप्रमाणे राज्यातील अधिकाधिक लोक प्रौढमतदानामुळे वा अन्य कारणांमुळे राजकीय व्यवहारात भाग घेतात, तसेच राजकीय सत्तास्थानांकरिता उमेदवार बनू शकतात. राजकीय सत्ता ही काही विशिष्ट व्यक्तींची अगर घराण्यांची मिरासदारी नसते. सत्ताधारी लोकांना जनतेपुढे काही नियमांना व मूल्यांना अनुसरून आपल्या सत्तेचे समर्थन करावे लागते. म्हणजे सत्ताधाऱ्यांना आपले धोरण व त्याच्या अंमलबजावणीची पद्धत जनतेच्या हिताकरिताच आहे, हे सिद्ध करावे लागते व जनतेचा पाठिंबा मिळवावा लागतो.

संस्कृतीच्या क्षेत्रातही धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान इत्यादींचे शिक्षण, संवर्धन, प्रचार व प्रभाव यांच्या बाबतीतही प्रभेदन झालेले दिसून येते. साक्षरतेचा प्रसार, उदारमतवादी शिक्षण तसेच व्यक्तीचा कल व पात्रता यांस अनुसरून समाजास आवश्यक असलेले शिक्षण देणाऱ्या अनेक विशेषीकृत संस्था इ. लक्षणेही आधुनिक विकसित समाजात दिसून येतात. या सर्वांहून भिन्न आणि सर्वसमावेशक असे लक्षण म्हणजे आधुनिक समाजातील लोकांची विचारसरणी व अभिवृत्ती होय. या विचारसरणीस अनुसरून ऐहिक ऐश्वर्याला आणि भोगसुखाला प्राधान्य लाभते. सामाजिक-वैयक्तिक प्रगती किंवा सुधारणा ही ऐहिक सुख भोगण्याच्या क्षमतेवर ठरविली जाते. व्यक्ती ही समाजाचा केंद्रबिंदू बनते आणि वैयक्तिक हित साधण्याला नैतिक अधिष्ठान लाभते. कार्यक्षेत्रातील व्यक्तीचा दर्जा तिच्या यशस्वी कार्यकुशलतेवर ठरविला जातो. म्हणून नात्यागोत्याचे संबंध अगर अन्य जन्मजात गुणविशेष हे या बाबतीत कमकुवत ठरतात. जन्मजात सामाजिक गुणावगुणांच्या बंधनातून व्यक्ती मुक्त होऊन स्वतःच्या कर्तृत्वावर हवे ते स्थान मिळविण्यास स्वतंत्र बनते. माणसामाणसांतील परस्परसंबंध हे अनैच्छिक परंपरेवर आधारित न राहता व्यक्तीच्या उद्दिष्टास व हितास अनुसरून तिच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असतात. व्यक्तीचे जीवन एका मर्यादित चाकोरीतून न जाता विकसनशील बनू शकते. व्यक्तीची वैचारिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक आणि राजकीय क्षितिजे विस्तारतात.

वरील लक्षणे सर्वसाधारणपणे जगातील सर्व विकसित राष्ट्रांत दिसून येतात. जगातील सर्वच राष्ट्रे आपल्या जनतेचे सरासरी जीवनमान उंचावण्याचे प्रयत्‍न करीत आहेत. परंतु हे उद्दिष्ट कोणत्या पद्धतीने व कोणत्या क्रमाने गाठावे, या बाबतीत राष्ट्राराष्ट्रांत भिन्नता आढळून येते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थकारण व राजकीय विचारसरणी आणि यांत्रिकीकरणाकरिता आवश्यक असलेली सर्वांगीण क्षमता यांवरून राष्ट्राराष्ट्रांतील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या लक्षणांना प्राधान्य लाभले आहे. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, रशिया आणि जपान या राष्ट्रांतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियाही परस्परांहून भिन्न आहेत.

विकसनशील राष्ट्रांतील आधुनिकीकरण : अविकसित, अर्धविकसित अगर विकसनशील राष्ट्रांच्या आधुनिकीकरणातील अडथळे कोणते, हे पाहणे उद्‍बोधक ठरेल. अविकसित राष्ट्रांतील समाज बहुतांशी पारंपरिक आहे. राजकीय दृष्ट्या जरी समाज एक मानला गेला असला, तरी सांस्कृतिक, वैचारिक अगर आर्थिक दृष्ट्या तो एकजिनसी बनलेला नाही. बहुतेक अविकसित राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य अलीकडेच लाभलेले आहे. त्यांच्या नव्या राज्यव्यवस्थेत परस्परभिन्न आणि परस्परविरोधी असे अनेक गट एकत्र आणले गेले आहेत आणि सर्वच गट आधुनिक राज्यशास्त्राच्या दृष्टीने प्रगत झालेले नाहीत. समाजात भाषा, जात, पंथ, धर्म, प्रदेश, कुटुंब इ. हितसंबंधांचे पुरस्कार करणारे वेगवेगळे गट आहेत. म्हणून व्यक्ती त्या त्या गटापुरतीच एकात्म राहते, सर्व समाजाशी एकात्म होऊ शकत नाही. राज्यसंस्था सोडल्यास सर्व समाजाला भिडणारी अगर सामावून घेणारी दुसरी संस्था अगर व्यवस्था नाही.

व्यक्तीचे सर्व व्यवहार गटापुरतेच मर्यादित असून गटागटांतील संपर्क किंवा देवाणघेवाण जुजबी आहे. राजकीय पक्षांचे सामर्थ्य अशा परंपरागत संकुचित गटांवर अवलंबून असते. हीच गटबाजी मजूरसंघटनांतही दिसून येते. म्हणून राजकीय पक्षांचे बळ त्यांच्या मार्गदर्शनाखालील मजूरसंघटनांवरही अवलंबून असते. वृत्तपत्रसंस्था पुष्कळदा स्थानिक अगर प्रादेशिक असतात. औद्योगिक व आर्थिक विकासाला आवश्यक असलेल्या साधनसंपत्तीची कमतरता असते. कामानिमित्त स्थलांतर करणाऱ्यांची संख्या कमी असते. स्थलांतर करणारे आपले पूर्वीचे आचारविचार सोडण्यास तयार नसतात आणि नव्या ठिकाणी निराळे गट करूनच राहतात. देशाच्या विकासाकरिता सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांचे फायदे आपल्यालाच मिळावेत, म्हणून सर्वच हितसंबंधी गट प्रयत्‍नशील असतात. या देशव्यापी गटबाजीमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येण्याचा संभव असतो आणि शासनसत्तेला देशाचे ऐक्य अबाधित राखण्याकरिता सतत जागरूक रहावे लागते.

यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे देशातील उद्योगधंदे अप्रगत अवस्थेत राहतात. जेथे यांत्रिकीकरण झाले असेल आणि मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे प्रस्थापित झाले असतील, तेथे त्यांची उत्पादनक्षमता वाढविणारा आणि उत्पादक घटकांना एकत्रित आणून त्यांना कार्यप्रवण करणारा कुशल व्यवस्थापकवर्ग अनेकदा नसतो. उद्योगधंद्यांच्या तसेच कोणत्याही संस्थेच्या वाढत्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यास प्रशिक्षित व्यवस्थापकांची व नोकरवर्गाची आवश्यकता असते. अविकसित राष्ट्रांत यांचीही उणीव भासते. प्रशिक्षित व्यवस्थापक व नोकरवर्ग जेथे उपलब्ध असेल, तेथे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर त्यांचे हितसंबंध गुंतले असल्यामुळे, पुष्कळदा ते प्रामाणिक व कार्यक्षम राहू शकत नाहीत.वरील लक्षणे ही सर्वच मागासलेल्या व विकसनशील राष्ट्रांच्या आधुनिकीकरणात कमीअधिक प्रमाणात अडथळे आणीत असल्याचे दिसून येते.

आधुनिकीकरणाच्या सामाजिक समस्या : समाजातील सर्वसामान्य माणसाला सहजगत्या उपलब्ध असणारी ऐहिक सुखोपभोगाची साधने, हे आधुनिकीकरणाचे महत्त्वाचे गमक आहे. हे जरी खरे असले, तरी आधुनिक समाज हा सर्व दृष्टींनी परिपूर्ण असेल आणि त्यात कोणत्याही समस्या नसतील असे समजणे मात्र चुकीचे होईल. आधुनिकीकरणातून निर्माण झालेल्या व होत असलेल्या अनेक समस्या आज विकसित राष्ट्रांना भेडसावीत आहेत.यांत्रिकीकरणामुळे व विशेषीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या : कामातील यांत्रिकपणा आणि कामातील वैयक्तिक आस्थेचा अभाव, औपचारिक समूहांचा आणि नियमांचा प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेला व्यक्ती व समाज यांतील दुरावा किंवा आपुलकीचा अभाव, यांसारखे प्रश्न गुंतागुंतीचे ठरले आहेत. यांशिवाय नित्य नव्या शोधांमुळे व यांत्रिकी क्रांतीमुळे झपाट्याने बदलणाऱ्या समाजात व्यक्तीच्या सामाजीकरणावर व समायोजनक्षमतेवर ताण पडतो. सामाजिक नियंत्रणाच्या संदर्भात कुटुंबासकट सर्वच पारंपरिक संस्था कमकुवत बनून राज्यसंस्थेला व त्यायोगे सरकारला प्राधान्य लाभते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाने समाजविघातक अशी स्वैरवृत्ती व जीवनातील असुरक्षितता निर्माण होते.

जीवनातील सुरक्षिततेची हमी देणाऱ्या देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा ऱ्हास व भोगवादाचा अतिरेक दिसून येतो.   कुटुंबसंस्थेचे वर्चस्व नष्ट होऊन विवाहविच्छेदनाच्या वाढत्या प्रमाणामुळे कुटुंबसंस्था अस्थिर बनत चाललेली आहे. कौटुंबिक अस्थिरतेमुळे लहान मुलांची आबाळ व वृद्धांची अगतिकता वाढत आहेत. योग्य सामाजीकरणाचा व सामाजिक नियंत्रणांचा अभाव दिसून येत आहे. स्पर्धात्मक श्रमविभागणीमुळे अतृप्त राहिलेल्या व्यक्तीच्या आशाआकांक्षा व त्यांतून निर्माण होणारी संघटित अगर उत्स्फूर्त गुन्हेगारी वाढत आहे. कलेच्या नावाखाली अनैतिक व समाजविघातक प्रवृत्तींना बाजारी प्रोत्साहन मिळत आहे. या व अशा गोष्टी मुख्यतः विकसित राष्ट्रांत अधिकांशाने दिसून येतात. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने त्यांची गणना सामाजिक समस्यांत केली जाते.

संदर्भ : 1. Apter, David, Politics of Modernization, London, 1969.

2. Eisenstadt, S. N. Modernization, Protest and Change, New Delhi, 1967.

3. Geertz, Clifford & Shils, Edward, Ed. Old Societies and New States, London, 1963.

4. Levy, Marion, J. Modernization and the Structure of Societies, 2 Vols. Princeton, 1966.

लेखक: मा. गु. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate