१. मुलांना रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक असते. जर जन्माची नोंद वेळेवर झाली असेल तर आरोग्य कर्मचारी या नोंदणीच्या आधारे बाळाला घरी येऊन रोगप्रतिबंधक लस देऊ शकतात.
२. माता बालसंगोपन, कुटुंबकल्याण नियोजन आणि प्रसुतीगृहाची व्यवस्था याची आखणी करण्यास या माहितीचा उपयोग होतो.
३. आईच्या पोटात बालकाची अपूर्ण वाढ झाल्यामुळे बालमृत्यू झाला असल्यास अथवा बालकाचा उपजत मृत्यु झाल्यास आरोग्य कर्मचारी अशा नोंदणीच्या आधारे घरी येऊन आरोग्य सल्ला देऊ शकतात किंवा पुढे कोणती काळजी घ्यावी याची माहितीही देऊ शकतात.
जन्म नोंदणीचे फायदे
शाळेत प्रवेश मिळविताना
प्रत्येक व्यक्तीला शाळेत प्रवेश देताना जन्मतारीख, वय, जन्म ठिकाण नागरिकत्व ही माहिती असणे आवश्यक असते. जर वेळेवर जन्माची नोंद झाली असेल तर वरील दाखला आपल्याला मिळतो व शाळेत मुलांना प्रवेश घेताना अडचणी येत नाहीत.
नोकरीत प्रवेश घेताना
नोकरीसाठी वयाची अट कायद्याने निश्चित व बंधनकारक केली आहे. नवीन नोकरीच्या वेळी व निवृत्ती घेताना वयाचा विचार केला जातो.
विमा उतरविताना
जेव्हा वैयक्तिक किंवा सामूहिक विमा उतरविला जातो. तेव्हा जन्माचा दाखला आवश्यक असतो. त्यामुळे त्य्क़ व्यक्तीचे नेमके वय किती हे समजते.
राष्ट्रीयत्व ठरविताना
जन्माची नोंद केल्यामुळे त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मठिकाण व राष्ट्रीयत्व ठरविले जाते. त्यावरून ती व्यक्ती कुठल्या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध होते.
मतदानाचा हक्क प्राप्त करून घेताना
प्रत्येक नागरिकाला १८ वर्षानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे त्याच्या जन्मतारखेवरून त्याला वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क प्राप्त होतो. त्या शिवाय त्याला मतदान करता येत नाही.
सैन्यात प्रवेश मिळविताना
सैन्यात प्रवेश घेताना जन्मतारीख, वय, जन्मठिकाण, नागरिकत्व इ. बाबतीत माहिती व पुरावा लागतो. त्यावरून सैन्यात प्रवेश दिला जातो.
निरनिराळे परवाने म्हणजेच लायसन्स मिळविताना
व्यापार, उदयोग, व्यवसाय, प्रवास यांचे निरनिराळे परवाने मिळविताना जन्माच्या दाखल्याची आवश्यकता असते. त्यावरून जन्मतारीख, वय, जन्मठिकाण, राष्ट्रीयत्व इ. बाबत माहिती मिळते. त्यामुळे जन्म दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
लग्नाचे वय
प्रत्येक व्यक्तीला विवाह करण्यासाठी कायद्याने वय निश्चित केलेले आहे. मुलाचे वय २१ वर्ष आणि मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाले असेल तर त्यांचा विवाह कायदेशीर मानला जातो आणि जन्मतारखेवरून त्यांचे वय निश्चित होते. त्यामुळे जन्माची नोंद होणे आवश्यक आहे.
पॅनकार्ड
पॅनकार्ड तयार करण्याकरिता जन्म तारखेची नोंद असणे आवश्यक असते. या दाखल्याचा उपयोग अशा प्रत्येक ठिकाणी होतो. जिथे वयाची अट घातलेली आहे. उदा. शाळा प्रवेश, आरटीओ, (व्हेईकल लायसन्स) वाहन परवाना, परदेशी जाण्याचा परवाना वगैरे. जन्माचा पुरावा या दाखल्यामुळे दाखविता येतो. त्याचा उपयोग ग्रामपंचायत अथवा स्थानिक निवडणुकीच्या वेळी मतदानाचा हक्क प्राप्त होण्याकरता उपयोग होऊ शकतो.
स्त्रोत : जन्म मृत्यू नोंदणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/29/2020