অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आचारसंहिता : काय करावे, काय करु नये

आचारसंहिता : काय करावे, काय करु नये

भारत निवडणूक आयोगाने राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तेव्हापासून राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी ‘काय करावे, काय करु नये,' याबाबतची आयोगाने तयार केलेली सूची वानगी दाखल पुढीलप्रमाणे आहे.

काय करावे’

1)निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.
2) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालु ठेवता येऊ शकेल.
3) मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल.
4) मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्ष:पातीपणे उपलब्ध झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्ष:पातीपणे करता आला पाहिजे.
5)इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टिका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी.
6) शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.
7)स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकांचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी.
8) सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
9) मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये, मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजित रितीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे, सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
10) मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधाचे पूर्णत: पालन करण्यात यावे.
11) निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक/ मतदार प्रतिनिधी यांव्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.
12) निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या, आयोग/ निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/ प्रक्षेत्र दंडाधिकारी/ भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. निवडणूक आयोग/ निवडणूक निर्णय अधिकारी/ जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयीचे निर्देश/ आदेश/ सूचना यांचे पालन करण्यात यावे.
13) आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसला तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे.

'काय करु नये'

1)सत्ताधारी पक्ष/शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. कोणताही मंत्री तो किंवा तो उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.
2) शासकीय कामाची निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करु नये.
3) मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये.
4) मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करतील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करु नये.
5) इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करु नये.
6)मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
7)मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयागिरी, मतदार केंद्रापासून 100 मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
8) लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.
9) स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता) ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही.
10)इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजिक केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु नये.
11) ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोक, क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यात येऊ नयेत.
12)इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भिंतीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करु नयेत.
13) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
14) ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये.
15)संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री 10 नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम, परीक्षेचे दिवस इ. सारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
16) निवडणुकीच्या काळात दारुचे वाटप केले जाणार नाही. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (100 मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही. तसेच, अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही.
17) जर सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती मतदार असेल तर, केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह त्याच्या/ तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील.
18) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.
सदरील सूची केवळ वानखीदाखल असून ती सर्वसमावेशक नाही. याबाबत कोणतीही शंका असल्यास भारत निवडणूक आयोग किंवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मान्यता घेण्यात यावी.
-जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate