कारखान्यात उत्पादनाच्या किंवा त्या अनुषंगाने केल्या जाणा-या कामात जी व्यक्ती वेतन किंवा वेतनाशिवाय, मालकास माहिती असो वा नसो, ती मुख्य मालकाकडून किंवा कंत्राटदाराकडून लावली गेली असेल तर, ती व्यक्ती कामगार या व्याख्येत येते. कारखाने अधिनियमाखाली सर्व फायदे कंत्राटदारामार्फत लावलेल्या कामगारांनाही मिळतात. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामगार असा भेदभाव केला जात नाही. कायम, तात्पुरत्या, बदली कामगार या सर्वांचा कामगार या संज्ञेत समावेश होतो.
ज्या आस्थापनेत १० किंवा १० पेक्षा जास्त कामगार अश्वशक्तीसह २० किंवा २० पेक्षा जास्त कामगार अश्वशक्तीचा वापर न करता उत्पादन प्रक्रियेत काम करतात त्या जागेचा कारखाना या संज्ञेत समावेश होतो. त्याचप्रमाणे शासनाने अधिसूचना काढून कामगारांची संख्या वरील संख्येपेक्षा कामी असून, ज्यात पॉवरलुमसारखे उद्योग, लाकूडकाम, करण्याच्या सॉ मिल्स, धोकादायक रसायने वापरून प्रक्रिया चालतात, अँस्बेस्टॉसचा वापर अशा जागांनासुद्धा कारखाने अधिनियम लागू केलेले आहेत. त्यामुळे धोकादायक काम चालणा-या लहान कारखान्यातील कामगारांना कायद्यानुसार फायदे मिळतात.
कारखाने अधिनियम, १९४८ खाली कायदेशीर परवाना असल्याशिवाय कोणत्याही भोगवटादाराला कोणत्याही जागेचा वापर कारखाना म्हणून करता येत नाही. म्हणून, कोणत्या जागेचा वापर कारखाना म्हणून करता येतो, हे जाणून घेणे नवीन उद्योजकांच्या अत्यंत महत्वाचे आहे.
नुतनीकरण अथवा नवीन परवान्यासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावीत :
ज्या जागेत कारखाना उभारावयाचा असेल त्या इमारतीच्या बांधकामाचे व यंत्रांच्या मांडणीचे नकाशे दोन प्रतीत नमुना क्र.१ सह १० रुपयांचा कोर्ट फी स्टँप लावून सादर केला पाहिजे. या अर्जासोबत खालील दस्तऐवज जोडले पाहिजेत :
नकाशामध्ये वायुविजन, आगीच्या वेळी सुटकेचे मार्ग, इमारतीची उंची, संयंत्र, यंत्रसामग्री व जाण्या-येण्याचा मार्ग, अशा प्रकारचा तपशील असावा. त्याचप्रमाणे, इमारतीचे आवश्यक स्तरछेद (सेक्शन्स) द्यावेत.
व्यवस्थापनाकडून नमुना क्रमांक २ पूर्ण भरून विहित शुल्कासह मिळाला असल्यास, कारखान्याचे नकाशे मंजूर करून घेतले असल्यास व संचालनालयाच्या अधिका-यांनी जागेस भेट दिल्यानंतर कारखान्याचे बांधकाम व यंत्रांची मांडणी नकाशाप्रमाणे आढळून आल्यास निरीक्षकांकडून परवाना देण्याविषयी सहाय्यक संचालकांमार्फत संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांच्याकडे शिफारस करण्यात येते व परवाना देण्यात येतो. परवान्याचे नूतनीकरण सहसंचालकांकडून होऊ शकते.
कारखान्याच्या नोंदणीसाठी व तो चालू करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी संचालनालयाकडे आपला अर्ज विहित नमुन्यात व खाली दर्शविलेल्या कागदपत्रांसोबत सादर केला पाहिजे :
परवान्याचे नूतनीकरण करण्याचा अर्ज नमुना २ प्रमाणे करून जरूर त्या नूतनीकरण फी सहित पाठविला पाहिजे. त्याला १० रुपयांचा कोर्ट फी स्टँप लावला पाहिजे. असा अर्ज करण्याची अखेरची तारीख प्रतिवर्षी ३१ ऑक्टोबर असते. मात्र त्या तारखेनंतर अर्ज केल्यास नूतनीकरणासाठी लागणा-या फी च्या दरमहा ५ टक्के वाढत्या दराने जास्तीत जास्त २५ टक्के अधिक फी भरावी लागते. कारखान्याचा परवाना एकाच वेळी १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वार्षिक विवरणपत्र नमुना २७ मध्ये १ फेब्रुवारी किंवा त्याच्या आत सादर केले पाहिजे.
कारखाने अधिनियमाखाली व्यवस्थापकास कोणत्या नोंदवह्या ठेवाव्या लागतात ?
प्रत्येक कारखान्याला खालीलप्रमाणे नोंदवह्या ठेवाव्या लागतात :
अ.क्र. |
शीर्षक |
नमुना क्र. |
1 |
प्रौढ कामगारांची नोंदवही |
नमुना १७ |
2 |
हजेरीपत्रक |
नमुना २९ |
3 |
अपघात व धोक्याच्या घटनांची नोंदवही |
नमुना ३० |
4 |
पगारी रजा नोंदवही |
नमुना २० |
5 |
चुना, रंग वगैरे दिल्याची नोंद |
नमुना ९ |
6 |
यंत्रसामग्रीवर लक्ष देणा-या कामगारांची नोंदवही |
नमुना १० |
7 |
निरीक्षण नोंदवही |
नमुना ३१ |
8 |
आरोग्य विषयक नोंदवही |
नमुना ७ |
त्याशिवाय महाराष्ट्र कारखाने अधिनियम, १९६३ खाली आरोग्यविषयक नोंदवह्या या नियमाखाली येणा-या नोंदवह्या कारखान्यात ठेवाव्या लागतात.
प्रौढ कामगारांच्या कामकाजाचा कालावधी नियम क्रमांक १६ मध्ये कारखान्यात सूचना फलकावर दर्शविण्यात यावा आणि त्याच्या दोन प्रती संचालनालयाच्या अधिका-यांना पाठवाव्यात. कारखाने अधिनियमानुसार जरूर असलेली सर्व माहिती असल्यास्वीहीत केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त इतर कायद्याखालील रजिस्टर संचालनालयाचे अधिकारी मान्य करू शकतात.
कामगाराचे जानेवारी ते डिसेंबर या वर्षात २४० दिवस भरले असतील किंवा वर्षाच्या मध्यास कामावर लागल्यास उरलेल्या वर्षाच्या १/२ दिवस भरल्यास त्यांना पुढील वर्षी २० दिवसाला १ पगारी रजा मिळू शकते. ही रजा मिळण्यासाठी कामगारांना किमान १५ दिवस आधी अर्ज करणे जरुरी असते. ही रजा त्याला ३० दिवसांपर्यंत साठविता येते. एखाद्या कामगारास कामावरुन कमी केल्यास किंवा नोकरी सोडली किंवा तो निवृत्त झाला अथवा सेवेत असतांना मरण पावल्यास त्याला किंवा त्याच्या वरसास पगारी रजेच्या ऐवजी वेतन देणे आवश्यक असते. कामावरुन कमी केल्यास किंवा नोकरी सोडल्यास असे वेतन दुस-या दिवशी द्यावे लागते. तर निवृत्तीनंतर अथवा सेवेत असतांना मरण पावल्यास हे वेतन दोन महिन्यांच्या आत द्यावे लागते. पगारी रजेविषयी २४० दिवसांचा निकष लावतांना ले ऑफच्या दिवसांचा कालावधी तसेच स्त्री कामगारांच्या बाबतीत १२ आठवडयांची बाळंतपणाची रजा हा कालावधी २४० दिवसांमध्ये कामावर उपस्थित म्हणनू अंतर्भूत केला जातो. व्यवस्थापनाने पगारी रजेविषयी नोंदी नमुना क्र.२० मध्ये ठेवायच्या असतात व पात्र कामगारांस २८ फेब्रुवारीपूर्वी नमुना क्र.२० मध्ये पगारी रजेचा काळ ठरवून द्यावयाचा असतो.
केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, संरक्षण विभाग, सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीतील कारखान्यांनासुध्दा या अधिनियमाखाली परवाना देणे आवश्यक असते .
जो अपघात प्राणघातक असेल किंवा ज्या गंभीर अपघातात शरीराचा एखादा अवयव गमवावा लागला असेल, कामगार बेशुध्द पडला असेल, भाजल्यामुळे भयंकर जखमा झाल्या असतील, किंवा धोकादायक घटना घडल्या असतील अशा अपघाताचे वृत्त संचालनालयाच्या अधिका-यांकडे ४ तासांच्या आत टेलिफोनने, तारेने वा खास संदेशवाहकातर्फे कळविले पाहिजे आणि १२ तासांच्या आत नमुना २४ मध्ये त्याचा लेखी अहवाल पाठविला पाहिजे. ज्या अपघातामुळे कामगार ४८ तास कामावर हजर राहू शकला नसेल त्याची माहिती त्यानंतरच्या पुढील २४ तासांच्या आत कळविणे आवश्यक आहे.
कारखाने अधिनियमानुसार १,००० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात सुरक्षा अधिका-याची नेमणूक करावी लागते. त्याचप्रमाणे ज्या उत्पादन प्रक्रियेत कामगारांना शारीरीक इजा, विषबाधा, व्यवसायजन्य रोग किंवा आरोग्यास बाधा होण्याची शक्यता असेल तर, कामगारांची संख्या कमी असूनही अशा कारखान्यांना शासन अधिसूचना काढून सुरक्षा अधिका-याविषयी तरतूद लागू करु शकते.
कारखान्याच्या व्यवस्थापनास खालीलप्रमाणे सुखसोई कराव्या लागतात.
अ.क्र. |
कामगारांची संख्या |
तरतुदी |
1 |
१५० |
विश्रांतीची खोली, जेवणाची खोली |
2 |
२५० पेक्षा अधिक |
उपाहारगृह |
3 |
५०० किंवा त्याहून अधिक |
कल्याण अधिकारी, अँम्ब्युलन्स |
4 |
३० किंवा त्याहून अधिक स्त्री कामगार असल्यास |
पाळणाघराची सुविधा |
5 |
१००० |
सुरक्षा अधिकारी |
या संचालनालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या कायद्याविषयी कोणत्याही आस्थापनेविषयीच्या तक्रारीबाबत योग्य ती ताबडतोब कारवाई करण्यात येते. संघटनेकडून कारखान्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींकडून निनावी किंवा दूरध्वनीवरुन तक्रार जरी झाली तरी संचालनालयाशी निगडीत असलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येते व जरुर ती कार्यवाही करण्यात येते. तक्रारकर्त्यास केलेल्या कार्यवाहीविषयी उत्तर देण्यात येते. याशिवाय विभागीय कार्यालयात तक्रार कक्ष आहे . तक्रारींची चौकशी करताना तक्रारकर्त्याविषयी गोपनीयता ठेवण्याची विशेष दक्षता बाळगण्यात येते.
महाराष्ट्र कारखाने अधिनियम, १९६३ च्या नियम ११४ खाली २४ अनुबंध आहेत. त्यातील इलेक्ट्रोप्लेटींग, शिशाच्या संपर्कात काम, ग्लास उत्पादन, शॉट ब्लास्टींग, कातडी कमावण्याचे काम, क्रोमिक अॅसिड, नायट्रो अमायनो कंपाऊंड, धोकादायक जंतुनाशके, अॅस्बेस्टॉस, मॅंगनिज, बेंझिन, रंग उत्पादन करणे, कापडाचे उत्पादन करणे, कर्कश आवाजात काम करण्याचे विभाग इत्यादी. या प्रकारच्या वातावरणात काम केल्यामुळे विषबाधा, फुफ्फुसाचे रोग, कॅन्सर, कर्णबधिरता असे व्यवसायजन्य रोग होऊ शकतात.
कारखाने अधिनियमाअंतर्गत कारखान्यात वापरण्यात येणा-या केन्स रोल पुली ब्लॉक्स मालाची व व्यक्तींची खाली-वर ने-आण करणारी उच्चालन यंत्रे व लिफ्ट्स, हवेच्या दाबापेक्षा जास्त दाबाखालील संयंत्रे, यांची विहित कालावधी नंतर सक्षम व्यक्तींकडून तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र अनुक्रमे नमुना क्रमांक १२ व १३ मध्ये द्यावे लागते. त्याचप्रमाणे, सक्षम व्यक्तींना सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन प्लांटची तपासणी तो चालू करण्यापूर्वी विहित कालावधी नंतर करून प्रमाणपत्र द्यावे लागते.
अर्हताप्राप्त व विहित अनुभव असलेल्या व्यक्तींना किंवा संस्थांना कारखाने अधिनियमा अंतर्गत तपासण्या, परीक्षणे करण्यासाठी संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य लेखी मान्यतापत्र देतात. अशा व्यक्तींना / संस्थांना "सक्षम व्यक्ती" म्हणून संबोधिले जाते.
स्त्री कामगारांना सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे. विविक्षित प्रक्रियांसाठी शासनाने अधिसूचना काढल्यास रात्री १० पर्यंत काम करता येते. त्याचप्रमाणे, पाळणाघर, उपहारगृहात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था अशा तरतुदी आहेत.
कारखाने अधिनियमाखाली स्त्री कामगारांच्या बाबतीतील बाबींकडे जास्त कटाक्षाने लक्ष दिले जाते. बॅटरी, काच, शिसे उत्पादन, शोत ब्लास्टिंग, कातडी कमावणे, कॉमिक अॅसिड, नायट्रोअमिनो संयुगाचे उत्पादन, धोकादायक जंतुनाशके, मँगेनीज, बेन्झिन, कॅन्सर होण्याची शक्यता असलेले पदार्थ वापरून रंग निर्मिती, इत्यादी प्रक्रीयात स्त्री कामगार व तरुण मुले लावण्यास कायद्याने मनाई आहे. कारखाने तपासणीच्या वेळी अशा प्रक्रीयात स्त्री कामगार / तरुण मुले लावली जात नाहीत हे पहिले जाते.
स्रोत : कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020