অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक स्थान

सामाजिक स्थान

सामाजिक स्थान

समाजामध्ये व्यक्ती वा गट यांचा जो दर्जा ते सामाजिक स्थान होय. स्थान व दर्जा या एकाच अर्थाच्या दोन संज्ञा होत. सामाजिक स्थान ही संकल्पना सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेचा एक भाग आहे. अनेक गट, विविध समूह यांचा मिळून समाज बनतो. समाजातील सामाजिक संबंध दृढ होण्यात त्या-त्या गटातील व्यक्तींचे समूहातील स्थान,दर्जा, वैचारिक जग, कर्तृत्व, कर्तव्य, निर्णयप्रक्रिया यांचा संबंध असतो. सामाजिक स्थान या संकल्पनेत दर्जा आणि भूमिका हे दोन मुख्य घटक आहेत. दर्जामुळे व्यक्तीस प्राप्त अधिकाराद्वारे महत्त्वाची भूमिका बजावावयाची असते. म्हणजेच भूमिका या घटकाचे काम व्यक्तीस कर्तव्य म्हणून पार पाडावयाचे असते. हॅरी जॉन्सन यांच्या मते या दोन घटकांच्या संदर्भातच सामाजिक स्थानाचे निर्धारण होते.

सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला व्यक्तिश

किंवा तिच्या स्थानानुरूप समाजाने जो सकारात्मक किंवा नकारात्मक मानसन्मान, प्रतिष्ठा आणि सत्ता यांद्वारे दर्जा दिलेला असतो, त्यावरुन तिचे सामाजिक स्थान ठरते. उदा., एकच व्यक्ती वकील असते, ते तिचे कायदेशीर स्थान असते. तीच व्यक्ती मतदार असते ते तिचे संवैधानिक स्थान असते आणि जर त्याच व्यक्तीला कलेविषयी जाण असेल; तर ती सांस्कृतिक क्षेत्रात रसिक म्हणून मानली जाईल. स्थान हे इतर व्यक्तींशी असलेले संबंध स्पष्ट करते. व्यक्ती आपल्या व इतरांच्या स्थानांप्रमाणे वर्तन करते. सर हेन्री मेन यांच्या मते सरंजामशाहीतील उच्च व नीच (सरंजामशहा, भूमिहीन मजूर, गुलाम) अशा स्थानापासून तसेच अनौपचारिक संबंधांपासून निर्माण होणाऱ्या स्थानापर्यंत आणि औद्योगिक कांतीमुळे निर्माण झालेल्या मालकापासून ते करारानुसार कारखान्यांत काम करणाऱ्या, तुटपुंज्या श्रममूल्यावर अवलंबून राहणाऱ्या कामगारांपर्यंत प्रत्येकाचे स्थान नियमांनी आणि ठरावीक करारांनी बांधलेले होते. या स्थानावर असणाऱ्या कामगारांची मालकांकडून आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत होती; पण तो बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा स्थायीभावच होता. माक्स वेबर यांनी याच अर्थाने राजकीय पक्ष, वर्ग आणि स्थानापन्न गट यांच्यातील परस्परसंबंध हे करारानुसार बांधले गेले होते असे म्हटले आहे. त्यांच्या सिद्घांतानुसार ‘व्यक्ती आपल्या स्थानाच्या आधारे समाजात प्रतिष्ठा मिळविते.’ वर्ग, प्रतिष्ठा आणि सत्ता असा तो प्रवास आहे. स्थान असलेल्या व्यक्तीची जीवनप्रणाली वेगळी असते. त्यासाठी त्याला औपचारिक प्रशिक्षण मिळालेले असते. दर्जा असलेले समूह स्थानासाठी नेहमीच स्पर्धात्मक पवित्रा घेतात, कारण त्यांना स्वतःच्या समूहाचे हितसंबंध/मक्तेदारी जपायची असते. समाजाचे स्तर उच्च-नीच स्थानांवर श्रेणीव्यवस्थेच्या स्वरूपात असतात. यांपैकी काही समूह स्थानसमूह तर काही समूह वर्गसमूह होऊन समाजात श्रेष्ठ स्थान प्राप्त करू शकतात.

कर्तृत्वसिद्घ दर्जा (स्थान)

स्वगुणांवर आपले स्थान सिद्घ करतात म्हणून अशा स्थानास कर्तृत्वसिद्घ स्थान असे म्हणतात. एकविसाव्या शतकात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अभियांत्रिकी (एंजिनिअरिंग) दूरसंदेशवहन (टेलिकम्यूनिकेशन ), संगणक यांचे अद्ययावत प्रशिक्षण घेऊन आधुनिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भविष्यातील उज्ज्वल स्थान प्राप्त करून घेत आहेत. खूप मेहनत घेऊन स्पर्धेमध्ये यशस्वी होत आहेत. अशा यशस्वी विद्यार्थ्यांना देशी-परदेशी खाजगी कंपन्या निवड करून नोकऱ्या देत आहेत. त्यांचे स्थान भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे; परदेशात त्यांचे गौण स्थान असले; तरी आर्थिक आणि लौकिक दृष्ट्या ते कर्तृत्व वाढविण्याच्या प्रयत्नात असतात आणि दर्जा प्राप्त करून घेत आहेत. प्रत्येक समाजात कर्तृत्वसिद्घ आणि अर्पित असे दोन प्रकारचे स्थान असते. काही समाजांत यापुढील काळात कर्तृत्वसिद्घ स्थानालाच महत्त्व राहील.

अर्पित दर्जा ( स्थान )

स्थान आणि दर्जा या दोन्ही एकाच अर्थाच्या संज्ञा आहेत. लहान मुलांना कर्तृत्व दाखविण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून त्यांचा दर्जा अर्पितच ठरतो. अर्पित दर्जा ‘वय’ या निकषावरू न ठरतो. ‘वय’ या निकषानुसार वाढत्या वयाबरोबर तरुण-तरुणींना अर्पित स्थान प्राप्त होते; परंतु या वयात त्यांना अर्पित स्थानाचा फायदा होत नाही; कारण ते शारीरिकदृष्ट्या सक्षम झालेले असतात, प्रौढपणी त्यांनी लहान मुलांची व वृद्घांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते. समाजासाठीही उत्पादक स्वरूपाची कामे करावीत, गुणवत्ता वाढवावी अशी अपेक्षा असते. ‘वय’ मोठे झाले तर वृद्घ म्हणून मान मिळतो, वृद्घांचे मार्गदर्शन घेतले जाते. ज्येष्ठत्व प्राप्त होते.

लिंग हा दुसरा एक निकष स्त्री-पुरुष यांचा अर्पित दर्जा ठरवितो. लिंगानुसार भूमिका प्रदान केल्या जातात. स्त्री-पुरुष यांच्यामध्ये शारीरिक भेद असल्यामुळे व स्त्री मुलाला जन्म देते हे कारण पुढे करून तिला गौण स्थान दिले गेले; परंतु स्त्री घराबाहेर जाऊन अर्थार्जन करण्याची आणि घराचे व्यवस्थापन पहाण्याची भूमिकाही आता करू लागली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात घराबाहेर व्यवसायाच्या ठिकाणी तिला उच्च स्थान असून, अद्यापि काही कुटुंबांमध्ये तिचे स्थान गौणच समजले जाते.

नातेसंबंधाच्या निकषानुसार घरातील पुरुष मंडळी विशेषतः वडील, आजोबा, आजी, आई यांना वरचे स्थान असते, तर लहान मुले, नातवंडे, सासरी जाणाऱ्या मुली यांना गौण स्थान असते. विवाहानंतर सासरचे सासरे-सासू, मोठे दीर-जाऊ, नणंद अशांना वरचे स्थान असते, तर धाकटे दीर, धाकटी नणंद यांना गौण स्थान असते. हे स्थान विवाह, नामकरण विधी इ. समारंभात फार महत्त्वाची भूमिका बजावते.

याशिवाय सामाजिक संबंध स्थान ठरवितात. धर्म, जात, वर्ग यांना समाजात उच्च-नीच स्थान असते. त्यातील सदस्यांना त्या त्या जातीमधील वा वर्गामधील स्थानानुसार कमी-अधिक महत्त्वाचे स्थान मिळते. धर्मपंथ आणि परस्परांबद्दलची भेदाभेदाची भावना ही व्यक्तीचे स्थान व भूमिका ह्यांवर वेळोवेळी प्रभाव पाडत असते.

 

काळदाते, सुधा

स्त्रोत : मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate