অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुपत्नीकत्व

बहुपत्नीकत्व

बहुपत्नीकत्व

एकाच पुरूषाने दोन अथवा अनेक स्त्रियांशी विवाह करणे, याला बहुपत्नीकत्व म्हटले जाते. अर्थात सर्व विवाहित स्त्रिया हयात असणे ही अट यात आहेच. पहिली पत्नी मृत झाल्यावर किंवा तिला घटस्फोट देऊन दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणे, याला बहुपत्नीकत्व म्हणता येणार नाही. बहुपतिकत्व हे जगातील फार थोड्या जमातींमध्ये होते; परंतु ख्रिस्ती धर्मीय समाज सोडले, तर हिंदु, मुसलमान इ. समाजांत बहुपत्नीकत्व हजारो वर्षे रूढ आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच अलीकडे हिंदु समाजातील बहुपत्नीकत्वाला कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मुसलमान समाजाला मात्र तशी कायदेशीर बंदी अजून घालण्यात आली नाही. वेदकाळापासून आतापर्यंत बहुपत्नीकत्व हिंदु समाजात होते. युद्धामध्ये पराभूत झालेल्या शत्रूंच्या स्त्रिया पळवून आणून त्यांच्याशी विवाह करणे, ही पद्धत अतिप्राचीन काळापासून असलेली दिसते. पराभूत शत्रूची मालमत्ता आणि स्त्रिया विजयी सैनिकांच्याच समजल्या जात. कृषिजीवन अस्तित्वात येऊन जसे विकसित होत गेले, तशी कुटुंबव्यवस्थेतही परिवर्तने होत गेली. कृषी व्यवस्थेत मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेता, बहुपत्नीहकत्वाला मान्यता प्राप्त झाली. मातृसत्ताक पद्धतीतून पितृसत्ताक पद्धती हळूहळू दृढ होत गेली. कुटुंबसंस्थेत, कुलसमूहात पुरूषाची अधिसत्ता निर्माण झाली आणि बहुपत्नीकत्व समाजमान्य झाले.

हुपत्नीकत्वाची चाल अस्तित्वात असणारे अनेक मानवी समूह जगात आढळून येतात. आफ्रिका खंडातील अनेक आदिवासी जमातींत बहुपत्नीकत्व आहे. प्राचीन काळी ईजिप्त संस्कृतीत, हिब्रू जमातीत, अरबांच्या टोळ्यांमध्ये बहुपत्नीकत्व होते. चीन, जपान, भारत या आशियाई देशांमध्ये विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतही एका पुरूषाने अनेक स्त्रिया करण्याची पद्धत किंवा ⇨ रखेली पद्धती होती. इस्लामने चार स्त्रिया करण्याची परवानगी विधिपूर्वक दिलेलीच आहे. मुहंमद पैगंबरांनी अनेक स्त्रियांशी विवाह केलेला होता.
भारतात ऋग्वेदकाळापासून एकविवाहपद्धती आदर्श मानली गेली असली, तरी प्रत्यक्षात मात्र बहुपत्नीकत्वच प्रचारात असलेले दिसते. राजघराण्यांत अनेक स्त्रिया करण्याची वहिवाट होती. शतपथब्राह्मणात राजाच्या चार स्त्रियांचा उल्लेख आलेला आहे : महिषी (प्रमुख पत्नी ), परिवृक्ती (सोडून दिलेली), वावाता (आवडती) आणि पालागली (कनिष्ठ जातीत जन्माला आलेली कन्या). यांपैकी परिवृक्ती ही तर सोढून दिलेलीच स्त्री आहे. पालागली कनिष्ठ जातीतील असल्यामुळे, धर्मकार्यात सहभागी होण्याचा तिला अधिकार नसे. क्षत्रिय घराण्यांमध्येच अनेक स्त्रियांशी विवाह केले जात असे नाही, तर ब्राह्मणांमध्येही अनेक लग्ने करण्याची प्रथा असल्याचे दिसते. याज्ञवल्क्याला दोन स्त्रिया असल्याचा उल्लेख आहे.

या संदर्भात आणखी एका परंपरेचा उल्लेख करावयास हवा, तो म्हणजे अनुलोम व प्रतिलोम विवाहांचा स्मृतींनी केलेला उल्लेख. या पद्धतीनुसार उच्च वर्णीय पुरूषाचा कनिष्ठ वर्णीय स्त्रीशी झालेला विवाह तो अनुलोम विवाह, तर कनिष्ठ वर्णीय पुरूषाचा उच्च वर्णीय स्त्रीशी झालेला विवाह तो प्रतिलोम विवाह. यानुसार ब्राह्मणाला स्ववर्णातील स्त्रीशी विवाह करण्याची परवानगी होतीच; परंतु क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णातील स्त्रियांशीही त्याला विवाह करता येत असे. क्षत्रियाला क्षत्रिय स्त्री व खालच्या दोन वर्णातील स्त्रिया, वैश्याला वैश्य स्त्री व शूद्र स्त्री व शूद्राला केवळ शूद्र स्त्रीशी विवाह करण्यास मान्यता होती. प्रतिलोम विवाहाचा मात्र सर्वत्रच निषेध केलेला दिसतो. प्रतिलोम विवाहातून जन्माला आलेल्या अपत्याचा वर्ण कोणता, अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. अशा संततीला ‘चांडाळ’ समजले जाई. [⟶जातिसंस्था].
स्मृतिकारांनी एकविवाह आदर्श ठरवलेला असला, तरी बहुविवाहाची वस्तुस्थिती त्यांना नाकारता आली नाही. स्त्री जर निपुत्रिक असेल, धर्महीन असेल, परंपरा सोडून वागणारी असेल, व्यभिचारिणी असेल, तर दुसरा विवाह करण्यास स्मृती परवानगी देतात. प्राचीन भारतीय जीवनात पुत्रसंतती व धर्म यांना महत्वपूर्ण स्थान असल्यामुळे, बहुपत्नींविवाहास मान्यता द्यावी लागली असावी.
पुरूषांना असलेली विविधतेची आवड; तरूण स्त्रीशी लग्ने केल्यास वार्धक्य येत नाही, अशांसारख्या समजुती, कृषिजीवनातील मनुष्यबळाची आवश्यकता अशी काही कारणेदेखील बहुपत्नी कत्वाविषयी सांगितली जातात. केरळमधील नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मण जातीतील फक्त थोरल्या भावालाच विवाह करण्याचा अधिकार होता. सर्व धाकटे भाऊ नायर स्त्रीशी संबंध ठेवीत, त्यामुळे नंपूतिरींमध्ये अविवाहित मुलींची संख्या वाढत जाई. नंपूतिरींमधील बहुपत्नीतकत्वाला प्रोत्हासान देणारी अशीही परिस्थिती दिसते.

बहुपत्नीकत्वाच्या संदर्भात ‘मेहुणी-विवाहा ’ चा (सोरोरेट) उल्लेख करणे आवश्यक आहे. काही जमातींत बायकोच्या बहिणावर हक्क सांगितला जातो. पहिल्या पत्नींच्या निधनानंतर तिच्या धाकट्या बहिणीशीच लग्ना केले जाते. पहिली पत्नी  निपुत्रिक असेल, तर ती स्वतःच आपल्या पतीचे स्वतःच्या बहिणीशी लग्नभ जमवते, अशी उदाहरणे आहेत.

बहुपत्नीवकत्वामध्ये स्त्रीचे स्थान अत्यंत गौण समजले जाई. केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून तिला मानले जात असे. जेवढ्या जास्त बायका, तेवढा समाजात जास्त डामडौल समजला जाई. अनेक स्त्रिया करणाऱ्या पुरूषाला समाजात प्रतिष्ठा होती. विशेष म्हणजे, बहुपत्नीकत्व काही वावगे आहे असे स्त्रियांनादेखील वाटत नसे. अमेरिकेत जो किन्से रिपोर्ट प्रसिद्ध झाला, त्याला आपल्या पतीने इतर स्त्रीशी संबंध ठेवल्यास, आपल्याला मुळीच वाईट वाटणार नाही, असे अनेक स्त्रियांनीच सांगितले. [⟶ किन्से, ॲल्फ्रेड चार्ल्स]. भारतात तर पुत्रप्राप्तीसाठी खुद्द पत्नीच पतीचा दुसरा विवाह करून देई.

भारतीय लोकसभेने १९५५ साली संमत केलेल्या ‘हिंदू विवाह कायद्या’ नुसार बहुपत्नीकत्व व बहुपतिकत्व यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate