অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागो ग्राहक जागो...

जागो ग्राहक जागो...

प्रतिवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होतो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, तो अधिक सजग बनावा, फसविला जाऊ नये, यासाठी देशात, राज्यात ग्राहक पंचायत, ग्राहक मंच कार्यरत आहेत. ग्राहक दिनाच्या या पार्श्वभूमीवर ग्राहक हक्काबाबत घेतलेला आढावा...
ग्राहक हिताचे संरक्षण हा वैध मापन शास्त्र यंत्रणेचा मूळ उद्देश असून त्यासाठी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या व्यापारी आस्थापना आवेष्टक व उत्पादक, आयातदार आवेष्टनाचे काम करणाऱ्या आस्थापना, औद्योगिक संस्था यांना अचानक भेट देऊन वेळच्या वेळी तपासण्या केल्या जातात. त्यांच्याकडे वापरात ठेवलेली व ताब्यात असलेली वजने, मापे, तोलन व मापन उपकरणे यांची विहीत मुदतीत पडताळणी व मुद्रांकनाचे काम केले जाते. तसेच माल कमी देणे, ज्यादा किंमतीने मालाची विक्री करणे, खरेदीच्या वेळी ठरलेल्या मोजमापापेक्षा फसवणुकीने जादा माल घेणे यासारख्या वजनमापे कायद्याअंतर्गत तरतुदीच्या भंगाबद्दल संबंधितावर गुन्हे दाखल केले जातात.
ग्राहक या नात्याने, सुज्ञ नागरिकाने आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे, वैध मापनशास्त्र, म्हणजे वजन मापाचे शास्त्र. या यंत्रणेमार्फत पुढील अधिनियम व नियमांची अंमलबजावणी करण्यात येते वजने व मापे मानके अधिनियम 1976, वजने मापे मानके (आवेष्टीत वस्तू) नियम 1977, वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम 1985, महाराष्ट्र वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम 1987 प्रत्येक वस्तू मार्केटमध्ये वजने वा मापाने दिली जाते. हे करीत असताना व्यापाऱ्याने वजन बरोबर करुन दिले किंवा नाही, घेतलेली वस्तू द्रव स्वरुपात असेल तर ती बरोबर दिली किंवा नाही याबाबत या यंत्रणेकडून खातरजमा केली जाते. ही मेट्रीक पद्धत असून ती 1958 ला लागू झाली. पूर्वी लांबीची मोजणी फुटामध्ये व्हायची मात्र त्यावर कायद्याने बंधन घातले आहे.
एखादी वस्तू जर पॅकेटस् मध्ये बंद असेल तर त्या पॅकेटवर 6 गोष्टी असणे कायद्याने बंधनकारक आहे. 1) वस्तूच्या मॅन्युफॅक्चरचे नाव 2) त्या पॅकेट मध्ये काय आहे ? 3) वजन किती आहे?, युनिट असेल तर किती युनिटस् आहे ? 4) पॅकेटस् वर निर्मितीचा महिना व वर्ष. 5) अधिकतम विक्री किंमत...(सर्व करासहित) आणि 6) कन्झुमर केअर क्रमांक. बाजारात मिळणाऱ्या आयातीत वस्तु वर देखील त्यांच्या आयातदाराचे तसेच त्याची पॅकिंग करणाऱ्यांची (इम्पोर्ट व पॅकर) नावे व पत्ते असणे आवश्यक आहे. त्यापैकी एखादीही माहिती वस्तुवर नमूद नसेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. या गुन्ह्यासाठी कायद्यात शिक्षाही नमूद केली आहे. वरील प्रकारचे सर्व गुन्हे हे खात्यामार्फत समोपचाराने मिटविले जातात. संबंधितावर नोंदविलेल्या गुन्ह्यात त्यांनी आरोपाचा इन्कार केल्यास ते गुन्हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविला जातो.
वरील 6 गोष्टी पैकी एखाद्या पॅकेटवर आवश्यक माहिती लिहिली नसल्याचे आढळले तर त्या संदर्भात वैध मापन शास्त्र विभागास तक्रार करायला हवी. विभागाच्या नजिकच्या कार्यालयात, दुरध्वनीद्वारे किंवा इमेलद्वारे कोणताही ग्राहक तक्रार नोंदवू शकतो. ग्राहकांचे तक्रारी नुसार किंवा त्यांनी पुरविलेल्या माहिती नुसार विभागाचे निरीक्षक किंवा सहाय्यक नियंत्रक त्या दुकानावर छापा मारु शकतात. थोडक्यात कोणताही विक्रेता, दुकानदार आपली फसवणूक करणार नाही याची दक्षता जागरुक नागरिक या नात्याने प्रत्येक ग्राहकाने घ्यावी. ही दक्षता घेवूनही अपयश आल्यास आपल्या नजिकच्या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.
-फारुक र. बागवान
उप माहिती कार्यालय, पंढरपूर

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate