অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर्वोदय

सर्वोदय

परंपरागत भारतीय समाजव्यवस्थेची नैतिक तत्त्वांच्या आधारे आमूलाग्र पुनर्बांधणी करण्याची एक विचारप्रणाली. सर्वांचे कल्याण, सर्वांचा उदय असा सर्वोदय शब्दाचा भावार्थ आहे. भगवद्‌गीते तील सर्वभूतहिताची कल्पना यात अनुस्यूत आहे. या विचारसरणीचा महात्मा गांधींनी व्याख्याने व प्रासंगिक स्फुटलेखनातून पुरस्कार केला होता. त्यांनी १८ जानेवारी १९४८ च्या हरिजन वृत्तपत्र - अंकात सर्वोदयाचा आशय आणि वैशिष्टये यांची सुस्पष्ट रूपरेषा मांडली आहे. जैन दर्शनातील  विचार आणि रस्किनच्या अंटू धिस लास्ट या पुस्तकावरून गांधीजींना हा विचार सुचला; कारण गांधीजींनी रस्किनच्या या पुस्तकाचे गुजरातीत भाषांतर करून त्याला ‘ सर्वोदय ’ हे शीर्षक दिले होते.

पाश्चात्त्य उपयुक्ततावादयांच्या ‘ अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक सुख ( कल्याण )’ या विचारधारेला मागे टाकणारा ‘ सर्वोदय ’ हा विचार आहे. सर्वोदयात समन्वयाचा विचार महत्त्वाचा आहे. सर्व विचारांचा मेळ घालण्याची व त्यांना एकत्र आणण्याची शक्ती सर्वोदयाच्या तत्त्वज्ञानात आहे. सर्वांचे सुख हा विचार इथे केंद्रिभूत आहे आणि सर्वोदयी विचारातील सुखाची कल्पना नैतिक सुखाची आहे. प्रत्येक व्यक्तीने सर्वांच्या कल्याणासाठी त्यागास सज्ज असले पाहिजे. त्या त्यागाने होणाऱ्या बाह्य दु:खातील आंतरिक सुखाचा अनुभव त्याला घेता आला पाहिजे. हा एक नवसमाजनिर्मितीचा व्यापक विचार असल्यामुळे त्यात गांधीजींना अभिप्रेत असणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थेबरोबरच व्यक्तिजीवनाशी निगडित अशा शिक्षण, आरोग्य, उदयोग, रोजगार, व्यवसाय इत्यादी विषयांची चर्चा केलेली आहे. सर्वोदयवादात गांधींनी समाजाचा आध्यात्मिक विकासवाद मांडला आहे. त्यातील काही तत्त्वे अशी :

तत्त्वे

  1. समाजात व्यक्ति-व्यक्तींमध्ये फरक असला, तरी त्यांचे हितसंबंध सारखेच असतात, म्हणून परस्परसंबंधांत स्वामित्वाच्या जागी परस्परसमतेच्या विचाराला प्राधान्य दयावे,
  2. साध्य आणि साधन यांचा अन्योन्य संबंध आहे. त्यासाठी सर्वोदयाचे उद्दिष्ट साधण्यासाठी साधनशुचिता आवश्यक आहे,
  3. अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दयावे. कर्तव्यपालनातून ज्या अधिकारांची निर्मिती होईल, तेवढेच अधिकार सर्वोदयी समाजातील व्यक्तींनी उपभोगावेत,
  4. सर्वोदयी समाजातील व्यक्तींच्या ठायी सत्य-अहिंसेच्या तत्त्वांबरोबरच इंद्रियनिगह( बह्मचर्य ), अभय, अस्तेय, अपरिगह, संयम, वैराग्य, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशी आणि सर्व धर्मांविषयी आदरयुक्त भावना असावी,
  5. सर्वोदयाची स्वत:ची अशी राज्यव्यवस्था  असावी. तीत व्यक्ती केंद्रस्थानी धरून प्रत्येक खेडे स्वत:च एक गणराज्य असेल. त्यात वास्तव्य करणारे गामस्थ हे मुक्त आणि स्वयंपूर्ण असतील. मतैक्य हे निर्णयप्रकियेचे साधन राहील. प्रेम आणि परस्परसहकार्य हा गामीण जीवनाचा मूलभूत आधार असेल. शासनव्यवस्था विकेंद्रित असेल, हे राज्य पूर्णत: अहिंसक राज्य असेल आणि
  6. सामान्य व्यक्तीचे हितसंबंध केंद्रस्थानी असणारी न्यायोचित अर्थव्यवस्था यात असावी. मर्यादित गरजा हा या अर्थव्यवस्थेचा पाया व वस्तुविनिमय हे आर्थिक व्यवहाराचे साधन राहील. उत्पादनप्रकियेत निसर्गाचे किंवा व्यक्तीचे शोषण होता कामा नये, हे या व्यवस्थेचे मुख्य सूत्र आहे. व्यवसायाचे विकेंद्रीकरण, ग्रामोदयोगाला उत्तेजन, चलनमुक्ती, संपत्तीची सामूहिक मालकी आणि विश्वस्त म्हणून तिचा वापर, ही या अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये होत.

सर्वोदयात सगळे सारखे आहेत. कोणीही उच्च् वा नीच नाही. सगळ्यांची सारखीच काळजी घेतली जाईल. सर्वांना विकासाची सारखी संधी दिली जाईल. सर्वांना सारखे शिक्षण मिळेल. सर्वोदयाला बहुमतावर आधारलेली लोकशाही व्यवस्था मान्य नाही. तद्वतच आधुनिक प्रचलित शासनविषयक विचार आणि पाश्चात्त्य राजकीय संस्थासंघटनापद्धती यांना सर्वोदय विचारात स्थान नाही. सर्वोदयी राज्य खऱ्या अर्थाने शासनमुक्त, स्वयंनियंत्रित, विकेंद्रित व लोकनीतीचे राज्य असेल, जसजसे विकेंद्रीकरण होईल, तसतसे लोकशक्ती-लोकनीतीचे राज्य विकसित होईल, त्याचेच पूर्ण विकसित रूप म्हणजे गांधीजींना अभिप्रेत असणारी रामराज्याची कल्पना होय. सर्वोदयी राज्य संकल्पनेची ती आदर्श आहे, परंतु शांतिमय कांती अर्धोदय ठरली.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर (१९४८) विनोबा भावे, जयप्रकाश नारायण प्रभृतींनी सर्वोदयाचा विचार भूदान, गामदान यांसारख्या चळवळींव्दारे समग कांती तून प्रसृत केला. भूदानाने शांतिमय कांती सुरू झाली. त्यामार्गाने सर्वोदय होणार, असे विनोबांना वाटले. सेवागाम ( वर्धा ) येथे गांधीभक्तांची सभा भरली. तीत सर्वोदय समाज स्थापनेचा ठराव संमत झाला. त्यानंतर पोचमपल्ली ( आंध प्रदेश ) येथे सर्वोदय संमेलन झाले  (१९५०). त्यात भूदानयज्ञाची प्रेरणा विनोबांना मिळाली. भूमीप्रमाणे संपत्तीवरील स्वामित्व सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे स्वार्थ, द्वेष आणि हिंसा संपुष्टात येऊन सर्वोदय घडेल, अशी विनोबांची मनोमन धारणा होती. जयप्रकाश नारायण यांनी १९६० च्या सर्वोदय संमेलनाच्या  अध्यक्षपदावरून भाषण करताना राजकारणसंन्यास घेऊन सर्वोदयवादी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. ग्रामराज्य, ग्रामोदयोग, नई तालीम  इ. कार्यांची जोड देऊन सर्वोदय कार्यकर्त्यांनी या कार्याला व्यापक  स्वरूप देण्याचे प्रयत्न केले; परंतु ही कल्पना म्हणावे तशी मूळ धरू शकली नाही.

सर्वोदय हा एक आदर्शवादी विचार आहे, हे वादातीत सत्य आहे; पण तो व्यवहारात आणणे कठीण आहे, हे विदारक सत्य आहे. अहिंसक राज्य, समताधिष्ठित समाज आणि सद्गुणी व्यक्ती प्रत्यक्षात सापडणे अवघड आहे; मात्र मार्गदर्शक सूत्रे म्हणून त्यांना महत्त्व आहे.

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Humanism of M. K. Gandhi, Varanasi, 1971.

2. Jayaprakash Narayan, From Socialism to Sarvodaya, 1959.

3. Narayan, Shriram, Vinoba : His Life and Work, Bombay, 1970.

4. Tendulkar, D. G. Mahatma, 8 Vols., New Delhi, 1960–63.

५. शिखरे, दा. न. विनोबांचे जीवन-मंत्र, पुणे, १९५८.

लेखक: सुनील दाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate