आर्थिक कुवत, कुटुंबाचा आकार आणि राहती जागा यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून, नीटनेटकेपणे प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जीवन काटकसर करून सर्व दृष्टींनी सुखकर व समृद्ध बनविणे ही जशी कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. गृहजीवनाच्या या दृष्टीने आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य इत्यादींचा अभ्यास गृहविज्ञानात येतो. गृहजीवन हे मुख्यतः गृहिणींवर अवलंबून असल्याने गृहिणींसाठी हे शास्त्र आहे. गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तिविकास, कौटुंबिक स्वास्थ्य, समाजस्वास्थ्य आणि पर्यायाने राष्ट्रहितही साधले जाते. या शास्त्राच्या अनेक संज्ञा प्रचलित आहेत. उदा., अमेरिकेत ते गृह-अर्थशास्त्र (होम इकॉनॉमिक्स), तर इंग्लंड व यूरोपीय देशांत कौटुंबिक विज्ञान (डोमेस्टिक सायन्स) किंवा गृहकौशल्य (हाउस क्राफ्ट) अशा नावांनी ओळखले जाते. ह्या संज्ञांचा वापर भारतातही रूढ होता. मात्र अखिल भारतीय गृहविज्ञान परिषदेने निर्णय घेऊन गृहविज्ञान (होम सायन्स) हीच संज्ञा आता निश्चित केली आहे.
या शास्त्राच्या पाच प्रमुख शाखा आहेत : (१) बालसंगोपन व कौटुंबिक आप्तसंबंध; (२) पाकशास्त्र व आहारविद्या; (३) वस्त्रप्रावरणे, शिवणकाम, विणकाम इत्यादी; (४) गृहव्यवस्थापन; (५) ग्रामीण व नागरी भागांतील गृहजीवनाचा अभ्यास व विस्तार. गृहविज्ञानाच्या निरनिराळ्या उपविषयांखाली गृहिणीला जे शिक्षण दिले जाते, त्यात स्थूल मानाने पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो : (१) अन्नधान्याची खरेदी, साठवण व संरक्षण; पाकक्रियेतील नैपुण्य आणि पौष्टिक व समतोल आहार. (२) घराची स्वच्छता व नित्यनैमित्तिक साफसफाई, घरातील वस्तूंची आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण मांडणी, गृहशोभन, बागकाम, पाळीव प्राण्यांचा सांभाळ. (३) कुटुंबीयांसाठी ऋतुमानानुसार आवश्यक अशा कपड्यांची खरेदी, कपड्यांचे संरक्षण, टिकाऊपणा, शिवणटिपण, धुलाई, इस्त्री इत्यादी. त्याचप्रमाणे वस्त्रांविषयी शास्त्रशुद्ध माहिती, विणकाम, भरतकाम इत्यादी. (४) लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीचा अभ्यास करून त्यानुसार आहार, शिक्षण आणि संस्कार ह्यांचा अवलंब करणे. (५) शारीरक्रियाविज्ञान व आरोग्यविज्ञान ह्यांचा अभ्यास करून कुटुंबीयांच्या आरोग्याविषयी काळजी घेणे, प्रथमोपचार, रुग्णसेवा इत्यादींविषयीचे ज्ञान. (६) कुटुंबाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे. खरेदीव्यवहार, बचत, भविष्यकाळाची तरतूद ह्या दृष्टींनी कौटुंबिक अर्थव्यवहारांचे नियंत्रण करणे. (७) कुटुंबातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची वाढ, सांस्कृतिक विकास व सुजाण नागरिकत्व ह्या दृष्टींनी त्यांच्यावर संस्कार करणे.
गृहविज्ञान हे अनेक शास्त्रांवर आधारित आहे. त्याच्या अभ्यासासाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, शारीरक्रियाविज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रांची बैठक आवश्यक आहे. उदा., भौतिकीच्या अभ्यासामुळे गृहव्यवस्थापनात जड व हलक्या वस्तूंची आखणी कशी करावी; शीतपेटी, पंखा वगैरे विद्युत् उपकरणांचा वापर कसा करावा इत्यादींची नेमकी माहिती मिळते. रसायनशास्त्राच्या अभ्यासातून कोणकोणत्या रसायनांपासून अन्नधान्ये वा वस्त्रे तयार होतात, ते कळते. जीवरसायनशास्त्रामुळे आहारविद्या जाणून घेण्यास मदत होते. सूक्ष्म जीवशास्त्रामुळे दूषित अन्नाची कारणमीमांसा व अन्नसंवर्धन ह्यांसंबंधी मार्गदर्शन होऊ शकते. शारीरक्रियाविज्ञानाच्या अभ्यासामुळे शारीरिक वाढ व विकास यांचे नेमके स्वरूप लक्षात येते आणि त्याचा उपयोग बालसंगोपनात व आहारविद्येत होऊ शकतो. मानसशास्त्राचा अभ्यास बालसंगोपन व कौटुंबिक आप्तसंबंध ह्यांच्या सुजाण आकलनासाठी होऊ शकतो. समाजशास्त्राच्या अभ्यासातून समाज व राष्ट्र ह्यांच्या चौकटीत कुटुंबाचे स्थान व महत्त्व कळते. अर्थशास्त्राचा अभ्यास कुटुंबाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तसेच बचतीच्या योजना आखण्यासाठी उपयुक्त ठरतो.
ऐतिहासिक दृष्ट्या गृहशिक्षणाचा प्रारंभ हा कुटुंबसंस्थेइतकाच जुना आहे. सर्वच प्राचीन समाजांत स्त्रियांचे शिक्षण हे गृहक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. आईकडून मुलीला परंपरागत पद्धतीने गृहकृत्यांचे आणि तत्संबंधित इतर जबाबदारीचे शिक्षण मिळत असे. मुलींना विणकामासारख्या हस्तकलांचे शिक्षण दिले जाई. मात्र गृहविज्ञानाचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर शिक्षण आधुनिक काळातच सुरू झाले.
गृहविज्ञानाच्या विस्तृत क्षेत्रातील काही उपशाखांचे अभ्यासक्रम पश्चिमी समाजात १८७४ च्या सुमारास अल्पप्रमाणात सुरू झाले. त्यांना अल्पावधीतच खूप लोकप्रियता लाभली. १८९८ मध्ये इंग्लंडच्या मोफत विद्यालयांतून जवळजवळ २ लक्ष मुलींनी पाकशास्त्राचे शिक्षण घेतले. १९२४–२५ मध्ये ही संख्या ५ लक्षांवर गेली. १८८६ पासून अमेरिकेत या शास्त्राचे अभ्यासक्रम न्यूयॉर्कच्या सार्वजनिक विद्यालयांतून सुरू झाले. ‘गृह-अर्थशास्त्र’ अशा व्यापक विषयाखाली गृहजीवनाशी संबंधित अशा अनेक कलाकौशल्यांचा एकत्रित अभ्यासक्रम शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यास अमेरिकेत प्रारंभ झाला. त्याचे श्रेय डॉ. एलेन एच्. रिचर्ड्झ (१८४२–१९११) ह्या रसायनाशास्त्रातील विदुषीकडे जाते. १८९९–१९०८ या काळात प्रतिवर्षी रिचर्ड्झ ह्यांनी मेल्व्हिल ड्यूई पति-पत्नी, डॉ. बेंजामिन अँड्रूज ह्यांसारख्या शिक्षणतज्ञांबरोबर लेक प्लॅसिड येथे सभा घेतल्या व मुलींना यशस्वी गृहजीवनासाठी व्यावहारिक शिक्षण देण्याची किती गरज आहे, ह्यासंबंधी चर्चा केली. ह्यातून वॉशिंग्टन येथे १९०८ मध्ये ‘अमेरिकन होम इकॉनॉमिक्स असोसिएशन’ ह्या संस्थेची स्थापना झाली. ह्या संस्थेने १९१३ मध्ये ‘सिलॅबस ऑफ होम इकॉनॉमिक्स’ मध्ये गृहविज्ञानाच्या मूळ उद्दिष्टांचा एक आराखडा दिला, तो असा : गृहविज्ञान हा स्वतंत्र अभ्यासविषय असून त्यात अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत मानवी गरजांची निवड कशी करावी, त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी, त्यांची उपयुक्तता सिद्ध कशी करावी इ. गोष्टींचा अभ्यास अंतर्भूत होतो. असा अभ्यास आर्थिक, आरोग्यविषयक व सौंदर्यात्मक दृष्टींनी केला जातो. अर्थात ही योजना जशीच्या तशी अंमलात आली नाही. ह्या वेळेपासून शिक्षणक्षेत्रात गृहविज्ञान हा एक महत्त्वाचा विषय मानला जाऊ लागला. आज अमेरिकेत कॉर्नेल, विस्कॉन्सिन, टेनेसी, आयोवा, नेब्रॅस्का, कॅरोलायना, फ्लॉरिडा, टेक्सस, बर्कली, वॉशिंग्टन, इलिनॉय इ. ठिकाणच्या विश्वविद्यालयांत गृहविज्ञानाचे शिक्षण दिले जाते. ग्रेट ब्रिटन, यूरोपीय देश, ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणी हा विषय कौटुंबिक विज्ञान ह्या नावाने शिकवला जात असे. विश्वविद्यालयीन शिक्षणक्रमात या अभ्यासक्रमाला अलीकडेच मान्यता मिळाली. १९०८ मध्ये लंडन येथे पहिले महाविद्यालय स्थापन झाले आणि नंतर १९४६ साली फिनलंडमध्ये तशाच एका महाविद्यालयाची स्थापना झाली. गेल्या दोन दशकांत थायलंड, जपान, फिलिपीन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका इ. देशांत शालेय व महाविद्यालयीन पातळ्यांवर गृहविज्ञानाचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली.
भारतात अखिल भारतीय महिला परिषदेने १९२७ मध्ये ही गरज ओळखली व १९३२ मध्ये दिल्ली येथे ‘लेडी अर्विन कॉलेज’ स्थापन झाले. त्याच्या प्राचार्यपदी श्रीमती ताराबाई सवूर होत्या. बरीच वर्षे भारतात गृहविज्ञानाचे हे एकच महाविद्यालय होते. मद्रास विद्यापीठाने प्रथम गृहविज्ञानातील बी.एस्सी. पदवी सुरू केली. १९५१ साली बडोदा येथे गृहविज्ञानाच्या क्षेत्रामधील भारतीय तज्ञांची सभा भरली होती. त्यातूनच १९५३ मध्ये मद्रास येथे अखिल भारतीय गृहविज्ञान परिषदेचा जन्म झाला. ह्या परिषदेने १९५६ साली मध्यवर्ती सरकार व ‘टेक्निकल को-ऑपरेशन मिशन’ ह्यांचा साह्याने एक करार घडवून आणला. त्यामुळे भारतातील आठ विश्वविद्यालयांना गृहविज्ञानाची विद्यालये सुरू करण्यास तज्ञ, साधनसामग्री, ग्रंथ इत्यादींची मदत मिळाली. तसेच भारतीय शिक्षिकांना अमेरिकेस जाऊन विनामूल्य उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. दिल्ली, जबलपूर, कलकत्ता, बडोदा, मुंबई (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ), बंगलोर, मद्रास येथील आठ विद्यापीठांनी गृहविज्ञानाची विद्यालये स्थापन केली. हा करार दोन वर्षांसाठी होता. त्याचे १९५८ साली पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे भारतातील विश्वविद्यालयांत गृहविज्ञानाच्या शिक्षणाचा पाया पक्का रोवला गेला. गेल्या दहा वर्षांत आणखी अनेक विद्यापीठांनी ह्या विषयात रस घेऊन महिलांसाठी विद्यालये सुरू केली. चंडीगढ, लुधियाना, आग्रा, अलाहाबाद, आणंद, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, हैदराबाद, म्हैसूर, तिरुपती इ. ठिकाणी गृहविज्ञानाची विद्यालये आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र लेडी अर्विन कॉलेज, दिल्ली; श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, मुंबई; तसेच चंडीगढ, लुधियाना, बडोदा, हैदराबाद, नागपूर, बंगलोर, मद्रास, तिरुपती अशा ठिकाणीच आहे व पीएच्.डी.चा अभ्यासक्रम फक्त बडोदा व मद्रास ह्या दोनच ठिकाणी आहे.
शालेय व विश्वविद्यालयीन पातळ्यांवरील गृहविज्ञानाच्या अभ्यासक्रमाची सोय महाराष्ट्रात कमी आहे. बिहार, ओरिसा व आसाम या राज्यांत अगदीच कमी प्रमाणात आहे. गृहविज्ञान हा विषय आठवीपासून माध्यमिक शालान्त परीक्षेपर्यंत काही ठिकाणी ऐच्छिक, तर काही ठिकाणी सक्तीचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या तांत्रिक शिक्षण विभागाने माध्यमिक शालान्त परीक्षेनंतर एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. काही प्रशिक्षणसंस्थांमधूनही हा विषय शिकवितात. काही कृषिविद्यालयांतही या शास्त्राचा अभ्यासक्रम ग्रामीण भागांस उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने शिकविला जातो.
गृहविज्ञानाचा विस्तार-विकास होण्याच्या दृष्टीने भारतात ज्या व्यक्तींनी कार्य केले, त्यांत श्रीमती ताराबाई सवूर व जेसी डब्ल्यू. हॅरिस ह्यांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. त्यांनी ‘टेक्निकल को-ऑपरेशन मिशन’ करार घडवून आणून गृहविज्ञानास जोराची चालना दिली. ह्या करारान्वये डॉ. जोसेफीन स्टाब, डॉ. मेरी एलन किस्टर, कु.डिकी, डॉ. एक्स्ट्राम, डॉ. रॉब, डॉ. गिल्बर्ट, डॉ. गॅसेट इ. तज्ञ व्यक्तींनी भारतभर निरनिराळ्या ठिकाणी कार्य करून गृहविज्ञानाचा विकास घडवून आणला. शालेय स्तरावर कु. निडहॅम व कु. स्ट्राँग ह्यांनी पुस्तके लिहून कार्य केले. महाराष्ट्रात शालेय स्तरावर लक्ष्मीबाई वैद्य ह्यांचे कार्य प्रशंसनीय आहे.
गृहविज्ञानाच्या क्षेत्रात जगभर ज्या संस्था कार्य करीत आहेत, त्यांपैकी ‘अमेरिकन होम इकॉनॉमिक्स असोसिएशन’ ह्या संस्थेचा उल्लेख यापूर्वी केलाच आहे. अमेरिकेतील मान्यवर संस्थांचे पदवीधर ह्या संघटनेचे सदस्य होऊ शकतात. ह्या संस्थेच्या धर्तीवर जगभर अनेक ठिकाणी संघटना निर्माण झाल्या आहेत. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ होम इकॉनॉमिक्स’ ह्या संस्थेच्या सदस्यांमध्ये अनेक ख्यातनाम गृहवैज्ञानिक आणि त्यांच्या व्यावसायिक संघटना अंतर्भूत आहेत. ग्रेट ब्रिटनमध्ये गृहविज्ञानाशी निगडित अशा अनेक व्यावसायिक संघटना असून त्या ‘युनायटेड किंग्डम फेडरेशन फॉर एज्युकेशन इन होम मॅनेजमेंट’ ह्या संस्थेशी संलग्न आहेत. भारतात ‘अखिल भारतीय गृहविज्ञान परिषद’ ही संघटना कार्य करीत आहे.
अलीकडील काळात गृहविज्ञानाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अत्यंत वाढले आहे. पूर्वीप्रमाणे आईकडून मुलीस मिळणारे पारंपरिक गृहकृत्यांचे शिक्षण अपुरे पडते. आधुनिक जीवन हे गतिमान आणि गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सुखावह गृहजीवनासाठी शास्त्रशुद्ध व पद्धतशीर गृहशिक्षणाची आवश्यकता आहे. पैसा, श्रम, वेळ ह्यांची जास्तीत जास्त बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन, घरातील यांत्रिक-तांत्रिक उपकरणांची वाढ झाल्याने त्यांविषयीची माहिती, मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीचा काळ व त्यास अनुकूल असे त्यांचे पालनपोषण, कौटुंबिक घटक ह्या नात्याने प्रौढांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी गृहविज्ञानाद्वारे मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे गृहविज्ञानाच्या शिक्षणाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे.
संदर्भ : Devadas, R. P. The Meaning of Home Science, Coimbatoor, 1958.
लेखिका: निर्मला खेर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/5/2019
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या क...
यामध्ये महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांची याद...
तांत्रिकदृष्ट्या कोणताही खाद्यपदार्थ थोडा अणुकिरणो...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...