অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नियोग

नियोग

पतीचा मृत्यू, असाध्य रोग, क्लीबत्व, निर्वीजत्व इ. कारणांमुळे स्त्री निपुत्रिक असेल, तर तिने केवळ पुत्रोत्पत्तीसाठी आपद्धर्म म्हणून अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची प्राचीन भारतीय प्रथा. ‘नियोग’ या शब्दाचे आज्ञा, नियुक्ती व कर्तव्य हे तीनही अर्थ अभिप्रेत आहेत. सधवेला पतीने व विधवेला वडीलधाऱ्या माणसांनी पुत्रोत्पादनाची ‘आज्ञा’ द्यावी (किंवा तिने त्यांची संमती घ्यावी), नंतर तिची व अन्य पुरुषाची पुत्रोत्पादनासाठी तात्कालिक ‘नियुक्ती’ करावी आणि त्यानंतर त्या स्त्रीपुरुषांनी ‘कर्तव्य’ भावनेने समागम करावा, अशी पद्धत होती. निपुत्रिक पत्नी ही ‘क्षेत्र’ (जमीन), तिचा निपुत्रिक पती हा ‘क्षेत्री’ आणि नियुक्त पुरुष हा ‘बीजी’ मानला जाई, बीजी म्हणून स्त्रीच्या दिराची आणि तो नसेल, तर पतीच्या बाजूने अग्रक्रमाने सपिंड, सगोत्र, सप्रवर, सजातीय वा उच्चवर्णीय पुरुषाची नियुक्ती केली जाई. जननक्षम, निरोगी आणि सद्‌गुणी पुरुषासच बीजी म्हणून केले जाई.

नियोगाला स्त्रीचीही संमती आवश्यक असे. नियोगापूर्वी ती व्रतस्थ असे. देव, ब्राह्मण, पितर व अतिथी यांना भोजन दिल्यानंतर गुरुजनांदेखत नियोगाचा विचार जाहीर करून वडीलधारी माणसे बीजीची नियुक्ती करीत. ऋतुस्नात, शुक्लवस्त्रा व संयमी स्त्रीकडे बीजीने रात्री किंवा ब्राह्म मुहूर्त असताना (पहाटे) जावे. विलासाची इच्छा होऊ नये म्हणून त्याने अंगाला तुप (वा तेल) चोपडावे, तिच्याशी संभाषण, चुंबन, आलिंगन इ. वासनायुक्त वर्तन न करता समागम करावा. प्रत्येक वेळी ती ऋतुस्नात झाल्यानंतर फक्त एकदाच या पद्धतीने गर्भ राहीपर्यत समागम करावा, इच्छित पुत्रप्राप्तीसाठी नियोग असल्यामुळे जन्मलेले मूल मृत, अयोग्य वा कन्या असल्यास पुन्हा नियोग करावा, पुत्रप्राप्तीनंतर दोघांनी सून व सासरा या नात्याने वागावे इ. नियम होते.

नियोगाने एक, दोन आणि क्कचित तीन पुत्र प्राप्त करण्यास संमती असे. नियोगापूर्वी काही करार झाला नसेल, तर होणारा पुत्र क्षेत्रीचा ‘क्षेत्रज’ पुत्र ठरे. बीजी हा केवळ निमित्तमात्र मानला जाई. औरस पुत्राप्रमाणे क्षेत्रज पुत्राला क्षेत्राची संपत्ती व गोत्र आणि पिंडदानाचा व वंश चालविण्याचा अधिकार प्राप्त होई. ‘होणारा पुत्र दोघांचा’ असा आधी करार झाल्यास किंवा बीजीला स्वतःच्या भार्येपासूनचा पुत्र नसल्यास तो पुत्र बीजी व क्षेत्री या दोघांचाही ठरून त्याला दोघांच्याही संपत्ती वगैरेंचा हक्क प्राप्त होई. क्षेत्रीने क्षेत्रज पुत्र निर्माण करून घेतल्यानंतर त्याला औरस पुत्र झाला, तर अशा पुत्रांनी आपापल्या जनक पित्याची संपत्ती घ्यावी; परंतु औरस पुत्राने क्षेत्रज पुत्राला उपजीविकेसाठी पाचवा वा सहावा हिस्सा द्यावा, असे मनूने म्हटले आहे.

अर्थलाभ वा कामतृप्ती यांकरिता नियोग करण्यास मान्यता नव्हती. कुमारिका, पुत्रवती, सधवा वा विधवा, रुग्ण, वेडी, पतिनिधनाच्या दुःखाने बेभान झालेली, मूल होण्याचा काळ निघून गेलेली वृद्धा, वंध्या व गर्भवती यांना नियोगाचा अधिकार नव्हता. नियुक्त नसलेले, आवश्यकता नसताना नियुक्त केलेले, नियुक्त केलेले परंतु विलासमग्न होणारे व उद्दिष्टपूर्तीनंतरही गमन करणारे दीर-भावजय हे अगम्य आप्तसंभोग करणारे ठरतात, राजाने त्यांना शिक्षा द्यावी; त्यांना होणारा पुत्र बीजीचा असल्यामुळे क्षेत्रीच्या संपत्तीत त्याला वाटा नाही इ. मते होती.नियोग म्हणजे पुनर्विवाह नव्हे. उलट, स्त्रीने पुनर्विवाह करून परक्या कुलात जाऊ नये यासाठी नियोगाचा पर्याय होता. विवाहाने स्त्रीपुरूष पत्नी व पती बनतात. परंतु नियोगाने स्त्री ही बीजीची पत्नी बनत नाही, तर सदैव विवाहप्राप्त पतीचीच पत्नी राहते. पुनर्विवाहात विधवेच्या कामपूर्तीचा विचार असतो, परंतु नियोगात त्याला मुळीच स्थान नसते. नियोग हा व्यभिचारही नव्हे; कारण तो विधिपूर्वक नियुक्त स्त्रीपुरुषांचा संबंध असून तो तत्कालीन धर्म, शास्त्रे, नीती व शिष्टाचार यांना संमत होता. शिवाय, नीतीच्या कल्पना सदैव बदलत असल्यामुळे नियोगाला आजचे निकष लावणे योग्य नाही.

पुत्रप्राप्ती हाच नियोगामागचा प्रमुख उद्देश होता. पुत्रोत्पत्तीद्वारा पितृऋण फेडणे हे कर्तव्य आहे, पुत्राच्या अभावी वंश व स्वर्गही बुडतो, पुत्राने श्राद्धतर्पणादी विधी केल्याशिवाय पितरांना उत्तम गती मिळत नाही, ऐहिक समृद्धीसाठीही पराक्रमी पुत्राची गरज आहे इ. समजुतींमुळेच निपुत्रिक पुरुष स्वतःच्या पत्नीला प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटणाऱ्या नियोगाची आज्ञा वा संमती देत असे. जॉन मकलेन्‌नच्या मते बहुपतित्वाची चाल, जॉलीच्या मते आर्थिक उद्देश व विंटरनिट्‌सच्या मते दारिद्रय, स्त्रियांची दुर्मिळता व एकत्र कुटुंबपद्धती ही नियोग प्रथेची कारणे होत.

स्त्रीपारतंत्र्याची व पितृप्रधान संस्कृतीची द्योतक असलेली ही प्रथा वेदपूर्वकालापासून चालत आलेली होती. पूर्वी केव्हातरी कन्यादान व्यक्तिशः वराला न करता कुलाला करीत असावेत व नियोग हा त्या प्रथेचा अवशेष असावा, असे एक मत आहे. थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर धाकट्याने त्याची संपत्ती व विधवा पत्नी यांचा स्वीकार करण्याची पद्धत होती. यास्काचार्यांनी दीर (देवर) या शब्दाचा द्वितीय वर असा अर्थ दिला आहे. दीर व विधवा भावजय यांचा संबंध अजूनही काही ठिकाणी मान्य आहे. जावयाच्या धाकट्या भावाला पाणजावई व ‘वरधवा’ (कनिष्ठ वर) म्हणण्याची प्रथा आहे. या गोष्टी नियोग प्रथेच्या उगमाचा विचार करताना महत्त्वाच्या ठरतात.

नियोग हा काहींनी धर्मसंमत, तर काहींनी धर्माविरुद्ध मानलेला होता. ऋग्वेदादी वेद, गौतम-वसिष्ठादींची धर्मसूत्रे, स्मृती, पुराणे, अर्थशास्त्र, महाभारत इ. वाङ्‌मयातून नियोगाला मान्यता असल्याचे निर्देश आढळतात. धृतराष्ट्र, पंडू व पांडव यांचा जन्म नियोगानेच झाला होता. याउलट आपस्तंब धर्मसूत्राचा मात्र नियोगाला विरोध होता. मनूने आधी नियोगाचे वर्णन केले आहे, परंतु नंतर वेन राजाने मानवात आणलेला व वर्मसंकराला कारणीभूत होणारा पशुधर्म म्हणून त्याचा धिक्कार केला आहे. त्याच्या मते कन्येच्या वाङ्‌निश्चयानंतर; परंतु विवाहापूर्वीच नियोजित वर मृत्यू पावला, तर तिने त्याच्या भावाकडून पुत्रप्राप्ती करणे, हा खरा प्राचीनांच्या नियोगाचा अर्थ होता.

बृहस्पतीच्या मते कृत व त्रेता युगांतील लोक तपस्वी असल्यामुळे त्यांना नियोगाचा अधिकार होता, परंतु नंतरच्या लोकांना तो उरलेला नाही. काही धर्मनिबंधांनी नियोग हा वैकल्पिक होता किंवा शास्त्रांनी तो फक्त शुद्रांसाठी सांगितलेला होता, असे म्हटले आहे. ही चाल उत्तर हिंदुस्थानातील काही भागांत ब्रिटिश अमदानीपर्यंत चालू होती; परंतु इसवी सनाच्या पाचव्यासहाव्या शतकापासून 'कलिवर्ज्य' प्रकरणात नियोगाचा समावेश झाला आणि ही प्रथा नामशेष झाली. आधुनिक काळात आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी मात्र अक्षतयोनी विधवेप्रमाणेच अक्षतवीर्य विधुरानेही पुनर्विवाह न करता संतानोप्तत्तीसाठी नियोग करावा, असा विचार मांडला; परंतु त्यांच्या अनुयायांनीही याबाबतीत त्यांची मते मानलेली नाहीत.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate