অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक वर्गव्यवस्था

सामाजिक वर्गव्यवस्था

सामाजिक वर्गव्यवस्था

सामाजिक स्तरीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या एकाच स्तरावरील समान सामाजिक स्थानांच्या लोकांना संघशः सामाजिक वर्ग असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. समाजातील हे स्तर उच्च–नीच या कल्पनेतून निर्माण झालेले असतात. व्यक्तीला सामाजिक स्थानपरत्वे समाजाकडून मिळणारी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या त्रिविध मोबदल्याच्या भेदात्मक प्रमाणामुळे समाजातील सर्वच व्यक्तींची विभागणी कोणत्या तरी एका वर्गात होते. अशा रीतीने एखाद्या व्यक्तीला अगर व्यक्तिसमूहाला मिळणारा वर्ग हा इतर वर्गांच्या संदर्भातच निश्चित होतो. म्हणून या वर्गवारीच्या प्रक्रियेला ‘वर्गव्यवस्था’ असे म्हणणे क्र मप्राप्त ठरते.

एकाच वर्गातील लोकांना परस्परांबद्दल समतेची भावना असते; परंतु इतरांबद्दल मात्र अमुक वर्ग खालचा, अमुक वर्ग वरचा अशी त्यांची भूमिका असते. रोटी–बेटी व्यवहारामध्ये हा भेद तीवपणे जाणवतो. एकाच वर्गातील लोकांच्या आर्थिक दर्जापेक्षाही त्यांच्या अभिवृत्ती, अभिरुची, जीवनमूल्ये, राहणीमान व जीवनपद्घत सारखीच असते, हे महत्त्वाचे आहे. समाजात एकूण असे किती वर्ग असतात, याबद्दल भिन्न मते प्रचलित आहेत. ⇨ॲरिस्टॉटलने अतिश्रीमंत, गरीब आणि मध्यम असे तीन वर्ग असतात, असे म्हटले होते.

साम्यवादी विचारवंत ⇨ कार्लमार्क्स याने समाजात उत्पादनाच्या साधनांचे मालक अगर भांडवलदार आणि श्रमजीवी मजूर असे दोनच वर्ग असतात, असे म्हटले आहे. त्याच्या मते, कामगारांच्या श्रमाने उत्पादन होत असले, तरी उत्पादित वस्तूंवर किंवा साधनांवर कामगारांची मालकी नसते. त्यामुळे पहिला वर्ग ‘आहे रे’ (कर्रींशी ) चा तर दुसरा ‘नाही रे’ ( Haves nots ) चा होय.

ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ⇨ॲडम स्मिथ याने समाजात कुळाकडून मिळणाऱ्या भुईभाड्यावर जगणारे, मजुरीवर जगणारे आणि व्यापारी नफ्यावर जगणारे असे तीन वर्ग असतात, असे म्हटले आहे. ⇨थॉर्स्टाइन व्हेब्लेन (१८५७–१९२९) या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने जगण्याकरिता परिश्रम कराव्या लागणाऱ्या मजुरांचा आणि रिकामा वेळ भरपूर असलेल्या ऐषारामी लोकांचा असे दोनच वर्ग असतात असे म्हटले आहे. हा ऐषारामी वर्ग दिखाऊ अगर प्रदर्शनी उपभोगामुळे इतरांपासून अलग पडतो. ⇨माक्स वेबरप्रणीत वर्गविभाजनाचे तत्त्व काही बाबतींत मार्क्सच्या तत्त्वांशी मिळतेजुळते आहे.

विपुल संपत्ती व संपत्तीचा अभाव हेच वर्गाचे मूळ घटक आहेत असे वेबर म्हणतो.भांडवलशाही समाजात मालमत्ताधारी उच्च वर्ग, मालमत्ता नसणारा पांढरेपशा कामगारांचा वर्ग, छोटे भांडवलदार आणि मजूर वर्ग असे चार प्रमुख वर्ग असतात असे त्याने म्हटले आहे. वरील वर्गवारीमध्ये सर्वांनी पैशाला, धनसंपत्तीला महत्त्व दिले आहे असे दिसते; परंतु सामाजिक वर्ग हे केवळ पैशावर अवलंबून नसतात.

एका वर्गाच्या सदस्यांची विचारसरणी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व सांस्कृतिक पातळी सारखीच असते. जवळ केवळ पैसा असणे याला महत्त्व नसून, तो पैसा कसा मिळविलेला आहे, समाजमान्य व वैध मार्गाने मिळविलेला आहे का नाही आणि त्या पैशाचा विनियोग कसा केला जातो, याचेही मूल्यमापन समाजाकडून होत असते आणि त्यानुसार व्यक्तींना दर्जा मिळतो. अशा रीतीने सामाजिक वर्ग म्हणजे, समान दर्जा व समान शील असलेल्या लोकांचा गट बनतो. एका वर्गातील लोकांमध्ये परस्परांबद्दल आपुलकीची भावना असते.

एकूण किती वर्ग समाजात आहेत, हे आपण निवडलेल्या निकषांवर अवलंबून असते. सामान्यतः उच्च, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन वर्ग मानणे ही पूर्वापार चालत आलेली पद्घत होय. लॉयड वॉर्नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९४१–४२ दरम्यान अमेरिकेतील एका शहरातील सामाजिक जीवनाच्या पाहणीचे विश्लेषण करताना सहा वर्गांची कल्पना मांडली. यानुसार अत्युच्च, निम्न–उच्च, उच्च–मध्यम, निम्न–मध्यम, अतिकनिष्ठ आणि कनिष्ठ असे सहा वर्ग कल्पिण्यात आले. अत्युच्च वर्गात समाजातील प्रतिष्ठित, धनिक आणि अनेक पिढ्यांपासून समाजाचा भाग बनलेल्या कुटुंबांचा समावेश करण्यात आला. निम्न–उच्च म्हणून गणल्या गेलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या वर्गात, बहुधा अत्युच्चां इतकीच श्रीमंत कुटुंबे होती; परंतु तुलनेने हा वर्ग नव–श्रीमंतांचा होता आणि तो तितकासा प्रतिष्ठितही मानला जात नव्हता.

उच्च–मध्यम वर्गात चांगली मिळकत असलेले व्यापारी व व्यावसायिक यांचा समावेश होता. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही चांगली होती. निम्न–मध्यम वर्गात कारकून, पांढरपेशे, छोटे व्यावसायिक, कुशल कारागीर इ. होते. कनिष्ठ वर्गात पगारी मजूर, तर अतिकनिष्ठ वर्गात बदली कामगार आणि रोजंदारीवर काम करणारे असुरक्षित मजूर यांचा समावेश होता. अशा प्रकारे सहा वर्गांत समाजातील सर्व लोकांचे विभाजन करण्याची ही पद्घत अधिककरून मोठ्या वा मध्यम आकाराच्या जुन्या शहरांना व तेथील अनेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या लोकवस्तीला लागू पडते.

झपाट्याने वाढलेल्या नव्या नगरांमध्ये जुनी स्थायिक कुटुंबे सापडणे कठीण आहे. त्यामुळे अशा संदर्भात अत्युच्च आणि निम्न–उच्च हे दोन्ही वर्ग मिळून उच्च हा एकच वर्ग अर्थपूर्ण ठरतो. त्याचप्रमाणे लहान आकाराच्या शहरांमधील लोकवस्तीत सहा वर्ग करण्याइतपत सूक्ष्म भेदही दिसून येत नाहीत, म्हणून तेथे श्रीमंत, गरीब आणि मध्यम वर्ग असे तीनच वर्ग बहुधा दिसून येतात. समान जीवनमूल्ये, अभिरुची,हितसंबंध यांचा अभाव यांमुळे सामाजिक वर्ग एकमेकांपासून अलग पडतात हे लक्षात येते, तर लहान आकाराच्या शहरांतील लोकांमध्ये सम्मुखी संबंध व अन्योन्यक्रिया घडण्याचा संभव अधिक आणि त्यामुळे त्यांच्यात अभिरुची, हितसंबंध अगर जीवनमूल्ये यांबाबतीत तफावत असण्याची शक्यता कमीच असते, हे स्पष्ट होते. वर्गविभाजनात स्थानिक लोकांना काय वाटते,त्यांचे या बाबतीतील मूल्यमापन काय आहे, हे महत्त्वाचे असल्यामुळे समाजात एकूण किती वर्ग असतात अगर आहेत, याबद्दल नगरागणिक भेद दिसून येणे स्वाभाविक आहे.

आपल्याबरोबरचे, आपल्याऐहून उच्च दर्जाचे अगर नीच दर्जाचे म्हणून केलेले इतरांबद्दलचे मूल्यमापनच सामाजिक वर्ग एकमेकांपासून अलग पडण्याच्या मुळाशी असते. आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांत, विशेषतः अर्थोत्पादनाच्या क्षेत्रात यांत्रिकीकरण व तांत्रिक कौशल्य यांचे वर्चस्व वाढल्यामुळे आणि एकूण प्रशिक्षित व काम करणाऱ्या मनुष्यबळाचे कार्यात्मक विशेषीकरण झाल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात सत्ता,संपत्ती आणि प्रतिष्ठा या अनुक्रमे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मोबदल्यात फरक पडत गेला. शेवटी प्रतिष्ठेत फरक पडत गेल्यामुळे सामाजिक वर्ग निर्माण होणे अपरिहार्य ठरले. ही प्रतिष्ठा सत्तेवर, संपत्तीवर, उदरनिर्वाहाकरिता स्वीकारलेल्या व्यवसायावर, शिक्षणावर अवलंबून आहे की, इतर गुणविशेषांवर, हे समाजाच्या एकूण विचारसरणीवर अवलंबून असते.

अशा रीतीने श्रमविभाजन न झालेल्या समाजात अशा प्रकारचे सामाजिक वर्गही दिसून येत नाहीत, हेही तितकेच खरे. प्राथमिक अवस्थेतील वन्य जमातींमध्ये जमातप्रमुख, पुरोहित-वैद्य असा एखादाच इतरांपेक्षा श्रेष्ठ गणला जातो. बाकीचे सर्व एकाच पातळीवरचे समजले जातात; कारण त्यांच्यात व्यावसायिकदृष्ट्या सामान्यीकरण असते, विशेषीकरण झालेले नसते. सामाजिक वर्गनिर्मितीमध्ये अनेक कारणे अंतर्भूत होत असली, तरी मुख्यतः श्रमविभाजन आणि त्यायोगे लाभलेला अगर मिळविलेला व्यवसाय महत्त्वाचा ठरतो आणि व्यवसायाच्या महत्त्वास व पदाधिकारास अनुसरुन सोयीसवलतीसुद्घा संबंधित व्यक्तीस आवश्यक बाबी म्हणून मिळतात.

याचा फायदा त्या व्यक्तीसच नव्हे, तर तिच्या कुटुंबियांनाही मिळतो. यांपैकी कौटुंबिक मालमत्तेच्या स्वरूपातील फायदे वारसाहक्काने पुढच्या पिढीकडे सोपविले जातात. याचा परिणाम म्हणून समाजातील एकदा निर्माण झालेले वर्ग काही कुटुंबांपुरते मर्यादित राहण्याची परिस्थिती निर्माण होते. सामाजिक वर्गामध्ये निर्माण होणारा सांस्कृतिक भेद आणि तो भेद पुढच्या पिढीकडे जाण्याची प्रक्रिया लक्षात घेतली, तर यातील सत्य स्पष्ट होते. वर्गा-वर्गांमधील हा भेद जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरू न तेथे तो प्रत्येक वर्गाचा व्यवच्छेदक लक्षण बनतो. कोणत्याही शहरात आणि काही प्रमाणात श्रमविभाजन झालेल्या ग्रामीण भागांतसुद्घा श्रीमंत आणि गरीब यांच्या वस्त्या अलग-अलग आणि एकमेकांपासून काही अंतरावर असतात.

मोठ्या शहरात हा भेद अधिक ठळकपणे दिसून येतो. उच्चवर्गीय लोकांची कुटुंबे शहराबाहेर बाजारी गजबजाटापासून दूर, हवेशीर ठिकाणी, स्वतंत्र बंगल्यांतून अगर सर्व सोयींनी सज्ज अशा स्वतंत्र निवासांतून राहात असलेली दिसून येतात. यात काही उच्च-मध्यमवर्गीयसुद्घा येतात. वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था,रस्ते, इतर वाहतुकीच्या सोयी, शाळा, महाविद्यालय, तार-टपाल कचेरी, बँका, दवाखाने, किरकोळ विकीची दुकाने इ. नित्याच्या गरजा भागविणारी साधने स्वतंत्रपणे अगर जवळपास उपलब्ध असतात.

या लोकांजवळ स्वतंत्र वाहतुकीची साधने बाळगण्याची ऐपत असते. ते सामान्य अगर गरीब लोकांना परवडत नाही. याउलट मध्यमवर्गाचे लोक चाळीवजा इमारतींतून आणि कनिष्ठ व अतिकनिष्ठ वर्गांचे लोक मोडकळीस आलेल्या चाळींमधून अगर झोपडपट्टीतून राहतात. मध्यवर्ती बाजारपेठेची आणि अत्युच्च, उच्च व उच्च-मध्यम वर्गांच्या राहत्या घरांची जागा अतिखर्चिक असल्याने गरीब वर्गाची राहती घरे लांब उपनगरात फेकली जातात.

मध्यवर्ती बाजारपेठेत, व्यापार-उद्योगांसारख्या मोठ्या आर्थिक उलाढालींच्या संस्थांनाच परवडण्यासारखी जागा असते; कारण तेथील भूखंडांच्या किमती भरमसाठ असतात. वर्गा-वर्गांमधील हा फरक राहती घरे व त्यांचा परिसर यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही. मुलांच्या सामाजिकीकरणाचा संदर्भ तपासला, तर ही गोष्ट स्पष्ट होते. अत्युच्च किंवा उच्च वर्गांतील कुटुंबे मुलांच्या शिकवणीसाठी शिक्षकांना घरी बोलावू शकतात. काही कुटुंबांत मुलांकडे संपूर्ण लक्ष द्यायला, घरचे वर्गविहित वळण लावायला पूर्ण वेळ घरकाम करणारी महिला असते.

उच्च-मध्यम व मध्यम वर्गाच्या कुटुंबांत मुलांचे सामाजिकीकरण व्यवस्थित रीतीने होऊ शकते. विकासाकरिता पोषक वातावरण उपलब्ध असते. आजूबाजूला मित्रवर्गात त्यांच्या आशा-आकांक्षा उंचावणाऱ्या गप्पा चालतात. घरात शिक्षणाची परंपरा किंवा आवड आणि ऐपत असल्याने, उच्च शिक्षणाचे मनसुबे लहानपणीच रचले जातात आणि त्याकरिता सर्वतोपरी तयारी लहानपणापासूनच केली जाते. आर्थिक स्थिती खालावत जाईल, तसे घरातील आणि घराभोवतालच्या परिसरातील वातावरण आरोग्यदृष्ट्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या दूषित व कमकुवत होत जाते. कनिष्ठ व अतिकनिष्ठ वर्गांतील विशेषतः झोपडपट्टीत मोडकळीस आलेल्या व स्वच्छतेच्या अपुऱ्या सोयी असलेल्या चाळीत वा तत्सम वस्तीत राहणाऱ्या मुलांना शिक्षणाला अनुकूल असे वातावरण उपलब्ध नसते.

घरात फारसे कोणी शिकलेले नसते. शिक्षणाबद्दल उपेक्षा व शिकलेल्यांबद्दल एक प्रकारचा तिरस्कार दिसून येतो. घरातील संस्कृती आणि शाळेत शिकविली जाणारी संस्कृती यांत तफावतच नव्हे, तर विरोधही असण्याची शक्यता अधिक असते. उच्च वर्गातील मुलांबद्दल अगर शाळेतील वातावरणाबद्दल त्यांना आपुलकी वाटत नाही. कौटुंबिक जीवनातील अस्थिरता, नोकरीतील बेभरवशीपणा, असुरक्षितता, दैनंदिन जीवनातील अनिश्चितता, खाण्यापिण्यातील विधिनिषेधशून्यता आणि एकंदर जीवनातील विसकळितपणा इत्यादींशी त्यांचा संबंध असतो. गलिच्छ वस्ती अगर झोपडपट्टी ही गुन्हेगारीला नेहमीच पोषक ठरते, असे नसले, तरी गुन्हेगारांना झोपडपट्टीत प्रच्छन्नपणे वावरता येते.

त्यामुळे त्या वस्तीतील मुलांसमोर, सट्टा-जुगारासारख्या अनैतिक-अवैध मार्गाने पैसा कमवून तो तितक्याच जलद गतीने व्यसनापायी घालविणारे व काहीही न्याय्य मिळकतीचे काम न करता, धाकधपटशाने, दंगामस्तीने साऱ्या वस्तीत दहशत निर्माण करू न गुर्मीत वावरणाऱ्या गुंडांचा आदर्श कोवळ्या वयापासून राहतो. एका बाजूला काही कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या दारिद्याने गांजलेल्या योग्य दिशेअभावी अज्ञानाच्या खाईत सापडलेली दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला काही कुटुंबे ऐषारामात लोळत पडलेली दिसतात. स्थावर आणि जंगम मालमत्ता, वारसाहक्काने पुढच्या पिढीला निर्विघ्नपणे सोपविता येते. एवढेच नव्हे, तर सांस्कृतिक पातळी, जीवनेच्छा आणि जिद्द हीसुद्घा वर्गनिहाय कमीअधिक प्रमाणात पुढच्या पिढीला मिळते. त्यामुळे हा वर्गभेद पिढ्यान्पिढ्या टिकतो.

एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणे हे सततच्या परिश्रमाने शक्य असले, तरी त्याला परिस्थितिजन्य मर्यादा आणि अडथळे खूप असतात हे स्पष्ट आहे. वर्गविहित संस्कृती पूर्णपणे आत्मसात केली जाते, ती जन्मल्यापासूनच्या संस्कारांमुळे व सामाजिकीकरणामुळे होय. मुलांच्या सामाजिकीकरणाची जबाबदारी मुख्यतः कुटुंबाकडे असते. त्यामुळे कौटुंबिक ऐपतीचा, सांस्कृतिक पातळीचा व परिसराचा प्रभाव मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर निश्चितपणे पडतो. कौटुंबिक ऐपतीचा आधार आर्थिक आहे, तर सांस्कृतिक पातळी ही सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. म्हणूनच केवळ पैशामुळे उच्च वर्ग लाभत नाही आणि केवळ गरिबी आहे म्हणून निकृष्ट दर्जा लाभत नाही;म्हणजे कनिष्ठ वर्ग लाभत नाही हेही तितकेच खरे. यावरून वर्गविभाजन हे कशावरू न ठरते; पैसा, पेशा, व्यवसाय, शिक्षण,चारित्र्य यांवरू न, की जन्माने मिळणारा वारसा यांवरू न, असा प्रश्न उपस्थित होतो. केवळ पैसा मिळाला म्हणून कौटुंबिक रीतीभाती आणि जीवनशैली, अभिरुची झटपट बदलता येत नाहीत. जीवनशैली आणि अभिरुची ही तर सामाजिक वर्गाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. ही अभिरुची जीवनाच्या अनेक क्षेत्रांमधील आवडीनिवडींवरू न व्यक्त होते. घराची सजावट, कपडेऐलत्ते, नोकर-चाकर, मित्रवर्ग, सार्वजनिक क्षेत्रात वावरण्याची पद्घत, समाजकार्याची आवड, फावला वेळ घालविण्याची पद्घत, ललित कलांबद्दलचा दृष्टिकोन व आवड इ. गुणविशेष दीर्घ सामाजिकीकरणामुळे व सततच्या संस्कारांमुळे मनात खोलवर रुजलेले असतात. पैशाबरोबर ते बदलत नाहीत. प्रत्येक पिढीबरोबर कमशः बदलत जातात. पैशाप्रमाणेच उदरनिर्वाहाकरिता स्वीकारलेल्या पेशाला, व्यवसायालाही महत्त्व आहे. सर्वसामान्यपणे हातमजुरीपेक्षा पांढरपेशी कामे अधिक श्रेयस्कर, असा एक समज समाजात दिसून येतो. व्यवसायावरुन संबंधित व्यक्तीचे शिक्षण कोणत्या स्वरूपाचे व किती झाले आहे, राहणीमान कशा प्रकारचे आहे, व्यवहारात तिच्या संपर्कात येणारी माणसे कोणत्या प्रकारची आहेत, तिच्या कामाचे तास कोणते इत्यादींबद्दल अंदाज बांधता येतो. व्यक्ती नोकरदार असेल, तर कोणत्या संस्थेत, कोणत्या हुद्यावर काम करते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरणाच्या प्रक्रिया सर्व व्यवसायांत शिरल्याने व्यवसायांची संख्या वाढली. त्यांच्यातील गुंतागूंत वाढली, तशी व्यवसायांचा कार्यात्मक समन्वय साधण्याकरिता कुशल व्यवस्थापनाची आवश्यकता भासली. साहजिकच व्यवस्थापनाची व समन्वयकाची कामे करणारे वरच्या दर्जाचे ठरले. कारण इतर लोक त्यांच्या देखरेखीखाली अगर हुकमतीखाली काम करणारे असतात. शिक्षणाचे समीकरण चांगल्या वेतनाची नोकरी मिळण्याशी आणि चांगल्या उत्पन्नाचा स्वतंत्र व्यवसाय थाटण्याशी केले जाते. उच्च शिक्षणातील स्पर्धात्मक प्रावीण्यामुळे सरकारदरबारी अधिकाराची स्थाने मिळण्याची शक्यता असते. अशा सर्व शिक्षणप्रकारांना श्रेष्ठ समजून त्यांना उच्च स्थान दिले जाते. प्रतिष्ठा बहाल केली जाते. कोणत्याही शिक्षण शाखेतील परमोच्च पदवी संपादन करणारे इतरांहून श्रेष्ठ समजले जातात. शिक्षण कोणत्या संस्थेतून घेतले, यालाही विद्यार्थिवर्गात व सर्वसामान्य जनतेत महत्त्व असते. काही शैक्षणिक संस्थांमध्ये ते बहुतेक उच्च वर्गाचे विद्यार्थी जातात म्हणून तेथील शिक्षणशुल्क अधिक असते. तेथील निकाल चांगले लागतात म्हणून इतर संस्थांपेक्षा वरचा दर्जा दिला जातो. साहजिकच तेथे शिकणारा विद्यार्थीही अधिक प्रतिष्ठित समजला जातो. या शैक्षणिक संस्थांबरोबरच विद्यार्थ्यांची वेषभूषा, मित्र-परिवार, अभ्यासाव्यतिरिक्त खेळ-करमणुकीतील प्रावीण्य, बोलण्या-चालण्यातील लकब इत्यादींबद्दलच्या वैशिष्ट्यां मुळेही वरचा दर्जा प्रदान केला जातो. अर्थात याची कालमर्यादा थोडी असते. मिळकत, व्यवसाय आणि शिक्षण हे तीन निकष अधिक वस्तुनिष्ठ मानले जातात. जीवनशैलीपैकी दिखाऊ उपभोग हा अर्थात वस्तुनिष्ठ निकष आहे; परंतु अभिरुची, ललित कलांची आवड व त्यांबाबतचा दृष्टिकोन इ. बाबी आत्मनिष्ठ मूल्यमापनाच्याही होऊ शकतात. वर्गभेदाचा व समाजात असलेल्या विविध वर्गांचा समाजावर आणि भिन्न वर्गांतील व्यक्तींवर काय परिणाम होतो, हे पाहणे उद्‌बोधक ठरेल. यांत्रिकीकरणाच्या विस्तारामुळे व विशेषीकरणामुळे समाजातील एकूण श्रमिकांची संख्या कमी होत असून पांढरपेशा कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे आणि मध्यमवर्गात अधिकाधिक लोक येत आहेत. श्रमिकांमधील निव्वळ मजुरीवर जगणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून, प्रशिक्षित आणि कसबी कामगारांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे समन्वयक व व्यवस्थापकांच्या गरजा वाढून त्यांचे म्हणजे पांढरपेशांचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे तांत्रिक कुशल कामगारांचेही प्रमाण वाढत आहे. एकूण अर्थो त्पादनातील त्यांचा वाटा व महत्त्वही वाढत आहे. औद्योगिकीकरणाच्या विस्ताराबरोबरच कामगारांबद्दलचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे. कामगार हा उत्पादन प्रक्रियेतील एक यांत्रिक ठोकळा नसून आपल्या परिवाराकरिता झटणारा, आशा-आकांक्षांनी प्रेरित झालेला एक माणूस आहे, ही भावना व्यवस्थापनामध्ये बळावत आहे. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे या कामगारांचे सहकार्य मिळावे, म्हणून उत्पादनसंस्थेच्या एकूण नफ्यामध्ये त्याला वाटेकरी करून घेण्याचे आणि काही ठिकाणी त्यांना व्यवस्थापनामध्येही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. याचा परिणाम म्हणून कामगारांच्या वेतनामध्ये वाढ होऊन, उच्च राहणीमानाकरिता मागण्या वाढत आहेत. मध्यम वर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालल्यामुळे आणि अनेक कुटुंबे उच्च-मध्यम व उच्च वर्गात सरकत असल्यामुळे शहरांत स्वमालकीच्या सदनिकांच्या नवनव्या वस्त्या वाढत आहेत. त्याचबरोबर स्वयंचलित दुचाकी-चारचाकी वाहनांपासून घरगुती जीवनात शारीरिक कष्ट कमी करून, इंद्रियसुखाची बरसात करणाऱ्या अनेक दिखाऊ उपभोगाच्या यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपर्यंतच्या सर्वच वस्तुंकरिता मागण्या वाढल्या आहेत. साहजिकच त्यांच्या उत्पादनात गुंतलेल्या कारखान्यांची संख्याही वाढत आहे आणि त्याचबरोबर कामगारांच्या संख्येत वाढ, त्यांच्या वेतनात वाढ, त्यांच्या राहणीमानाचा विस्तार आदींचे चक्र चालूच आहे. परंतु आजकाल माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे व प्रसारामुळे काही क्षेत्रांतील लोकांचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढले आहे व त्या तुलनेत इतर क्षेत्रांत उत्पन्नवाढ न झाल्याने वर्गव्यवस्थेची परिमाणे बदलली असून वर्गभेद तीव्रपणे दिसून येतो आहे. कामगारवर्गाच्या उद्घाराकरिता समाजात अनेक उपाययोजना चालू असूनही कनिष्ठ अगर अतिकनिष्ठ वर्ग संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. शेती, बांधकाम व इतर असंघटित क्षेत्रांमध्ये तसेच कार्यालयीन व घरगुती कामासाठी कामगार महिला व पुरुषांची गरज असते. अर्थात त्यांच्याही वेतनात व कामाच्या स्वरूपात हळूहळू परिवर्तन होत आहे. तरीही वर्गा-वर्गांमधील भेद अजूनही टिकून आहेत. सार्वजनिक बाबींकडे सर्वच वर्ग स्वहिताच्या दृष्टीने पाहतात; परंतु सरकारी योजनांकडे व धोरणांकडे मध्यम आणि उच्च-मध्यमवर्ग अधिक जागरू कतेने पाहतात असे दिसते. उच्चवर्गीय लोक एकूणच सार्वजनिक हिताच्या शासकीय योजनांबद्दल उदासीन असतात; परंतु स्वहिताशी संबंधित क्षेत्राबद्दल तेही जागरूक असतात असे दिसते. एकूण सामाजिक-राजकीय क्षेत्रांमधील विविध घडामोडींबद्दलच्या वर्गा-वर्गांमधील अभिवृद्घीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतो. मतदानाच्या वेळी याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांकडून होतो आणि त्याचा निकालावर परिणाम होणे अपरिहार्य ठरते. वर्गव्यवस्था आणि जातिव्यवस्था यांची नेहमी तुलना केली जाते. वर्गाच्या बाबतीत व्यवसाय तत्त्वतः तरी बदलता येतो आणि बदललेही जातात; परंतु काही कौटुंबिक स्वयंरोजगाराच्या व्यवसायाच्या संदर्भात उदा., शेती, दुकानदारी, कारखानदारी,वैद्यक व्यवसाय इ. एखाद्या कुटुंबात वारसाहक्काने पिढ्यान्‌पिढ्या तो तसा टिकावा म्हणून प्रयत्न केला जातो. वर्ग बदलण्याविषयी काही तात्त्विक बंधने नसली, तरी प्रत्यक्ष व्यवहारात रोटी-बेटी संबंध आंतरवर्गीय असण्याची उदाहरणे कमीच आहेत.

 

कुलकर्णी, मा. गु.; नायगांवकर, अमिता

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate