अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर! तीन दिवसांचे शिबिर. गावोगावहून जवळजवळ शंभर मुले जमली होती. पनवेलच्या म्हणजे पनवेलजवळच्या शांतिवनात हे शिबिर भरले होते. आम्ही तिथे गेलो तो शिबिराचा शेवटचा दिवस होता. आम्ही म्हणजे आमचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप! अर्धा दिवस ट्रिपहून येता येता शांतिवनात घालवायचा असे सर्वानुमते ठरलेले!
जेवणासाठी सुट्टी होती त्यामुळे सगळे शिबिरार्थी विखुरले होते. मग आम्ही काहीजणांशी छान गप्पा मारल्या. ही मुले किती दुरून दुरून आली होती. समाजातील अंधश्रद्धा दूर करावी या एकाच उद्देशाने भारलेले. दोन दिवस कशी माहिती मिळाली हे आवडीने वर्णन करून सांगत होते. जणू नवीन जे शिक्षण मिळाले त्याची पुनरावृत्ती करून त्यांची माहिती पक्की करत होते.
‘‘नवीन कोणती माहिती मिळाली इथे?’’
‘‘आजी’’ एक मुलगा उत्साहाने सांगू लागला,
‘‘कोणाच्या घरी साधी चोरी झाली तर चोर मिळेल का वगैरे चौकशी करतात की नाही?’’
‘‘हो, परवाच आमच्या शेजारी सुनंदाताईंकडे घड्याळाची चोरी झाली. त्यांनी ‘गजानन ओक ज्योतिषी आहेत त्यांना लगेच विचारले. त्यांनी पाच मिनिटात सांगितले की चोर उत्तर दिशेला गेलाय म्हणून.’’
‘‘हे कसं सांगतात माहिती आहे?’’
‘‘पाहिलंय ना मी स्वत:’’, सुशीलाबाई उत्साहाने म्हणाल्या. ‘‘ते घरात गेले आणि एका तांब्यात तांदूळ भरून आणले. उदबत्त्याही होत्या त्यात. उदबत्त्या पेटवल्या नि काय नवल बाई त्या उदबत्त्या गोल ङ्गिरू लागल्या. थांबल्या तेव्हा त्यातली सगळ्यात मोठ्ठी उदबत्ती उत्तर दिशेला वळलेली होती. बघतच राहिले की मी.’’
‘‘हा’’ं. आता दुसरा मुलगा सरसावला. ‘‘काही नवल नाही त्यात. अहो शुद्ध फसवणूक करतात आपली. आम्हालाही खरं वाटायचं सगळं. पण इथं सगळे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले. शिवाय काही तर आम्हीच केले तेव्हा कळलं आम्हांला पण! अहो, खाली तांदळात खोचताना उदबत्तीला पीळ दिलेला असतो. तो आपल्याला दिसत नाही तो पीळ सुटू लागला की उदबत्ती फिरणारच ना. आणि आपल्याला वाटत ‘वा: काय पण जादू आहे.’
‘‘कमालच आहे की आम्ही पण यायला पाहिजे अशा शिबिरांना.’’
इतक्यात संचालक आले. त्यांनी आमचं बोलणे ऐकलं होते. येता येता ते म्हणाले, ‘‘हे नाही तर पुढच्या शिबिराला या. सहा महिन्यांनी इथेच आहे. पुन्हा शिवाय आता आहात तर पुढचे सत्र पहा म्हणजे शिबिरार्थींचे अनुभवकथन आहे. जेवढा वेळ असेल तेवढे ऐकून जा.’’
आम्हालाही कुतूहल होतेच. कारण आल्यावर काही वेळात बाजूलाच एका टेबलावर मांडलेली काही पुस्तके पाहिली, चाळली. त्यात काही प्रयोग, काही अनुभव मांडलेले होते. ज्येष्ठ नागरिकांनी पंधरावीस पुस्तके सहज विकत घेतली. मी सुद्धा दोन घेतली. किमतीही १५/२० रु. अशा अगदी कमी होत्या.
एक मुलगा उभा राहिला त्याच्या शेजारच्या बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीला ताप येऊ लागला. तर तिला डॉक्टरांकडे न नेता मांत्रिकाकडे कशी नेली हे सांगितले.
‘‘गावात डॉक्टर नव्हते का?’’
‘‘आमचं गाव तसं छोटं आहे. डॉक्टरांकडे म्हणजे तालुक्याच्या गावाला जावं लागतंय. गावात एक मांत्रिक आहे. काही झालं, लग्नाचा मुहूर्त काढायचा असो की कोण आजारी पडो तिथंच जातात सगळी.’’
‘‘त्याने उपाय कोणता सांगितला?’’
‘‘म्हणाला कसा एका भुतानं धरलंय तिला.’’
‘‘मग काय केलं? ती झाली का बरी?’’
‘‘त्यानं काय हो पेटवला. त्यात मिरच्या बिरच्या टाकत होता. आणि एका शिमटीनं तिला मारत होता. ती किंचाळत पळून जायला लागली तर घरच्यांनी तिला पकडून ठेवली. मी माझ्या आईला म्हटलं, ‘किती मारतात तिला?’ तर आई बोलली, ‘‘त्ये तिला काय बी लागत न्हाई. भुतास्नी मारल्याबिगर त्ये अंगातन भाईर कसं पडल?’’
शेवटाला ती बेसुध पडली. ‘आता ती बरी झाली’ असं म्हणून मांत्रिक गेला निघून. ती काय शुद्धीवर आलीच नाय. मग झाली रडारड.’’
सगळीजण एकदम शांत बसली थोडा वेळ. तसं म्हटलं तर तो एक खुनाचाच प्रकार नव्हता का? आणखी तीन-चार वेगवेगळे अनुभव ऐकले. जगदीश नावाचा मुलगा कधीपासुन चुळबुळत होता. तिकडे संचालकांचे लक्ष गेले. संचालकांनी विचारले, ‘‘काय रे जगदीश, तुला काही सांगायचं आहे का?’’
‘‘होय सर...’’
‘‘मग गप्प का? बोल... अगदी मोकळेपणाने सांग तुझा अनुभव.’’ जगदीश सांगू लागला.
‘‘काय आणि कसं सांगावं तेच कळत नाही.’’ त्याच्या चेहर्यावर दु:खाचे असे काही सावट पसरले होते की आत्ताच तो एखादी दु:खद घटना डोळ्यांसमोर पाहतोय. त्या अनुभवाला सामोरे जातोय. धीर एकवटून त्याने बोलायला सुरुवात केली.
‘‘मी, बाबा आणि आई तिघेजण अगदी सुखात राहात होतो. तसे गरिबीतच. पण गावातली सगळीच गरीब. त्यामुळे विशेष काही वाटायचे नाही. आमचं गाव तसं खूप दूर. मध्यप्रदेशात द्रुगजवळ, रायपूरजवळ, अगदीच छोटं. ३००/३५० वस्तीचं! मी तेव्हा अगदी लहान आठ दहा वर्षांचा होतो. गावापासून दूर मैलावर एक तळं होतं. तिथूनच सगळी पाणी आणायची. मी पण आईच्या मागे मागे जायचा. तिकडे कधी मधी चक्रीवादळ व्हायचं. धुळीचे लोट गोल गोल फिरत पार उंच उडायचे. जमिनीवरचा पालापाचोळा पण गोल गोल फिरायचा त्यात. लांबून पाह्यला मजा वाटायची, पण जास्त करून भीतीच वाटायची. शेजारचा रम्या भेटला म्हणून टिवल्याबावल्या करत गप्पा मारत आम्ही हळूहळू चालत होतो. आईला कामाची घाई. ती भराभरा तळ्याजवळ पोचली. दुरूनच धुळीचे लोट दिसले आई ओरडली. ‘‘जग्या पळ बेगीन पळ घराकडं.’’
तेवढ्या वेळात भल्या मोठ्या राक्षसासारखे ते वादळ तिच्यापर्यंत पोचले. पाण्यात बुडवायला तिने घागर उलटी धरलेली. त्यात हवा शिरली. त्या हवेत घागर उंच उडाली. त्या वादळात फिरली. आईनं ती गच्च धरून ठेवलेली मग ती पण घागरीबरोबर भरकटली उंच उंच. तळ्याकाठची सगळीचजण हे आक्रीत श्वास रोखून बघत होती. मला तर वाटलं ‘आई तळ्यात पडणार. प्रत्येकाच्या चेहर्यावर भीती. पण आई उडत उडत पार तळ्याच्या पल्याड गेली. कशी त्या वावटळीतनं सुटली काय जाणे, पण खाली पडली फार उंचावरून नाही, तरी पाय मुरगळला थोडा. पण वाचली हे काय थोडं होतं? मी तर धावत धावत तळ्याच्या बाजूने तिकडे पोचलो आणि तिला धरून धरून घरी आणली. बाबांना आई कशी उडाली ते सविस्तर सांगितले.
‘‘चमत्कारच झाला म्हणायचा समदा.’’ आणि आईची थट्टा करू लागले. घटना घडून गेल्यानंतर वातावरण सैलावते. भीती संपलेली असते ना. बाबा पुढे म्हणाले, ‘‘इमानात बसून फिरल्यावानी वाटलं आसल न. कसं वाटलं खालती बगताना?’’
‘‘कसलं बगताव की काय? जीव मुठीत धरून व्हती मी नि काय? जिती र्हाती का न्हाय ही पंचाईत!’’
अशा गप्पा चालल्या होत्या. आई गरम तव्यात फडके दाबून त्याने मुरगळलेला पाय शेकवत होती. तोवर गावातली काही मंडळी, बायका पण घरात आल्या.
‘‘ही समदी त्याची किरपा.’’ आभाळाकडे हात करीत बाबा म्हणाले.
‘‘त्याची कसली किरपा आँ...’’ कोणीतरी म्हणाले.
‘‘असं न्हाई बोलू समद त्येच्या इच्छेनं तर व्हतंय न्हवं?’’ बाबा बोलले. आम्हांला वाटलं पाय मुरगळला तरी इतक्या मोठ्या संकटातून वाचली याची चौकशी आणि आपुलकी दाखवायला सर्वजण जमली असावी.
‘‘आरं जग्या पानी दे की समद्यास्नी. आर बसा की हुबं का?’’
‘‘र्हाऊ द्या. ह्या घरातलं पानी बी नग!’’
‘‘आँ! काय चुकी झाली का आमच्या हातनं?’’
‘‘तुमची बायको चेटकीन हाय. तिच्यापास्न गावाला बी
धोका हाय.’’
‘‘आऽर द्येवा आसं काय बाय बोलू नगा राव पाया पडतो तु च्या.’’
‘‘त्याबिगर आसं उडून अल्लद कोन येल का जिमिनीवर इत्की वरीस पातोय हित. कंदी पाह्यलंय का आसं झालेलं?’’
‘‘कंदीच न्हाय बा.’’ बाकीच्या सगळ्यांनी अनुमोदन दिलं.
‘‘त्ये काय न्हाय. गावात ही पीडा नाय पायजे. ही बला हाय. गावावरचं संकट हाय. हाकला रं तिला.’’
‘‘अवं माजा सौंसार’’ बाबा गयावया करू लागले.
‘‘खड्ड्यात ग्येला! गावावरलं संकट मोट का तुजा सौंसार. चल बाजूला व्हय.’’
‘‘आन जास्ती बोललास तर वाळीत टाकू तुला. समजलं?’’
काही बायकाही त्या पुरुषांसोबत आल्या होत्या रोज आईबरोबर पाण्याला जाणार्या. सुखदु:खाच्या गप्पा मारणार्या! पण चेटकीण म्हटल्यावर त्या एकदम परक्या झाल्या. त्यांनी आईला बकोटीला धरून बाहेर काढले. आधीच तिचा पाय मुरगळलेला. दुखत होता खूप चालतापण येईना नीट.
‘‘लंगडी चेटकीण मारा रे तिला. काळं फासा तोंडाला.’’
मग काय बाकीच्यांच्या हाती कोलीतच सापडले. कोणीतरी काळे फासले. आपण गावासाठी, गावाच्या भल्यासाठी काहीतरी करतोय याचा उत्साह सळसळला होता जणू. लकटालकटीत आईचं जुनेर पण ङ्गाटलं. त्यात दगडांचा मारा. मारत झोडत तिला पार गावाच्या शिवेबाहेर हाकलत नेली. नंतर ती कोठे गेली कोणास ठाऊक?
बाबा तर डोक्यावर हात मारून घेत होते कोपर्यात बसून. गावापुढे काही करूच शकत नव्हते. ‘‘नका हो मारू माज्या आयेला.’’ सुरुवातीला मी विरोध केला खरा, पण कोणीतरी मला ढकलून दिली. मग मी ‘आई आई’ करत रडत बसलो होतो बराच वेळ. रडत रडतच बाबांच्या कुशीत कधी झोपलो तेही कळले नाही.
झोप कसली ती बाबा म्हणाले, ‘‘पोरा रातच्याला दोनचारदा वरडत व्हतास ‘आये आये’ करून.’’
जरी वाळीत टाकले नाही तरी आमची परिस्थिती वाळीत टाकल्यासारखीच होती. बाबांचे व माझे नावही सगळी विसरली होती. आमचा उल्लेख सतत ‘चेटकिणीचा नवरा’ आणि ‘चेटकिणीचा पोरगा’ असाच व्हायचा. शाळेतसुद्धा मी चेटकिणीचा मुलगा म्हणून माझ्याजवळ कोणी बसायचे नाही.
‘‘एऽ तू पण शिकला असशील ना चेटूक करायला?’’असं विचारायची देखील थट्टेनं. ‘अरे त्याला अभ्यास कराया नुको. आपसूक पयला नंबर’ अशी थट्टा व्हायची.
बाबा पण कावून गेले अगदी. शेवटी एका रात्री आम्ही घरातलं सगळं सामान, असं जास्त सामान होतंच कुठं म्हणा. गोळा केलं आणि रातोरात गुपचूप स्टेशनावर गेलो तालुक्याच्या गावाला आणि मिळाली त्या गाडीत बसलो. जितकं लांब जाता येईल तेवढं जायचं म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही असं ठरवलं. आगगाडीचे शेवटचे स्टेशन कोणते ते देखील माहिती नव्हते. शेवटी एकदम मुंबईला पोचलो. इथल्या गर्दीत जीव अगदी भांबावून गेला. उपाशी-तापाशी एका फॅक्टरीच्या दाराशी पोचलो. कारखान्याचे मालक गाडीतून उतरले. बाबांनी तर पायच धरले त्यांचे.
‘‘न्हाई म्हनू नगा. कुटलबी काम द्या. दया करा.’’ काकुळतीचं बोलणं की बाबांच्या डोळ्यांतील पाणी पाहून साहेबांना, देसाई त्यांचे नाव, दया आली म्हणा किंवा ८/१० दिवसांपूर्वीच शिपाई काम सोडून निघून गेला होता म्हणूनही बाबांची तिथं वर्णी लागली एवढं मात्र खरं! तसे ते स्वभावाने चांगले होते. मीही बाबांबरोबर कारखान्याच्या बाहेर बाकावर झोपायचो. ते त्यांनी पाहिले. आणि चौकशी केली.
‘‘आय न्हाय त्याची. कुट ठेवू त्येला? या मोट्या शेरगावात आन त्यो काम तरी काय करनार?’’ थोडा वेळ तेही विचारात पडले.
‘‘बाळ नाव काय तुझं?’’
‘‘जगदीश’’
‘‘बरं जगदीश, दीड वर्षांचा मुलगा आहे माझा. त्याला सांभाळशील का?’’
‘‘होऽ ’ मी आनंदाने म्हणालो. शेजारच्या काकू कामाला गेल्या की त्यांच्या गजाला मीच तर बघायचा. माझी राहायची सोय लागल्यावर बाबा निवांत झाले. सुरुवातीला फॅक्टरीच्याच बाहेर वळचणीला झोपायचो कुठंतरी. नंतर ओळखी वाढल्या. फॅक्टरीतल्याच एका माणसाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागलो. घरात जेवायची सोय झाली. पडवीला झोपायची. त्या कामगारालापण थोडी पैशाची मदत. एकदा एका रविवारी फॅक्टरी बंद होती. बाबा देसायांच्या घरी मला भेटायला आले. तसा मी मोठा झालो होतो. म्हणजे बारा वर्षांचा. देसाईणबाईंची बहीण पाहुणी आली होती सुट्टीत. तिला वाचायचा खूप नाद होता. एका मासिकात नेहमी ‘नवल’ या सदरात एखादी चमत्कारिक घटना यायची लिहून. ती वाचता वाचता एकदम स्वयंपाकघरात आली. मी तिथंच बाळाला खायला देत होतो. तेव्हाच नेमके बाबा मला भेटायला आलेले.
‘‘ताई ताई बघ न किती विचित्र गोष्ट! दोन वर्षांपूर्वी म्हणे द्रुगमध्ये एका गावात चक्रीवादळ झालं. एक बाई पाणी भरायला गेलेली. घागरीत हवा भरली आणि ती उडत उडत पार तळ्याच्या पलिकडे गेली. कित्ती मजा न... बापरे पुढचं वाचलंच नाही मी.’’
‘‘वार्याला चांगलाच जोर असतो. वैशू तुला आठवत नाही का गेल्या वर्षीची गोष्ट?
‘‘कोणती गं?’’
‘ती नाही का जोरकरांच्या घरावरचे सिमेंटच्या पत्र्यांचे छप्पर वार्याने उडाले. त्या घराला एका बाजूला खिडक्या होत्या. वादळी वारा, पाऊस. वारा आत शिरला पण दुसर्या बाजूला एकही खिडकी नाही मग काय त्या दाबाने सगळंच्या सगळं छप्पर जे उंच उडालं ते तीन चार घरांवरून पलिकडे जाऊन कोसळलं. नंतर धो धो पाऊस. छपराखालचं सामान उचलताना नाकीनऊ आले सगळ्यांच्या.’’
‘‘आठवलं की चांगलंच. ते शिरगावकरांच्या अंगणात कोसळलं. बरं तर बरं घरी सून बाळंतीण. ती जवळच होती. कोणाला काही झालं नाही नशीब!’’
‘‘बरं पुढं काय झालं त्या उडालेल्या बाईंचं?’’
‘‘हं ते तर फारच विचित्र. अगदी दुष्टपणाच.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अगं ती बाई उडाली ना आणि पाण्यात न पडता नेमकी पलिकडे उतरली. याचा लोकांना चमत्कार वाटला.’’
‘‘वाटणारच गं. पण त्यात दुष्टपणा कसला?’’
‘‘तिला चेटकीण समजून लोकांनी गावाबाहेर हाकलली गं! दगड पण मारले. शी: काय हे... बिच्चारी कुठं गेलीअसेल ती?’’
‘‘अगं खेडेगावात अजून अशा अंधश्रद्धा आहेत. मुळात शिक्षण नसते ना. खरं तर निसर्गाच्या शक्तीचा केवढा मोठा चमत्कार पाह्यला मिळाला लोकांना पण त्याचा अर्थ समजण्याची कुवत नव्हती ना!’’
इतका वेळ बाबा आणि मी दोघंही शांतपणाने ऐकत होतो. आमच्या डोळ्यांत पाणी आलं.
‘‘जगूचे बाबा तुम्हाला पण वाईट वाटलं ना ऐकून?’’
‘‘वाईट अशापाई की ती आमचीच चित्तरकथा हाय. उडाली नि गावाभाईर हाकलली ती माजीच बायको. या जग्याची आय. तिला हाकलली ती हाकलली पर आमचं बी जिणं मुश्कील क्येलं बगा.’’
‘‘मग?’’ वाईट वाटून वैशालीने विचारले.
‘‘मग काय रातच्याला पळालो नि ठेसनात आलो दिसली त्या गाडीत बसलो आन ममईला आलो. सायबांची दया तवा चार घास खातोय म्या आन हा जगू पर.’’
‘‘मग तिथं शाळेत नव्हता का जात?’’
‘‘पयल्या वर्गात व्हता. पर समदी ‘चेटकिणीचा पोरगा’ म्हणायचे आन जवळ बसायचे पर न्हाई. मंग दिली सोडून साळा. काय करनार?’’
‘‘पण शिकायला तर पाहिजे ना. नाहीतर सुधारणा नाही होणार. अशा अंधश्रद्धांवर विश्वास बसतो शिकलं नाही की.’’
‘‘म्या मोप म्हनतोय पर हिथं साळत कोन घेनार. माजा पर ठावठिकाना कुटं हाय धड?’’
हे सर्व ऐकल्यावर देसाईकाकांनी माझी जबाबदारी उचलली. जवळच नाईटस्कूल होते. आमच्या कामगाराचा मुलगा म्हणून शाळेत नाव घातले. त्यांचे उपकार म्हणून इतके शिकू शकलो. कॉलेजचे हे दुसरे वर्ष..
सुरुवातीला आम्ही आईच्या बाबतीत घडलेली घटना कोणालाही सांगत नव्हतो. न जाणो इथेही ‘चेटकिणीचा मुलगा’ म्हणून दूर लोटले तर. अशी भीती वाटायची. पण माझे नशीब खरंच बलवत्तर म्हणून नेमकी ती घटना वैशालीमावशीने वाचली. आणि आमचीच ती कथा म्हणजे आमच्या आईच्या बाबतीतच घडलेली. कळले तरी आमचा तिरस्कार न करता उलट देसाई कुटुंबाने मदतच केली. अंधश्रद्धेचा असा दु:खद अनुभव आल्याने अंधश्रद्धा दूर करण्याच्या कामी मदत करण्याच्या तीव्र इच्छेनेच मी या शिबिरात सामील झालो. अजूनही ती घटना आठवली की सगळं दृश्य चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर उभे राहतं. मार खाता खाता आमच्याकडे पाहणारे तिचे केविलवाणे डोळे आठवतात. वाटतं ती कोठे भेटेल का? मुळात ती जिवंत तरी असेल का, या विचाराने जीव कासावीस होतो अगदी.’’
जगदीश खाली बसला. त्याचे डोळे डबडबले होते. त्याच्याच का सर्वांच्याच डोळ्यात ही अजब कहाणी ऐकून पाणी तरळले होते. सगळेजण स्तब्ध झाले. आम्ही थोडाच वेळ बसणार होतो. पण त्या कहाणीत पुरेपूर रंगून गेलो. सर्व कुटुंब उद्ध्वस्त झाले. देशोधडीला लागले. याला कोण जबाबदार? विचारांचे वादळ डोक्यात घुमू लागले.
----
भारती मेहता
६, पसायदान, पाचपाखाडी,
ठाणे - ४००६०२
चलभाष ः ९९६९१९८८८१
स्त्रोत:
अंतिम सुधारित : 8/1/2020
जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वसाधारणपणे थंड...