मुसलमान समाजात स्त्रियांकरिता राखून ठेवलेल्या, घरातील विशिष्ट भागास जनानखाना असे म्हटले जाते. रूढीने अशा भागात वावरणाऱ्या स्त्रियांनाही याच नावाने संबोधिले जाते. जनानखान्याची पद्धत मध्यपूर्वेकडील मुसलमान राष्ट्रांमध्ये अधिक प्रचारात आहे. मुसलमानी सामाजिक व्यवहारात स्त्रियांना असलेला मज्जाव, स्वतःचे संरक्षण करण्यास स्त्रिया असमर्थ असल्याची कल्पना किंवा वस्तुस्थिती आणि बहुपत्नीत्वाची चाल यांच्याशी जनानखान्याची प्रथा निगडित आहे. जनानखान्याचे अस्तित्व असलेल्या समाजात अर्थातच स्त्रियांना सामाजिक आणि कौटुंबिक व्यवहारांत दुय्यम स्थान असते.
जनानखाना हा मुसलमान समाजातील सुलतान, अमीर, उमराव अशा श्रीमंत आणि उच्चपदस्थ लोकांच्या घरांतच विशेषतः दिसून येत असे. या लोकांना बायकाही खूप असत. बायकांची संख्या वाढली म्हणून त्यांच्याकरीता स्वतंत्र जागेची सोय करण्याची आवश्यकता भासली असावी. यातून त्यासंबंधीची विशिष्ट व्यवस्था उदयास आली असावी. बहुपत्नीत्व रूढ असलेल्या हिंदू राजांमध्येही अंतः पुर ही संस्था प्रचारात होती. मुसलमान राष्ट्रांत व समाजात जनानखान्यातील स्त्रियांनी परपुरुषांना तोंड दाखवू नये, त्यांनी परपुरुषांच्या पुढे नेहमी तोंडावर पडदा किंवा बुरखा टाकावा, गोषा परिधान करावा, असे संकेत आहेत. भारतात यामुळेच या पद्धतीस पडदापद्धती किंवा गोषापद्धती असे म्हटले जाते. पडदापद्धती हे घरंदाजपणाचे लक्षण समजले जाते.
सुलतानांच्या जनानखान्याच्या व्यनस्थेकरिता काही समाजांत स्त्री अधीक्षकाची तसेच इतर अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असे. काही वेळा सुलतानाची आईच या अधीक्षकाद्वारे जनानखान्यावर नजर ठेवीत असे. जनानखान्याच्या रक्षणाचे काम हिजडे लोकांकडेही सोपविले जात असे. हिंदू संस्कृतीत अंतः पुरावर देखरेख ठेवणाऱ्या कंचुकी या अधिकाऱ्याच्या उल्लेखावरून अंतः पुराची व्यवस्था ही काही अधिकाऱ्यांकडे राहत असे, असे दिसते. भारतात हिंदू लोकांत पडदापद्धतीशी जुळणारे काही संकेत हे राजस्थानमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात.एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध आल्यापासून या पद्धतीबद्दलच्या दृष्टीकोनात फरक पडू लागला. तरी पडदापद्धतीस पोषक ठरणारी बहुपत्नीत्वाची चाल फक्त तुर्कस्तानातच कायद्याने रद्द ठरविण्यात आली. भारतात बहुपत्नीत्वाच्या आणि पडदापद्धतीच्या रूढीविरूद्ध चळवळ सुरू झालेली आहे.
लेखक: मा. गु. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्...
देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना म...
सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला किंवा मुद्रित झ...
सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्...