অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिष्टाचार

शिष्टाचार

समाजातील सभ्यतापूर्ण व्यक्तिवर्तनाची प्रथा वा संकेत म्हणजे शिष्टाचार, असे सामान्यपणे म्हणता येईल. प्रत्येक समाजात शिष्टाचार आढळतो. मात्र प्रत्येक समाजातील शिष्टाचाराचे स्वरूप स्वतंत्र असते. समाजातील शिष्टजनांचा (एलीट्स) जो वर्ग असतो, त्याचे वर्तन किंवा आचार समाजातील इतर वर्गांना अनुकरणीय वाटतात. शिष्टाचाराच्या कल्पनेत असा एक अर्थ आहेच. एकाच समाजातील स्त्री-पुरुषांच्या विविध प्रकारच्या गटांत व्यावसायिक वर्गात किंवा इतर प्रकारच्या समूहातही विशिष्ट प्रकारचे शिष्टाचार रूढ असतात. समाजशास्त्रीय दृष्टीने व्यक्तीचे सामाजिक वर्तन किंवा आचार नियंत्रित करण्याचे शिष्टाचार हे एक साधन असते.

किंग्जली डेव्हिस या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाच्या अभिप्रायानुसार शिष्टाचार हे विशिष्ट प्रकारचे

लोकाचार होत. त्यांना सखोल अर्थ नसला, तरी सामाजिक संबंधांचे स्वरूप सुखावह व शिस्तबद्ध व्हावे, म्हणून त्यांचे पालन करण्यात येते. शिष्टाचार पाळण्याबाबत प्रत्येक व्यक्तीवर तिची जात, जमात, वर्ग, व्यवसाय इत्यादींचे दडपण असते. शिष्टाचार शिकणे व त्यांचे पालन करणे, या प्रक्रियांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा, भूमिका व प्रतिष्ठा यांबाबतचे महत्त्वपूर्ण संकेत स्पष्ट होतात. शिष्टाचारांचे उल्लंघन केल्यास समाजाचा रोष व टीका ओढवून घेण्याचा धोका व बहिष्कृत होण्याची भीती असते. समाजातील श्रेणीव्यवस्थाही शिष्टाचारांतून सूचित होते. शिष्टाचारांमुळे व्यक्तीला विशिष्ट समूहातील सदस्य असल्याची जाणीव होऊन तिची अस्मिता जागृत होते.

शिष्टाचारांच्या माध्यमातून समाजातील वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यातील परस्परसंबंधांना समाजमान्यता व पुष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या स्तरांमधील सामाजिक अंतर टिकून राहते.

शिष्टाचारांचे स्वरूप कृत्रिम भासले, तरी त्यांचा सामाजिक आशय महत्त्वाचा असतो. ज्या व्यवहारांमध्ये शिस्त व औपचारिकतेची निकड असते, तेथे शिष्टाचारांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. उदा., सैनिकी दलांत शिष्टाचार काटेकोरपणाने पाळण्याची गरज असते.

मध्ययुगीन यूरोपीय समाजामध्ये शिष्टाचारांचे स्तोम माजले होते. १६६१ साली प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकाचे नाव बुक ऑफ कर्टसी असे आहे. सभ्य वर्तनप्रकारांची ही संहिता आहे. एमिली पोस्ट या प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीने एटिकेट : द ब्लू बुक ऑफ सोशल युजेस हे पुस्तक प्रकाशित केले (१९२२). सामाजिक आंतरसंबंधांमध्ये परस्परांचा आदर केला जावा, यासाठी कोणते शिष्टाचार अंगी बाणवावे, हा या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाचा विषय आहे. भारतीय समाजातील विविध वर्ग, जाती, जमाती, धार्मिक संप्रदाय व पंथ यांच्या वर्तनांवर कठोर बंधने होती. विशेषतः स्त्री व पुरुषांमधील परस्परसंबंधांचे शिष्टाचार पाळणे अत्यावश्यक समजले जाई. उच्चवर्गीय स्त्रियांच्या बाबतीत निर्बंध अधिक कडक असत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनाला गती लाभून वर्ग, जात, जमात यांमधील पारंपरिक अंतर कमी झाले. १९८२ मध्ये एलिनॉर रुझवेल्ट यांनी अतिशय सोप्या भाषेत प्रॅक्टिकल बुक ऑफ कॉमनसेन्स एटिकेट हे पुस्तक प्रसिद्ध केले. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा मान ठेवून व अधिकारांची जाणीव राखून कसे वर्तन करावे, याबाबत उद्बोधक मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.

विसाव्या शतकातच राजकारण, धर्म व लष्करांसारखी क्षेत्रे सोडता, सर्वसामान्य व्यक्तीवरील सर्वच पारंपरिक वर्तनप्रकारांची दडपणे हळूहळू कमी होत गेली. आधुनिक समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, वैयक्तिक हक्क, सामाजिक समता व न्याय यांसारख्या मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले. लोकशाही समाजात वर्तनपद्धती कालबाह्य होत गेल्या. परंपरागत शिष्टाचारांचा प्रभावही कमी होत गेला. अर्थात नवे शिष्टाचारही याबरोबरच रूढ होत आहेत, हेही खरे. त्यातून व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारातील वर्तनासंबंधीचे काही प्रतीकात्मक संदर्भ टिकून राहिले आहेत.

लेखक: पी. के. कुलकर्णी ; अनुपमा केसकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate