অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निशाणी अभिमानाची!

निशाणी अभिमानाची!

साधारणत: सकाळी दहाची वेळ. उपविभागीय कार्यालयात स्वीप-2 कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जागृतीसाठी प्रशासनामार्फत बनविण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते करण्यात येणार होता. त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार व इतर सर्वांमध्ये एक उत्साह संचारलेला दिसत होता.
मतदार जागृती विषयक विविध प्रकारची घोषवाक्ये असलेल्या बॅनर्संनी हा चित्ररथ सजवला जात होता. मताची किंमत नाही घेणार, मत मात्र जरुर देणार; ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर; सर्वांचे ऐकून घ्या, सर्वांचे जाणून घ्या, निर्णय मात्र मनाचाच घ्या; मतदार असल्याचा अभिमान, मतदानाकरिता सज्ज व ही निशानी अभिमानाची आहे, आदी घोषवाक्यांचा त्यामध्ये समावेश होता.
वरील आकर्षक, मनाला भिडणाऱ्या व तरुणाईला आकर्षित करणाऱ्या मतदार जागृतीच्या घोषवाक्यांनी चित्ररथ सजला होता. या सर्व घोषवाक्यांमधील…. ‘ही निशानी अभिमानाची आहे’. या घोषवाक्याने येथे उपस्थित असलेल्यांचे व माझेही लक्ष व मन आकर्षित करुन घेतले. ही निशाणी अभिमानाची आहे, हे वाक्य मनावर खोलवर रुजत गेले व वाटले की, खरेच दिनांक 15 ऑक्टोबर 2014 ला प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या बळकटीकरणात आपला सहभाग नोंदविण्याचा हक्क मिळणार आहे. हा हक्क बजावित असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला जी निशाणी लावली जाणार आहे, ती मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेने दिलेले कर्तव्य बजाविण्याची अर्थातच अभिमानाची निशाणी ठरणार आहे.
प्रत्येक नागरिक आपल्या अधिकाराबाबत सजग असतो. मात्र, आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असतो. लोकशाही प्रक्रियेत सामर्थ्यशाली राष्ट्राच्या निर्मितीकरिता लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक मतदारांने मतदानाचा हक्क बजावण्याचे आपले कर्तव्य पार पाडल्यास लोकशाही अधिक सुदृढ होऊन राष्ट्र सामर्थ्यवान बनेल यात तीळमात्र शंका नाही, असा विचार मनात घोंगावत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाले. त्यांनी मतदार जागृती चित्ररथाची पाहणी केली. या रथावरील मतदार जागृतीविषयक आकर्षक घोषवाक्य पाहून त्यांनी कौतुकही केले. त्यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मतदार जागृती अभियानाचा शुभारंभ केला. या चित्ररथातील कर्मचाऱ्यांना नवमतदार व महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी सूचित केले.
हे सर्व पाहून मला असे वाटत होते की, मतदार जागृती करुन मतदानाच्या एकूण टक्केवारीत वाढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व उत्स्फूर्तपणे सहभागासाठी प्रशासन नियोजनबद्धरित्या सरसावलेले आहे. प्रशासनाचे हे मतदार जागृती अभियान यशस्वी होण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने आपले मतदान करण्याचे कर्तव्य बजावण्याची. विकासाच्या मार्गावर जात असताना एका सुज्ञ, जागरुक, चांगल्या व योग्य उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबून आपला हक्क बजावण्याची.
त्या अर्थाने हाताच्या बोटावर लावण्यात आलेली शाईची निशाणी ही अभिमानाची आहे, असे आपले मन आपल्यास सांगेल. तर उठा, चला, प्रत्येकास अभिमान वाटेल असे राष्ट्र घडविण्यासाठी येणाऱ्या 15 ऑक्टोबरला मतदानाचे कर्तव्य पार पाडून "ही निशाणी अभिमानाची आहे!" असे सर्व जगाला आपल्या कृतीतून दाखवू या !
लेखक - सुनिल सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.

स्त्रोत : महान्यूज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate