অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तरुण डॉट कॉम : वाटा लग्नाच्या

तरुण डॉट कॉम : वाटा लग्नाच्या

‘आमचं लग्न’ या विशेष विभागाअंतर्गत आपण आजवर तीन तरूण जोडप्यांना भेटलो. या तीनही जोडप्यांनी लग्नाच्या निर्णयावर येईपर्यंत काय विचार केला आणि तो कसा केला हे आपल्याला सांगितलं. परस्पर भेटीतून होणारा हा प्रवास रोचक असतोच, पण असं कुणी भेटलं नाही तर लग्न जमवायचा रूढ मार्ग स्वीकारावा लागतो. अर्थात या मार्गावरून जातानाही ‘पूर्वतयारी’ करून जाणं निश्चितच हिताचं असतं. या संदर्भातल्या अनुभवांविषयी लिहित आहेत ‘अनुरूप’ या प्रसिद्ध वधू-वर सूचक मंडळाच्या संचालक गौरी कानिटकर.

माझं लग्न मीच ठरवलेलं. झाली त्याला तीस एक वर्षं. पण फारसा विचार न करता ठरवलेलं. त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांना सामोरंही जायला लागलं. पण त्यातूनच कदाचित तावून सुलाखून निघाले. आयुष्याच्या एका विशिष्ट प्रगल्भ वयाच्या टप्प्यावर ‘अनुरूप विवाह संस्थे’मध्ये काम करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे घरचं काम या नात्याने त्याकडे पाहत होते. ही संस्था माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी १९७५ मध्ये सुरु केली. पण त्याचबरोबर माणसांमध्ये काम करायला मिळणार याचा विलक्षण आनंद होत होता. आत्तापर्यंत बँकेत रूक्ष विषयाशी गाठ पडलेली. जशी जशी या विषयात काम करायला सुरुवात केली, अनेक वधू- वरांशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या पालकांशीसुद्धा बोलायला सुरूवात केली तशी तशी या विषयाची व्याप्ती आणि खोली कळायला सुरूवात झाली आणि गंमत म्हणजे आमच्या दोघांच्या - मी आणि माझा नवरा महेंद्र नात्याविषयी मी अधिक खोलात जाऊन विचार करायला लागले. अजूनही वेळ गेली नाही, आपण आपलं सहजीवन अधिकाधिक फुलवू शकतो, असे विचार मनात यायला लागले आणि या विषयाकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलला. अनुरूप संस्थेत काम करण्यापूर्वी मी बँकेत काम करत होते. बँकेत काम करत असतानाच डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अनिता अवचट यांच्याशी स्नेह जुळला आणि त्यामुळे लग्न आणि सहजीवन या विषयाचे नवनवीन आयाम कळले. आजच्या आमच्या ‘अनुरूप’ या संस्थेमध्ये अशा समृद्ध विचारांचे बीज पेरण्यात या दोघांनी दिलेल्या विचारांचा मोठा वाटा आहे.

त्याच वेळी ठरवलं की आपण जे काम करणार आहोत, जो व्यवसाय करणार आहोत तो फक्त व्यवसाय असणार नाही, तर त्याबरोबरच अगोदरच मनात असलेलं सामाजिक बांधिलकीचं भान याच्याशी जोडायचं. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे मानसशास्त्राच जे शिक्षण घेतलंय त्याचीही जोडणी या विषयात करायची. मग मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इथे कामाला आला. प्रेमात पडून, पुरेसा वेळ एकमेकांबरोबर घालवून लग्नाच्या निर्णयापर्यंत पोचावं असं प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण आधी शिक्षण आणि नंतर पैसे मिळवण्यासाठी केलेले कोणतेही काम या संपूर्ण प्रवासात समविचारी कुणी भेटलाच नाही तर? आजकाल सगळ्याच महाविद्यालयीन मुला-मुलींना अनेक मित्र मैत्रिणी असतात. पण त्यातून त्यांना नवरा किंवा बायको ‘मटेरियल’वाले सापडतातच असे नाही. (आमच्याकडे येणार्‍या अनेक मुला मुलींनी हीच भाषा वापरली होती!)

खूप विचारपूर्वक स्वतःचा जीवनसाथी स्वतः शोधणारे तुलनेने खूप कमीजण असतात. कारण त्यासाठी लागणारी वैचारिक पार्श्वभूमी, वाचनाचे संस्कार, शिवाय घरातून मिळणारे संस्कार तसंच परिस्थितीमुळे केला जाणारा विचार या सगळ्याचा अंतर्भाव त्यामध्ये होत असतो. शिवाय असा कुणी भेटलाच नाही तर त्यांनी काय करावं? मग ठरवून केलेल्या विवाहामध्ये फक्त तो आणि तीच असतात का? अशा प्रकारच्या अरेंज्ड मॅरेजमध्ये कुटुंबियांची भूमिका काय? गंमत म्हणजे प्रत्यक्ष लग्नाच्या मुला-मुलीपेक्षा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्यांच्या लग्नामध्ये विलक्षण रस असतो. मग काय, लाडू कधी देताय? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. त्यांना लग्न तर करायचं असतं पण तसं योग्य कुणी भेटत पण नाही, त्यात मनाशी असणार्‍या अटींचा/अपेक्षांचा गुंता, पैशाला आलेलं अवास्तव महत्त्व, घरातली मोठी माणसे, आई वडील आणि अनेकदा आपलेच मित्र मैत्रिणी यांच्या विचारांचा वरचष्मा यामध्ये गुंतायला झालं तर नवल वाटायला नको. मनातला गुंता वाढत जातो. खूप काय काय गोष्टी वाचलेल्या, ऐकलेल्या असतात. अशा वेळी अनेकदा दोन दोन डिग्र्या घेतलेल्या सुशिक्षित मुलामुलींचा गोंधळ नाही झाला तरच नवल.

फक्त डेटिंग साईटवरून लग्न कसं जमवत असतील? आणि याचा पुरेसा विचार सध्याची मुलं- मुली करतायत का? ‘लग्न म्हणजे नेमकं काय?’ हा प्रश्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाला विचारलाय का? त्यांच्या पालकांनी तरी त्यांना विचारलाय का? पालकांशी बोलताना जाणवलं की पालकांनी तरी स्वतःच्या आयुष्यात स्वतःला विचारलं का? असं स्वतःलाच विचारावं असं त्यांना वाटलं असेल का? मागील पानावरून पुढे आयुष्य नेताना त्यांना काय वाटत असेल? त्रास होत असेल का? पालकांशी मुलामुलींच नातं कस असतं? पालकांशी मुलंमुली मोकळेपणी बोलत असतील का? मनात येणारी प्रत्येक गोष्ट शेअर केली जात असेल का? अशा कित्येक गोष्टींचा विचार माझ्या मनात सातत्याने येत होता.

गेल्या तीनही अंकांमध्ये खूप विचारपूर्वक स्वतःचे लग्न ठरवलेल्या तीन जोड्यांचे विचार, त्यांची मते आपण वाचली. ते वाचताना सगळच खूप छान आणि उत्साहवर्धक होतं. किती छान ना असं करायला मिळालं तर? असाही विचार मनात येईल. पण असा खोलात जाऊन विचार करणारे तरुण-तरुणी किती असतील? शंभरात १० सुद्धा असतील की नाही अशी मला शंका वाटते. मग जे तरुण अशा स्वतःच्या लग्नासंबंधी, पर्यायाने स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करण्याच्या विषयापासून कित्येक योजने दूर आहेत त्यांनी काय करावे? कसा शोधावा आपला जोडीदार? त्यांच्याबद्दल काय करावे? त्यांचे वैवाहिक आयुष्य ते कसे घालवत असतील? असे विचार जेव्हा जेव्हा मी करत असते त्यावेळी मन अधिकाधिक खोलात शिरायचा प्रयत्न करतं.

