অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

समाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी, भारतातीलच केवळ नव्हे, तर आशिया खंडातील पहिली संस्था. ‘सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क’ या नावाने १९३६ मध्ये भायखळा येथे स्थापना. १९४४ मध्ये सध्याचे नाव देण्यात आले. १९५४ मध्ये चेंबूर येथे स्थलांतर. संस्थेची उद्दिष्टे व्यापक असून त्यांनुसार तिच्या कार्याचा व्याप पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) समाजकार्य, समाजसेवा, कर्मचारी-व्यवस्थापन व तत्संबंधित व्यावसायिक क्षेत्रांसाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पुरविण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्रांचे शिक्षण देणे, (२) सामाजिक संशोधन करणे व सामाजिक संशोधनपद्धतींचे प्रशिक्षण देणे, (३) अभ्यासविषयाशी निगडित अशी पुस्तके, नियतकालिके, प्रबंध आणि शोधनिबंध यांचे प्रकाशन करणे, (४) संस्थेतील अभ्यासकांसाठी व्याख्याने, परिसंवाद, परिषदा, चर्चासत्रे इत्यादींचे आयोजन करणे, (५) विशिष्ट कार्यासाठी योग्य त्या इतर संस्थांशी सहकार्य साधणे आणि (६) समाजकार्य, समाजसेवा, कर्मचारी-व्यवस्थापन व त्यांच्याशी निगडित अशी क्षेत्रे यांविषयी चांगली समज व चांगले व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी योग्य ते उपक्रम करणे. संस्थेचे पहिले संचालक डॉ. क्लीफर्ड मॅनशर्ट होते. २७ जुलै १९६२ पासून डॉ. एम्. एस्. गोरे हे संचालक आहेत.

या संस्थेत एम्.ए.; पदव्युत्तर पदविका; एम्.फिल्. व पीएच्.डी. यांच्या अभ्यासक्रमांची सोय असून त्यांत पुढील विषय शिकविले जातात : एम्.ए.साठी सामाजिक कार्य, कर्मचारी-व्यवस्थापन व औद्योगिक संबंध; पदव्युत्तर पदविकेसाठी संशोधनपद्धती; एम्.फिल्.साठी सामाजिक कार्य आणि सामाजिक विज्ञान व पीएच्.डी.साठी सामाजिक कार्य आणि सामाजिक संशोधन. संस्थेत १९७५ अखेरपर्यंत एकूण २०२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. संस्थेत पोस्ट डॉक्टरलच्या विद्यार्थ्यांसाठी चार संशोधन अधिछात्रवृत्त्या व एम्.ए.; एम्.फिल्. व पीएच्.डी. करणाऱ्‍या विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या देण्यात येतात, तसेच बक्षिसे व पारितोषिकेही दिली जातात.

द इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क हे संस्थेचे त्रैमासिक १९४० पासून अव्याहतपणे प्रसिद्ध होत आहे. याशिवाय संशोधन अहवाल, प्रबंध, संकलन, सामाजिक कार्याच्या शिक्षणासाठी व्यक्तिवृत्ते (केस-रेकॉर्ड्‌स) असे विविध प्रकारचे लेखनही संस्था प्रकाशित करीत असते. संस्थेचे ग्रंथालय अद्ययावत असून त्यात ३८,००० हून जास्त ग्रंथ आहेत. ‘नागरी बालक आणि युवा अभ्यास विभाग’ व ‘शैक्षणिक समाजशास्त्र अभ्यास विभाग’ हे दोन संशोधनविभाग आहेत. आतापर्यंत अनेक संशोधनप्रकल्पांचे अहवाल पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संशोधनासाठी जमविलेल्या प्राथमिक माहितीचे आधुनिक यंत्राद्वारे संकलन करण्याची सुविधा संस्थेत आहे.

बाल मार्गदर्शक उपचार केंद्र, वरळी समाज केंद्र व लोक सहयोग केंद्र या समाजकल्याण संस्था संस्थेतर्फे चालविल्या जातात. या संस्थेत सामाजिक कार्य या विषयात शासकीय अधिकाऱ्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तर या संस्थेला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली आहे. सामाजिक कार्य, कर्मचारी-व्यवस्थापन आणि काही प्रमाणात सामाजिक शास्त्रांच्या इतर क्षेत्रांतही बहुविध प्रशिक्षणकार्य व संशोधन करून संस्थेने उच्च शैक्षाणिक दर्जा मिळविला असून तो टिकविण्याच्या दृष्टीने ती सतत प्रयत्नशील असते.

लेखक: एन्. कृष्णमूर्ती

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate