सर्वसामान्यपणे विवाहबंधन न पाळता स्त्री-पुरुष ज्या मुलांना जन्म देतात, अशा मुलांना अवैध वा अनौरस संतती आणि अशा स्त्रीच्या मातृत्वाला विवाहबाह्य मातृत्व असे संबोधतात. कोणत्याही समाजातील स्त्री-पुरुष संबंध, कुटुंबव्यवस्था, वारसाहक्कसंबंधीच्या काही रूढी, समजुती व सामाजिक नियम यांनुसार त्या त्या समाजातील विवाहबाह्य मातृत्वाचे स्वरूप निर्धारित होते.
विशिष्ट स्त्री व पुरुष यांच्यातील एकाधिकारयुक्त शरीरसंबंधांना सामाजिक व नैतिक अधिष्ठान तसेच वैधता देण्याच्या गरजेतून विवाहसंस्थेचा उदय झाला. विवाह हा कायदा, नैतिकता व सामाजिक मूल्यव्यवस्था यांवर आधारलेला एक विधी वा करार आहे. प्रजनन व वंशवृद्धी ही त्यामागील सुप्त उद्दिष्टे होत. शरीरसंबंधातून निर्माण झालेल्या संततीची योग्य देखभाल व्हावी, ही प्रवृत्ती विशेषेकरून मानवप्राण्यामध्ये प्रकर्षाने जाणवते. या प्रवृत्तीतूनच स्त्रीच्या शुद्ध मातृत्वाला महत्व प्राप्त झाले. वंशवृद्धी व वंशश्रेष्ठत्वाची भावना या लैंगिक निर्बंधामागे दडलेली आहे. स्त्रीला गरोदरपणात, बाळंतपणात व इतर आपत्तींना तोंड देण्याकरिता पुरुषाचे संरक्षण गरजेचे वाटले व त्यामुळे मातृत्वाला विवाहबंधनाची प्रतिष्ठा प्राप्त होणे अनिवार्य ठरले.
काही आदिवासी जमातींमध्ये विवाहपूर्व मातृत्व प्राप्त झाल्यास त्या स्त्रीला व तिच्या संततीला जमातीतून बहिष्कृत केले जात नसे. अशा कुमारी मातांच्या विवाहाबाबतही फारशा अडचणी येत नसत. याउलट काही आदिवासी जमातींत विवाहबाह्य मातृत्व हे पराकाष्ठेचे लज्जास्पद मानले जाई आणि अशा अनौरस मुलांचा नायनाट करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते. परंपरागत भारतीय समाजाच्या इतिहासातही विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलांना टाकून दिल्याची उदाहरणे क्वचित आढळतात. मात्र दासीपुत्रांना किंवा अनौरस मुलांना राजकीय व आर्थिक अधिकार औरस मुलांपेक्षा कमी प्रमाणात मिळत होते. अनौरस असूनही समाजात प्रतिष्ठा मिळविणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. उदा., कृष्णद्वैपायन व्यास हे पराशर व सत्यवती यांच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मले होते. पुढे अठरा पुराणे व महाभारत रचणारे असाधारण विद्वान व प्रतिभावंत म्हणून त्यांना समाजात प्रतिष्ठा लाभली. त्यांची आई सत्यवती ही शंतनूची राणी बनून सन्मानित आयुष्य जगू शकली. स्पष्ट व अस्पष्ट स्वरूपात विवाहबाह्य संबंधांशी निगडित असलेल्या अनेक पुराणकथांतून कुमारी मातेच्या वा अनौरस संततीच्या बाबत कठोर दृष्टिकोन बाळगलेला आढळत नाही. प्राचीन काळी भारतात नियोगाची चाल होती. तीनुसार पतीचा मृत्यू वा असाध्य रोग, क्लीबत्व इ. कारणांमुळे स्त्री निपुत्रिक असल्यास तिला पतीच्या वा कुलमुख्याच्या आज्ञेनुसार व केवळ आपद्धर्म म्हणून परपुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेण्यास धर्मशास्त्राची मुभा व समाजमान्यता होती. व्यासांनी अंबिका व अंबालिका ह्या स्त्रियांच्या पोटी नियोगविधीने जी संतती उत्पन्न केली, ती धृतराष्ट्र व पांडू होय. मात्र केवळ पुत्रप्राप्तीच्या उद्देशानेच नियोगाची प्रथा पाळली जाई. इ.स. पू. तिसऱ्या शतकापासून ती हळूहळू कालबाह्य होत गेली व पाचव्या-सहाव्या शतकांत नामशेष झाली. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या निबंधात ‘अयोनिज’ या शब्दाचे दिलेले स्पष्टीकरण याला पुष्टी देणारे आहे. ‘योनि’ या शब्दाचा अर्थ ‘गृह’ असा मुळात आहे व वेदांमध्ये या अर्थाने हा शब्द योजिलेला आढळतो. ‘योनिज’ म्हणजे घरात जन्मलेले मूल व ‘अयोनिज’ म्हणजे घराबाहेर जन्मलेले, म्हणजे यज्ञमंडपात जन्मलेले मूल. यज्ञभूमीवर पुत्रप्राप्तीसाठी केलेला विवाहबाह्य समागम असा याचा अर्थ होतो. राजवाडे असे प्रतिपादन करतात, की अतिप्राचीन आर्य समाजात अनियंत्रित व सरमिसळ स्त्री-पुरुष समागम रूढ होता. ह्या विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेल्या अपत्यांची नावे बापाच्या नावावरून न ठेवता आईच्या नावावरून ठेवली जात. उदा., ममता या स्त्रीच्या मुलाला ‘मामतेय’, विनता या स्त्रीच्या मुलाला ‘वैनतेय’ अशी नावे दिली जात. वंशावतरण स्त्रियांच्या आधीन असे. कुटुंबात मातृप्राधान्य जाऊन पितृप्राधान्य स्थापित झाल्याच्या इतिहासकाळापासून व्यासांनी महाभारतरचनेचा प्रारंभ केला आहे. कुंतीने सूर्याला आवाहन केल्याची व कर्णाचा जन्म झाल्याची महाभारताच्या वनपर्वातील कथा सर्वश्रुतच आहे.
काळाच्या ओघात धार्मिक नीतिमूल्ये दृढ होत गेली व वर्णसंकर वा जातिसंकर यांवरील निर्बंध कडक झाले. विवाहाला धार्मिक संस्कार मानले गेले व स्त्रीच्या बाबतीत पावित्र्याचे व योनिशुचितेचे कठोर निर्बंध रूढ झाले. त्याबरोबरच स्त्रीला समाजात पुरुषाच्या तुलनेत दुय्यम स्थान प्राप्त झाले. तसेच स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची अनिष्ट प्रवृत्ती सर्वत्र बळावली. या नीतिमूल्यांच्या व समाजसंकेतांच्या प्रसारामुळे, विवाहबाह्य मातृत्व प्राप्त होणारी स्त्री ही हेटाळणीचा विषय झाली. त्यात संपूर्ण भागीदार असलेल्या पुरुषाचा मात्र समाजाने कधी धिक्कार केला नाही. विशेषतः राजे-महाराजे, सरदार, जमीनदार, पुरोहित इ. उच्च वर्गातील पुरुषांचे अनेक स्त्रियांशी लैंगिक संबंध असत व त्यांतून निर्माण होणाऱ्या अनौरस संततीचा सांभाळही केला जाई. सामान्यतः पुरुषांनी गणिका (गायिका-नर्तकी वा कलावंतीण), वेश्या, देवदासी अशा स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध ठेवल्यास अशा संबंधांकडे समाज कानाडोळा करीत असे. जातिव्यवस्था जशी कडेकोट बंदिस्त झाली, तसे जातीबाहेरच्या स्त्रियांशी संबंध ठेवणे निषिद्ध मानले गेले. अशा स्त्रीच्या संततीला संपत्तीचा वाटा मिळेनासा झाला व त्यांना अप्रतिष्ठित गणले जाऊ लागले. मध्ययुगात ख्रिस्ती धर्मकल्पनेनुसार स्त्रीला आपल्या विवाहबाह्य संबंधाबाबतचा कबुलीजबाब धर्मपीठापुढे द्यावा लागे व तिला कडक शिक्षा केली जाई. अशा दुर्दैवी कुमारी मातांना सामाजिक अवहेलनाही सहन करावी लागे. अवैध वा अनौरस संततीला त्यामुळे कनिष्ट दर्जा प्राप्त होई.
जर्मनीचा राजा फ्रीड्रिख याने १७७७ साली व्हॉल्तेअरला लिहिलेल्या पत्रात बालहत्यांमुळे फाशी जाणाऱ्या कुमारी मातांची संख्या चिंताजनक असल्याचा उल्लेख केला आहे. यूरोपीय देशांतील अवैध संततीविषयीची आकडेवारी काही प्रमाणात उपलब्ध आहे. १९१४ साली रशिया, फिनलंड व बाल्कन राष्ट्रे वगळता उरलेल्या यूरोप खंडात ९ लक्ष मुले विवाहबाह्य संबंधांतून जन्माला आली. १९२४ ते १९२८ च्या दरम्यान केलेल्या पाहणीनुसार जमेका व पनामा येथे दर हजारी ७०० मुले विवाहबाह्य संबंधांतून जन्माला आली, असा अंदाज आहे. भारतीय समाजातील कडक निर्बंध व कुमारी मातांना घृणास्पद मानण्याचा प्रघात असल्याने याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र अनेक समाजसुधारकांनी या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्यासंबंधी लिखाण केलेले आढळते. उदा., लोकहितवादींनी (१८२३-१८९२) या कारणास्तव बालहत्या प्रतिबंधक गृहे स्थापन करण्याचा पुरस्कार त्यांच्या निबंधांमधून केलेला आहे.
स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची अपप्रवृत्ती समाजात कशी निर्माण झाली व फैलावत गेली, ह्यांविषयीची मीमांसा गुंतागुंतीची आहे. प्रजननाच्या प्रक्रियेत पुरुषाचा सहभाग असला, तरी गर्भास पूर्णाकार देण्यास स्त्रीच कारणीभूत ठरते. त्यामुळे तिला नियंत्रणात ठेवणे, हे पितृसत्ताक कुटुंबपद्धतीला पोषक ठरले. विवाहसंस्थेचे व प्रजननप्रक्रियेचे अनिवार्य संबंध मानवशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी मान्य केले आहेत. औरस संततीवर पित्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे तत्त्व पाश्चात्य व मुस्लिम जीवनपद्धतींमध्ये अंगीकारलेले होते.
प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये या पितृत्वाधिकाराला ‘पॅट्रिआ पॉटेस्टास’ (रोमन कुटुंबातील सर्वाधिकारयुक्त पितृसत्ता) असे संबोधिले जाई. कुटुंबप्रमुख पुरुषाला स्त्रिया व मुले यांच्यावर अनिर्बंध अधिकार गाजविता येत असे. मात्र रखेल्यांपासून झालेल्या अनौरस संततीचा सांभाळ करण्यास या काळातील पुरुष बांधील नसत. रोमन सम्राट कॉन्स्टंटीन याने चौथ्या शतकात हुकूमनामा काढून अनौरस संतती निर्माण झाल्यास त्या संततीच्या वैधतेसाठी तिच्या आईबापांवर विवाह करण्याची सक्ती कायद्याने केली. मध्ययुगातील नागरी कायद्यानुसार हा नियम सर्वच अवैध संततीच्या वैधतेबद्दल लागू करण्यात आला. ⇨नेपोलियनच्या कारकीर्दीत (१७९९ – १८१५) अनौरस मुलांचे वारसाहक्क मर्यादित असत; पण वडिलांच्या मालमत्तेतून त्यांचे पालनपोषण होई. तथापि विल्यम गुड या समाजशास्त्रज्ञाच्या मते यूरोपमधील विवाहसंस्था व संतती यांविषयी असलेली मूल्ये स्पष्ट आणि सर्वमान्य नव्हती. श्रीमंत, जमीनदार-मालदार कुटुंबात वारसाहक्काबाबत नियम काटेकोर असत. मात्र स्थावर मालमत्ता नसलेल्या कुटुंबांत औरसतेविषयीचे नियम स्पष्ट नसत. तसेच निर्वासित व स्थलांतरित समुदायांतर्गत विवाहबंधनावर कडक नियंत्रण नसल्याने विवाहबाह्य संबंध व अनौरस संतती यांबाबतचा निषेध सौम्य प्रमाणात आढळतो.
विवाहसंस्था हे केंद्र मानले, तर त्याच्या परिघांतर्गत निर्माण होणारे विवाहबाह्य संबंध दोन प्रकारचे असतात : (१) विवाहपूर्व संबंध आणि (२) विवाहोत्तर संबंध.
विवाहपूर्व संबंध तरुणतरुणींच्या धोक्याच्या कोवळ्या वयातील अपरिपक्व, शारीरिक आकर्षणाचे फलित असते. यामुळे होणारी गर्भधारणा समाजमान्य नसल्याने कुमारी मातेची व तिच्या संततीची हेटाळणी होते. यातून गर्भपातासारखे उपाय केले जातात. एकोणिसाव्या शतकापर्यंत गर्भपात धार्मिक दृष्ट्या पाप मानले जात असल्यामुळे ती भ्रूणहत्या समजली जाई. विवाहपूर्व संबंधातून जन्मलेल्या अर्भकाच्या बाबतीत जन्मापूर्वीदेखील गंभीर समस्या निर्माण होतात. कुमारी मातेचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. गर्भपातासारख्या उपायांमुळे मातेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. जर गर्भपाताचे अघोरी उपाय अपयशी ठरले, तर संततीमध्ये दोष निर्माण होतात. या मुलांचे संगोपन व वाढ होण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रश्न उभे राहतात. कुमारी मातांच्या व त्यांच्या मुलांच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांनी १८७० साली बालहत्या प्रतिबंधक कायदा अंमलात आणला. महाराष्ट्रात पहिले बालगृह महात्मा फुले यांनी १८६३ मध्ये पुण्यात सुरु केले. त्यानंतर १८७५ साली पंढरपूर व नासिक येथे बालहत्या प्रतिबंधक गृहे स्थापन केली. यूरोपमध्ये सहाव्या शतकापासून अनाथालये स्थापन केली गेली व कुमारी मातेला अनामिक राहण्याची इच्छा असल्याने अनाथालयाच्या दारात पाळणा बांधण्याची व्यवस्था केली गेली.
विवाहोत्तर जीवनात विवाहबाह्य संबंधामुळे संतती निर्माण झाली, तर अशा मुलांचे जीवन असुरक्षित असते. असे संबंध चोरटे असले व ते जर उघडकीला आले, तर संबंधित कुटुंबांचे स्वास्थ धोक्यात येऊ शकते. वैवाहिक संबंधात पती हाच मुलांचा पालक असतो. मात्र विवाहबाह्य संबंधामधून जन्मणाऱ्या मुलांचे पालकत्व आईकडे जाते. तथापि आई हयात असतानाही बापाने मुलाबद्दलचे कर्तव्य पार पाडावे, अशी सोय फौजदारी कायद्यात आहे. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ नुसार, स्वतःला पोसू न शकणारी पत्नी व तिची वैध वा अवैध अल्पवयीन मुले ह्यांना पोसण्याचे कर्तव्य बापाने पार पाडले नाही, तर फौजदारी खटला भरता येतो. बापाला या मुलांच्या पालनपोषणासाठी पोटगी द्यावी लागते.
भारतातील प्रचलित कायद्यानुसार अनौरस मुलांचे हक्क वेगवेगळे आहेत. धर्मानुसार हक्क प्रदान होतात. हिंदू कायद्याप्रमाणे अवैध ठरविलेल्या संबंधातून होणाऱ्या संततीला आईवडिलांच्या मिळकतीत वाटा मिळतो. मुसलमानी विधीप्रमाणे शिया पंथीय अनौरस मुलाला वारसाहक्क नाही; पण सुन्नी पंथीय मुलाला आईच्या मिळकतीत वाटा असतो. पारशी कायदा अनौरस मुलाला वारसदार मानत नाही. ख्रिस्ती कायद्यात अनौरस संततीला मातापित्यांच्या मिळकतीत वाटा मिळतो.
आधुनिक पाश्चात्त्य देशांत १९५० च्या दशकानंतर सामाजिक परिस्थिती बदलत गेली. विवाहसंस्थेचे महत्त्व १९६० नंतर ओसरू लागल्याने विवाहबाह्य संबंधाच्या व अनौरस संततीबाबतच्या दृषअटिकोनात अमूलाग्र बदल घडून आले. लैंगिक संबंधावरचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे, मातृत्व-पितृत्वासंबंधीची पारंपारिक मूल्ये शिथिल होत गेली. १९८५ साली केलेल्या पाहणीत ४९ टक्के अमेरिकन स्त्रियांच्या मते, विविह न करता अपत्य होऊ देणे गैर नाही.
यूरोप-अमेरिकेत १९६० ते १९७० या दशकात अनौरस मुलांचे जननप्रमाण वाढल्याचे दिसून येते. १९७५ मध्ये अमेरिकेतील निग्रो स्त्रियांमध्ये १४.३ टक्के स्त्रिया कुमारी माता होत्या. १९८८ मध्ये हे प्रमाण २५.७ टक्के इतके वाढले. त्याचप्रमाणे फक्त अविवाहित माता व तिची अपत्ये व तिची अपत्ये मिळून राहणाऱ्या कुटुंबांची संख्याही विकसित देशांत वाढली आहे. अमेरिकेतील जनगणनेनुसार १९७० साली १०.८ टक्के मुलांचा सांभाळ त्यांच्या माता करीत होत्या व या गटामधील ०.८ टक्के कुमारी माता होत्या. १९८१ साली १८.१ टक्के मुले मातांकडे होती व त्यांतील २.९ टक्के स्त्रिया २.९ टक्के स्त्रिया या कुमारी माता होत्या. अनौरस मुलांचा सांभाळ करणाऱ्या पित्यांचे प्रमाण सर्वत्र नगण्य आहे.
अनौरस संततीचे संगोपन करणे कठीण जाते, कारण अल्पवयीन कुमारी मातांचे शिक्षण अकाली मातृत्वामुळे अपूर्ण राहण्याची शक्यता असते, तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही बहुधा हालाखीची असू शकते. अनियोजित व अवेळी प्राप्त झालेले मातृत्व स्त्रीला सर्वच दृष्टींनी हानिकारक ठरते. भारतीय समाजव्यवस्थेत कुमारी मातेचे मातृत्व समाजमान्य नाही, तसेच व्भिचारातून जन्मलेले मूलही कमी लेखले जाते आणि वांझ, अपत्यहीन विवाहितेचाही अनादरच होतो. मातृत्व हा स्त्रीच्या व्यक्तीमत्त्वाचा एक पैलू आहे; संपूर्ण व्यक्तिमत्त्व नव्हे, ही कल्पना समाजात रुजणे आवश्यक आहे.
आधुनिक समाजातील विचारसरणीनुसार औरस व अनौरस मुलांमधील भेदभाव कमी करावा, अशी धारणा आहे. सर्व मुलांचे पालनपोषण पालकांनी करावे व पालक नसल्यास कल्याणकारी संस्थांद्वांरा व सरकारी योजनांद्वारा ते कराले, हा सामाजिक कर्तव्याचाच एक भाग ठरतो. कुमारी माती, एकच पालक असणारा कुटुंब व अनाथ मुले यांना संरक्षण व प्रतिष्ठा देणे, हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही आवश्यक ठरते. आधुनिक स्त्रीमुक्तिवादी चळवळीचे हेच उद्दिष्ट आहे. स्त्रीला संतती प्राप्त करून घेण्यासाठी विवाहबंधनात जखडून घेण्याची आवश्यकता नाही. तो हिच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु बालसंगोपनाच्या कार्यात आपल्या जोडीदाराची साथ मिळावी, अशी तिची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे राज्यशासन व सामाजिक संस्था त्यांचा ह्या कार्यात सक्रिय सहभाग असावा, अशी स्त्रीमुक्ती संघटनांची मागणी आहे.
स्वीडन, अमेरिका इ. पाश्चात्त्य देशांत कायदेशीर विवाह न करता अनौपचारिक पद्धतीचे संबंध प्रस्थापित करून अनेक जोडपी एकत्र राहतात. अशा संबंधातून जन्मलेल्या मुलांना भावनिक सुरक्षितता कमी लाभते. तसेच आप्तसंबंधीय व्यवस्था त्यामुळे विस्कळीत होते. विवाह व अपत्यसंगोपन यामुळे कुटुबातील प्रत्येक सदस्याचे परस्पराशी तसेच अनेय कुटुंबांशीही भावनिक जिव्हाळ्याचे संबंध जोडले जातात. कुटुंब हा सामुदायिक जीवनाचा पाया आहे. ज्या देशात जैविक पितृत्वाचे महत्त्व कमी झाले आहे, तेथे मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रमुख्याने माता, इतर नातेवाईक व सरकार यांवर पडते. अमेरिकेमध्ये १९८८साली कुटुंबास आधार देणारा कायदा (फॅमिली सपोर्ट ॲक्ट) संमत झाला. या कायद्यानुसार समाजकल्याण योजनामार्फत अनाथ वा अनौरस मुले व एकट्या राहणाऱ्या माता यांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच अनौरस संततीच्या पित्याने आपली जबाबदारी टाळू नये, ह्यासाठीही त्या कायद्यात तरतुदी आहेत.
विकसनशील देशांत अनौरस मुले व कुमारी माता यांचे प्रश्न गंभीर आहेत. अल्पवयीन कुमारी मातांचे प्रमाण अरब देशांत १९८० साली १६ टक्के होते. आफ्रिकेतील घानामध्ये हे प्रमाण ५८ टक्के होते, तर केन्यामध्ये ७७ टक्के अल्पवयीन मुली या कुमारी माता होत्या, कोटुंबिक जीवनाची वाताहत व शिक्षणाची कमतरता असल्याने गरीब स्तरातील तरूण-तरुणांना लैंगिक संबंधातून अनेक घातक रोगांची लागण होऊ शकते. दरवर्षी ५५ दशलक्ष गर्भपात होतात व त्यामुळे ६०,००० स्त्रिया मृत्यु पावतात. यातील कुमारी मातांचे प्रमाम वाढते आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड डिव्हेलपमेंट रिपोर्ट’ मध्ये (१९१३) ही आकडेवारी दिलेली आहे.
भारतात न्यायसंस्थेमार्फत अनाथाश्रम, बालकाश्रम, अभिरक्षणगृह इ. ठिकाणी अनौरस मुलांना व कुमारी, परित्यक्ता मातांना संरक्षण दिले जाते. कलकत्ता शहरामध्ये मदर तेरेसा यांच्या मिशनमार्फत कुमारी मातांना संरक्षण देण्यासाठी व अनौरस बालकांच्या सरंक्षण व पोषणासाठी ‘निर्मल शिशुभवन’ ही संस्था १९५३ साली स्थापन झाली. मात्र भारतातील बहुसंख्य अर्भकालयांत व अनाथाश्रमांत प्रशिक्षित पर्यवेक्षिका, तज्ञ डॉक्टर, पुरेशा वैद्यकीय साधनसुविधा इत्यादींचा अभाव असल्याने अशा मुलांचे संगोपन व्यवस्थित रीत्या होत नाही. अनौरस संततीच्या आणि कुमारी मातांच्या कल्याणकरिता प्रचलित कायद्याच्या कक्षा वाढविण्याची गरज आहे. वारसाहक्काचे कायदे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे आहेत. त्यांतील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. समाजातील सर्व व्यक्तींनी व संस्थांनी या प्रशनाकडे मानतावादी दृष्टीकोनातून पाहणे इष्ट ठरेल.
संदर्भ : 1. Dandavate, Pramila; Rajani Kumari; Jamila, Verghese, Widows, Abondoned and Destisute Women in India, New Delhi, 1989.
2. Panigrahi, Lalita, British Social Policy and Female Infanticide in India, Calcutta, 1970.
3. Sharma, Vijay, Protection to Women in Materimonial Home, New Delhi, 1994.
4. Vincent Clark E. Unmarried Mothers, New York, 1964.
5. Wearing Betsy, The Ideology of Motherhood, England, 1984.
६. राजवाडे, वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, मुंबई, १९८९.
७. रानडे, प्रतिभा, स्त्रीप्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक (‘स्त्रीमुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा’ या अभ्यासमालिकेतील तिसरा खंड), मुंबई, १९९१.
८. लिंबाळे, शरणकुमार, संपा., विवाहबाह्य संबंध: नवीन दृष्टिकोन, पुणे, १९९४.
लेखिका: अनुपमा केसरकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
या विभागात गरोदरपणातील आहार कसा असावा आणि किती घ्य...
विवाहबाह्य संबंधापासून झालेली संतती.
एकाचवेळी दोन बालकांचा जन्म झाला तर त्यांना जुळी म...
गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे द...