साधारणपणे ज्यावेळी यंदा कर्तव्य आहे असं आपल्या लग्नेच्छू मुला-मुलीच्या बाबतीत बोलले जाते त्यावेळी प्रथम कुठल्यातरी विवाहासंस्थेमध्ये नाव नोंदवले जाते. आता ओळखीतून लग्न ठरण्याची प्रथा तशी कमीच झाली आहे. लग्न स्वतःच स्वतः ठरवलं नाही किंवा ठरलं नाही तर विवाहसंस्थेत नाव नोंदवणं (ऑनलाईन किंवा ऑफलाईन) याला फारसा काही चॉईस नसतो. एकदा ही गोष्ट स्वीकारली की त्याच्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी त्याबरोबर आपोआपच येतात. म्हणजे उदा. त्या विवाहसंस्थेमधला फॉर्म भरणं, त्याबरोबर फोटो आणि पत्रिका देणं, अपेक्षा मुद्देसूद लिहिणं इ. यानंतर स्थळ संशोधनाला सुरुवात होते. नवीन पद्धतीनुसार वेबसाईटवरून किंवा रीतसर त्या संस्थेत जाऊन स्थळे आणली जातात. ठरवून केलेल्या विवाहामध्ये पालकांची भूमिका फार मोलाची ठरते. या पद्धतीच्या विवाहामध्ये कुंडली तथा पत्रिका या गोष्टीला आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक वेळेला फक्त पालकच नाहीत तर खूप शिकलेली मुलेमुली देखील पत्रिका पाहण्याचा आग्रह धरताना दिसतात. मग एकदा कुंडली जमली, अपेक्षा जमल्या की कांदेपोह्याचा कार्यक्रम.

एक दिवस वैभव आला होता ऑफिसमध्ये मला भेटायला. वैभवला असं कुठल्याही पारंपरिक पद्धतीने स्वतःचे लग्न ठरवायचे नव्हते. कांदेपोहे वगैरे अजिबातच मान्य नव्हतं त्याला. मी त्याला म्हटलं, अगदी मान्य. ती प्रोसेस खरंच छान नाहीये. कुणालाच ती नाही आवडत. पण जोडीदार निवडीची प्रक्रिया तणावरहित करायची असेल तर आत्मपरीक्षणाची गरज आहे याचा तू विचार केला आहेस का? आणि जोडीदार निवडण्यासाठी दुसरा काहीच पर्याय नसेल तर आपण काय करू शकतो? तीच पूर्वीची कांदे पोह्याची पद्धत आपण सुकर करू शकतो का? त्याऐवजी तुम्ही दोघेजण जर बाहेर कुठेतरी भेटलात तर? आणि त्या भेटीमध्ये काय बोलायचं याचंही नियोजन करून तयारी करून गेलास तर हीच प्रक्रिया तुलनेनं सोपी होणार नाही का? असं म्हणून फक्त वधू-वरांनीच भरायचा आम्ही खास डिझाईन केलेला फॉर्म मी त्याच्यासमोर टाकला. वाचताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत होते. तो म्हणाला, बाप रे! मी या सगळ्या मुद्द्यांचा विचारच नव्हता केलेला. मी परत येईन जरा जास्त गप्पा मारायला तुमच्याकडे. जरूर! मी हसून म्हटल.

या मुलामुलींनी स्वतःच्या लग्नाबाबत विचार करावा म्हणून वधू-वरांशी गप्पांचे अनेक कार्यक्रम सातत्याने आम्ही आयोजित करतो. गेल्याच महिन्यात असा गप्पांचा कार्यक्रम झाला. या गप्पांमधून काही ठळक मुद्दे समोर आले.
मुलामुलींच्या आपसातल्या भेटीचा कार्यक्रम खूपच औपचारिक होतो. बायोडेटामध्ये जे दिलेलं असतं तेच विचारलं जातं. स्वतंत्रपणे बोलायला पालक पुरेसा वेळ देत नाहीत. लगेच निर्णयाची मागणी असते. हे मुद्दे बहुतेक सर्वांच्या बोलण्यात होते. खरं तर अशा प्रत्येक पाहण्याच्या-सॉरी-भेटण्याच्या कार्यक्रमाअगोदर मुलगा आणि मुलगी यांनी दोघांनी एकमेकांविषयी पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मुला-मुलीची स्वतःबद्दलची प्रतिमा काय आहे, त्यांची लाइफस्टाइल कशी आहे? आयुष्याची पायाभूत तत्त्वे म्हणजेच नेमकी जीवनमूल्ये कोणती याची माहिती करून घ्यायला हवी. प्रत्यक्षातली व्यक्ती आणि फोटोमधली व्यक्ती वेगवेगळी असणार आहे याची मनाशी पक्की खूणगाठ बांधायला हवी. लग्न ठरवण्यापूर्वी किमान चार-पाच भेटी त्या मुला-मुलीने घ्यायला हव्यात असं आम्ही सुचवतो. त्या भेटींदरम्यान काय बोलायचं याचाही आराखडा ठरवायला हवा. आणि अशा भेटी घ्यायला पालकांनी संमती द्यायला हवी. शारीरिक अनुरूपता, वेगवेगळ्या असलेल्या सवयी, भविष्याबद्दल केलेला विचार, वर्ण हा मुद्दा तितका महत्वाचा आहे की नाही याचा विचार करणेही अगत्याचे आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःच्या स्वभावाची ओळख या निमित्ताने करून घेणं हा मैलाचा दगड ठरावा. मी नेमका/नेमकी कसा/कशी आहे? मला हवेच असणारे नेमके मुद्दे कोणते आणि कोणत्या गोष्टींबाबत मी तडजोड करूच शकत नाही याचा विचार स्वतःच्या मनाशी हवाच हवा. कोणतीही घटना घडली तरी त्याचा सामना करायला मी सक्षम आहे का?

मानसी म्हणाली, लग्नानंतर माझ्या आई-वडिलांना मी माझ्या पगारातली काही रक्कम देणार आहे. या माझ्या निर्णयामध्ये त्याने मध्ये येण्याचे कारण नाही. त्यात मी तडजोड नाही करणार. खरं तर याचा संपूर्ण विचार मनाशी करून त्याचा लेखी अभ्यासच करायला हवा. जोडीदार निवडीच्या संदर्भात अनेकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता बरीच आहे. पालकांच्या मनामध्ये चिंता आहेत आणि या चिंता अनेकदा इतरांच्या अनुभवावर आधारित असतात. बाह्य गोष्टींबाबत जास्त चिकित्सा दिसते. मुलगी विचार करते तेव्हा त्याचे शिक्षण, दर महिना हातात येणारा पगार, स्वतःचे घर आहे का नाही, त्याच्यावर जबाबदारी नाही ना याचा प्रमुख्याने विचार करते. या सोबत त्याचं दिसणं, लुक्स हाही विचार असतो. थोडक्यात सांगायचा तर सर्वगुणसंपन्न जोडीदार हवा असतो. आमच्या एका कार्यशाळेत याबद्दलचं स्पष्टीकरण विचारलं - असा सर्वगुणसंपन्न जोडीदार मिळणं खूप अवघड आहे हे समजत असूनही हा अट्टाहास का आहे ? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मुला-मुलींना देता आलं नाही. आपल्या जोडीदाराचा शोध घेत असताना आपण सगळेजण सातत्याने बदलणारे आहोत हे विसरून चालणार नाही. बदल ही एकच स्थिर गोष्ट आहे. लग्नाच्या बाबतीत तर हा संक्रमणाचा काळ आहे. असुरक्षितता आणि भीती यातून मुक्त होण्यासाठी वस्तुस्थितीला धरून विचार करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.

लग्नानंतर माझं आयुष्य बदलणार आहे, याची कल्पना मला आहे का? कोणत्याही मुलीला तिचा नवरा आज मित्र म्हणून हवाय. ती त्याच्याशी जेव्हा लग्नाच्या दृष्टीने गप्पा मारते तेव्हा ती फक्त त्याचाच विचार करत असते . पण तो मात्र ही मुलगी माझ्या घरात सूट होईल का, तिचे आईशी जमेल का, आईला ती आवडेल का हा विचार करत असतो. दोघांच्या दृष्टिकोनाबाबत हा मूलभूत फरक असतो. आपल्याकडे मुलामुलींच्या लग्नासंदर्भात पालक हा घटक खूपच महत्त्वाचा ठरतो. आता पालक मुलांच्या निर्णयाच्या आड येत नाहीत, पण कित्येकदा मुलगा किंवा मुलगी एखादे स्थळ नाकारत असेल तर पालकांना सगळ चांगलं असून हा/ही स्थळ का नाकारत आहेत याचा शोध काही लागत नाही. आणि मग बर्‍याच घरांमध्ये यावरून वादविवाद होताना दिसतात. छोटीशी कमतरताही मुलामुलींना चालत नाही. असे असले की स्थळ नाकारले जाते आणि लग्न लांबणीवर पडते. आपल्या मनातही काही पक्क्या समजुती असतात. उदा. नेव्हीमध्ये काम करणार्‍या मुलाला ड्रिंक्सची सवय असते, किंवा वकिलीचे शिक्षण घेतलेली मुलगी भांडकुदळ असते इ. पालक त्यांच्या भावी जावयाबाबत किंवा भावी सुनेबाबत खूप आग्रही असलेले दिसतात. जावई आणि सून हा/ही कसा/कशी असावी याबाबत त्यांच्या ठाम कल्पना असतात. खरं तर बदलत्या काळानुसार पालकांनी बदलणं गरजेचं आहे. पालकांच्या मनात असलेल्या तुलना तर कित्येकदा अवास्तव अशा असतात.


आधुनिक काळात पत्रिकेसारख्या विषयाला किती महत्व द्यायचे ते ठरवायला हवे. त्यापेक्षा मानसशास्त्रातली परस्पर पूरकता चाचणी (compatible test) ला महत्त्व द्यावे का? याचाही विचार व्हायला हवा. विवाहपूर्व समुपदेशनात या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते. मला कल्पना आहे की हे सगळं वाचताना कदाचित काहींना हे प्राथमिक वाटेल, कृत्रिम वाटेल. पण लग्न करणं आणि ते निभावून नेणं ही जन्मजात येणारी गोष्ट नाही. तर ती गोष्ट शिकावी लागते. ते एक कौशल्य आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार लग्न जमवताना करायला हवा. लग्न जमल्यानंतर एकमेकांकडे निदान चार दिवसांसाठी जरूर राहायला जावे. घराची शिस्त, माणसांचे स्वभाव, घरातल्या पद्धती या राहायला गेल्यावरच समजू शकतात. याचा विचार नक्की करावा. लग्नानंतर बदलणार्‍या भूमिकेचा विचारही महत्वाचाच. एकदा का लग्न ठरले की साहजिकच त्याचा सोहळा करण्याकडे अनेकांचा कल दिसतो. इथे देखील विचारांची स्पष्टता हवी. मला माझं लग्न कसं झालेलं आवडेल याचा विचार हवा. लग्नात किती खर्च करायचा आहे याचाही विचार हवाच.

आपल्या मुलांची लग्न ठरत किंवा होत असताना पालक म्हणून आपली भूमिका बदलणार आहे याचं भान पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या संसारात आपले स्थान काय असणार आहे हा विचार आवश्यक आहे. सध्याच्या काळात बहुतांश संसार पालकांच्या हस्तक्षेपामुळे बिघडताना दिसतात.
‘अनुरूप’तर्फे यासाठी विविध परिसंवाद आयोजित केले जातात. -
पालकांसाठी
लग्न मुलामुलींची चिंता पालकांची
लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल
धास्तावलेल्या वरमाया आणि अचंबित वर
सासू सासरे होताना....
मुला-मुलींसाठी :
शोध अनुरूप जोडीदाराचा
रंग भावनांचे .....
लग्नापूर्वीच हे शिकायला हवं....
रिलेशनशिप : मनातलं ओठावर...
गप्पा वधुवराशी :
निर्णय पटकन घ्यायला काय घ्याल ?
या परिसंवादामध्ये डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. वैजयंती खानविलकर, डॉ. शशांक सामक, डॉ. विद्या दामले, डॉ. सरिता काकतकर, डॉ. मकरंद ठोंबरे असे अनेक डॉक्टर तसेच अनुराधा करकरे, मुक्ता पुणतांबेकर, अश्विनी लाटकर असे अनेक समुपदेशक सहभागी होतात.
इतका सगळा विचार करताना नक्कीच जाणवतं की सध्या लग्न जमणं जिकिरीची बाब बनत चालली आहे. पण विचारधारा पक्की असेल आणि त्याचा अभ्यास स्वतःसाठी केलेला असेल तर हा अभ्यास रंजकच ठरेल. हो ना? तुम्हाला काय वाटतं?
----
गौरी कानिटकर
चलभाष : ९८९०००१३३०
chaitragaur@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate