मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यू. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला. बातमी तर दुख:द होतीच पण या बातमीसोबतच्या छायाचित्राने अंत:करण पुरे हेलावून गेले. समुद्रकिनारी स्थानिकांच्या मदतीने समुद्रातून शोधून काढलेले ते मृतदेह छायाचित्रात पहातानाही क्लेष झाला. केवळ आणि केवळ अतिउत्साहापोटी लावलेल्या जीवघेण्या पैजा (अर्थातच पैज कोणती हे समजून घेण्याची बाब आहे) आणि त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा विषयक सूचनांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष हेच सर्वनाशास कारणीभूत ठरले.
असो… अन्य पर्यटकांनी सावध व्हावे, दक्ष रहावे यासाठी अशा प्रकारच्या बातम्या व छायाचित्रे महत्त्वाचे काम करतात. केवळ याच वर्षी व आत्ताच नव्हे तर यापूर्वीही अनेक वेळा मन विषन्न करणाऱ्या अशा बातम्या आपण वाचलेल्या आहेतच. तरीही असे का घडते? याचाही विचार पर्यटनास जाताना व्हायलाच हवा.
परवा पालकमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला मुरूड-जंजिरा येथे जाताना काशिद बिचवर असलेल्या एका माहितीफलकाने लक्ष वेधून घेतले. ग्रामपंचायतीच्या वतीने बिचवर पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल अशा ठिकाणी हा माहिती फलक लावलेला आहे. या फलकावर सुरक्षेच्या सूचना असून गेल्या काही वर्षात बिचवर अतिउत्साहाने बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची आकडेवारी देखील दिली आहे. तसेच स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की, आपला जीव महत्त्वाचा असल्याने पर्यटकांनी समुद्राकाठी निसर्गाचा आनंद घेऊन सागरी सुरक्षा दलास सहकार्य करावे. पावसाळ्यामध्ये खवळलेल्या समुद्रात पोहणे धोक्याचे असल्यामुळे काशिद ग्रामपंचायतीने जून ते सप्टेंबर अखेर समुद्रात पोहण्यास बंदी घातली आहे. समुद्रात पोहताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ग्रुप-ग्रामपंचायत काशिद यांच्या हुकुमावरुन मद्य प्राशन करण्यास मनाई आहे, असेही येथे नमूद करण्यात आले आहे.
येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने सावधान करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने नक्कीच आपले कार्य केलेले आहे. अशा फलकाचा फायदा हजारो पर्यटकांना नक्कीच झाला असेल. मात्र, दुर्लक्ष केल्याचा तोटाही काही अतिउत्साही पर्यटकांना भोगावा लागला. त्या दुर्लक्षतेचे दूरगामी परिणाम पहावयास ते दुर्दैवी जीव हयात नसतील. मात्र त्यांचे कुटुंबीय ते भोगत असतील, याचे फार वाईट वाटते. म्हणूनच जनजागृतीच्या दृष्टीने फर्स्ट पर्सन लिहिण्याचा हा प्रपंच करीत आहे.
शासनाच्या वतीने अर्थातच स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन धोका निर्माण होऊ शकणाऱ्या सर्वच पर्यटनस्थळी सुरक्षाविषयक माहिती फलक लावलेले असतात. त्याखेरीज स्थानिक परिस्थितीनुसार आपत्ती निवारणाची सोय देखील करण्यात येते. पण हे फार मोठ्या प्रमाणात करणे शक्य होत नाही. त्याला काही मर्यादा पडतात. तेथील स्थानिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडेही कळत नकळतपणे दुर्लक्ष केले जाते आणि मग अपघात घडल्यावर 'डोळे उघडून' काय उपयोग?
अशा माहिती फलकांकडे किती गंभीरतेने पहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही आपण या बोर्डाकडे, सूचनांकडे दुर्लक्ष करुन पुढे गेलो तर... तर काय! जे होईल त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतील. आनंदासाठी पर्यटन आणि पर्यटनाचा आनंद घेताना स्वत:ची काळजी घ्यायलाच हवी. म्हणूनच म्हणावेसे वाटते, की 'नो एन्ट्री!' फलक दिसेल तिथे, 'पुढे धोका आहे', हे निश्चित ओळखावे.
राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/22/2020
सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्त...
स्त्री आणि पुरुष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही च...
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहे...
अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला... देखा पिलास...