অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पितृसत्ताक कुटुंबपद्धति

वडीलधार्‍या पुरूषाची अधिसत्ता

कुटुंबातील घटक व्यक्तींवर पित्याची वा वडीलधार्‍या पुरूषाची अधिसत्ता असणारी कुटुंबाची संघटना म्हणजे पितृसत्ताक कुटुंबपद्धती. अशा पद्धतीच्या कुटुंबातील सर्वच स्त्री-पुरूष व्यक्तींचे जीवन नियंत्रित करण्याचा अधिकार वयाने किंवा नात्याने मोठ्या असलेल्या पुरूषाकडे असतो. परंतु पितृसत्ताक पद्धतीत वयात आलेल्या इतर व्यक्तींचेही अधिकार वाढतात, हे या संदर्भात लक्षात ठेवावे लागते. निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या देशांत कुटुंबीय व्यक्तींवरील मुख्य पुरूषाच्या अधिकाराच्या मर्यादा वेगगगवेगळ्या दिसतात. मालमत्तेचा वारसा आणि सामाजिक स्थान पित्याच्या वांशिक परंपरेने चालत असे आणि पुढेदेखील पुरूष संततीकडेच संक्रमित होत असे. या प्रकारची कुटुंबपद्धती भारत, चीन, जपान या आशियाई देशांत वा प्राचीन यूरोपात प्रामुख्याने दिसून येते. प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या सुरूवातीच्या कालखंडात पितृसत्ताक कुटुंबपद्धती ही अधिक प्रभावी होती. तेथे तर कुटुंबातील व्यक्तींचे जीवन या सत्ताधारी पुरूषांच्या हातीच असे, कुटुंबातील व्यक्तींच्या वर्तनास मर्यादा घालून देणे, कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह ठरवणे, संपूर्ण संपत्तीवर आपली मालकी ठेवून इतरांची गरजेनुसार सोय करणे, इतकेच काय पण कुटुंबातील व्यक्तींना विकून टाकण्याचा देखील अधिकार त्याला असे. अरबांच्या टोळ्यांत अशीच अमर्याद पितृसत्ता होती. चीनमध्ये कुटुंबप्रमुख, त्याची पत्नी, विवाहित आणि अविवाहित मुले, नातवंडे यांनी बनलेले विस्तारित कुटुंब पिढ्यान्‌पिढ्या राहात आलेले होते. आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक घटक म्हणून हे कुटुंब कार्य करीत होते. कम्युनिस्ट क्रांतीनंतर कुटुंबविषयक नवे कायदे झाले आणि ही रचना बदलली. अशा रीतीने अनेक प्राचीन मानवी समूहांत अमर्याद पितृसत्ता असलेली कुटुंबपद्धती होती, असे दिसते. आधुनिक काळातदेखील सुधारलेल्या मानवी समाजात पितृसत्ताक पद्धती असली, तरी पित्याच्या अधिकाराला आता खूपच मर्यादा पडलेल्या आहेत.

मातृसत्ताक पद्धती

व्याध संस्कृतीच्या अवस्थेत असलेल्या मानवी समूहात मातृसत्ताक पद्धती होती. पुरूषाने शिकारीला जाणे, शिकार मिळवून आणणे व स्त्रीने घर सांभाळणे असे श्रमविभाजन होते. शेतीचा शोध स्त्रीनेच लावला. असे आता मानले जाते. शेतीचा शोध लागल्यानंतर भटकणारा मानव स्थिर स्वरूपाचे जीवन जगू लागला. निरनिराळे व्यवसाय निर्माण झाले. समाजात उत्पादन अधिक होऊ लागले. घरेलू व्यवसायात स्त्रीचाच सहभाग मोठा होता. तरी पण काही कार्ये अशी होती, की त्यांतून स्त्रीला वगळणे भागच होते. उदा., युद्धात शत्रूंशी सामना देण्याचे उत्तदायित्व पुरूषावरच होते. यात स्त्री जर सहभागी झाली, तर वंशच नष्ट होण्याची भीती होती. युद्ध ही एक अशी महत्वाची घटना होती, की ज्यामुळे समाजात पुरुषाचे वर्चस्व निर्माण झाले. वंशवृद्धीसाठी स्त्रीला जपणे आवश्यक असल्यामुळे स्त्रीचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले. व तिच्यावर बंधने आली. रक्षणकर्ता म्हणून पुरूषाची भूमिका असल्यामुळे स्त्री ही ‘रक्षित’ बनली. कृषिजीवनाचा विकास व निरनिराळ्या व्यवसायांचा उदय यांमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या अधिक असणे आवश्यक बनले. बहुपत्‍नीविवाहाचे हे एक कारण सांगितले जाते. पुरुषाच्या अनेक बायका, त्यांची मुले या सर्वांचे मिळून विस्तारित कुटुंब निर्माण झाले व कुटुंबप्रमुखाची सत्ता वाढत गेली.

औद्योगिक क्रांतीनंतर पारंपारिक व्यवसायांचा र्‍हास होत गेला, तसे कुटुंबसंस्थेवर त्याचे परिणाम होऊन कुटुंबे विभक्त झाली. पति-पत्‍नी आणि त्यांची अविवाहित मुले-मुली यांनी बनलेल्या नव्या कुटुंबात अधिसत्ता ही पुरूषांकडेच असते. मालमत्तेचा वारस, घराण्याचे नाव पुरुषवंशाकडूनच संक्रमित होते.

समाजव्यवस्थेवर प्रभाव

पितृसत्ताक कुटुंबपद्धतीने एकंदरच मानवी समाजव्यवस्थेवर प्रभाव टाकलेला आहे. मानव जातीने इतिहासकालात स्वीकारलेले आदर्श, मूल्ये, प्रमाणके ही पुरुषांना अनुकूल असलेली अशीच राहिली. स्त्रीला कुटुंबात दुय्यम स्थान प्राप्त झाल्यामुळे तिचा सामाजिक दर्जा एकंदरच पुरूषाच्या तुलनेत कमी राहिला. पुढे पुढे मध्ययुगात तर तिच्यावर अनेक बंधने लादली गेली. अर्थव्यवस्था, राजकारण, धार्मिक जीवन या सर्वांवरच पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा प्रभाव पडलेला दिसतो.

भारतामध्ये खासी व गारो यांसारख्या काही जमाती व केरळमधील नायर जमात सोडल्यास सर्व जातिजमातींमध्ये पितृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. आर्य लोक पितृसत्ताक कुटुंबपद्धती असलेले होते व त्यांच्या संस्कृतिप्रसारामुळे एतद्देशीय मातृसत्ताक कुटुंबपद्धती र्‍हास पावली असावी.

संदर्भ : 1. Burgess, Ew.; Locke, H.J.The Family, New York, 1960.

2. Goode, W.J.World Revolution and Family Patterns, London, 1963.

लेखक: नरेश परळीकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate