অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक सुधारणा

सामाजिक सुधारणा

सामाजिक सुधारणा

(सोशल रिफॉर्म्स). अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो. या संज्ञेची व्याप्ती वा कृतिकक्षा कालानुसार व सामाजिक कायद्यानुसार बदलत असते. उदा., कुटुंबनियोजन, सामाजिक सुरक्षा,दारिद्र्यविमोचन यांसारख्या कार्यक्रमांमुळे तिच्या कृतिकक्षेत फेरफार झालेले आढळतात. शिवाय देशपरत्वे सामाजिक सुधारणांत भिन्नत्व आढळते. उदा., मुस्लिम राष्ट्रांत स्त्रियांनी बुरखा घालावा अशी सक्ती वा बंधन आहे, तर पाश्चात्त्य देशांत मुस्लिम स्त्रियांना असे बंधन नाही. एवढेच नव्हे तर, काही देशांत सार्वजनिक ठिकाणी (फ्रान्स) बुरखा वापरण्यास कायद्यानेच बंदी घातलेली आहे. समाजात सतत काहीना काही बदल नेहमी घडत असतात. सुधारणा आणि संस्कृती या माणसांच्या अभिव्यक्तीतून निर्माण झालेल्या मानवनिर्मित परंपरा व चालीरीती होत. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजाची सर्वांगीण सुधारणा होय. उदा., भारताच्या घटनाकारांनी सामाजिक सुधारणांमध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय आदी बाबींचा अंतर्भाव केला आहे.

भारतात इंग्रजांच्या सत्तेच्या प्रस्थापनेनंतर इंग्रजांची शिक्षणव्यवस्थाही आली आणि इंग्रजांकडून मिळालेल्या शिक्षणामुळे संस्कारित झालेल्या सुशिक्षितांना आपल्या समाजाकडे पाहण्याची नवी, बुद्घिवादी आणि मानवतावादी दृष्टी प्राप्त झाली. आपल्या समाजातील जाचक रू ढी आणि अंधश्रद्घा नाहीशा झाल्या पाहिजेत अशी त्यांची धारणा झाली.

राजा राममोहन रॉय (१७७२–१८८३) ह्यांनी समाजसुधारणांची परंपरा सुरू केली. त्यांनी केलेल्या बाह्मो समाजाच्या स्थापनेमुळे भारतात एक नवे युग अवतरले. बुद्घिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये त्यांनी भारतीय समाजाला उपलब्ध करून दिली. नवरा मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीला त्याच्या चितेवरच जाळण्याची अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी, तसेच कन्याविकय, कन्याहत्या, बालऐविवाह, बालावृद्घ विवाह अशा हीन चालींच्या बंधनांतून भारतीय स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. पंडित ⇨ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांनीही ह्या दृष्टीने अथक प्रयत्न केले. विधवांच्या पुनर्विवाहासाठी केशवचंद्र सेन यांनी बंगालमध्ये ब्राह्मो समाजातर्फे चळवळ सुरू केली.

महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर⇨लोकहितवादी, ⇨महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती ⇨महादेव गोविंद रानडे, ⇨गोपाळ गणेश आगरकर, ⇨विठ्ठल रामजी शिंदे, ⇨भीमराव आंबेडकर, कर्मवीर ⇨भाऊराव पाटील, ⇨पंडिता रमाबाई, ⇨रघुनाथ धोंडो कर्वे इत्यादींनी समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले; अनिष्ट सामाजिक रुढींविरुद्घ लढा दिला. इंग्रजी अमदानीच्या आरंभी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. १८१९मध्ये मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी कोलकात्यात काढली. १८३४ पर्यंत कोलकात्यात मुलींसाठी तीन शाळा निघाल्या होत्या.

महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा स्थापन केली; पुढे आणखी दोन शाळा काढल्या. अस्पृश्यांसाठीही त्यांनी शाळा काढली. अस्पृश्यांना पिण्याचे पाणीही सहजपणे मिळत नसे. जोतीरावांनी आपल्या वाड्यातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. अंधश्रद्घेचे निर्मूलन करून वैचारिक कांती घडवून आणण्यासाठी तसेच समताप्रधान समाजाच्या निर्मितीसाठी ⇨सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घातले. ⇨धोंडो केशव कर्वे (१८५८–१९६२) ह्यांनी स्वतः एका विधवेशी पुनर्विवाह केला होता. १८९३ साली त्यांनी विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ काढले. १८९९ मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रम ह्या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेतर्फे महाराष्ट्रभर कन्याशाळांचे जाळे निर्माण झाले.

राजर्षी ⇨शाहू छत्रपतींनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी तत्त्वांना पाठिंबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना इंग्लंडमधील उच्च शिक्षणास त्यांनी आर्थिक मदत केली. जातिभेद निर्मूलनाचा एक मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहांना त्यांनी कायद्याने मान्यता दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. घटस्फोटास व विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. बहुजनसमाजाच्या शिक्षणासाठी म. फुलेंनी जागृती निर्माण केली होती. राजर्षींनी खेड्यापाड्यांतील विविध जातिजमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली.

डॉ. आंबेडकरांनी स्वतः कष्ट करून शिक्षण घेऊन आपल्या अस्पृश्य गणलेल्या समाजबांधवांना शिका, संघटित व्हा आणि लढा हा संदेश दिला; त्यांच्यासाठी शिक्षणसंस्था उभी केली.

ह्या सर्व समाजसुधारकांनी धडाडीने केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचा विचार प्रभावी ठरला.

सामाजिक सुधारणा संपूर्ण समाजासाठी केल्या जातात, तसेच एखाद्या समूहाचे प्रश्न हाताळण्यासाठीही केल्या जातात;एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील विकासासाठीही त्या कराव्या लागतात. उदा., सेना-व्यवस्था, पोलीस खाते अशांमध्ये नव्या आचारसंहिता लागू कराव्या लागतात. शिक्षणक्षेत्रात तर वेळोवेळी बदलत्या मूल्यांनुसार शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये बदल सुचवावे लागतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये अलीकडच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिक मूल्ये, आध्यात्मिक मूल्ये यांची एकत्रितपणे जोपासना करणे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यावरणाची जाणीव व जागृती निर्माण करणे, श्रमप्रतिष्ठा व कष्ट यांच्या निरोगी वृत्तीची जोपासना करणे, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय यांबद्दल शिक्षणातून निष्ठा निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता व प्रतिष्ठा राखण्यासाठी समर्पणाची भावना जोपासणे, अशा ध्येयांनी प्रेरित होऊन शिक्षक व विद्यार्थी यांनी शिक्षण घेतले, तर सामाजिक सुधारणा यशस्वी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते. सामाजिक सुधारणा योग्य वेळी सर्वांच्या प्रयत्नाने अंमलात आणल्या गेल्या, तरच समाजाला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल. या सुधारणा अपेक्षेनुसार घडून येतातच असे नाही. त्यांमध्ये अनेक अडथळे येतात. हे अडथळे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व मानवी स्वरूपाचे असतात. याचा साकल्याने विचार करून, समाजहित डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक नीतिमूल्यांची बूज राखून सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा केला पाहिजे. केवळ कायदे करून समाजसुधारणा होत नाही. कायद्याला सूज्ञ समाजाची संमती अपरिहार्य असते.

 

काळदाते, सुधा; कुलकर्णी, अ. र.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate