অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुटी (सुट्टी)

सुटी (सुट्टी)

हॉलिडे

दैनंदिन कामधंदा व कर्तव्यकर्म आणि व्यावसायिक उद्योगधंदे यांच्या व्यापातून उसंत देणारा, श्रमपरिहार करणारा दिन वा दिवस. सुटी हा हॉलिडे या इंग्रजी शब्दाचा पारिभाषिक वा पर्यायी शब्द होय. हॉलिडे (Holiday) हा शब्द मूळ प्राचीन अँग्लो-सॅक्सन हॅलिग-देएग किंवा हॅलिग-दॅग (Halig-daeg किंवा Halig-dag) या दोन शब्दांपासून बनला असून त्याचा अर्थ पवित्र कार्याला अर्पण केलेला दिवस किंवा धार्मिक सण अथवा विधी असा आहे. थोडक्यात पवित्र दिवस किंवा धार्मिक सण वा विधी अथवा एखादा धर्मवेत्ता वा संस्थापक याच्या स्मरणार्थ योजिलेला दिवस होय.

दैनंदिन उद्योग, व्यवसाय, कामधंदा व कर्तव्यकर्म यांतून विरंगुळा मिळण्यासाठी सुटीचा उपयोग ही वैश्विक संकल्पना व प्रघात प्राचीन काळापासून आजमितीस व्यवहारात रूढ आहे. प्राचीन संस्कृतींतून काम थांबवून आधिदैविक शक्तींना संतुष्ट करण्यासाठी वस्तू व नैवेद्य समर्पित करण्याची पद्घती होती. आदिम समाजात निसर्गपूजेला अनन्यसाधारण महत्त्व होते व त्याकरिता स्त्री-पुरूष आपल्या दिनचर्येतून वेळ काढून (सुटी घेऊन) ती करीत असत. हिब्रू संस्कृतीत सुटी (होलि डे) याचे दोन अर्थ दिलेले आढळतात : एक, आनंददायी नृत्य व दोन, सणासाठी एकत्र जमण्याचे स्थळ. बायबलच्या जुन्या करारातील उत्पत्ती (जेनिसिस) या पुस्तकात देवाने सहा दिवस उत्पत्ती करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली, असे धर्मगुरू असलेल्या लेखकाने सांगितले आहे. याच अभिव्यक्तीच्या शैलीत त्याने असे प्रतिपादन केले आहे की, मानवानेही सहा दिवस काम केल्यावर सातव्या दिवशी विश्रांती घ्यावी. जेनिसिस (२:१-३) मध्ये पुढे म्हटले आहे की, ‘प्रभूने सातवा दिवस (आठवढ्याचा शेवटचा दिवस –रविवार) पवित्र ठरविला आणि शुद्घ केला; कारण त्या दिवशी प्रभूने सर्व कामकाजातून विश्रांती घेतली.’ सॅबथ (ज्यूंचा शनिवार; ख्रिस्ती लोकांचा रविवार) किंवा सेवन्थ डे ही संज्ञा प्राचीन बॅबिलोनियन लोकांच्या शब्बात्तू (Shabbattu) म्हणजे विश्रांती या शब्दापासून अपभ्रंश होऊन बनलेली असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा शब्दशः अर्थ प्रत्येक चान्द्र मासातील चार विश्रांतीचे दिवस असा आहे. ख्रिस्ती धर्मीय रविवार, ज्यू शनिवार तर मुसलमान शुक्रवार पवित्र दिवस मानून त्यादिवशी सुटी घेऊन प्रार्थना करतात. जगातील सर्व धार्मिक सणांनिमित्त दिलेल्या सुट्या या नैसर्गिक ऋतुमानानुसार आणि सूर्य-चंद्र यांच्या भ्रमणगतींशी संबंद्घ आहेत. चीनने पाश्चात्त्य ग्रेगेरियन कॅलेंडर (सौर मास) अधिकृत रीत्या १९१२ मध्ये स्वीकारले असले; तरी त्यांची पारंपरिक नववर्षाची सुटी जुन्या चिनी पंचागांनुसार (चान्द्र मास) हिवाळ्यानंतर सूर्य उत्तरायण होताना (जानेवारी-फेब्रुवारी) येणाऱ्या प्रथम चंद्रदर्शनावर (शुद्घ प्रतिपदा किंवा द्वितीया) दिली जाते. त्यादिवशी प्रत्येक चिनी व्यक्ती आपला वाढदिवस प्रत्यक्ष असणाऱ्या जन्मतारखेकडे दुर्लक्ष करून साजरा करते. ही सुटी जगातील सर्व चिनी लोक एकसमयावच्छेदेकरून साजरी करतात.

सुट्या प्रमुख कारण

सुट्या दोन प्रमुख कारणांनी घेतल्या जातात. एक, धार्मिक सुट्या ह्या जगातील सर्व प्रमुख धर्मांच्या प्रमुख सणांनिमित्त तसेच सर्वधर्मसंस्थापकांच्या जयंती-मयंती निमित्त अथवा त्यांच्या स्मरणार्थ विहित केलेल्या दिवशी दिल्या जातात. दोन, काही सुट्या या पूर्णतः धर्मातीत (सेक्यूलर) कारणासाठी दिल्या जातात. यांमध्ये मुख्यत्वे स्वातंत्र्य दिन, कामगार दिन, थोर पुरूषांचे जन्मदिन, नववर्ष दिन इत्यादींचा अंतर्भाव होतो आणि त्यांना सार्वजनिक सुट्या असे म्हणतात. त्यामुळे सुट्या वेगवेगळ्या नावांनी व भिन्न परिस्थितीत उपभोगल्या जातात. त्यांचे मूलभूत उद्दिष्ट व्यावसायिक परिपाठातून किंवा उद्योगधंद्यांमधून-नित्यकर्मातून विरंगुळा हेच असते. या विरंगुळा कालावधीत मनोरंजन, पर्यटन, खेळ, वाचन, विश्रांती वगैरे अन्य कर्तव्येतर गोष्टी बहुधा व्यक्ती करीत असते. धार्मिक सुटीत सणानिमित्त लोकांना एकत्र आणणे, धर्माबद्दल जागृती निर्माण करून श्रद्घा जोपासणे आणि सहभागी सदस्यांत प्रेम व ऐक्यभावना वृद्घिंगत करणे हा हेतू असतो. काही सुट्या या केवळ कर्मकांडे व पूजाअर्चा यांसाठी असतात. धर्मातीत सुट्यांत लोक मनोरंजन, गोडधोड खाणे, नवीन कपडेलत्ते परिधान करणे वगैरे मौजमजा लुटतात. या सुट्यां ना उत्सवाचे स्वरूप असून त्यांतून औदार्याचे प्रदर्शन घडते.

अमेरिका

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत अधिकृत अशी एकही राष्ट्रीय सुटी नाही; मात्र राष्ट्राध्यक्ष व काँग्रेसने संघीय नोकरशाहीसाठी काही सुट्या विधिवत निश्चित केल्या आहेत. त्या राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक सुट्या म्हणून पाळल्या जातात. यांत प्रामुख्याने नववर्ष दिन (१ जानेवारी), मार्टिन ल्यूथर किंग जयंती (१५ जानेवारी), वॉशिंग्टनची जयंती (२२ फेब्रुवारी), मेमोरिअल डे (३० मे), स्वातंत्र्य दिन (४ जुलै), कामगार दिन (१ मे) वगैरेंचा समावेश होतो. यांपैकी मार्टिन ल्यूथर किंग, वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या जयंतीच्या सुट्या त्या त्या महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजऱ्या केल्या जातात. त्याही सर्व राज्यांतून साजऱ्या केल्या जात नाहीत. उदा., अब्राहम लिंकनची जयंती (जन्मदिन) फक्त तीस राज्यांत सुटी देऊन साजरी केली जाते. ग्रेट ब्रिटनमध्ये काही सुट्यांना बँक हॉलिडेज म्हणतात; कारण त्यादिवशी बँका व शासकीय कार्यालये पूर्णतः बंद असतात. या सुट्यांत प्रामुख्याने न्यू यीअर्स डे, गुड फ्रायडे, ईस्टर डे, ख्रिसमस आणि बॉक्सिंग डे (२६ डिसेंबरचा दिवस) यांचा अंतर्भाव होतो. याशिवाय स्प्रिंग आणि समर हॉलिडेज यांनाही सुटी असते. नववर्ष दिनाची सुटी बहुतेक सर्व देशांत असते. पाश्चात्त्य देशांत नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर डे वगैरेंच्या सुट्या सार्वजनिक असून त्या राष्ट्रीय पातळीवर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच दुकाने व उद्योजक पाळतात. फ्रान्समध्ये बॅस्तील डे (१४ जुलै) आणि जोन ऑफ ऑर्क डे (मे मधील दुसरा रविवार) हे प्रमुख राष्ट्रीय सण होत. जपानमध्ये चिल्ड्रन्स डे (५ मे) हा राष्ट्रीय सुटीचा दिवस असून जपानी लोक साप्ताहिक सुटीव्यतिरिक्त फार थोड्या सार्वजनिक सुट्या उपभोगतात. ब्रिटीश साम्राज्याचा वसाहतवाद आणि पाश्चात्त्यीकरण यांमुळे जगातील बहुतेक सर्व देशांत रविवार ही साप्ताहिक सुटी असून कार्पोरेट जगतात व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर शनिवारीही सुटी असते. काही राज्यांत दुसरा व चौथा शनिवार सुटी असते. कारखान्यांतून विशेषतः कार्पोरेट जगतात कंपन्या कर्मचाऱ्यांना संबंध वर्षांत फार मोजक्याच सुट्या देतात. त्यांमध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यदिन, दिवाळी वा नाताळसारखा मोठा सण, कारखान्याचा स्थापना दिन (फाउंडेशन डे) इत्यादींचा अंतर्भाव होतो.

भारत

भारतात राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक अशा तीन प्रकारच्या सुट्या आढळतात. स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे आता राष्ट्रीय सणच झाले आहेत. त्यांची सर्वत्र सुटी असते. भारत हे धर्मनिरपेक्ष (सेक्यूलर) राष्ट्र असल्यामुळे येथे सर्व धर्मांतील प्रमुख सणांना सार्वजनिक सुट्या दिलेल्या आढळतात; उदा., ख्रिस्ती धर्मीयांच्या नाताळ, गुड फ्रायडे; पार्शी धर्माची नवरोज; इस्लाम धर्मीयांच्या मोहरम, बकरी ईद; बौद्घ धर्माची बुद्घ जयंती; जैन धर्मीयांची महावीर जयंती; हिंदू धर्मातील गुढीपाडवा, दसरा, दिवाळी वगैरे. यांव्यतिरिक्त महात्मा गांधींसारख्या (२ ऑक्टोबर) थोर व्यक्तींच्या स्मरणार्थ काही राष्ट्रीय सुट्या दिल्या जातात. याशिवाय भारतात प्रदेशपरत्वे काही राज्यांच्या स्वतंत्र सुट्या असून त्या त्या राज्यातील प्रमुख सणांना या खास सुट्या दिल्या जातात. उदा., कर्नाटकमध्ये ओणम्, नाडहब्ब हा सण (देवीचे नवरात्र व दसरा), ओडिशा-बंगालमध्ये कालिमातेचा सण (दुर्गाष्टमी), केरळमध्ये पूरम्, ओणम्, पोंगल, महाराष्ट्रात गणेशोत्सव, उत्तर भारतात होलिकोत्सव, रंगपंचमी वगैरे होत. याशिवाय त्या त्या राज्यामधील थोर व्यक्तींच्या स्मरणार्थ काही सुट्या त्या राज्यांपुरत्याच मर्यादित असतात. उदा., आंबेडकर जयंती, शिवजयंती महाराष्ट्रात साजरी केली जाते व त्यादिवशी शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे बंद असतात. अशाच काही थोर व्यक्ती अन्य राज्यांत होऊन गेल्या, त्यांच्या स्मरणार्थ त्या त्या राज्यांतून सुटी दिली जाते. याशिवाय काही स्थानिक वा वैकल्पिक सुट्या असून त्या जिल्हावार दिल्या जातात. उदा., महाराष्ट्रातील कोल्हापूर-सोलापूर जिल्ह्यांत घटस्थापनेची, तर सातारा जिल्ह्यात दासनवमी, रामनवमी आणि पुणे जिल्ह्यात अनंत चतुर्दशीची खास सुटी असते. अशा स्थानिक सुट्या अन्य राज्यांतूनही आढळतात.

प्रसारमाध्यमांना (दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे) यांना कोणत्याच प्रकारच्या सुट्या नसतात; मात्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी त्या त्या माध्यमांनी ठरवून दिलेल्या प्रशासकीय नियमांनुसार पर्यायी सुटी मिळते किंवा दुप्पट मानधन दिले जाते. वर्तमानपत्रातील कर्मचाऱ्यांना काही प्रमुख राष्ट्रीय सार्वजनिक सुट्या असतात व त्याविषयीची सूचना वर्तमानपत्रात मुख्यपृष्ठावर देण्यात येते; पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे.

संदर्भ : 1. Gregory, R.W. Anniversaries and Holidays, 1983.

2. Handelman, Don, Models and Mirrors: Towards an Anthropology of Public Events, Cambridge (Mass), 1990.

3. Mossmen, Jennifer, Ed. Holidays and Anniversaries of World, Gale Res, 1989.

लेखिका: सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/3/2019© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate