অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुपतिकत्व

बहुपतिकत्व

बहुपतिकत्व

एकाच स्त्रीचा दोन किंवा अधिक पुरूषांशी विवाह होऊन, त्या पतींचे सहअस्तित्व म्हणजे बहुपतिकत्व. पहिला पती मृत झाल्यानंतर दुसऱ्या पुरूषाशी विवाह केला किंवा दुसऱ्या पतीशी घटस्फोट घेऊन तिसऱ्या पुरूषाबरोबर विवाह केला, तर त्यास बहुपतिकत्व म्हणता येणार नाही. बहुपतिकत्वाच्या रूढीत स्त्रीच्या अनेक पतींचे अस्तित्व आणि त्यांचा तिच्यावरील नवरेपणाचा अधिकार यांचा अंतर्भाव होतो. स्त्रीचे सर्व पती एकाच कुटुंबातील असू शकतात, ते एकमेकांचे बंधू असू शकतात किंवा एकमेकांशी कोणतेही नातेसंबंध नसणारे पुरूषही तिचे पती असू शकतात. यावरून ‘बांधविक बहुपतिकत्व’ आणि ‘अबांधविक बहुपतिकत्व’ अशा दोन संज्ञा मानवशास्त्रज्ञांनी निश्चित केलेल्या आहेत. बहुपतिकत्वामध्ये कुटुंबातील सर्व पुरूषांची एकच सामायिक स्त्री असते असे नाही, तर अनेक स्त्रियांशी जरी कुटुबांतील पुरूषांनी प्रसंगी विवाह केला, तरी त्या सर्व स्त्रिया सर्व पुरूषांच्या सामायिक बायकाही असू शकतात.

हुपतिकत्वाची चाल जगातील फार थोड्या मानवी समूहांत आढळून येते. आधुनिकीकरणाच्या नव्या प्रवाहात ते मानवसमूहदेखील आता एकविवाहपद्धती स्वीकारीत आहेत. तिबेटमध्ये बहुपतिकत्व प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पॉलिनीशियामदील मार्केजियन जमातीत, आफ्रिकेतील ⇨ बांतू व बहामा जमातींत त्याचप्रमाणे भारतातील ⇨ खस, इरवन, कुर्गी, ⇨ तोडा, ⇨ कोटा इ. जमातीत बहुपतिकत्वाच्या चालींचे अस्तित्व दिसून येते. आदी द्राविड आणि द्राविड संस्कृतींत बहुपतिकत्व असावे. महाभारतातील द्रौपदीचा पाच पांडवांशी झालेला विवाह हे बहुपतिकत्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जाते, या विवाहाच्या संदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही मते महाभारतातच आढळतात. परंतु एवढे एक उदाहरण सोडले, तर बहुपतिकत्व म्हणता येईल अशी घटना भारतीय वाङ्‌मयात फारशी कोठे आढळून येत नाही. पतीच्या मृत्यूनंतर ⇨नियोगासाठी स्त्रीच्या दिराची अथवा कुळातील एखाद्या पुरूषाची योजना केली जाई, पण त्या दोघांचे वैवाहिक संबंध निर्माण होत नसत. पतीच्या मृत्यूनंतर किंवा पती परागंदा झाला असल्यास, स्वतःच्या धाकट्या दिराशी स्त्रीने विवाह करण्यास कौटिल्याने मान्यता दिलेली आहे. देवर-विवाहाला बंदी करणारी वचनेही स्मृतींमधून आढळतात. वरील उदाहरणांवरून लक्षात येते की, आदी द्राविड संस्कृतींतून बहुपतिकत्वाच्या चालत आलेल्या परंपरा कालांतराने नष्ट झाल्या. आर्यांच्या नीतिमूल्यांचा प्रभाव वाढत गेला, तसे हे परिवर्तन घडून आले. भारतातील व इतर देशांतील काही जमातींमध्ये देवर-विवाहाची चाल आढळून येते, ती बहुपतिकत्वाच्या रूढीचाच अवशेष आहे.

केरळमधील नायर, इरवन. निलगिरी पर्वताच्या सान्निध्यात राहणारी तोडा, कोटा त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील डेहराडून जिल्ह्यात राहणारी खस या जमातींमध्ये बहुपतिकत्वाची प्रथा होती. विसाव्या शतकात ती बंद होत चालली आहे. वरीलपैकी खस, इरवन, तोडा, कोटा या जमातींमध्ये पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून नायर जमातच फक्त मातृसत्ताक पद्धती असणारी आहे. खस, इरवन, कोटा या जमाती बांधविक बहुपतिकत्व असणाऱ्या आहेत; म्हणजे या जमातीत स्त्रीचे सर्व पती हे एकमेकांचे सख्खे भाऊ असतात. स्त्रीचा विवाह तिच्या पतींपैकी ज्येष्ठ भाऊ जो असेल त्याच्याशीच होतो. त्यावेळी सर्व धाकटे भाऊ त्याच्या शेजारी बसलेले असतात. ज्येष्ठ भावाची पत्नी सर्वांचीच पत्नी समजली जाते. पहिली स्त्री निपुत्रिक ठरली किंवा काही कारणाने दुसरी स्त्री करण्याचा प्रसंग आला, तर पुन्हा ज्येष्ठ भावाचाच विवाह होतो व तीदेखील सर्वांचीच पत्नी मानली जाते. अनेक भाऊ मिळून एका स्त्रीशी विवाहबद्ध होत असले आणि सर्वांचा तिच्यावर लैगिंक हक्क असला, तरी जन्माला येणाऱ्या अपत्याचे पितृत्व ज्येष्ठ भावाकडेच असते. तोडा जमातीने मात्र पितृत्वाची समस्या वेगळ्याच मार्गाने सोडवली आहे. स्त्री गरोदर राहिली, की तिच्याशी संबंध असलेला पुरूष तिला धनुष्यबाण देण्याचा विधी करतो. याला ‘पुरसुतपिमी’ म्हणतात. जो पुरूष हा विधी करील तो जन्माला येणाऱ्या अपत्याचा पिता. तोडा स्त्रीचे पती हे एकाच कुळातील असतात, असे नाही. त्यांच्यांत अबांधविक बहुपतिकत्वही आहे.

बांधविक बहुपतिकत्व असणारी दुसरी जमात ही नायर जमात होय. नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मण कुळातील मुलांशी नायर मुलींचे अनुलोम पद्धतीने विवाह होत. काही वेळा ही विवाहबंधने अत्यंत शिथिल अशा स्वरूपाची असत. नंपूतिरी ब्राह्मण ही जमात पितृसत्ताक पद्धती असणारी व कुटुंबातील केवळ वडील मुलालाच स्वजातीय मुलीशी वैदिक पद्धतीने विवाह करण्याचा अधिकार मान्य करणारी, अशी जमात होती. इतर भावांना वैदिक पद्धतीने विवाह करण्यास बंदी असल्यामुळे स्वजातीय मुलीशी विवाह करता येत नव्हता. म्हणून इतर भाऊ नायर या नंपूतिरीच्या तुलनेत कनिष्ठ समजल्या गेलेल्या जातीतील मुलींशी ‘संबंधम्’ ठेवू लागले. नायर समाजात आता मात्र बहुपतिकत्व राहिलेले नाही.

मातृसत्ताक पद्धती व बहुपतिकत्व असणाऱ्या नायरांसारख्या जमातीत पुरूषांचे स्थान स्त्रीच्या तुलनेत दुय्यम राहत असे. वारसाहक्क व वंश स्त्रीपरंपरेकडून येत असे. विवाहबंधने पितृसत्ताक कुटुंबपद्धतीसारखी कडक नसत. नायर जमातीत स्त्रीला ऋतुप्राप्ती होण्यापूर्वीच जमातीतील एखाद्या सदस्याकडून तिच्या गळ्यात ताळी किंवा सोन्याचा ताईत बांधण्याचा समारंभ होत असे. याला ‘ताळी-केडू-कल्याणम्’ म्हणत. ताळी बांधणारा पती समजला जात असला, तरी त्या मुलीशी तीन दिवसांपेक्षा जास्त वैवाहिक संबंध टिकून राहत नसत. पुढे ती मुलगी नायर जातीतील तरूणाशी किंवा नंपूतिरी ब्राह्मणाशी संबंध ठेवण्यास मोकळी असे. हा संबंधम् ठेवणारा ब्राह्मण केवळ लैंगिक हक्कच मिळवीत असे. तरवाडच्या म्हणजे नायर कुटुंबाच्या मालमत्तेवर त्याचा काहीही हक्क नसे.

हुपतिकत्व या चालीचा उगम काय असेल हे सांगणे अवघड आहे. जमातीतील स्त्री-पुरूषांची विषमसंख्या हे एक कारण सांगितले जाते. काही जमातींत मुलगी जन्माला आली की तिला ठार करीत. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असे. त्यामुळे बहुपतिकत्वाची चाल निर्माण झाली असे सांगितले जाते. परंतु सर्वच जमातींबद्दल असे म्हणता येणार नाही. कुटुंबाची मालमत्ता विभागली जाऊन तिचे तुकडे होऊ नयेत, ती एकसंघ राहावी हेदेखील कारण असू शकते. प्रत्येक भावाचा स्वतंत्र विवाह झाल्यास त्याची संतती आणि पती व पत्नी यांचे स्वतंत्र कुटुंब निर्माण होऊन संपत्ती विभागली जाईल, ही भीती होती. बहुपतिकत्वात ही समस्या निर्माण होत नाही. काही जमातींत वधुमूल्याची चाल आहे. आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक भावासाठी वधुमूल्य देऊन वधू मिळवणे शक्य होत नाही. परंतु हे कारणदेखील तेवढे योग्य वाटत नाही. बहुपतिकत्व हे कृषिपूर्व मानवी जीवनाचे अवशेष असावे. व्याध आणि पशुपालन स्थितींतील मानव समूहजीवनाशी बांधलेला होता. भिन्नभिन्न व्यवसाय समाजात निर्माण झालेले नसल्यामुळे, श्रमविभागणी ही स्त्री-पुरूष अशा लिंगभेदांवर झालेली होती. स्त्रीने घरकाम, अपत्य संगोपन ही कामे करावीत आणि पुरूषाने टोळी करून शिकारीला जावे. एका वयोगटातील सर्व स्त्रियांशी त्याच वयोगटातील सर्व पुरूषांना संबंध ठेवण्याचे हक्क होते. अशा सामूहिक संबंधांतूनच बहुपतिकत्व निर्माण झाले असावे. बहुपतिकत्व असणाऱ्या समाजात स्त्रीला, पितृसत्ताक कुटुंबपद्धतीच्या तुलनेत स्वातंत्र्य बरेचसे असते. विशेष म्हणजे वैधव्य येण्याचा संभव क्वचित येत असल्यामुळे, आर्थिक विपन्नावस्थेचे जीवन तिला जगावे लागत नाही. बहुप्रसवा विधवेला लग्नातसाठी मागणी असते. आणि मोठी किंमत देऊन तिच्याशी लग्नज करण्याचा प्रयत्न होतो. बहुपतिकत्वाच्या रूढीमुळे स्त्री-पुरूषांच्या आरोग्यावर आणि संततीवर दुष्परिणाम घडून येतात, हेदेखील विसरता येत नाही.

ब्रिटिश राजवटीपासून वरील जमातींमध्ये झपाट्याने स्थित्यंतरे होत आहेत. बहुपतिकत्व मागे पडत आहे आणि एकविवाहपद्धती हळूहळू रूढ होत असून मातृसत्ताक कुटुंबपद्धतीपासून पितृसत्ताक पद्धतीकडे हे समूह वळत आहेत. तोडा स्त्रिया तर जमातीच्या बाहेर लग्नत करताना आढळतात. १८९६ च्या मलबार मॅरेज ॲक्ट व १९३३ च्या मद्रास ⇨ मरिमक्कतायम् ॲक्ट अन्वये नायरांच्या संबंधम्वर काही बंधने घालण्यात आली. कुटुंबातील पती, पत्नीप, मुले यांच्या पालनपोषणाची जबाबदारी संबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर टाकण्यात आली.

स्त्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate