অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय विवाहसंस्था

भारतीय विवाहसंस्था

विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप या दोन निकषांवर जगातील वैवाहिक संस्थांचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास, एका टोकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा संपूर्ण अभाव आणि वैवाहिक संबंधांचे अतूट स्वरुप या निकषांवर आधारलेली परंपरागत हिंदू विवाहसंस्था; तर दुसऱ्या टोकाला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप पूर्ण ऐच्छिक असावे असा आग्रह धरणारी पाश्चात्य समाजात सध्या रूढ असलेली आधुनिक विवाहसंस्था, असा फरक करावा लागेल. या दोन टोकांच्या विवाहसंस्थांच्या दरम्यान जगातील अन्य समाजांतील विवाहसंस्थांचे स्थान निर्धारित करता येऊ शकेल. विवाहसंस्थेचे सम्यक आकलन होण्याच्या दृष्टीने या दोन प्रमुख विवाहसंस्थांच्या स्वरूपाचे विवेचन करणे आवश्यक आहे. प्रथम परंपरागत हिंदू विवाहसंस्थेचे व त्यानंतर आधुनिक विवाहसंस्थेचे विवेचन केले आहे.

हिंदू विवाहसंस्थेची उत्क्रांती प्राचीन वैदिक काळापासून झाली. या उत्क्रांतीची विभागणी स्थूल मानाने प्राचीन वैदिक, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन कालखंडांत करता येते. हिंदू विवाहसंस्थेची जडणघडण वैदिक काळापासून सुरू  झाली. मध्ययुगीन काळात तिला तिचे पूर्ण स्वरूप प्राप्त झाले व ते अठराव्या शतकापर्यंत-म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपर्यंत-टिकून राहीले आणि ब्रिटिश राजवटीत आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे तिच्या मूळ स्वरूपाशी विसंगत असलेले काही बदल तिच्यात घडून आले.

हिंदू विवाहसंस्थेचे पारंपरिक स्वरूप व विवाहप्रकार

हिंदू विवाहसंस्था ही प्राचीन इहवादी व पारलौकिक दृष्टिकोणांच्या समन्वयातून साकारलेल्या जीवनविषयक मूल्यांच्या तात्विक बैठकीवर आधारलेली आहे. त्यात पुरुषार्थ, आश्रम, ऋणत्रय या मूल्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट हे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती म्हणजे मोक्ष मिळविणे हे जरी असले, तरी हे उद्दिष्ट भौतिक सुखाकडे पाठ फिरवून मिळवावयाचे नसून धर्माच्या आधाराने या भौतिक सुखाचा उपभोग घेऊन व आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडून मिळवावयाचे आहे. पारंपरिक हिंदू समाजातील आश्रमव्यवस्थेनुसार संपूर्ण मानवी जीवनाचा कालावधी हा ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास अशा चार आश्रमांत विभागलेला आहे. विवाहसंस्कारानंतरच व्यक्तीस गृहस्थाश्रमात प्रवेश मिळतो. या आश्रमस्थितीत चार पुरुषार्थांपैकी अर्थ व काम या पुरुषार्थांचे धर्मानुसार पालन करावयाचे असते. अर्थ म्हणजे भौतिक संपत्ती व काम म्हणजे लैंगिक तसेच अन्य वासनांची पूर्ती ह्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या दोन उद्दिष्टांची पूर्ती विवाहसंस्काराने व गृहस्थधर्माच्या पालनाने होते. गृहस्थाश्रमात व्यक्तीस मातापित्याची सेवा करावयाची व पितरांचे श्राद्ध करावयाचे असते. मुलास जन्म दिल्याने पितृऋण फेडले जाते व मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. इतर तीनही आश्रमस्थितीतील लोक अन्न, वस्त्र या दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. या दृष्टीने गृहस्थाश्रम हा सर्व समाजाचा मुख्य आधारस्तंभ होय. गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पती व पत्नी या दोघांनी मिळून पाळावयाची असतात. स्त्रीच्या दृष्टीनेही विवाह हा महत्त्वाचा संस्कार मानला आहे. विवाहप्रसंगी धर्म, अर्थ व काम यांच्या बाबतींत पत्नीचे अतिक्रमण करणार नाही, अशी वराने प्रतिज्ञा घ्यावयाची असते; यावरून स्त्रियांचा पुरुषार्थप्राप्तीचा हक्क स्पष्ट होते. विवाह हा दोघांच्याही पुरुषार्थप्राप्तीसाठी असतो. पतीच्या धर्मकार्यात पत्नीचा सहभाग आवश्यक असतो. विवाहसंस्कार होण्यापूर्वी स्त्रीचा वा पुरुषाचा मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अपूर्ण राहिलेल्या विवाहसंस्कारांची पूर्तता काही धार्मिक विधी पार पाडून करण्यात येते. या सर्व विवेचनावरून हिंदू समाजातील विवाहविधीची अनिवार्यता स्पष्ट होते.

पारंपरिक भारतीय समाजव्यवस्थेत एकविवाह (एकपत्नीकत्व) पद्धतीस वैदिक काळापासूनच एक आदर्श विवाहप्रकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. ऋग्वेदकाली पतीपत्नीचे नाते ज्या प्रकारचे होते आणि कुटुंबसंस्थेतील आपसांतील संबंध ज्या प्रकारचे मानत असत, त्याचप्रकारचे पतीपत्नीचे नाते व कौटुंबिक संबंध वर्तमान काळापर्यंत भारतीय समाजात आदर्श मानले आहेत. ऋग्वेदात विवाहबंधन पवित्र मानले असून, पतिपत्नींमधील परस्परांची वैवाहिक निष्ठा महत्त्वाची मानली आहे. रामायणातील राम-सीतेचे पतिपत्नीचे नाते नैतिकतेचा आदर्श मानले आहे. ऋग्वेदकालात एकपत्नीत्वाचा चाल प्रशस्त मानीत असत. ‘गृह्यसूत्रा’तील सप्तपदीच्या मंत्रात पत्नी सखी होते, असे म्हटले आहे. यावरून वैदिक लोकांचा वैवाहिक आदर्श म्हणजे पतिपत्नीचे मित्रत्वाचे समानपणाचे नाते होते, असे म्हणता येते. विवाहित स्त्रीवर पतीचे एक प्रकारचे स्वामीत्व असले तरी ती घराची स्वामिनी आहे, ही कल्पना वैदिक काळापासून आजपर्यंत मान्य आहे. पत्नी हेच गृह होय, अशी भावना ऋग्वेद संहितेत व्यक्त केली आहे. ऋग्वेदकालीन गृहसंस्थेत सर्व स्त्रीपुरुषांमध्ये वरिष्ठ स्थान स्त्रीला प्राप्त होऊ शकत असे. विवाह झाल्यावर ती घरात आली असता तिच्या नेत्रक्षेपाने घराला ऊर्जितावस्था येऊ शकते, अशी समजूत त्या काळी होती. यज्ञामध्ये पतीच्या बरोबरीने तिचे महत्व असे. पती व पत्नी हे समानपणे धनाचे स्वामी आहेत, असे आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे. ऋग्वेदकालीन कुटुंबसंस्था पितृप्रधान असली, तरी पिता व माता यांना कुटुंबसंस्थेत सारखीच प्रतिष्ठा होती. ‘सूर्यासूक्त’ हे आर्यांच्या विवाहसंस्कारात पठन करावयाचे असते. सूर्या व चंद्रमा यांचा विवाह ‘सूर्यासूक्ता’त वर्णिला आहे. पुत्र नसेल तर मुलीचा अधिकार पुत्रवत मानला जात होता. पत्नी या दृष्टीने स्त्रीची प्रतिष्ठा गृहसंस्थेत मुख्य मानत असत.

ऋग्वेदकालीन एकविवाह आदर्श मानला असला, तरी बहुपत्नीकत्वाची चाल समाजात मान्य होती. परंतु अशा प्रकारचा प्रघात राजघराण्यांतील व्यक्ती, श्रीमंत लोक व कारागीर जमाती यांच्यातच विशेषत्वाने असावा. हिंदू धर्माने पुरुषास पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह करण्यास मान्यता दिली होती. पहिल्या पत्नीस पुत्र न झाल्यास आठ वर्षे वाट पाहून त्यानंतर पुरुषाने दुसरा विवाह करावा, असे मनूने व कौटिल्यानेही सांगितले आहे. तसेच पहिली पत्नी दीर्घकाळ आजारी असेल; परंतु तिचे पतीशी वर्तन चांगले असेल तर तिच्या संमतीने पतीने दुसरा विवाह करावा, असे मनूने सांगितले आहे. अनेकभार्यत्व ऋग्वेदकालापासून ते अर्वाचीन काळापर्यंत भारतीय समाजात रूढ असल्याचे दिसते. स्त्रीपुरुषांचे विवाह सामान्यतः वयात आल्यानंतर होत व कन्यादानापेक्षा उभयपक्षी स्वयंवराची पद्धत ऋग्वेदकाली अधिक रूढ असावी. ज्येष्ठताक्रमानुसार कन्येचे व पुत्राचे विवाह होत असत. वरपक्षाकडून वा वधूपक्षाकडून परिस्थिती असेल, त्याप्रमाणे हुंडा घेण्याची चाल त्या काळी होती.

पति-पत्नीचे वैयक्तिक नाते ज्यावेळी निर्माण झाले नव्हते, त्यावेळची स्थिती ‘गोधर्म’ म्हणून महाभारतात वर्णिली आहे. यास ‘यूथविवाह’ असे म्हणता येईल. जनावरांच्या कळपात जसे स्त्रीपुरुष भेदाशिवाय इतर नाते लैंगिक संबंधाच्या बाबत नसते, त्या प्रकारची मानवाची विवाहसंस्था उत्तरकुरू देशात असल्याचा उल्लेख आढळतो. शिवाय ‘अरणिधर्म’(पतीच्या संमतीने पत्नीने परपुरुषाकडे त्यास संतती होईपर्यंत राहणे व संतती झाल्यावर पतिगृही परतणे, ही चाल) प्रचलित होता. ही चाल श्वेतकेतूने बेद पाडली, असे महाभारतात म्हटले आहे. द्रौपदीने पाच पती करणे, हे बहुपतिकत्वाचे उदाहरणही महाभारतात आढळते. अगम्य आप्तसंबंधी विवाहाची उदाहरणेही प्राचीन काळात आढळतात. रूद्राने आपल्या भगिनीशी आणि प्रजापतीने वा मनूने आपल्या मुलीशी लग्न केल्याची कथा वेदात सापडते. पुराणांमध्ये अशा सपिंडसंबंधाच्या दर्शक काही कथा आहेत. मात्र ऋग्वेदात सहोदरांच्या विवाहसंबंधाचा निषेध यम-यमी संवादातून सूचित केला आहे. ऋग्वेदकाली सपिंडविवाहाला मर्यादा घालण्यात आली. साधारणपणे तिसऱ्या पिढीला कुटुंबे विभक्त होतात; म्हणून पहिल्या दोन पिढ्या म्हणजे सख्खी, सावत्र व चुलत नाती वगळून मुलामुलींची लग्ने त्यावेळी मान्य होऊ लागली. चुलत नात्यातील केवळ सख्ख्या भावाची संतती विवाहास निषिद्ध धरत. आतेबहिण व मामेबहिण अथवा आतेभाऊ व मामेभाऊ यांची आपसांत लग्ने ऋग्वेदकाली मान्य होती. ऋग्वेदी-देशस्थ, कऱ्हाडे आणि दक्षिण भारतातील कर्नाटक इ. प्रांतांतील ब्राह्मण ह्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा अजून विद्यमान आहे. आते-मामे भावंडांच्या विवाहांमुळे आप्तसंबंधाचे नातेवाईक जास्त जवळ येतात व त्यांचे परस्परसंबंध टिकून राहतात, अशा विवाहांमुळे सामाजिक ऐक्यभाव वाढीस लागतो व आप्तसंबंधांतील लोकांच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन होते, असे निष्कर्ष व मते फ्रेंच मानवशास्त्रज्ञ ⇨क्लोद लेव्ही-स्त्राऊस (१९०८ -     ) याने व्यक्त केली आहेत. आते-मामे भावंडांमधील विवाह तसेच मामा-भाची विवाह हे सपिंड बहिर्विवाहाच्या नियमास अपवाद आहेत; परंतु ते रूढीमान्य असल्यामुळे वैध ठरले आहेत. डॉ. के. ल. दप्तरी यांनी असे अनुमान काढले आहे, की प्रथम सपिंड शब्दाचा अर्थ एका स्वयंपाकावर जेवणारे असा असावा. पिंड म्हणजे अन्नाचा गोळा. जोपर्यंत कुटुंबे विभक्त होत नाहीत तोपर्यंत सर्वांचा स्वयंपाक एकत्र होत असतो. साधारणपणे सख्खे वा सावत्र बंधू एकत्र राहतात. चुलतबंधू वयात आल्यावर कुटुंबात वाटणी होते. एका घरात राहणाऱ्यांचा कोवळ्या वयात लैंगिक संबंध होऊ नये, म्हणून प्रथम सपिंड विवाहाचा निषेध झाला असावा. दुसरे कारण असे दिसते, की लैंगिक संबंधाच्या मर्यादा जेव्हा नव्हता, तेव्हा म्हातारी माणसे तरुण कोवळ्या पोरीवरचा आपला संभोगाचा अधिकार सोडत नसावी, त्यामुळे वयात आलेल्या तरुणांमध्ये आणि वयस्क मंडळीत आपसांत वैर उद्‌भवत असेल, ते टाळण्याकरिता अशा संबंधांवर मर्यादा घालण्यात आली. या सापिंड्याचा अर्थ सूत्रकालात व स्मृतिकालात पारिभाषिक बनला. पित्याकडून सात पिढ्या व मातेकडून पाच पिढ्या असा सपिंडतेचा अर्थ गौतमादी सूत्रकारांनी व स्मृतिकारांनी केला आहे. पिंड म्हणजे शरीर, असा अर्थ स्मृतिकार करतात. सपिंड म्हणजे एकाच रक्तामांसाची म्हणजे रक्तसंबंधी व्यक्ती. मातापित्याच्या अवयवांची वा धातूंची अनुवृत्ती दहा पिढ्यांपर्यंत राहते, असे सपिंड विवाहाच्या निषेधाचे कारण स्मृतिकार सांगतात. सपिंड या शब्दाचा आणखी एक रूढ अर्थ म्हणजे श्राद्धाच्या प्रसंगी पूर्वजांना पिंडदान करण्याचा अधिकार ज्याला आहे अशी व्यक्ती. व्यक्तीचे इतरांशी असलेले रक्तसंबंध अत्यंत घनिष्ठ, थोडे दूरचे वा खूप दूरस्थ असू शकतात. तात्विक दृष्ट्या खूप दूरच्या व्यक्तींच्या मधे नातेसंबंध दाखवणे शक्य असले, तरी प्रत्यक्षात ते क्रियाशील नसतात. या दृष्टीने सपिंड कोणाला म्हणावयाचे, ह्याची मर्यादा स्मृतिकारांनी लोकव्यवहाराच्या आधारे घालून दिली आहे. वैवाहिक संबंध जोडायला वधूवरांचा वर्ण एक; पण गोत्र व प्रवर भिन्न असले पाहिजेत, असे मन्वादि स्मृतिकार व सूत्रकार यांनी सांगितले आहे. ‘गोत्र’ म्हणजे पारंपरिक अर्थाने प्राचीन ऋषिकुल आणि ‘प्रवर’ म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषीचे नाव होय. ‘गोत्र’ ह्याचा अर्थ छांदोग्योपनिषदात कुटुंब असा सांगितला आहे. एका गोत्रातील स्त्रीपुरुषांचे बंधुभगिनीचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात (इ. स. पू. ६ वे - ५वे शतक) ही रूढी असल्याचे स्पष्टच दिसते. याच्याही पूर्वी ऋग्वेदकाली ही प्रथा असावी. विवाहप्रसंगी वधूवरांच्या गोत्रांबरोबर प्रवरांचाही उच्चार करण्याची प्रथा आहे. गोत्र आणि प्रवर समान असलेल्या कुळांत विवाह होत नाही, असे ‘बौधायन प्रवराध्याया’त म्हटले आहे. काळाच्या ओघात गोत्रसंस्था शुद्ध राहिली नाही. गोत्र म्हणजे वंश ही मूळची वस्तुस्थिती आता उरलेली नसल्यामुळे, हिंदू कायद्यात सगोत्र  विवाह वैध मानला आहे.

विवाहाचे आठ प्रकार

विवाहाचे आठ प्रकार मनु इ. स्मृतींमध्ये वर्णिले आहेत. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गाधर्व, राक्षस व पैशाच असे आठ प्रकार मनूने सांगितले आहेत. ही प्रकारांची संख्या व नावे यांबाबत सर्व स्मृतिकारांमध्ये एकवाक्यता नाही. हे आठही प्रकार वैदिक किंवा वेदपूर्वकाळापासून भारतीय समाजातील भिन्न भिन्न गटांत रूढ असावेत.विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या दृष्टीने विवाहाचे आठ प्रकार महत्त्वाचे आहेत. प्राजापत्यात धर्म, अर्थ व काम या बाबतींत पतिपत्नीच्या समान हक्काची कल्पना आहे. निष्ठा न सोडता एकमेकांस समान अधिकाराने धर्माचरण करण्याचा करार प्राजापत्य विवाहात सांगितला आहे. एकपत्नीकत्वाची कल्पना प्राजापत्य विवाहातून विकसित झाली असण्याचा संभव आहे. कन्यादान हे ब्राह्म विवाहाचे विशेष सवरूप होय. गांधर्व विवाह म्हणजेच प्रेमविवाह. आर्ष विवाह हा कन्याविक्रयाचा प्रकार असल्याने महाभारतात त्याचा निषेध केला आहे. आसुर विवाहही कन्याविक्रयरूपच आहे. दैव विवाह म्हणजे यज्ञात ऋत्विजाला दक्षिणा म्हणून कन्येचे दान. आर्ष म्हणजे वरापासून गोमिथून (गायबैलाची जोडी) घेऊन कन्यादान. आसुर विवाहात वराकडून कन्येची ज्ञाती द्रव्य घेते. हा विवाह म्हणजे कन्याविक्रयच होय. राक्षस विवाहात कन्या तिच्या जन्मदात्या कुळातून जबरदस्तीने हरण करून न्यावयाची असते. पैशाच विवाहात झोपलेल्या, दारू प्यालेल्या किंवा बेभान असलेल्या मुलीशी जबरदस्तीने गुप्त संभोग हे निमित्त लागते. प्राजापत्य व गांधर्व हे दोन प्रकार वगळता, बाकीचे सर्व प्रकार पितृप्रधान समाजसंस्थेचे द्योतक आहेत. मनूने आठ विवाहप्रकारांपैकी पहिले सहा (शेवटचे दोन वगळून) ब्राम्हणांकरिता सांगितले आहेत. शेवटचे चार प्रकार क्षत्रियांकरिता व राक्षस वगळून शेवटचे तीन प्रकार वैश्य-शूद्रांकरिता सांगितले आहेत. पण मनूने सांगितलेला हा वर्णविभागानुसारी तारतम्यविचार सर्व स्मृतींस मान्य नाही. त्याबाबत मतभेद आहेत. प्राजापत्य, ब्राह्म व गांधर्व हे तीन प्रकार विद्यमान हिंदू समाजात साधारणपणे प्रशस्त समजले जातात.

उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था जसजशी बंदिस्त होऊ लागली, तसतशी आंतरवर्णीय विवाहावर बंधने घातली जाऊ लागली. परंतु ती पूर्णपणे अंमलात यावयास काही कालावधी जावा लागला. या मधल्या कालावधीत समाजातील उच्च वर्णातील पुरुषाने आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याची प्रथा होती, त्यास ‘अनुलोम विवाह’ असे म्हणतात. स्मृतींमध्ये अशा विवाहास संमती दिली आहे. मात्र असे विवाह गौण समजले जात. या काळात स्वतःच्या वर्णातच विवाह करावा, अशी विचारसरणी समाजात प्रभावी होऊ लागली होती. परंतु अनुलोम पद्धतीचे आंतरवर्णीय विवाह करणे पूर्णतया थांबले नव्हते. ब्राह्मण पुरुष क्षत्रिय वा वैश्य स्त्रीशी विवाह करू शकत असे, तसेच क्षत्रिय पुरुष वैश्य स्त्रीशी विवाह करू शकत असे. तथापि पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनी शूद्र स्त्रीशी विवाह करणे हे त्याज्य मानले होते. अनुलोम विवाहपद्धतीतून या काळात बहुपत्नीकत्वाची प्रथाही वाढीस लागली.

उच्च वर्णाच्या स्त्रीने हीन वर्णाच्या पुरुषाशी विवाह केल्यास त्यास ‘प्रतिलोम विवाह’ असे म्हणतात. मात्र अशा विवाहास समाजाची मान्यता नव्हती. उलट त्यास प्रतिबंध असून त्याकरिता दंडही ठेवला होता. प्रतिलोम विवाहाचे एक उदाहरण ऋग्वेदात आढळते. स्वनय भावयव्य या क्षत्रियाने आंगिरसी नामक ब्राह्मण कन्यशी विवाह केला होता. तसेच देवयानी या ब्राह्मण कन्येचा ययाती ह्या क्षत्रीय राजाशी झालेला विवाह हे प्रतिलोम विवाहाचे आणखी एक उदाहरण होय.

मध्ययुगीन कालखंडात बहुपत्नीविवाह हा प्रामुख्याने राजघराण्यातील व्यक्ती तसेच सरदार, जमीनदार इ. सधन वर्ग यांच्यात होत असे. समाजातील अन्य स्तरांमध्ये एकविवाह हा सर्रास प्रचलित असला, तरी बहुपत्नीविवाहास निर्बंध नव्हता. बहुपत्नीकत्वास बंदी स्वातंत्र्योत्तर काळातच द्विभार्याप्रतिबंधक कायदा करून घालण्यात आली. मध्ययुगीन कालखंडात वर्णावर आधारलेली अनुलोम विवाहपद्धती जरी संपुष्टात आली होती, तरी स्वतःच्या जातीतील असमान दर्जा असलेल्या पोटजातीत अनुलोम पद्धतीचा विवाह रूढ होता.

एका स्त्रीने एकाच वेळी अनेक पुरुषांशी विवाह करणे-म्हणजेच बहुपतिकत्व पद्धती-प्राचीन भारतीयांना माहीत होती. परंतु एकपत्नीकत्व व बहुपत्नीकत्व यांच्या तुलनेत ही पद्धत अस्वाभाविक मानण्यात येत असे. बहुपतिकत्व पद्धतीचे सुपरिचित उदाहरण म्हणजे द्रौपदीचा पाच पांडवांशी झालेला विवाह होय. त्या आधी जटिलेचा विवाह सात ऋषींशी आणि वार्क्षीचा विवाह प्रचेतस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहा भावांशी झाल्याची उदाहरणे युधिष्ठिराने पांडवांच्या द्रौपदीशी झालेल्या विवाहाच्या समर्थनार्थ दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पांडव ज्या जमातीतून आले, त्या जमातीत बहुपतिकत्वाची प्रथा असल्याचा उल्लेखही महाभारतात आहे. ही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास धर्मशास्त्रकारांचा कल या विवाहपद्धतीस मान्यता न देण्याकडेच होता.

बहुपतिकत्वाच्या प्रथेशी निगडित असलेल्या दीर-भावजय विवाहपद्धतीचे निर्देश ऋग्वेद, रामायण, महाभारत इ. ग्रंथात आढळतात. रामायणात वालीच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी तारा हिच्याशी वालीचा भाऊ सुग्रीव याने विवाह केल्याचे उदारहण आहे. पुढे दीर-भावजय विवाहाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जसजसा असहिष्णू होत गेला, तसतसे दीर-भावजयीत काही विशिष्ट परिस्थितीतीच लैंगिक संबंध असावेत, असे सामाजिक बंधन निर्माण झाले. ही परिस्थिती म्हणजे पुत्रप्राप्तीशिवाय पतीचा मृत्यू होणे ही होय. अशा विधवेला वा पती जिवंत असताही तो असाध्य रोग, क्लीबत्व, निर्बीजत्व इ. कारणांमुळे असमर्थ असल्यास त्याच्या निपुत्रिक पत्नीला केवळ पुत्रोत्पत्तीसाठी वडीलधाऱ्यांच्या अनुमतीने आपल्याला संतती प्राप्त होईपर्यंतच दिराशी अथवा अन्य योग्य परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवण्याची मुभा प्राचीन धर्मशास्त्रात होती. ही प्रथा नियोग या नावाने ओळखली जाते. महाभारतात अंबिका आणि अंबालिका यांना नियोगातून अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पंडू हे पुत्र झाल्याचा उल्लेख आहे.

मध्ययुगीन कालखंडात जातिसंस्थेचा उदय झाल्यानंतर काही आदिवासी जमाती व केरळमधील नायर ही जात सोडल्यास बहुपतिकत्वाची प्रथा भारतीय समाजात फारशी आढळत नाही. भारतात आधुनिक कालखंडाची सुरुवात होईपर्यंत नायर जातीत अशा पद्धतीचे-म्हणजे अभ्रातृक बहुपतिकत्व पद्धतीचे-विवाह होत असत. नायर जातीत मातृसत्ताक पद्धती व बहुपतिकत्व रूढ असल्याने पुरुषाचे स्थान स्त्रीपेक्षा दुय्यम असे. या जमातीतील स्त्रीला ऋतुप्राप्ती होण्यापूर्वीच जमातीतील एखाद्या सदस्याच्या कडून तिच्या गळ्यात ताळी (वा ताईत) बांधण्याचा विधी ‘ताळी- केडू-कल्याणम्’ केला जात असे. स्त्रीला ताळी बांधणारा तिचा पती मानला जात असला, तरी हा वैवाहिक संबंध तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नसे. पुढे ती स्त्री ‘संबंधम्’ हा वस्त्रदानाचा विधी करून स्वतःच्या जातीतींल पुरुषाशी अथवा क्षत्रियाशी वा नंपुतिरी(नंबुद्री) ब्राह्मणाशी पतीसारखे लैंगिक संबंध ठेवत असे. उत्तर प्रदेशातील खस या आदिवासी जमातीतही बहुपतिकत्वाची प्रथा रूढ असल्याचे उल्लेख आढळतात. दक्षिण भारतातील इरवा, कोडगू, तोडा, तसेच कोटा [ कोटा-१] या आदिवासी जमातींतही बहुपतिकत्व रूढ होते.

हिंदू विवाहपद्धतीमध्ये जोडीदाराच्या निवडीसंबंधी अनेक प्रकारचे नियम व निर्बंध रूढ आहेत. यांत प्रामुख्याने अंतर्विवाह व बहिर्विवाह यांसंबंधीच्या निर्बंधांचा समावेश होतो. हिंदू समाजात जातिव्यवस्था रुजल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने केवळ आपल्या जातीतच विवाह करावा, असे बंधन निर्माण झाले. आंतरजातीय विवाहास हिंदू धर्माची मान्यता नाही. एवढेच नव्हे तर, ज्या जातीत पोटजाती आहेत, त्यातील व्यक्तींनी आपापल्या पोटजातीतच विवाह करण्याचे बंधन पाळणे आवश्यक मानले आहे.

व्यक्तीने कोणत्या सामाजिक गटातून आपला जोडीदार निवडावा हे जसे महत्त्वाचे मानले आहे, तसेच या अंतर्विवाही गटात अंतर्भूत असलेल्या कोणत्या रक्तसंबंधी गटातील व्यक्तींशी वैवाहिक संबंध जोडू नयेत, याचेही निर्बंध पाळणे बंधनकारक आहे. यासंबंधीच्या वर्जनाच्या नियमांना ‘बहिर्विवाहाचे नियम’ असे संबोधतात. अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या वैश्विक नियमाखेरीज सपिंड आणि सगोत्र म्हणून गणल्या गेलेल्या व्यक्तींबरोबर विवाहसंबंध वर्ज्य मानले आहेत. बहिर्विवाहाच्या गोत्र आणि प्रवर नियमाप्रमाणे एकाच गोत्रातील तसेच समान प्रवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाह होऊ शकत नाही. गोत्र–प्रवर हे ब्राह्मणांमध्येच असतात. क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये कुलोपाध्यायाचे गोत्र घेण्याची प्रथा आहे.

शूद्रांमध्ये गोत्रांऐवजी देवक असते व देवकाची पूजा केली जाते. काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, प्राणी यांना देवक मानण्यात येते. एकच देवक असणाऱ्या कुटुंबामध्ये विवाह होत नाहीत. मुळात विस्तृत कुटुंब असा अर्थ असणाऱ्या गोत्र या संज्ञेचा विस्तार इतका वाढला, की केवळ आपले गोत्र-ऋषी एक आहेत असे मानणारे सर्वजण आपण एकाच पितृवंशातील आहोत, असे मानू लागले व आपापसांत विवाह करणे धर्मबाह्य मानू लागले. त्यामुळे कौटुंबिक भावनेतून निर्माण झालेल्या गोत्र-बहिर्विवाहाच्या नियमाला विकृत स्वरूप प्राप्त झाले. आधुनिक काळात ही विकृती १९५५ च्या हिंदू विवाहाच्या कायद्याने नष्ट झाली आहे.

परंपरागत हिंदू विवाहपद्धतीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला फारसे स्थान नाही. विवाह करण्याचा उद्देश व्यक्तीवर असलेल्या देवांच्या, पितरांच्या, ऋषींच्या अथवा समाजाच्या ऋणाची फेड करणे हा मानला आहे. व्यक्तिगत सुख मिळविणे हा नाही. विवाह करण्याच्या परंपरागत उद्दिष्टांमध्ये प्राधान्याने धर्माला प्रथम स्थान आहे; प्रजा हे दुसरे उद्दिष्ट मानले आहे; तर तिसरे आणि सर्वांत गौण मानलेले उद्दिष्ट म्हणजे रती होय.

पारंपरिक भारतीय विवाहसंस्थेत वैदिक संस्कारांनी साजरा झालेला विवाह हा अतूट बंधनकारक मानला आहे. या विवाहपद्धतीत घटस्फोटाला मान्यता नव्हती. पतीशी कोठल्याही परिस्थितीत एकनिष्ठ राहिलेल्या सीता, सावित्री, तारा, मंदोदरी अशा पौराणिक स्त्रियांचा पतिव्रता म्हणून समाजापुढे आदर्श ठेवला गेला. या आत्यंतिक पतिनिष्ठेची परिसीमा मध्ययुगीन कालखंडात ⇨सतीची प्रथा निर्माण होण्यात झाली. स्त्री ही या जगात स्वतःकरिता अस्तित्वात नाही, ती पुरुषाकरिता अस्तित्वात आहे, तिचे व्यक्तित्व पुरुषात समर्पित आहे, या तत्त्वाचा विकृत अतिरेक म्हणजे सतीची चाल होय. या चालीचे सर्वात प्राचीन उदाहरण इ. स. पू. सु. ३१६ मधील असून, ते डिओडोरस सिक्युलस या ग्रीक इतिहासकाराच्या ग्रंथातील आहे. ग्रीकांविरुद्ध लढताना एक हिंदू सेनापती रणांगणावर मरण पावला. त्याचा पत्नी सती गेल्याचा त्यात उल्लेख आहे. महाभारतातील पंडुपत्नी माद्री सती गेल्याचा उल्लेख या चालीचे प्राचीनत्व दर्शवितो. विष्णुधर्मसूत्रात या प्रथेचा वैकल्पिक म्हणून निर्देंश आहे. ही प्रथा प्रामुख्याने राजस्थान येथे राजपूतांमध्ये, तसेच बंगाल, पंजाब येथे जास्त प्रमाणात रूढ होती. १८२९ साली कायद्याने सतीची चाल बंद झाली. मात्र त्यानंतरही सती जाण्याचे तुरळक प्रकार या प्रदेशांत घडल्याचे आढळून येतात.

मनू, याज्ञवल्क्य प्रभ्रृतींनी सतीप्रथेची दखलही घेतलेली नाही. याउलट विधवेने पतिनिधनानंतर आपले पावित्र्य टिकवून जीवन जगावे, असा आदेश दिला आहे. उच्चवर्णियांमधील विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. ज्या कनिष्ठ जातींना वैदिक संस्कारांनी विवाह करण्याची मुभा नव्हती, अशा जातींत परंपरेने घटस्फोट घेण्याला, तसेच स्त्रीच्या पुनर्विवाहालाही मान्यता होती.

वेदकाळाच्या प्रारंभी स्त्रीला वेदाध्ययनाचा अधिकार होता व त्यासाठी तिला गुरूकुलातही प्रवेश होता. यावरून स्त्रीच्या विवाहसमयीच्या वयाबाबत समाजाचा दृष्टिकोन उदार होता, असे दिसते. स्त्रीने तरूण वा प्रौढ वयात विवाह करणे समाजमान्य होते. स्त्रीपुरुषांचे विवाह वयात आल्यानंतर होण्याची प्रथा रूढ असावी, असे सूचित करणारे विवाहसूक्त ऋग्वेदात आहे. वेदांमध्ये बालविवाहाचा उल्लेख आढळत नाही. तथापि धर्मसूत्रांच्या कालखंडामध्ये ही परिस्थिती बदलली आणि स्त्रीचा विवाह ती ऋतुस्नात होण्यापूर्वी व्हावयास पाहिजे, असा दंडक समाजात निर्माण झाला. पराशराने वयाच्या आधारावर मुलींचे वर्गीकरण केले. त्यानुसार आठ वर्षाच्या मुलीला ‘गौरी’, नऊ वर्षांच्या मुलीला ‘रोहिणी’, दहा वर्षाच्या मुलीला ‘कन्या’ व दहाच्या पुढील वयाच्या मुलीला ‘रजस्वला’ या नावांनी ओळखण्यात येऊ लागले. आठवे वर्ष हे मुलीचे वय विवाहास उत्तम मानण्यात आले. आपली मुलगी रजस्वला होण्याच्या आत तिच्या वडिलांनी व वडीलभावाने तिचा विवाह ठरवावा; अन्यथा त्यांना नरक प्राप्त होईल, असे पराशराने म्हटले आहे. स्त्री ही स्वातंत्र्य उपभोगण्यास पात्र नाही, असे मनुवचन आहे. तीस वर्षांच्या पुरुषाने बारा वर्षाच्या मुलीशी विवाह करावा व चोवीस वर्षाच्या पुरुषाने आठ वर्षाच्या मुलीशी विवाह करावा, असे मनुसंहितेमध्ये लिहिले आहे. ऋतुस्नात होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला पाहिजे, असा दंडक मध्ययुगीन काळात रूढ झाला व तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या एकदोन दशकापर्यंत अस्तित्वात होता. ब्रिटिश अमदानीमध्ये या परिस्थितीत बदल घडून येण्यास सुरुवात झाली.

संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.

2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.

3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.

4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.

5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.

6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.

7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.

8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

9. Harlan, Lindsey; Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.

10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.

11. Mace, D. R.; Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.

12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.

14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.

15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.

१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.

१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.

लेखक: त्रि. ना. वाळुंजकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate