অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नातेसंबंध

सपिंड आणि विवाहोद्भव संबंध म्हणजे सामान्यपणे नातेसंबंध असे म्हणता येईल. मानव वेगवेगळे समूह करून राहतो. सर्व मानवी समूहांत आप्त-समूहांची संख्या सर्वाधिक असते. एकंदर मानवी जीवनच नातेसंबंधांत गुरफटलेले असते. पारंपरिक व सरल समाजात नातेसंबंधांचे व आप्तसमूहांचे महत्त्व जास्त असते. व्यक्तीचे सामाजीकरण व त्याच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य प्रमुख्याने आप्त-समूहात केले जाते. औद्योगिक व जटिल अशा आधुनिक समाजात, आप्त-समूहांचे महत्त्व कमी होऊन त्याऐवजी हितसमूहांचे वर्चस्व वाढल्याचे दिसून येते.

नातेसंबंधांची सुरुवात बीजकुटुंब या आप्तगटांत होते. नातेसंबंधांचे क्षेत्र जसे वाढते, तशी आप्तगटांची व्यातीही वाढत जाते. बीजकुटुंबानंतर विस्तारित किंवा संयुक्त कुटुंब, भावकी किंवा घराणे, कुळी व गोत्र, जात व जात-पुंज, जात-समुच्चय इ. आप्त-समूह महत्त्वपूर्ण असतात. त्याशिवाय समूह न बनलेले पण समूह बनण्याची क्षमता असणारे सग्या-सोयऱ्यांचे नातेसंबंध व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण ठेवतात.

बीजकुटुंब हा सर्वव्यापी व सर्वांत महत्त्वाचा नातेसमूह आहे. मानवाचे प्राथमिक नातेसंबंध बीजकुटुंबात पाहावयास मिळतात. इतर आप्तांशी व पर्यायाने समाजातील इतर व्यक्तींशी परस्परसंबंध ठेवण्याविषयीचे शिक्षण बीजकुटुंबातच देण्यात येते. माता, पिता, पती, पत्‍नी, पुत्र, पुत्री, ज्येष्ठ व कनिष्ठ बंधू, भगिनी या सर्वांचे परस्परसंबंध हे प्राथमिक नातेसंबंध. हे नातेसंबंध सर्वसाधारणतः सर्व समाजात सारखे असतात. सामाजिक व आर्थिक जबाबदाऱ्या आणि हक्क, ममता, भावनिक संबंध, लैंगिक संबंध, अधिसत्ता, मालमत्ताविषयक नियम व वंशानुक्रमाचे नियम इ. महत्त्वाच्या सामाजिक प्रमाणांची सुरुवात बीजकुटुंबातील या नातेसंबंधांपासूनच होते.

कुटुंबातील व्यक्ती ही पिता, पती, पुत्र, भाऊ किंवा माता, पत्‍नी, पुत्री किंवा भगिनी यांपैकी एखादी भूमिका पार पाडत असते. या भूमिका दोन बीजकुटुंबात विभागल्या जातात. प्रत्येक व्यक्ती ही दोन बीजकुटुंबांची सभासद असते. व्यक्तीचा जन्म होतो, त्या जननकुटुंबात नातेसंबंध सपिंड (जैविक) असतात. विवाह झाल्यावर व्यक्तीचे जनककुटुंब निर्माण होते व त्यातील पति-पत्‍नीचे संबंध प्राथमिक असले, तरी ते विवाहोद्‌गत नातेसंबंध असतात. जनन व जनक-कुटुंबांतील सभासदत्वामुळे इतर नातेसंबंध प्रस्थापित होतात. समाजात, रक्तसंबंधी म्हणजेच सपिंड किंवा जैविक व विवाहोद्‌गत असे दोन प्रमुख नातेसंबंधांचे प्रकार आहेत. आजी-आजोबा, सासू-सारे, मेव्हणे, जावई इ. दुय्यम संबंध दोन तऱ्हेच्या बीजकुटुंबांमुळे व विवाहोद्‌गत संबंधांमुळे निर्माण होतात.

दुय्यम किंवा त्यापेक्षा जास्त दूरचे नातेसंबंध जरी सपिंड व विवाहोद्‌गत असे दोन्ही बाजूंचे असले, तरी समाजात एकाच प्रकारच्या नातेसंबंधास जास्त प्रधान्य देण्यात येते. वंशसत्ता, नामकरण आणि वारसाहक्क ठरविण्यासाठी पितृप्रधान समाजात पुरुषक्रमाचे नातेसंबंधी (आप्त) व मातृप्रधान समाजात स्त्रीक्रमाचे नातेसंबंधी (आप्त) जास्त महत्त्वाचे असतात. विवाहानंतर स्त्रीचे निवासस्थान, बदलत असल्याने पितृप्रधान समाजात पुरुषक्रमावरच भर देण्यात येतो. तसेच विवाहोद्‌गत नातेसंबंधांपेक्षा सपिंड नातेसंबंध जास्त जवळचे समजले जातात. एकरेषी वंशसत्ता ही भावकी किंवा घराणे, कुळी, गोत्र या नातेसमूहात अभिप्रेत आहे. नातेसमूहात स्त्रियांचे सभासदत्व पुरुषांच्या सभासदत्वावरच अवलंबून असते. कुमारिका पित्याचे व विवाहित स्त्रिया पतीचे सभासदत्व अंगीकारतात. गारो व खासी या मातृप्रधान जमातींत सभासदत्व हे स्त्रीक्रमाने मिळते व पुरुष कुटुंबातील स्त्रियांचे सभासदत्व अंगीकारतात. सपिंड व सोयरे, असे दोन प्रकारचे व्यापक नातेसंबंध असूनही एकाच प्रकारच्या नातेसंबंधास समाजाने महत्त्व दिल्यामुळे वारसाहक्क इत्यादींबाबत स्पर्धा मर्यादित स्वरूपातच राहतात. तसेच बहिर्विवाहाचे आणि अंतर्विवाहाचे नियम केल्याने भावकी, कुळी इ. नातेसमूहांत लैंगिक क्षेत्रात स्पर्धा होत नाहीत. जात व जातपुंज अशा व्यापक नातेसमूहांचे विवाह-नियमन हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. केवळ जातीतच विवाह मान्य असल्याने जातीचे सभासद हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नातेसंबंधी (आप्त) असतात. हे नातेसंबंधी सपिंड किंवा विवाहोद्‌गत अथवा विवाहोद्‌गतसंबंधी होण्याची क्षमता असणारे असतात. अशा रीतीने नातेसंबंधांविषयी सामाजिक नियमनांद्वारा विवाह, कुटुंब व मालमत्ताविषयक संस्थांचे स्वरूप ठरविण्यात येते.

प्रत्येक आप्ताचे काही अधिकार तसेच जबाबदाऱ्या असतात. जन्म, रजोदर्शन, दीक्षाविधि-उपनयन, विवाह, मृत्यू इ. समयी आप्तेष्टांच्या जबाबदाऱ्या अथवा हक्क निदर्शनास येतात. समारंभप्रसंगी आप्तेष्टांत देणग्यांची देवाण-घेवाण होते. तसेच आप्तेष्ट निकटचे किंवा दूरचे म्हणजेच प्राथमिक, दुय्यम वा तिसऱ्या गटातील असल्यास जन्म-मृत्यूसमयी, सोयर-सुतकांची कालमर्यादा पाळण्यात येते. काही आप्तेष्टांत सामान्यपणे विशेष सलगीचे किंवा परिहार्य संबंध असतात. जसे कनिष्ठ दीर व भावजय, पत्‍नीची धाकटी बहीण इत्यादींशी सलगीसंबंध असतात व सासू-जावई, सासरा-सून, ज्येष्ट दीर व धाकटी भावजय यांत परिहार्य संबंध असतात.

विवाहाच्या अंतर्विवाही, बहिर्विवाही व अधिमान्य साहचर्याच्या नियमांमुळे नातेसंबंधांचे प्रकार बदलतात. ज्या समाजात आते-मामे भावंडांचे विवाह अधिमान्य आहेत, तेथे अगोदरच अस्तित्वात असलेले आप्तसंबंध जास्त जवळचे होतात. तसेच ज्या समाजात प्रत्येक विवाह हा नवीन नातेसंबंध प्रस्थापित करतो, तेथे विवाहोद्‌गत नातेसंबंधांची संख्या वाढत जाते.

नातेसंज्ञा

आप्तेष्ट एकमेकांस विशिष्ट संज्ञांचा उपयोग करून संबोधतात व त्याप्रमाणे त्यांच्याबाबत निर्देश करतात. आप्तेष्टांनी जरी एकमेकांना त्यांच्या नावाने संबोधले, तरी निर्देश करताना सामान्यतः पदाचा निर्देश करण्यात येतो. जसे पित्यास आणि मातेस जरी नाना व माई म्हणून संबोधले, तरी निर्देश करताना वडील व आई असे सांगण्यात येते. संबोधन-संज्ञा ही नातेसंज्ञा नसून निर्देश-संज्ञा हीच खरी नातेसंज्ञा असते व प्रत्येक नातेसंज्ञाचे वा नाते-पदाचे अधिकार, जबाबदारी इ. समाजमान्य असते.

काही संज्ञा केवळ विशिष्ट आप्तांसच लागू होतात. जसे आई, वडील, काका, मामा हे आप्त विशिष्ट नातेसंबंधी असतात व या संज्ञा उच्चारल्यावर कोणाबद्दल निर्देश आहे असा गोंधळ होत नाही. या संज्ञेस वर्णनात्मक किंवा नातेवाचक संज्ञा म्हणता येईल. काही संज्ञा एकापेक्षा जास्त आप्तेष्टांचा निर्देश करतात, त्यांस वर्गनिष्ठ नातेसंज्ञा म्हणता येईल. जसे, आजोबा, आजी हे आईचे किंवा वडिलांचे माता-पिता असू शकतात. परंतु हिंदी-भाषिक समाजात पित्याकडील आजा-आजींस व आईकडील आजा-आजींस अनुक्रमे दादा, दादी व नाना, नानी अशा नातेवाचक संज्ञा आहेत. इंग्रजीतील कझिन, अंकल व आँट या संज्ञा वर्गनिष्ठ आहेत; कारण या संज्ञा एकापेक्षा जास्त प्रकारच्या आप्तांचा निर्देश करतात. कझिन या संज्ञेत सर्व चुलत, मावस, मामे व आते भावंडांचा समावेश होतो. या संज्ञेत लिंग-भेदही सूचित होत नाही तसेच अंकल व आँट या संज्ञा अनुक्रमे काका, मामा, मावशीचा नवरा, आत्येचा नवरा आणि काकी, मामी, मावशी व आत्या यांचा निर्देश करतात.

नातेसंज्ञा व सामाजिक वर्तन यांचा जवळचा संबंध असतो. वर्गनिष्ठ संज्ञा एकापेक्षा जास्त आप्तांचा निर्देश करतात; कारण त्या आप्तांशी समान संबंध असतात. जसे, मामेबहिणीशी विवाह करण्याची प्रथा असणाऱ्या समाजात मामा व सासरा यांस एकच वर्गनिष्ठ संज्ञा असू शकते. तसेच आत्या व सासू यांचा निर्देश करणारी एकच नातेसंज्ञा असू शकते. अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची पद्धत असते. कोणा व्यक्तीस जावई नसल्यास, भाच्यास (बहिणीचा मुलगा) वाण देण्यात येते. याचा अर्थ, भाचा व जावई यांच्या स्थानात साम्य असते. नातेसंज्ञांवरून समाजाच्या उत्क्रांतीचा मागोवाही मिळू शकतो. जरी वर्तमानकाळात सामाजिक चालीरीती बदलल्या असल्या, तरी वर्गनिष्ठ संज्ञा भूतकाळातील सामाजिक चालीरीतींवर प्रकाश टाकतात. वर्णनात्मक वा नातेवाचक संज्ञा समाजाच्या घनिष्ठ नातेपद्धतीचे दर्शन घडवितात. प्रत्येक आप्तात स्वतंत्र संज्ञा असण्याचे कारण, प्रत्येक आप्ताचे अधिकार, हक्क व संबंध हे स्वतंत्र असावयास हवे. यावरून समाज आप्ताभिमुख आहे, हे उघड होते. पाश्चिमात्य समाजात नातेवाचक संज्ञा कमी असण्याचे कारण, तो समाज हेतु-अभिमुख आहे व आप्ताभिमुख नाही.

आप्तगट : बीजकुटुंब आप्तेष्टांचा सर्वांत लहान गट असतो. पितृप्रधान समाजात पितृनिवास-पतिनिवास व मातृप्रधान समाजात मातृ-निवास-पत्‍नीनिवासाच्या पद्धतीमुळे हा आप्तगट निर्माण होतो. बहुतेक आप्तगट हे एकरेखी-म्हणजे पितृप्रधान किंवा मातृप्रधान असतात. एकरेखी आप्तांचे गट केल्याने समाजात अस्थिरता माजत नाही आणि वंशसत्ता, मालमत्तेविषयी वंशानुक्रम सुलभतेने ठरविता येतो. भारतीय खेड्यांत, सर्वसाधारणतः एका जातीत दोन वा तीन भावकीचे आतेष्ट राहतात. उत्तर भारतात खेडेगाव बहिर्विवाही मानल्यामुळे, सामान्यतः विवाहोद्‌गत आप्तेष्ट एका खेड्यात नसतात. आदिवासी खेड्यांत, सर्वच नागरिक सपिंडता किंवा विवाहोद्‌गत संबंधांनी एकमेकांचे आप्त झालेले असतात. आदिवासी कुळी हा सपिंड आप्तांचा मोठा गट असतो. हिंदू समाजात गोत्रप्रवर हे असेच सपिंड-गट असतात. जात हा प्रत्यक्ष व आप्त-क्षमता असणाऱ्या आप्तांचा एक मोठा समूह असतो. आदिवासी समाजात, कुळीपेक्षा मोठे सकुलक व अर्धक हे आप्तेष्टांचे समूह असतात.

भारतातील नातेसंबंध

उत्तर व दक्षिण भारतातील नातेपद्धतीत बरीच भिन्नता आहे. उत्तर भारतात आते-मामे भावंडांचे अधिमान्य विवाह वर्ज्य असल्याने विवाहोद्‌गत नातेसंबंधींची संख्या वाढत जाते. याउलट, दक्षिण भारतात व महाराष्ट्रातील काही जातींत आते-मामे भावंडांचे विवाह अधिमान्य किंवा समाजमान्य असल्याने आप्तेष्टांचे संबंध जास्त घनिष्ठ होतात. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतात सासू-सून, दीर-भावजय व सासरा-सून इ. संबंध वेगवेगळे असतात. दक्षिण भारतात घरात येणारी सून परकी नसते. उत्तर भारतात प्रत्येक सून ही परकी असल्याने ती दिराशी सलगीसंबंध प्रस्थापित करून, आपला एक मित्र निर्माण करते. दक्षिण भारतात जनन व जनक-कुटुंब साधारणतः एकमेकांत विलीन होतात; तशी उत्तर भारतात होत नाहीत. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारत जास्त पुरुषप्रधान असल्याकारणाने स्त्रीस सामाजिक व धार्मिक कार्यांत गौण स्थान असते. उत्तर भारतात सपिंड व विवाहोद्‌गत आप्तांना वेगवेगळ्या संज्ञा असतात, तशा अभिमान्य विवाहामुळे दक्षिण भारतात नसतात. भारतातही सपिंड विवाह वर्ज्य असल्याने जन्म, मृत्यु व विवाहसमयी, सपिंड आप्तांस जास्त महत्त्व प्राप्त होते. तसेच सोयर-सुतकही सपिंडांना जास्त काळ पाळावे लागते.

नातेसंबंध समाजात इतके महत्त्वाचे असतात, की समाजरचना व समाज संघटना नातेसंबंधांचा सर्वंकष अभ्यास केल्याशिवाय समजू शकत नाहीत.

संशोधन

मानवशास्त्रज्ञांना आदिवासी व सरल संस्कृतीचे अध्ययन करताना नातेपद्धतीचे महत्त्व उमगले. मानवशास्त्रात सर्वांत जास्त संशोधन नातेपद्धतीसंबंधी आहे. लूइस मॉर्गन या मानवशास्त्रज्ञाने १८७० मध्ये प्रथमच नातेसंबंधावर ग्रंथ लिहिला. मॉर्गनने उत्क्रांतिविषयक सिद्धांत मांडताना नातेसंबंधांच्या व नातेसमूहांच्या उत्क्रांतीवर आपले विचार मांडले आहेत. त्यानंतर रिव्हर्झ क्रोबर, विल्यम लोई, रॉबर्ट, रॅडक्लिफ ब्राउन, मॉलिनॉव्हस्की व मर्‌डॉक या नामवंत मानवशास्त्रज्ञांनी नातेसंबंधांवर विपुल संशोधन केले आहे. लेवी-स्ट्रॉस या फ्रेंच मानवशास्त्रज्ञानेही नातेसंबंधांची संरचना या विषयावर प्रख्यात ग्रंथ लिहिला आहे. आर्‌. डब्ल्यू. फर्थ या ब्रिटिश मानवशास्त्रज्ञाने टिकोपिया समाजाच्या नातेसंबंधांचे सखोल अध्ययन केले व नातेसंबंध सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनात कसे कार्य करतात हे दाखवून दिले. भारतात इरावती कर्वे यांनी नातेसंबंधांवर विशेष संशोधन केले. त्यांच्या नातेदारी संघटनेवरील ग्रंथ हा भारतीय नातेसंबंधांबाबत एकमेव ग्रंथ आहे.

संदर्भ: 1. Karve, Irawati, Kinship Organization in India, Poona. 1953.

2. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/23/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate