অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रचार

प्रचार

प्रचार म्हणजे लोकांच्या वृत्ती, समजुती किंवा कृती यांमध्ये हवा तो बदल घडवून आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न. प्रचारक व्यक्ती किंवा यंत्रणा जाणूनबुजून इतरांना आपल्या विचारप्रणालीस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करतात व तो यशस्वी व्हावा यासाठी शब्द, हावभाव, संगीत, निशाण, ⇨गणवेश यांसारख्या अनेक गोष्टींचा कुशलतेने वापर करतात. बुद्धिपुरस्सर सूचना देऊन त्यांची वारंवार पुनरुक्ती करणे हे प्रचाराचे तंत्र असते; कारण तसे केल्याने त्या सूचना लोकांच्या मनावर बिंबविणे सोपे जाते व प्रचारकांचा हेतू साध्य होतो. प्रचारकांसमोर विशिष्ट उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे असतात आणि ती साध्य करण्यासाठी ते काही निवडक घटना, युक्तिवाद आणि प्रतीके यांची विचारपूर्वक मांडणी करतात. ही मांडणी परिणामकारक व्हावी म्हणून पुष्कळदा ते काही संबंधित घटनांचा उल्लेखसुद्धा वगळतात आणि लोकांचे लक्ष आपल्या प्रचारसंदेशांखेरीज इतरत्र विचलित होऊ नये, याची काळजी घेतात. म्हणूनच प्रचार व शिक्षण यांमध्ये फरक आढळतो. शिक्षणाप्रमाणे विषयाच्या सर्व बाजू लोकांसमोर मांडण्याच्या भानगडीत प्रचारक पडत नाहीत. आपला प्रचार हेच पूर्ण सत्य आहे असे ते मानतात व म्हणून प्रचार करताना आपण लोकांना शिक्षणच देत आहोत, अशी त्यांची भावना असते.

प्रचार हा शब्द राजकीय चळवळीशी निगडित असला, तरी त्याचे स्वरूप कितीतरी व्यापक आहे. प्रचारामुळे लोकमत जागृत करता येते व बदलता येते. लोकांच्या आचारविचारांना प्रचाराने एक विशिष्ट वळण लावता येते व त्यातूनच एकात्मता निर्माण होऊ शकते. प्रचाराचा अनेक वेळा दुरुपयोगही केला जातो. चुकीची माहिती, भावनात्मक युक्तिवाद व जाणूनबुजून घेतलेली एकांगी वैचारिक भूमिका यांच्या आधारे जनसमूहांच्या वृत्ती, प्रेरणा व आवेग यांचा चलाखीने वापर करून घेऊन तज्ज्ञ प्रचारक आपले उद्दिष्ट साधतात. म्हणूनच कोणतीही गोष्ट अवास्तव करून सांगणे म्हणजेच प्रचार, असा त्या शब्दाला एक सांकेतिक अर्थ प्राप्त झाला आहे. वस्तुतः तसे असण्याचे कारण नाही. चांगल्या गोष्टीचासुद्धा प्रचार करण्याची जरूरी असते.

प्रचार उघड किंवा प्रच्छन्न असू शकतो. उघड प्रचारात प्रचारक कोण हे लोकांना उघडपणे समजू शकते, तर प्रच्छन्न प्रचारात प्रचारक पडद्याआडून कार्य करीत असतो. राजकीय मुत्सद्देगिरी, कायदेशीर युक्तिवाद, जाहिरातबाजी इ. क्षेत्रांत दोन्ही प्रकारच्या प्रचारांना वाव मिळू शकतो. मानसशास्त्रीय युद्धतंत्रामध्ये युद्धापूर्वी किंवा युद्ध चालू असताना शत्रुपक्षीय नागरिकांमध्ये किंवा सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण व्हावा, त्यांचा अवसानभंग व्हावा, हल्लासमयी ते गाफील राहावेत किंवा त्यांनी शरणागती पतकरावी या हेतूने प्रचार करण्यात येतो. प्रचाराचा उपयोग राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या मतपरिवर्तनासाठीही केला जातो. अशा वेळी त्यांना विशिष्ट राजनीतीचे डोस पाजणे, त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण व्हावी म्हणून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, इ. मार्गांनी आपली विशिष्ट विचारसरणी त्यांच्या अंगवळणी पाडण्याचेही प्रयत्न होत असतात. प्रचाराचा उपयोग माल खपावा म्हणून व्यापारी कारखानदार व जाहिरातदार तर करतातच; परंतु राजकीय पक्षांनाही निवडणुका जिंकण्यासाठी प्रचाराची गरज भासते. धर्मप्रसारासाठी प्रचारतंत्राचा वापर करण्यात येतो.

विसाव्या शतकातील यांत्रिक-तांत्रिक प्रगतीमुळे अनेक खुणा, प्रतीके व माध्यमे यांच्या द्वारा प्रचाराचा संदेश प्रसृत करता येतो. खुणा अनेक प्रकारच्या असतात व त्यांनी माणसांच्या वृत्तीचे उत्तेजन साधता येते. त्या शब्दरूप किंवा ध्वनिरूप असू शकतात. (उदा., भाषणे, लेख किंवा तोफांचे आवाज), हावभाव (सैनिकी सलामी, कवायती, संचलन इ.), वेशभूषा (गणवेश), इमारती (स्मारके), दृक्‌प्रतिमा (निशाण, स्वस्तिक, चित्रे) इत्यादींचाही प्रचारासाठी उपयोग करता येतो. सामान्यतः प्रतीक म्हणजे विशिष्ट अर्थबोध करून देणारे चिन्ह. अर्थात एखादे प्रतीक निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या अर्थाचा बोध करून देणे शक्य आहे. प्रचारासाठी खुणांची व प्रतीकांची निवड करताना त्यांचा निरनिराळ्या लोकांवर काय प्रभाव आहे, याचे संशोधन करावे लागते. सर्वेक्षणाच्या साहाय्याने जनमताचा अंदाज घेऊन वा मुलाखतींद्वारे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून प्रचारकांना मार्गदर्शन करण्याची कामगिरी काही खास संस्था करीत असतात.

खुणांचा व प्रतीकांचा वापर करण्यासाठी माध्यमांची गरज लागते. आधुनिक काळात विविध प्रकारची माध्यमेही उपलब्ध आहेत. लेखी माध्यमांत पत्रे, पत्रके, पत्रिका, भित्तिचित्रे, जाहिरात फलक, वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तिका, पुस्तके व भिंतीवरील किंवा रस्त्यावरील लिखाण इत्यादींचा समावेश होतो. दृक्‌श्राव्य माध्यमांमध्ये जाहीर व्याख्याने, चित्रपट, नाटके, मिरवणुकी, वाद्यवृंद, निदर्शने इत्यादींचा सामान्यपणे वापर केला जातो.

ऐतिहासिक आढावा :रोमन कॅथलिक पंथाने १६२२ मध्ये नेमलेल्या धर्मप्रसारक स्थायी समितीचे (द काँग्रिगेशन फॉर प्रॉपगेशन ऑफ दे फेथ) नाव व कार्य यांवरून ‘प्रॉपगँडा’ (प्रचार) ही संज्ञा प्रथम वापरात आली असली, तरी प्रचारकार्य मात्र तत्पूर्वी शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांवरून असे आढळते, की हजारो वर्षांपासून लोकांना दिपवून टाकणारे वेष, पुतळे, मंदिरे, राजवाडे, कायदेशीर व धार्मिक युक्तिवाद इत्यादींचा उपयोग करून राजे व धर्मगुरू यांनी आपला मोठेपणा व दैवी स्वरूप समाजावर ठसविण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट सामाजिक-धार्मिक पंथांना लोकाश्रय मिळावा म्हणून अनेक आख्यायिका, दृष्टांतकथा, म्हणी, आदेश इत्यादींचा प्रचार करण्यात आला. त्यांचे अविरोध स्वागत झाल्याने त्या काळी प्रचाराचे सिद्धांत शोधण्याची किंवा सूत्ररूपाने मांडण्याची गरज भासली नसावी. ख्रिस्तपूर्व ५०० च्या सुमारास अथेन्समध्ये अलंकारशास्त्र या सदराखाली वक्तृत्वकलेचा व प्रचारतंत्राचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. आयसॉक्राटीझ, प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी त्या शास्त्रातील नियमांचे संकलन केले. त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी या संदर्भातील साधनांच्या विश्वसनीयतेचा प्रश्न हाताळला. वक्त्याने श्रोत्यांना आपण लोकांच्या हिताचेच सत्य सांगत आहोत, आपला हेतू चांगला आहे हे कसे पटवून द्यावे, याचाही त्यांनी ऊहापोह केला. ग्रीकांप्रमाणेच अन्य प्राचीन समाजांमध्येही असे प्रयत्न झाल्याचे आढळते. ⇨ बुद्ध (इ. स. पू. सु. ५६३-४८३), ⇨कन्फ्यूशस (इ. स. पू. सु. ५५१-४७९) यांनीदेखील प्लेटोप्रमाणेच सत्यकथन, प्रभावी वक्तृत्व आणि सुयोग्य भाषण-लिखाण यांच्या साहाय्याने जनतेला सन्मार्गाचे दर्शन कसे घडवावे, याचे समर्थन केले आहे. कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात मानसशास्त्रीय युद्धपद्धतीचा व मुत्सद्देगिरीचा उल्लेख आढळतो व त्यामध्येही प्रचारकार्य कसे तडीस न्यावे याचे दिग्दर्शन आहे. स्वुन्‌जया चिनी लेखकाने युद्धकलेवरील आपल्या ग्रंथातही अशाच प्रकारचा उपदेश केला. सर्वच राजकीय पंथ व धर्म यांचा विस्तार आस्थापूर्वक विश्वास व विचारपूर्वक प्रचार या दोहोंच्या आधारेच बहुधा झाला असावा. ग्रीक व रोमन भाषांतून निवडणुकीतील डावपेच या विषयावर लिखाण आढळते. सोळाव्या शतकात इटलीमध्ये मॅकिआव्हेलीने, कौटिल्य व स्वुन्ज यांच्याप्रमाणेच,शांतताकाळात व युद्धात धर्मशीलता व दुटप्पीपणा यांचा प्रचारासाठी होणाऱ्या उपयोगाविषयी उल्लेख केला आहे. शेक्सपिअरच्या नाटकांतूनही प्रचारतंत्राचा वापर अनेक ठिकाणी आढळतो. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे कारखाने निघाले व त्यांना आपल्या प्रचंड उत्पादनाची विक्री करण्यासाठी खास प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस निरनिराळ्या ग्राहकवर्गांच्या खरेदीविषयक प्रेरणांचा व जाहिरातींना आणि विविध विक्रयतंत्रांना मिळणाऱ्या त्यांच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यास संशोधकांनी सुरुवात केली. १९३० नंतर ग्राहक सर्वेक्षणांचा वापर करून मालाच्या विक्रीक्षेत्राचे विश्लेषण करण्याची पद्धत बहुतेक सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये रूढ झाली. विद्यमान काळात तर ही माहिती इतक्या मोठ्या प्रमाणावर गोळा केली जाते, की तिचा संग्रह करण्यासाठी गणकयंत्राचा उपयोग करावा लागतो. नभोवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके इ. माध्यमांचा जाहिरातींसाठी वापर करणाऱ्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, त्यांची आर्थिक कुवत, शिक्षण अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. विपणिसंशोधन करून ही माहिती गोळा करणे, तिचे योग्य विश्लेषण करणे व हवी तेव्हा ती उपलब्ध करून देणे, हे कार्य गणकयंत्रांच्या मदतीमुळे बरेच सोपे झाले आहे. व्यापार, समाजकारण व राजकारण या क्षेत्रांत अज्ञानी आणि अशिक्षित जनतेतही गृहीतकल्पना, आख्यायिका, अर्धसत्य इत्यादींच्या आधारे प्रचारक दिशाभूल करू शकतात, याची जाणीव हळूहळू विचारवंताना होऊ लागली व त्यांनी प्रचाराचा सखोल अभ्यास केला. ⇨फ्रॉइडसिग्मंड(१८५६-१९३९), वॉल्टर लिपमन, हॅरल्ड डी. लसवेल यांसारख्या अभ्यासकांनी प्रचारविषयक तत्त्वांचे विश्लेषण केले. याचा परिणाम होऊन प्रचार हे केवळ एक तंत्र किंवा कला न राहता शास्त्रच बनले व त्यावर विपुल ग्रंथनिर्मिती होऊ लागली. प्रचाराच्या विविध शाखांमध्ये निष्णात असलेले तज्ञ हे कारखानदार, राजकीय पक्ष, शासन इत्यादींना मार्गदर्शन करू शकतात.

प्रचाराचे घटक :प्रचारकाला आपली कामगिरी पार पाडताना अनेक प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागते. त्यांतील प्रमुख प्रश्न वा घटक पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रचाराचे उद्दिष्ट, क्षेत्र व अपेक्षित बदलाचे स्वरूप, (२) जागतिक समाजव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप व त्यातील परिवर्तनाची दिशा, (३) समाजातील विविध गटांचे सध्याचे स्वरूप व त्यांत होत असलेले बदल, (४) प्रचारसंदेश खुद्द प्रचारकाने की त्याच्या प्रतिनिधींनी द्यावा याचा निर्णय, (५) प्रचाराची प्रतीके, (६) प्रचाराची माध्यमे, (७) ज्यांना उद्देशून प्रचार करावयाचा त्यांचे स्वरूप, (८) परिणामाचे मूल्यमापन, (९) संभाव्य विरोधकांची भूमिका व मार्ग आणि (१०) विरोधकांना तोंड देण्याची योजना. सद्यःपरिस्थितीत प्रचाराचे हे दहा घटक विचारात घेताना प्रचारकाला माफक असेच यश मिळत असले, तरी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावाच लागतो.

प्रचाराची उद्दिष्टे निश्चित करणे हे प्रचारकाचे आद्य कर्तव्य ठरते. विशिष्ट मालाची विक्री साधावयाची असल्यास उद्दिष्ट निश्चित करणे सोपे असते; परंतु जेव्हा बऱ्याच लोकांनी आपला धर्मपंथ स्वीकारावा, आपणास अभिप्रेत असलेली समाजरचना मान्य करावी, युद्धाच्या किंवा क्रांतीच्या प्रयत्नांत सामील व्हावे, असा प्रचारकाचा हेतू असतो, तेव्हा उद्दिष्टांचे निश्चित वर्णन करणे फार अवघड होते. अशा प्रसंगी बरेच कूटप्रश्न उद्‌भवतात. शिवाय प्रचार करताना प्रचारकाला जागतिक संदर्भ व त्यात सदोदित होत असणारे बदल ध्यानी घ्यावे लागतात; नाहीतर त्याचा प्रचार वाया जाण्याची शक्यता असते. पूर्वीच्या काळी एकांगी प्रचार करणे सोपे असे व त्याचा परिणामही तात्काळ अपेक्षेप्रमाणे होत असे. परंतु संदेशवहन आजकाल सर्वव्यापी व जलद झाल्यामुळे एकांगी प्रचारकास सहजासहजी यश मिळू शकत नाही. म्हणूनच दूरदर्शी प्रचारक आपल्या प्रचारात केवळ विशिष्ट संकेतांचाच वापर न करता सार्वत्रिक प्रतीकांना अधिक महत्त्व देतात. हे कामदेखील सोपे नसते; कारण समाजात वर्गजाणीव बाळगणारे अनेक गट असतात, त्यांचे हितसंबंध वेगवेगळे असतात व त्यांच्यात संघर्षही असू शकतो. प्रचार स्वतः करावा की दुसऱ्यांमार्फत करावा, याचाही विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत प्रचार करता आल्यास तो विशेष व्यापक व प्रभावी होऊ शकतो. प्रचारकार्याचा निःपात करण्याचे शासनाने ठरविले, तर मूळ प्रवर्तकास भूमिगत होऊन आपल्या साथीदारांकरवी प्रचारकार्य चालू ठेवावे लागते. प्रचारकास जेथे प्रचार करावयाचा असतो, तेथील भाषेवर प्रभुत्व नसेल किंवा तेथील संस्कृतीमधील महत्त्वाच्या प्रतीकांची पूर्ण माहिती नसेल किंवा धार्मिक, वांशिक अगर सांस्कृतिक भावनांमुळे प्रचारकाविरुद्ध तेथील लोकांचे पूर्वग्रह असतील, तर त्याने स्वतः प्रचार करणे इष्ट ठरत नाही. अशा वेळी पडद्याआड राहून केलेला प्रचारच अधिक सोईस्कर असतो. प्रचारकार्यात नेतृत्वाला अतिशय महत्त्व आहे. सर्वसाधारण माणसे निष्क्रिय असतात; परंतु त्यांच्या प्रशंसेस व विश्वासास पात्र असणाऱ्या त्यांच्या आवडत्या नेत्याने चेतना दिल्यास त्या व्यक्ती एकाएकी कार्यप्रवण होतात. प्रचारसाधनांनी नेत्याची प्रतिमा जनमानसावर ठसविता येते. प्रचारकाने प्रतीकांची निवड करताना केवळ तार्किक दृष्ट्या सुसंगत युक्तिवाद किंवा आकर्षक घोषवाक्ये यांवर विसंबून राहू नये; कारण प्रचार ऐकणाऱ्यांचे वर्तन प्रचारसंदेशाखेरीज इतर चार गोष्टींवर अवलंबून असते : (१) त्यांच्या मनःपटलांवर उमटलेल्या पूर्वस्मृती. त्यांचा परिणाम होऊन प्रचारातील बऱ्याचशा प्रतीकांकडे ते दुर्लक्ष करतात. (२) प्रचारकाने देऊ केलेले आर्थिक प्रलोभन, उदा., देणगी, अन्य प्रकारची लालूच इत्यादी. (३) प्रचारकाने दाखविलेली शारीरिकप्रलोभने, उदा., हिंसेपासून संरक्षण. (४) सामाजिक दबाव. ज्याच्यामुळे ते प्रचारकाच्या सांगण्याप्रमाणे वागतील किंवा प्रतिस्पर्धी प्रचारकाला विरोध करतील. या गोष्टी विचारात घेऊन प्रचारक अशाच वर्तनाचा प्रचार करतो, की जी लोकांना करावीशी वाटते व करणे शक्य असते.

याचाच अर्थ प्रचारकाने वास्तववादी असले पाहिजे, एरव्ही त्याचा प्रचार व्यर्थ जाईल. प्रचाराचा संदेश कृतिशील असला पाहिजे. उदा., स्वदेशीचे व्रत घ्या, परकीय मालावर बहिष्कार टाका, अ ला मत द्या, ब च्या पक्षातून बाहेर पडा, असा प्रचार परिणामकारक होण्याची शक्यता असते. प्रचारकाने अशाच प्रकारचे वर्तन सुचवावे, की जे श्रोत्यांना आवडेल व ज्यावर त्यांचा विश्वास बसेल. त्याचबरोबर संदेश देताना त्याने जर माता-पिता यांसारख्या प्रतीकांचा वापर करून आवाहन केले, तर प्रचार श्रोत्यांच्या हृदयास सहजपणे भिडण्याची शक्यता असते. म्हणूनचराष्ट्रीय चळवळीच्या प्रचारात मातृभूमी, पितृभूमी, राष्ट्रपिता, भारतमाता यांसारख्या कल्पनांची विशेष छाप पडते. जेथे ही प्रतीके वापरता येत नाहीत, तेथे प्रचारसंदेशाचा संबंध थोर व्यक्ती, लेखक, नेते किंवा साधुसंत यांच्याशी लावला जातो. प्रचारकाला संदेशप्रसारासाठी असंख्य माध्यमे उपलब्ध असतात. ज्या माध्यमांकडे लोकांचे विशेषत्वाने लक्ष जाईल, त्यांची निवड प्रचारक करतात. ज्यांचा दृष्टिकोन आपणास पसंत आहे, अशाचमाध्यमांकडे सामान्यतः लोक लक्ष देतात. काही नवीन शिकण्यासाठी म्हणून ते माध्यमांचा वापर करतात असे नाही, तर आपल्या श्रद्धा, समजुती व पूर्वग्रह योग्य आणि बरोबर आहेत, असे मानसिक समाधान मिळविण्यासाठी ते माध्यमांचा आश्रय घेतात. म्हणूनचप्रचारकाने त्यांना जे आवडते, त्यांची जी वागणूक असते त्याहून फार निराळे काही सांगण्याच्या भरीस पडू नये. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे, नभोवाणी यांसारख्या व्यक्तिनिरपेक्ष, सार्वत्रिक माध्यमांच्या ऐवजी ज्यांच्याशी लोकांचा प्रत्यक्ष संबंध येतो अशा संस्था, संघटना, गट किंवा क्लब यांच्या माध्यमांतून केलेला प्रचार अधिक परिणामकारक होतो. आधुनिक जगात प्रचाराबरोबरच प्रतिप्रचारही चालू असतो. शिवाय शिक्षण, प्रकाशन, वृत्तप्रसार, समारंभ इ. कार्यक्रमही सुरू असतात. या सर्वांमधून प्रचाराचा प्रत्यक्ष परिणाम कितीव कोणता होतो, हे सांगणे फार कठीण आहे. नियंत्रित प्रयोग करून हा परिणाम अजमावण्याचा प्रयत्न करण्यात येतो; परंतु प्रचाराचा परिणाम काही काळ सुप्त राहत असल्यामुळे हा प्रयत्नही अपुराच पडतो. शिवाय अशा प्रयोगांसाठी लोक पुढे यावयास तयार नसतात. केव्हा केव्हा तज्ञमंडळांच्या सभासदांच्या वेळोवेळी मुलाखती घेऊन त्यांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रचाराच्या परिणामाविषयी निष्कर्ष काढण्यात येतात. प्रचाराचे विरोधक प्रचारकाविरुद्ध कारवाई करतात. प्रचारकाला तुरुंगात टाकून त्याचा प्रचार बंद पाडतात किंवा अन्य उपायांनी त्याला नामोहरम करतात. त्याच्याविरुद्ध आर्थिक व इतर दबाव आणतात. प्रचारास आळा बसावा म्हणून वृत्तपत्रस्वातंत्र्यव भाषणस्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदेही केले जातात. त्यांविरुद्ध प्रचारकाला संधी मिळेपर्यंत स्वस्थ बसणे भाग पडते. प्रचाराचा जनसमूहावर नेहमीच अपेक्षित परिणाम होतो, असे मानता येत नाही. मानसिक सुस्तपणा, दुराग्रही वृत्ती व रूढ विचारसरणीला चिकटून राहण्याची प्रवृत्ती इ. कारणांमुळे बराचसा प्रचार निष्फळ ठरतो. शिवाय हितसंबंधी गटांच्या परस्परविरोधी प्रचारांमुळेही प्रचारकार्य निष्प्रभ होते.

प्रचाराचे नियंत्रण :लोकशाहीमध्ये प्रत्येकास प्रचाराचे व प्रतिप्रचाराचे स्वातंत्र्य असते. अशा प्रचारातून व प्रतिप्रचारातून समाजहिताच्या ज्या कल्पना आहेत, त्याच टिकतील अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. यामध्ये असे गृहीत धरलेले असते, की सर्वसामान्य जनता ज्ञानी, सुशिक्षित, विचारी आणि सहनशील असून संदेशवहनाच्या अतिरेकानेसुद्धा ती गोंधळून जात नाही. हे गृहीत तत्त्व वास्तववादी नसल्यामुळे शासनातर्फे प्रचारावर मर्यादा किंवा नियंत्रणे घालण्यात येतात. प्रचारकाने व प्रकाशकाने आपले नाव विवक्षित अधिकाऱ्याकडे नोंदवावे, प्रचार निनावी असू नये अशा प्रकारची नियंत्रणे बसविण्यात येतात. राजकीय निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण घालण्यात येते व निवडणुकीपूर्वी एकदोन दिवस प्रचारावर बंदी घालता येते. साम्यवादी राष्ट्रांमध्ये प्रचाराची सर्व साधने शासनाच्या ताब्यातच असल्याने शासनाकडे प्रचाराची मक्तेदारी असते. राष्ट्रीय पातळीवर जरी प्रचारावर नियंत्रणे बसविता येत असली, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचाराचे नियंत्रण करणारी संस्था अद्याप अस्तित्वात नाही.

संदर्भ :  1. Blackstone, P. W. Strategy of Subversion, Chicago, 1964.

2. Brown J. A. C. Techniques of Persuasion : From Propaganda to Brainwashing, London, 1963.

3. Doob, L. W. Public Opinion and Propaganda, London, 1948.

4. Kelman, H. C. Ed. International Behaviour : A Social Psychological Analysis, New York, 1965.

5. Sargent, S. S.; Williamson, R. C. Social Pychology : An Introduction to the study of Human Relations, New York, 1958.

6. Turner, R. H.; Killian, L. M. Collective Behaviour, Englewood Cliffs, 1957.

लेखक: ए. रा. धोंगडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate