অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक पर्यावरण

सामाजिक पर्यावरण

सामाजिक पर्यावरण

( सोशल इन्व्हाय्रन्मेन्ट ). मानवासभोवतीचे सर्व मानवनिर्मित भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक यांतील परस्परसंबंध आणि आंतरक्रिया यांतून तयार होणाऱ्या सर्वंकश आवरणास सामाजिक पर्यावरण असे संबोधण्यात येते.

मानव नैसर्गिक व सामाजिक अशा दोन प्रकारच्या पर्यावरणात वावरत असतो. अर्थात सामाजिक पर्यावरण ही परिपूर्ण स्वतंत्र संकल्पना नसून ती नैसर्गिक पर्यावरणावर आधारित आहे. त्यामुळे स्थलकालपरत्वे तीत फरक आढळतो. नैसर्गिक पर्यावरण जसे गतिशील आहे, तसेच सामाजिक पर्यावरणही गतिशील आहे. त्यात सातत्याने बदल होत असतात.

सामाजिक पर्यावरणाचे भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असे प्रमुख चार घटक मानले जातात. भौतिक घटकामध्ये भौगोलिक प्रदेश, जमीन, निवास, निवासाचे स्थान, इमारती, वसाहती, संस्था, रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग,जलमार्ग, वाहतुकीची साधने, दळणवळणाची साधने, करमणुकीची साधने, निरनिराळी भांडी, हत्यारे, उपकरणे, यंत्रे, पैसा,व्यवसाय, वस्त्रप्रावरणे, फर्निचर, कागदपत्रे, लेखनसामग्री, पुस्तके इत्यादींचा समावेश होतो. सामाजिक घटकामध्ये व्यक्ती,कुटुंब, समुदाय, समाज, जातिव्यवस्था, सामाजिक स्तर, सामाजिक संस्था इ. अंतर्भूत होतात. सांस्कृतिक घटकामध्ये संस्कृती म्हणजेच समाजाची सर्वच क्षेत्रांतील वैकासिक प्रगती, ज्ञानाची पातळी, अभ्यासकम, शिक्षण, शिक्षणपद्घती,शिक्षणसंस्था, विद्यापीठे, धर्म, धार्मिक विचार, धार्मिक संस्था, धार्मिक ग्रंथ, धार्मिक रीतिरिवाज, अर्चना, प्रार्थना, अध्यात्म,योग, चालीरीती, साधना, परंपरा, रुढी, विविध कला, कलाविष्कार वगैरेंचा समावेश होतो. राजकीय घटकामध्ये राज्यव्यवस्था, व्यवस्थापन, राज्यघटना, नियम, कायदे, प्रशासन, प्रशासकीय यंत्रणा, संरक्षणव्यवस्था, पोलीसयंत्रणा, सैन्य,गुप्तचर विभाग, परराष्ट्रीय धोरण, परराष्ट्रीय संबंध वगैरेंचा समावेश होतो. या सगळ्या घटकांची निर्मिती मानवाने स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतः केलेली आहे. या सर्व घटकांमध्ये परस्पर आंतर–संबंध असून त्यांच्यांत अगदी सूक्ष्म पातळीवरही आंतरक्रिया होत असतात. त्यातूनच मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, अन्न, वस्त्र, निवारा, अर्थ,साधनसामग्री, शक्ती, मानसिक स्वास्थ्य, सुख आणि समाधान याबरोबरच जगण्याचा सन्मान मिळत असतो.

जगदाळे, अनिलराज

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate