অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य

गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य

ऋषींची गोत्रे

ऋषींची गोत्रे म्हणजे गणसंस्थेचीच रूपे होते. या गणसंस्थांचीच पुढे एक किंवा अनेक वर्णांच्या रूपाने परिणती झाली. क्षत्रियांचे ब्राह्मण व ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले; एकाच ऋषिगणातून त्रैवर्ण्य व चातुर्वर्ण्य प्रादुर्भूत झाले. गोत्रप्रवराध्यायांमध्ये गोत्रे ही ऋषिगणांचा अवांतर प्रकार म्हणूनच वर्णिली आहेत. ऋषिगण ही गणसंस्थाच होत, असे अनुमान करता येते; हे पुढील प्रतिपादनावरून ध्यानात येईल.

यासंबंधी महाभारतात  व पुराणांत पुष्कळ उदाहरणे सापडतात. अंगिरस्, अंबरीष व यौवनाश्व हे क्षत्रिय होते. त्यांच्या कुळात ब्राह्मण झाले. गोत्र-प्रवरांमध्ये त्यांची गणना आहे.(विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद इ. ब्राह्मणवंश झाले (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). गृत्समदापासून शुनक झाला, शुनकाचा शौनक झाला व शौनक गण हा चार वर्णांचा गण बनला (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ८). अंगिरस् व भार्गव यांचे गणसुद्धा चातुर्वर्ण्यरूप बनले (हरिवंश, अध्याय ३२ । ३९, ४०). गर्ग, राभ, हारित, मुग्दल, कपी व कण्व हे गण क्षत्रिय असून ब्राह्मण बनले (भागवत, ९ । २०, २१). वायुपुराणातही (३० । ४) शौनक गण कर्मवैचित्र्यामुळे चार वर्णांचा बनला, असे म्हटले आहे. भागवतात म्हटले आहे, की ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नव्वद क्षत्रिय व दहा ब्राह्मण झाले.

समाजसंस्थेचे पहिले स्वरूप

गणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाजसंस्थेचे पहिले स्वरूप होय. अशा अगणित गणसंस्थांचे वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. अनेक वंशांच्या गणांना वर्णभेदांचे स्वरूप हळूहळू प्राप्त झाले. प्राचीन भारतीयांच्या गणसंस्थेत राजसत्ता व प्रजासत्ता यांचे गुण कमीजास्त प्रमाणात मिसळलेले होते. ब्राह्मणस्पती हा गणपती म्हणून ऋग्वेदात स्तविला आहे. विश्व हे गणराज्य म्हणजे देवगणांचे राज्य होय; कारण वरुण, मित्र, इंद्र, सविता, भग, पूषन्, विष्णू, वायू इ. देव-समुदाय विश्वाचे राज्य ऋताच्या द्वारे करतात, असे ऋग्वेदात सांगितले आहे. गणप्रमुखास प्रजापती, गणपती, व्रातपती किंवा ब्रह्मणस्पती अशा प्रकारच्या संज्ञा होत्या. यजुर्वेद, ब्राह्मणग्रंथ व पुराणे यांवरून असे दिसते, की प्रजापती हा ब्रह्मा म्हणजे पुरोहित असे; म्हणजे गणांचा मुख्य हा पुरोहित व शासक असा एकच असे. त्यात भेद नसे. प्रजापती ही कोणी एक व्यक्ती झाली नाही. प्रजापती हे प्राचीन भारतीयांच्या उच्चतम प्रशासकाचे अभिधान आहे. दक्ष, कश्यप, मनू, वसिष्ठ, अगस्त्य इ. प्रजापती होऊन गेले. ते यज्ञद्वारा किंवा मंत्रद्वारा संस्कार करून चातुर्वर्ण्याचा विभाग करीत असत. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून चार वर्ण निर्माण झाले, ही रूपकाची कल्पना ‘पुरुषसूक्ता’त प्रथम आली. इतर वेदांमध्ये तीच थोड्याफार फरकाने पुनःपुन्हा सांगितली आहे. एकाच प्रजापतीपासून चार वर्ण निर्माण झाले, ही कल्पना वंशभेदसूचक नाही. तिच्यात केवळ कार्यभेद रूपकाच्या भाषेत सूचित केला आहे. यज्ञ किंवा मंत्र यांच्या योगाने प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले, असे वेदांत पुष्कळ ठिकाणी सांगितले आहे (वाजसनेयी-संहिता, १५ । २८–३०; तैत्तिरीय ब्राह्मण ३ । १२ । ९ । २; शतपथ ब्राह्मण  २ । १ । ४ । १३). वेदद्रष्ट्या ऋषींच्या वंशात चातुर्वर्ण्य निर्माण झाले, असे जे पुराणांमध्ये अनेक ठिकाणी म्हटले आहे, ते यावरून उपपन्न होते. शतपथ ब्राह्मणात (१४ । २ । २३–२७) ब्राह्म प्रथम होते व त्यातून क्रमाने अधिक चांगले असे शूद्रापर्यंत वर्ण उत्पन्न झाले, असे जे म्हटले आहे, ते या मुद्याच्या योगाने स्पष्ट होते. महाभारतातील ‘शांतिपर्वा’तही (१८८ । १०; १८९ । ८) असे विस्ताराने प्रतिपादन केले आहे, की एकाच ब्रह्मरूप वर्णाचे चार वर्ण कर्मभेदामुळे व गुणभेदामुळे झाले आहेत.

संदर्भ : 1. Brough, J. The Early Brahmanical System of Gotra and Pravara, Cambridge, 1953.

2. Ghurye, G. S. The Two Brahmanical Institutions–Gotra and Charana, Bombay, 1972.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate