অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुटुंबसंस्था

कुटुंबसंस्था

विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अगर अधिक स्त्रीपुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय. निवासस्थान, स्वयंपाक, स्थावर आणि जंगम मालमत्ता, मिळकत व खर्च आणि सभासदांच्या एकमेकांबद्दलच्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी कुटुंबात बहुधा समाईक असतात.

समाजातील नात्यागोत्याच्या व्यवस्थेचा एक घटक म्हणून असलेले कुटुंबाचे हे स्वरूप आणि लक्षणे मानवी समाजात आजवर अस्तित्वात असलेल्या कुटुंबसंस्थेवरून निश्चित होत गेली आहेत. वेगवेगळ्या समाजातील तसेच एकाच समाजात वेगवेगळ्या काळी अस्तित्वात आलेल्या कुटुंबसंस्थांचे स्वरूप, रचना व कार्ये यांबाबत भिन्नता आढळून येते; कारण कुटुंब शेवटी एका व्यापक समाजरचनेचा घटक आहे. समाजातील इतर आर्थिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी तो संबंधित असतो. म्हणून कुटुंबाचे स्वरूप, समाजातील त्याचे स्थान, त्याची अंतर्रचना व कार्य इ. लक्षणे सापेक्ष आहेत. एकूण संस्कृतीतील जीवनमूल्ये, धर्म व तदानुषंगिक आचार, नीतिनियम, अर्थव्यवस्था, राजव्यवस्था इत्यादींच्या संदर्भात समाजा-समाजांत आणि एकाच समाजात कुटुंबसंस्थेची भिन्न भिन्न रूपे व प्रकार आढळणे, अपरिहार्य आहे. कुटुंबाकुटुंबातील अशी भिन्नता ही कुटुंबाची रचना, कुटुंबाचे स्वरूप, कुटुंबाचा विस्ताराच्या दृष्टीने असलेला आकार, विवाह प्रकार आणि कुटुंबाची कार्ये या पाच घटकांतून मुख्यत्वे दिसून येते. पैकी कुटुंबाच्या निवासस्थानाचे स्वरूप व आकार हे एकमेकांशी व कुटुंबाची रचना व कार्य हे एकमेकांशी अधिक निगडित असतात.

अर्थशास्त्रीय विवेचनात घर वा गृहकुल (हाउसहोल्ड) या नावाखाली निवासस्थान व इतर समाईक गोष्टीही येतात. उदा.,  वसतिगृह, मठ इत्यादी. परंतु अशा रीतीने एकत्र राहणाऱ्या माणसांचे एकमेकांशी नाते असतेच, असे नाही. शिवाय त्यांचे इतर हितसंबंध स्वतंत्र असू शकतात. म्हणून केवळ अर्थशास्त्रीय संदर्भातील घर हे कुटुंब होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे लोकसंख्याशास्त्रात कुटुंब या संज्ञेला वेगळा संदर्भ आहे. स्त्रियांच्या प्रसवक्षमतेचा व संततिप्रमाणाचा अभ्यास करताना एकूण जन्मलेल्या मुलांची संख्या त्यात लक्षात घेतली जाते. अर्थातच शिक्षणाकरिता व नोकरीकरिता दुसरीकडे राहणाऱ्यांचीही गणना त्यात होतेच. पण समाजशास्त्रातील अर्थानुसार या सर्व व्यक्ती कुटुंबाचे सभासद असतातच, असे नाही. म्हणून कुटुंबाच्या समाजशास्त्रीय विचारांत समाईक निवासस्थान, कुटुंबातील सभासदांची एकमेकांशी असलेली नाती, त्यांचे हक्क, कर्तव्ये, भूमिका व कार्ये ही लक्षणे महत्त्वाची आहेत.

कुटुंबाचे स्वरूप व आकार : कुटुंबातील सदस्यांचे संबंध, मुलांच्या सामाजीकरणाच्या जबाबदाऱ्या वगैरे दृष्टींनी, कुटुंबाच्या स्वरूपाला व आकाराला महत्त्व आहे. कुटुंबाचे स्वरूप हे कुटुंबसदस्यांच्या कुटुंबप्रमुखाशी व एकमेकांशी असलेल्या रक्ताच्या नात्यावरून ठरते; म्हणजे कुटुंबाचे सदस्य कोण असू शकतील, यावर ते अवलंबून आहे. कोणत्याही कुटुंबाचे मूलभूत सदस्य पती, पत्नी आणि एक किंवा अनेक अविवाहित मुले हे होत.  पती, पत्नी आणि फक्त मुलेच असलेल्या कुटुंबाला म्हणून केंद्र किंवा केंद्रस्थ किंवा बीज-कुटुंब म्हणतात.

मानवी समाजाच्या अगदी आरंभीच्या काळात कुटुंब असे काही नव्हतेच; लहानमोठ्या गटांत ते पूर्णपणे विलीन झालेले असे, असे एक मत मार्क्सवादी व विकासवादी समाजशास्त्रज्ञ मांडत असत. पण बऱ्याच अंशी हे सर्व अंदाज आहेत. कुटुंबाचा उगम निश्चित केव्हा व कोणत्या अवस्थेत झाला, याचा तर्क करणे कठीण आहे. फारतर असे म्हणता येईल, की मानवी समाजाच्या कृषिपूर्व अवस्थेत गटजीवन हे कुटुंबाच्या तुलनेने अधिक प्रभावी होते. पण आई, बाप आणि मुले यांचे भावनिक दुवे या ना त्या स्वरूपांत सर्व समाजात दिसून येतात. या अर्थाने केंद्रकुटुंब हे सार्वकालिक आहे. स्वतंत्र घटक म्हणून त्याचे महत्त्व व स्थान अलीकडचे असले आणि गट किंवा संयुक्त कुटुंबाचे वर्चस्व काही समाजात जास्त असले, तरी पती, पत्नी व मुले यांचे रक्ताचे व सामाजिक दुवे यांचा पूर्ण लोप असलेली समाजरचना इतिहासात कुठे आढळत नाही.

केंद्रकुटुंबात इतर सदस्य समाविष्ट झाले,की ते कुटुंब विस्तारित होते. विस्तारित कुटुंब हे मुख्यतः प्रचलित असलेले विवाहाचे प्रकार, विस्तार पावण्याची पद्धती आणि केंद्रकुटुंबाव्यतिरिक्त इतर सदस्यांचे कुटुंबप्रमुखाशी व एकमेंकाशी असलेले नाते यांवरून वेगवेगळे स्वरूप धारण करते. विवाहानंतर वधू किंवा वर स्वतःचे घर सोडून जोडीदाराच्या घरी जाऊन रहावयाच्या निवास-नियमानुसार कुटुंबात विशिष्ट नात्याचेच लोक राहू शकतात. यामुळेही कुटुंबाचे स्वरूप बदलते.

एकविवाह,बहुपत्नीविवाह आणि बहुपतिविवाह या तीन विवाहप्रकारांमुळे तीन वेगवेगळ्या स्वरूपांची कुटुंबे बनतात. एकविवाहपद्धतीत एका वेळेला एका पतीस एकच पत्नी व पत्नीस एकच पती असू शकतो. पतीबरोबर लैंगिक संबंध असलेली दुसरी स्त्री जर कुटुंबात असली, तर ती ठेवलेली म्हणूनच राहू शकते. पतीचा तिच्याबरोबर रूढ पद्धतीने विवाह झालेला नसतो. म्हणूनच तिला आणि तिच्या संततीला वारसाचे अगर धार्मिक विधीत भाग घेण्याचे हक्क नसतात किंवा असले, तरी पत्नीच्या बरोबरीने नसतात. एकविवाहपद्धतीने बनलेले कुटुंब हे केंद्रस्थ अगर विस्तारित या दोन्ही स्वरूपाचे असू शकेल.

बहुपत्नीविवाहपद्धतीत एका पुरुषाला एकाच वेळी एकाहून जास्त बायका असू शकतात. सर्व आपापल्या मुलांबरोबर एकत्रच राहतात. काही जमातींमध्ये प्रत्येक स्त्री आपल्या मुलांसमवेत वेगळ्या घरात राहते. परंतु सर्वांची घरे अगदी जवळजवळ असतात व पती क्रमाने किंवा अन्य नियमांनुसार प्रत्येकीकडे जाऊन राहतो. अर्थात सामाजिक इतिहासात अशी उदाहरणे फार थोडी आहेत. अशा बहुपत्नीकुटुंबात अनेक केंद्रकुटुंबे समाविष्ट असतात; परंतु पती हा समाईक असतो. म्हणून अशा कुटुंबाला केंद्रकुटुंब न म्हणता बहुविवाही कुटुंब म्हटले जाते. बहुविवाहाचा दुसरा प्रकार म्हणजे बहुपतिविवाह. यात एका स्त्रीला एकाच वेळी एकाहून जास्त पती असतात. तिच्याशी विवाहबद्ध असलेले सर्व पुरुष भाऊभाऊ असले, तर तिच्यासह एकाच घरात राहतात. अशा कुटुंबाला भ्रातृक बहुपतिकत्व कुटुंब म्हटले जाते. प्राधान्याने भारतात दक्षिणेत तोडा आणि उत्तरेस खासा या जमातींमध्ये ही कुटुंबपद्धती आहे. सर्व पुरुष जर वेगवेगळ्या कुटुंबांतील असले, तर अशा विवाहाला अभ्रातृक बहुपतिकत्व म्हटले जाते. ही पद्धत दक्षिण पॅसिफिक महासागरातील मार्केझास बेटावरील जमातीमध्ये व काही प्रमाणात तोडा व तिबेटी जमातींमध्ये दिसून आल्याची नोंद आहे. भारतात केरळमधील नायर जमातीमध्ये काही वर्षांपूर्वी एका स्त्रीशी वेगवेगळ्या कुटुंबांतील पुरुषांनी शरीरसंबंध ठेवण्याची ‘संबंधम्’ विधीवर आधारलेली पद्धत होती. परंतु अशा संबंधांना रूढ विवाहाची सक्ती नव्हती. विवाहानंतर येणारी जोडीदाराची आर्थिक जबाबदारी अगर जोडीदाराशी आर्थिक सहकार्याची आवश्यकताही या ‘संबधम्‌’ मध्ये अभिप्रेत नव्हती. बहुपतिकत्वाच्या कुटुंबात स्त्री समाईक असून पुरुष अनेक असतात. भ्रातृक बहुपतिकत्व कुटुंबात अनेक केंद्रकुटुंबे असतात,परंतु स्त्री समाईक असते. बहुपत्नीकत्व आणि भ्रातुक बहुपतिकत्व या दोन कुटुंबातील दुसरा एक महत्त्वाचा फरक हा, की बहुपत्नीकत्वाच्या कुटुंबात अनेक स्त्रियांमध्ये एकच पुरुष समाईक असतो आणि भ्रातृक बहुपतिकत्वाच्या कुटुंबात भावाभावांमध्ये एकाहून अधिक स्त्रिया समाईक असू शकतात.

कुटुंब दोन प्रकारांनी विस्तारते. एक आनुवंशिक पिढीतून आणि दुसरे इतर केंद्रकुटुंबांचा समावेश करून. एकापेक्षा जास्त केंद्रकुटुंबे असलेल्या विस्तारित कुटुंबात एका पिढीतील केंद्रकुटुंबातील पती हा दुसऱ्या पिढीच्या केंद्रकुटुंबातील पतीचा पिता किंवा पुत्र असतो किंवा एका पिढीच्या केंद्रकुटुंबातील पत्नीही दुसऱ्या पिढीच्या केंद्रकुटुंबातील पत्नीची माता अगर मुलगी असते. यांतील पहिला प्रकार हा विवाहानंतर होणाऱ्या वधूच्या निवासांतराशी, वारसाहक्क पित्यापासून पुत्राकडे जाणाऱ्या रूढीशी तसेच पितृवंशीय व पितृसत्ताक संस्कृतीशी अधिक निगडित आहे. हा प्रकार सर्व प्राचीन आणि आधुनिक संस्कृतींत प्रामुख्याने दिसून येतो. दुसरा प्रकार हा विवाहानंतर पतीने पत्नीच्या घरी जाऊन रहावयाच्या चालीशी व मातृवंशीय (आईकडून मुलीकडे वारसाहक्क येणाऱ्या) व मातृसत्ताक संस्कृतीशी अधिक जुळणारा आहे. हा प्रकार भारतात खासी व गारो जमातींत तसेच भारताबाहेर अन्यत्रही दिसून येतो. एकूण पहिला प्रकार हा अधिक समाजांत आहे. भारतातील संयुक्त कुटुंब हे बव्हंशी पहिल्या प्रकारातच मोडते. परंतु मर्‌डॉक यांच्या मते भाऊभाऊ आपापल्या पत्नीमुलांसमवेत एकत्र रहात असलेले कुटुंब हे संयुक्त कुटुंब आहे. अशा कुटुंबात कमीतकमी दोनच पिढ्या असतात. विस्तारित कुटुंबात किमान तीन पिढ्या तरी एकत्र असतात. संयुक्त कुटुंबात भाऊभाऊ स्वेच्छेने एकत्र आलेले असतात, अशी कल्पना आहे. परंतु भारतीय संयुक्त कुटुंब अशा प्रकारचे नसते. विस्तारित कुटुंबातील सर्व विवाहित भावांना जोडणारे आईवडील निवर्तले, की उरते ते संयुक्त कुटुंब. भारतीय संदर्भात विस्तारित कुटुंबालाही संयुक्त कुटुंबच म्हटले जाते.

मातृगृहीय व पितृगृहीय पद्धतींबरोबरच मातुलगृहीय पद्धतही अल्प प्रमाणात रूढ आहे. यात लग्नानंतर वराच्या मामाच्या कुटुंबात किंवा जवळपास राहतात. ही पद्धत मातृगृहीय आणि मातृवंशीय पद्धतींवरून उद्‌भवली असावी, असा तर्क आहे.

विवाहानंतर स्वतंत्र कुटुंबाची स्थापना करण्याच्या पद्धतीस नूतनगृहीय पद्धत म्हटले जाते. परिस्थितीप्रमाणे वधूच्या अगर वराच्या माता-पित्यांबरोबर राहण्याच्या पद्धतीस उभयस्थानीय पद्धत म्हणतात.

आकाराच्या दृष्टीने केंद्रकुटुंब हा सर्वांत लहान गट असणे आणि क्रमाने बहुविवाही विस्तारित कुटुंब मोठे असणे स्वाभाविक ठरते. वरील कुटुंबांव्यतिरिक्त दंपतिविहीन असे एखादे कुटुंब असल्यास ते कोणत्यातरी कुटुंबाचा खंडित अवशेष असण्याचीच शक्यता असते.

कुटुंबाची रचना व कार्य : कुटुंबाची रचना ही मुख्यत: कुटुंबाच्या सभासदांतील श्रमविभाजन तसेच सत्ता, अधिकार व दर्जा यांच्या स्वरूपावर व वाटपावर अवलंबून असते. मालमत्तेचा वारसा, घरातील सत्तेची व अधिकारांची विभागणी, घटस्फोटाचे अधिकार व सवलती, मुलांवरील नियंत्रण या सर्व गोष्टींतून ती रचना व्यक्त होत असते. तथापि कौटुंबिक रचनेची ही अंगे अखेरीस समाजातील सांस्कृतिक, धार्मिक मूल्ये, अर्थव्यवस्था व तिच्यामधील श्रमविभाजनपद्धती, सामाजिक स्तररचनेनुसार त्या त्या स्तरातील व्यक्तींना मिळणारी सत्ता, अधिकार व दर्जा आणि व्यक्तींची सामाजिक चलनशीलता यांच्याशी निगडित असतात.

पितृसत्ताक कुटुंबात सापेक्षत: पित्याचे व पर्यायाने पुरुषांचे वर्चस्व असणे व मातृसत्ताक कुटुंबात सापेक्षतः मातेचे व पर्यायाने स्त्रियांचे वर्चस्व असणे स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे मुलामुलींवर वडीलधाऱ्या माणसांचे वर्चस्व असणे, हेही तितकेच सुसंगत आहे. परंतु ही सर्व लक्षणे आदर्शात्मकच असतात. कारण लिंगभेद आणि वयोमानानुसार कामाची व सत्ताधिकारांची वाटणी होणे, हे मुख्यतः समाजातील साध्या अर्थव्यवस्थेवर, विशेषत: शारीरिक श्रमावरच आधारलेल्या श्रमविभाजनावर अवलंबून असते. या श्रमविभाजनाच्या स्थिरतेशी आणि कुंठित सामाजिक चलनशीलतेशीही ते निगडित असते. आहारासाठी भटकणाऱ्या, शिकारीवर जगणाऱ्या किंवा बागायतीप्रधान जमातींत स्त्रियांना अधिक महत्त्व येते. यामुळे अशा जमातींत मातृवंशीय व मातृसत्ताक कुटुंबरचनेचे घटक उदयास येण्याचा संभव अधिक असतो. शेतीच्या अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या वाट्याला अधिक काम येत असल्यामुळे व जमीनजुमला कुटुंबातच अभंग ठेवण्याच्या हेतूमुळे पितृवंशीय व पितृसत्ताक कुटुंब शेतीप्रधान समाजांशी जुळणारे ठरते. या दोन्ही प्रकारांत एकूण अर्थव्यवस्थाच अशा प्रकारे निर्णायक ठरते. त्याचप्रमाणे बहुविवाही विस्तारित आणि संयुक्त कुटुंबे ही प्रामुख्याने साधी व बिनगुंतागुंतीची शेतीची अर्थव्यवस्था असलेल्या समाजातच अधिक प्रमाणात अस्तित्वात असतात. याउलट आधुनिक समाजरचनेशी केंद्रकुटुंबे सुसंगत आहेत. कारण अर्थोत्पादनात व इतर व्यवहारांत यंत्रतंत्रांचा व्यापक व सर्वंकष प्रवेश झाला आहे. प्रशिक्षणाला महत्त्व आले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला अग्रहक्क इ. मूल्ये प्रधान मानली जात आहेत. औद्योगिकीकरण व शहरीकरण यांच्या विकासासाठी व्यक्तीची चलनशीलता आवश्यक समजली जाऊ लागली आहे. परिणामी स्थिर स्वरूपाच्या शेतीच्या अर्थव्यवस्थेतील चिवट असलेली कुटुंबाची व नात्यागोत्याची बंधने आजच्या यंत्रतंत्रप्रधान समाजरचनेत शिथिल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रकुटुंब हे आधुनिक उद्योगप्रधान समाजाचा एक अपरिहार्य घटक समजले जाते.

अशा आधुनिक केंद्रकुटुंबातील पतिपत्नी हे दोघेही समाजाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादक व इतर व्यवहारांत अधिकाधिक सहभागी होतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कुटुंबाची सत्ता व अधिकाराची स्थाने स्त्रीपुरुषभेदांनुसार ठळकपणे वेगळी व मर्यादित राहत नाहीत. त्याचप्रमाणे घरातील कामेही लिंगभेदानुसार केली जातातच, असे नाही. पुरुषाने स्त्रियांची परंपरागत अशी अनेक कामे करावी व स्त्रियांनीही पुरुषांच्या अनेक नेहमीच्या जबाबदाऱ्या उचलाव्यात, अशा अपेक्षा निर्माण होतात. सारांश, आधुनिक समाजात अशा रीतीने स्त्रीस्वातंत्र्य व स्त्रीपुरुषांतील सामाजिक समानता अपरिहार्य बनते.

कुटुंब : एक पायाभूत समाजसंस्था : कुटुंब ही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीने एक मूलभूत महत्त्वाची संस्था आहे. समाजसंस्था या दृष्टीने तिचे इतिहासातून चालत आलेले सातत्य सामान्य माणसांना इतके प्रभावी वाटते, की बऱ्याच वेळा कुटुंब हे नैसर्गिक आहे, माणसांची एक सहज– जणू रक्ताची– प्रेरणा आहे, असे त्यांना वाटते. अर्थातच कुटुंबाची अशी एखादी सहज आणि स्वतंत्र मानवी प्रेरणा अस्तित्वात नाही; पण या सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कुटुंबाकडून होणाऱ्या कार्यांना समाजरचनेतच एक असाधारण स्थान आहे आणि यातच संस्था या दृष्टीने कुटुंबाचे सामर्थ्य आहे.

कुटुंब हा समाजातील एक महत्त्वाचा आणि आधारभूत असा प्राथमिक गट आहे. प्रेम, आपुलकी, त्याग, समान हितसंबंध जपण्याची ईर्षा,सहकार्य इ. कुटुंबजीवनातून निर्माण होणारे प्राथमिक भावबंध हे व्यापक समाजजीवनातही पाझरत जाऊन व्यक्त होतात. व्यक्तीच्या बालपणी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या ती संपूर्णपणे कुटुंबाच्या आधीन असते. त्यामुळे आई, वडील, बहीणभाऊ आणि इतर नातेवाईक यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा पूर्णपणे निर्णायक नसला, तरी मूलभूत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे समाजाच्या संस्कृतीचे कुटुंब हे एक प्रमुख वाहन असते. समाजाची मूल्ये, परंपरा, रीतीभाती व आचार ह्यांचा वारसा व्यक्तीला एका संस्कारक्षम अवस्थेत इतर संस्थांचा त्याच्या जीवनात प्रवेश होण्यापूर्वी कुटुंबाकडूनच मिळतो.

कोणतेही समाजजीवन व रचना सतत चालू राहण्याच्या दृष्टीने जी कार्ये अटळ आणि आवश्यक असतात, ती कुटुंबाकडून केली जातात. तसे पाहिले, तर समाजाच्या वेगवेगळ्या अवस्थांत धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशी कार्ये कुटुंबाने– विशेषत: संयुक्त कुटुंबाने– केलेली आहेत. पण ही सर्वच कार्ये अपरिहार्य आणि आवश्यक नव्हती. ही कार्ये म्हणजे (१) प्रजनन, (२) पालनपोषण, (३) नव्या पिढीचे वेगवेगळ्या पद्धतींनी सामाजीकरण आणि (४) व्यक्तीला एक निश्चित स्थान व दर्जा प्राप्त करून देणे, ही होत.

या कार्यांपैकी प्रत्येक कार्य हे तत्त्वत: दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकेल. पण आजपर्यंत तरी कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था टिकू शकलेली नाही. व्यक्तीचे वेगळे व्यक्तिमत्त्व राखणारी संस्था म्हणून कुटुंबावर समूहवादी विचारवंतांनी नेहमीच हल्ले चढविले आहेत. प्लेटोच्या आदर्श समाजात कुटुंबाला स्थान नव्हते. साम्यवादी विचारसरणीत व तत्त्वत: समाजातही, खाजगी मालमत्तेचा भांडवलशाही आधार म्हणून कुटुंबसंस्था विलयाला जाईल, असेच भविष्य अभिप्रेत होते. प्रत्यक्षात, मूल जन्मल्यानंतर, त्याचा सामाजिक व आर्थिक दर्जा आईवडिलांच्या दर्जावरून निश्चित होण्याच्या आतच, पालनपोषणासाठी व सामाजीकरणासाठी ते अन्य सामूहिक संस्थांकडे देण्याचे प्रयोग आजपर्यंत चार ठिकाणी झाले आहेत : (१) रशियन क्रांतीनंतरच्या पहिल्या काही वर्षांत रशियात स्थापन झालेल्या पण पुढे बंद झालेल्या ‘कम्यून’ संस्था. (२) काहीशा मोठ्या प्रमाणावर साम्यवादी चीनमध्ये निर्माण केलेल्या प्रचंड ‘कम्यून’ संस्था. (३) इझ्राएलमध्ये सामूहिक, सहकारी संस्थांचा –‘किबुत्झ’– चालू असलेला प्रयोग. (४) खाजगी व्यक्तिवादाला विरोध म्हणून अलीकडे अमेरिकेतील काही तरुणतरुणींच्या गटांनी कम्यूनमध्ये सामूहिक जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न. यांपैकी पहिल्या आणि चौथ्या ठिकाणच्या प्रयोगांचे प्रमाण अल्प आहे. चीनमधील कम्यूनचा चिवटपणा व दीर्घकालीनत्व अजून निर्णायकपणे सिद्ध व्हावयाचे आहे. इझ्राएलमधील किबुत्झ चळवळ कमी होत चालली आहे.सारांश, या प्रयोगांचे तुरळक प्रमाण, ज्या आणीबाणीच्या राष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच हे प्रयोग झाले ती पार्श्वभूमी, सरकारची त्यामागील दंडसत्ता आणि हे प्रयोग फसल्यानंतर कुटुंबसंस्थेची या समाजातून पुन्हा बसविली गेलेली घडी, हे सर्वच मुद्दे त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. व्यक्तीला स्वत:चे एक खाजगी विश्व असते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा व्यक्तिकेंद्रित अशा जवळीकीच्या संबंधांतून होतो, समूह त्या दृष्टीने उणा पडतो, असाही एक महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला जातो.

कुटुंबसंस्थेचे परिवर्तन : आधुनिक कुटुंबसंस्थेवर मुख्यत: चार शक्तींचे एकाच वेळी आघात होत आहेत : (१) आर्थिक–औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. (२) वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ती. (३) मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद. (४) विवाहनीतीमध्ये पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: आज पाश्चात्त्य समाजात होत असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक ठरण्याचाच संभव आहे. पौर्वात्य समाजातील कुटुंबांवरही हे आघात चालू आहेत. त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व वर्गांतील कुटुंबांतही हे बदल होत आहेत, असेही नाही. मुख्यत: हे आधुनिक उद्योगप्रधान समाजातील मध्यम वर्गातील बदल आहेत. पण मध्यम वर्गाचे कुटुंब हाच आधुनिक समाजातील प्रभावी नमुना असल्यामुळे हे परिवर्तन महत्त्वाचे आहे.

सर्व समाजांत सर्व काळी कुटुंबबाह्य प्रजनन,अल्पशा प्रमाणात का होईना,पण होत राहिले आहे. परंतु विवाहबाह्य लैंगिक संबंध निषिद्ध मानले गेल्यामुळे कुटुंबबाह्य संततीस कायद्याने व सांस्कृतिक दृष्ट्या गौण स्थान दिले जात असे. काही समाजांत अशा अनौरस व्यक्तींना परित्यक्त स्थितीत अगदी निकृष्ट जीवन जगावे लागत असे. अशा संततीकडे आधुनिक काळात बहुतेक सर्व समाजांमध्ये सहानुभूतीनेच पाहिले जाते. अनाथ विद्यार्थीगृहे यासारख्या संस्थांद्वारे परित्यक्त मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारीही अनेक समाजांनी स्वीकारली आहे. कायद्याने गर्भपातास मान्यता मिळालेल्या समाजात हा प्रश्न तितकासा तीव्र न होण्याचा संभव असतो. पण विवाहबाह्य संततीस कायद्याने जरी योग्य स्थान मिळाले असले, तरी तिला इतरांच्या बरोबरीची सामाजिक प्रतिष्ठा सर्व समाजांत मिळतेच असे नाही. अशी प्रतिष्ठा देण्यास बद्ध झालेल्या रशियन समाजातही हा अनुभव आहे. भारतात अनौरस मुलांना वारसाहक्क आणि विवाह यांबाबतीत आजही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

सामाजीकरण आणि सामाजिक स्थान प्राप्त करून देणे,या कुटुंबाच्या दोन कार्यांना समाजातील औद्योगिकीकरण व शहरीकरण तसेच प्रत्येक व्यक्तीस साध्य असलेली सामाजिक चलनशीलता यांच्यामुळे काही प्रमाणात मुरड बसली आहे. पारंपरिक व्यवसाय, व्यवसायतंत्रातील नावीन्याचा अभाव, त्यायोगे नवीन व्यवसाय निर्माण होण्याची अशक्यता, व्यवसायास लागणारे ज्ञान वा कसब बापाकडून मुलाला तो लहानाचा मोठा होईपर्यंत सहज मिळण्याची शक्यता इ. कारणांमुळे पारंपरिक समाजात व्यवसाय कुटुंबातच राहिला होता व व्यवसायास कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते. कुटुंब हे समाजाचे उत्पादक व उपभोगी घटक होते. औद्योगिकीकरणामुळे व्यवसाय कुटुंबाच्या हातातून निसटला. तो सर्व कुटुंबाचा म्हणून न राहता केवळ एका व्यक्तीचा म्हणून राहिला. बहुतेक वेळा व्यक्ती ही अशा अनेक कुटुंबबाह्य व्यवसायांपैकी कोणत्या ना कोणत्या यांत्रिक किंवा नोकरशाहीच्या संघटनेत चाकर म्हणून राहू लागली. त्याची चाकरी त्याच्या कुवतीवर आणि कार्यप्रवणतेवरच अवलंबून असते. यांमुळे आज कुटुंब हा प्राधान्याने उपभोगी गट म्हणूनच उभा आहे. कुटुंबातील सदस्यांत पूर्वीची व्यवसायात्मक आपुलकी, एकोपा अगर परस्परावलंबन आता नाहीसे झाले. कुटुंबप्रमुख हा केवळ कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च सोसणारा म्हणून राहिला. व्यवसाय व्यक्तीच्या कुवतीवर आणि कौटुंबिक हक्काच्या बाहेर राहिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीस प्रौढ वयात शारीरिक व बौद्धिक कुवतीनुसार उपजीविकेची स्वतंत्र साधने शोधावी लागतात. या साधनांच्या शोधार्थ स्वत:चे आईवडील आणि नात्यागोत्यांचा परिसर सोडून दूरवर जावे लागत असल्याने तिच्यावरची कौटुंबिक बंधने शिथिल होतात. तसेच कौटुंबिक जीवनपद्धतीला, अडीअडचणीच्या वेळी सहज मिळणाऱ्या आप्तांच्या मार्गदर्शनाला व मदतीला या व्यक्ती पारख्या होतात. अशा परिस्थितीत आपले सामाजिक स्थान व दर्जा आपल्या वैयक्तिक कुवतीवर राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सामाजिक स्थान हे व्यक्तीस कुटुंबाकडून केवळ आयतेच न मिळता तिला ते कमवावे लागते आणि टिकवावेही लागते. यामुळे एकाच कुटुंबातील भिन्न व्यक्तींचे सामाजिक स्थानही भिन्न असण्याची शक्यता वाढलेली आहे. सामाजिक स्थानाविषयीची व्यक्तीची चलनशीलता व कुटुंबाचे विघटन या दोन्ही प्रक्रिया परस्परपूरक आहेत. तथापि उद्योगप्रधान समाजातील, संपादित करून घ्याव्या लागणाऱ्या सामाजिक स्थानाच्या बाबतीत वैयक्तिक गुणांचे महत्त्व हे काहीसे आदर्शात्मक स्वरूपाचे असून त्याला आधुनिक समाजात महत्त्वाचे अपवादही असतात. व्यक्ती प्रौढ वयात येईपर्यंतचे शिक्षण आणि तिला मिळणाऱ्या इतर महत्त्वाच्या संधी, तिचे सामाजिक स्थान, या गोष्टी शेवटी तिच्या कुटुंबप्रमुखाच्या सामाजिक स्थानावरच अवलंबून असतात. तसेच कुटुंबाची लौकिक प्रतिष्ठा ही सर्व समाजात नावाजलेली असल्यास त्यातील व्यक्तीस केवळ कुटुंबाच्या नामनिर्देशावरूनही विशिष्ट दर्जा प्राप्त होतो.

व्यक्तीचे सामाजीकरणही आता पूर्णपणे कुटुंबाच्या हातात राहिलेले नाही. व्यवसाय, करमणूक, शिक्षण, खेळ इ. सर्वच उद्दिष्टांकरिता व्यक्तींना कुटुंबबाह्य संस्थांचा आश्रय घ्यावा लागतो. पारंपरिक समाजात ही सर्व उद्दिष्टे कौटुंबिक परिसरातच सफल होत असल्यामुळे कौटुंबिक आचारविचारांचा, नीतिनियमांचा आणि मतमूल्यांचा पगडा व्यक्तीवर सतत असे आणि सर्व समुदायच एका मोठ्या कुटुंबासारखा एकजिनसी बनलेला असे. आधुनिक समाजात पुरुषांबरोबर स्त्रियाही व्यवसाय-नोकरीनिमित्त दिवसभर किंवा वेळीअवेळीसुद्धा घराबाहेर राहत असल्यामुळे, घरातील मुलांचे एकचित्ताने संगोपन करण्यास त्या असमर्थ बनतात. हा केवळ सवडीचा प्रश्न म्हणूनही आता राहिलेला नाही. औद्योगिकीकरण-नागरीकरण यांचा अतीव विकास,यांत्रिक उपकरणांचा व शोधांचा वापर,ज्ञानाच्या आणि कारागिरीच्या दीर्घ व कठीण प्रशिक्षणावर अवलंबून असलेले व्यवसाय आणि भोवतालची सर्वंकष बहुजन-संस्कृती (मास-कल्चर) या सर्व कारणांमुळे आधुनिक समाजात कौटुंबिक संगोपन वा नीतिनियम यांच्या सामर्थ्याला काही मर्यादा पडतात.

सामाजिक सुरक्षा ही पूर्वी बव्हंशी कुटुंबाकडूनच मिळत असे. आजही पूर्वेकडील अविकसित देशांत अपंग, एकाकी, वृद्ध व बेकार व्यक्तींना कुटुंबाचाच आधार असतो. अशा व्यक्तींचे पालनपोषण करणे हे कुटुंबातील, विशेषत: एकत्र कुटुंबातील, कर्त्या पुरुषाचे कर्तव्य समजले जात असे. परंतु अनेक कारणांमुळे अशा व्यक्तींची जबाबदारी स्वीकारणे आधुनिक कुटुंबाला अशक्य होते. जागेची टंचाई, वाढत जाणारे जीवनमान व राहणी ही आर्थिक आणि पतिपत्नीकेंद्रित कुटुंबाचा स्वीकार ही मूल्यात्मक कारणे त्यामागे आहेत. अर्थातच आधुनिक समाजात वृद्ध, अपंग, एकाकी अगर बेकार व्यक्ती ह्या निदान दैनंदिन जीवनात तरी नात्यातल्या माणसांच्या, मुख्यत: स्वत:च्या मुलांच्या, आसऱ्याला पारख्या होतात. यातल्या काही व्यक्तींना स्वत:च्या मुलांकडून अगर नातेवाईकांकडून आर्थिक साहाय्य लाभत असेलही; तथापि ही उणीव नाहीशी करून अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेची हमी स्वीकारण्याकरिता आधुनिक समाजात अनेक सरकारी वा खाजगी संस्था निर्माण झाल्या आहेत. निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाहनिधी, जीवनविमा, बेकारी भत्ता, अपंगांच्या कल्याणार्थ निघालेल्या संस्था इत्यादींद्वारे बेकार व अपंग-अनाथांची आणि वृद्धाश्रमांसारख्या संस्थांद्वारे एकाकी वृद्धांची काळजी घेतली जाते. तथापि वृद्धांच्या प्रश्नांचे ताण सर्वच समाजांत आहेत. भारतासारख्या देशांत ते अधिक आहेत.

या विवेचनावरूनच कुटुंबाची काही परंपरागत कार्ये कशी नाहीशी होत आहेत किंवा कुटुंबाचे मध्यवर्ती वर्चस्व कसे कमी होत चालले आहे आणि त्या जागी इतर संस्था कशा उद्‌भवत आहेत हे दिसून येईल. मध्यवर्ती महत्त्वाची संस्था म्हणून कुटुंबाचे कमी होत जाणारे महत्त्व आणि इतर संस्थांचा उदय ह्या दोन्ही परस्परपूरक अशा गोष्टी आहेत. कुटुंबाचे पूर्वीचे महत्त्व कमी झाल्यामुळे कौटुंबिक स्थैर्याला तडा गेलेला आहे. व्यक्तिनिष्ठ जीवनाच्या व मूल्यांच्या वर्चस्वामुळे विवाहास त्याचे धार्मिक स्वरूप जाऊन कराराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आधुनिक समाजात कुटुंबाचे, विशेषत: पतिपत्नीसंबंधाचे,स्थैर्य टिकवून धरण्यास धर्म,नीती इ. परंपरागत बंधने कमकुवत ठरत असून त्यांच्यातील प्रेमाचा बंध हाच केवळ समर्थ आहे,असे म्हटले जाते. कुटुंबाच्या चिवटपणाचे रहस्य या प्रेमाच्या बंधातच असू शकेल. त्याचप्रमाणे अपत्यसंगोपन व व्यक्तिमत्वाची पायाभूत घडण अजूनही लोकशाहीप्रधान समाजात कौटुंबिक वर्चस्वाखाली अगर देखरेखीखाली होत आहे. साम्यवादी समाजातून कुटुंबाचे महत्त्व हे सापेक्षत: कमी असते. तथापि रशियन समाजातही कुटुंबाला एक आद्य घटक म्हणून मान्यता आहे. कौटुंबिक अस्थिरतेचा परिणाम बालमनावर विपरीतपणे होऊन त्याच्या हातून समाजबाह्य अगर समाजघातक असे गुन्हेगारी वर्तन घडते, याचाही निर्णायक पुरावा आधुनिक समाजात दिसून येतो. पतिपत्नीमधील वैमनस्य, विकल्प, विद्रोह इ. विघटनात्मक गोष्टींना आटोक्यात आणून, त्यांच्यात विश्वास व निष्ठा निर्माण करून, विवाहविच्छेदनाची संख्या कमी करण्यासाठी आधुनिक समाजात सल्लाकेंद्रे निघाली आहेत, हेही त्या संदर्भात सूचक आहे.

व्यक्तीचे सामाजीकरण, तिच्या व्यक्तिमत्त्वाची बांधणी, समाजरचनेची स्थिरता आणि संस्कृतीचे सातत्य हे समाजजीवनाच्या मीमांसेतील मूलभूत प्रश्न आहेत. त्या सर्वांचा विचार कुटुंबसंस्थेच्या मीमांसेशीही अविभाज्यपणे निगडित आहे.

संदर्भ : 1. Bell, N.W.; Vogel, E.F. Ed. A Modern Introduction to the Family, New York, 1968.

2. Burgess, E.W.; Locke, H. J. The Family, NewYork, 1971.

3. Davis, Kingsley, Human Society, New York, 1965.

4. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

5.Goode, W.J. World Revolution and Family Patterns, New York, 1963.

6. Kane, P.V. History of Dharmashastra, 4 Vols., Poona, 1930—53.

7. Kapadia, K. M. Marriage and Family in India, Calcutta, 1966.

8. Murdock, G.P. Social Structure, New York, 1949.

9. Parsons, Talcott; Bales, Robert, Family Socialization and Interaction Process, London, 1956.

10. Schlesinger, Rudofd, Changing Attitudes in Soviet Russia, London, 1949.

11. Valavalkar, P.H. Hindu Social Institutions, London, 1939.

लेखक: मा. गु. कुलकर्णी ; विद्याधर पुंडलीक

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate