অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक स्वास्थ्य

सामाजिक स्वास्थ्य

सामाजिक स्वास्थ्य

समाजाच्या स्वास्थ्यसंवर्धनासाठी भोवतालच्या परिस्थित्यनुसार केलेली आरोग्यविषयक सुव्यवस्था. समाजशास्त्राची ही एक शाखा आहे. या संकल्पनेत शरीराचे, मनाचे वर्तन आणि सामाजिक स्वास्थ्याचा समावेश असतो. आरोग्यविज्ञानाच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणार्थ सक्षम यंत्रणा मनुष्यजातीच्या स्वास्थ्यसंरक्षणाच्या कामी अनेक उपकम राबवीत आहे. तीत वैयक्तिक स्वास्थ्य व सार्वजनिक स्वास्थ्य या दोन्हींचा साकल्याने विचार केला जातो आणि ह्यांसाठी काही तत्त्वे, नियम आणि कायदेही करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीने आरोग्यविषयक नियमांचे पालन करून आरोग्यदायक सवयी लहानपणापासून आत्मसात करणे आवश्यक आहे. सुदृढ निरोगी शरीरासाठी स्वच्छता, शुद्घता व सकस आहार ही मुलभूत तत्त्वे आचरणात आणली पाहिजेत. सार्वजनिक स्वास्थ्याकरिता विघातक गोष्टींचे निर्मूलन करून आरोग्यप्रद सोयीसुविधा उपलब्ध कशा होतील, यांकडे लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिबंधक उपाय, रोगचिकित्सेची सोय,औषधोपचार वगैरे बाबी सार्वजनिक स्वास्थ्याची मूलतत्त्वे होत. पाणीटंचाई, दुष्काळ, बेकारी, नैसर्गिक आपत्ती, परकीय आक्र मणे इ. प्रश्न मानवजातीला भेडसावत असतात. त्या प्रश्नांना समर्थपणे तोंड देऊन या कठीण परिस्थितीतून जे मार्ग शोधून काढतात, त्यांच्यावर समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. या अडचणींचा त्यांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. सामाजिक स्वास्थ्य मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. निरोगी व निकोप शरीरात निकोप मन असते. एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग बदल झाला आहे. निर्वाहासाठी त्यांना धावपळ करावी लागते आणि अनेक समस्यांना सामोरे जाणे भाग पडते. त्यामुळे ताण वाढून मानसिक संतुलन बिघडते आणि रक्तदाबासारख्या व्याधी उद्‌भवतात. आरोग्याची काळजी घेणे ही सर्वस्वी व्यक्तीची जबाबदारी आहे. व्यक्तीचे वर्तन,आरोग्यविषयक सवयी आणि शांत, मनमिळाऊ आणि विचारी स्वभाव, संयमित बोलणे आणि वागणे या स्वास्थ्याशी संबंधित बाबी आहेत. समतोल आहार, आवश्यक ती विश्रांती घेऊन, समाजातील इतरांशी चांगले वर्तन ठेवून सामाजिक स्वास्थ्य प्रत्येकाने कसे राखावे याचे प्रशिक्षण दिले जाणे महत्त्वाचे आहे.

आरोग्याचा आर्थिक स्थितीशील दर्जाशी जवळचा संबंध आहे. व्यक्तीची आर्थिक सुस्थिती असेल, तर त्याला आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेणे सुकर होते. इंग्लंडमधील आरोग्यविषयक विषमतेबद्दलचा ‘दि ब्लॅक रिपोर्ट’ हा अहवाल इतिहासप्रसिद्घ आहे. पी. टाऊनशेंड आणि एन. डेव्हिडसन यांना १९८२ मध्ये असे आढळले की, ग्रे ट ब्रिटनमधील १८ ते ६० वर्षे वयोगटातील प्रथमश्रेणी व्यक्तींपेक्षा चतुर्थश्रेणीतील व्यक्तींचा मृत्युदर जवळजवळ अडीचपट जास्त आहे आणि दोन स्तरांमधील अंतर कमी होण्याची शक्यता नाही. हा अहवाल ‘ब्लॅक रिपोर्ट’ या नावाप्रमाणेच सामाजिक स्वास्थ्याची विषमता दर्शवितो.

सामाजिक अस्वास्थ्यासाठी कारणीभूत असणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढू नये, म्हणून प्रत्येक समाजात आरोग्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याची व्यवस्था असावयास हवी. त्यासाठी छोट्या-मोठ्या गावांमध्ये आरोग्यकेंद्रे उभारावयास हवीत. जागतिक आरोग्य संघटना (WHO ), सार्वजनिक आरोग्य ही संकल्पना सर्व देशांतून प्रसृत व्हावी म्हणून स्थापन झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक विकास आणि जागतिक शांतता यांसाठी ते अत्यावश्यक आहे. लोक व्यसनमुक्त होण्यासाठी कडक अंमलबजावणी केली पाहिजे. अप्रगत देशांमध्ये अस्वच्छता, रोगराई, प्रदूषण, संसर्गजन्य साथी यांमुळे बहुतांशी गरीब जनता सतत आजारांनी ग्रस्त असते. या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम व्यवस्था नाही, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याचा दर्जा घसरला आहे. याशिवाय गरिबीमुळे कुपोषण ही गंभीर समस्या अशा अस्वास्थ्यात भर घालते. ‘ज्याचे आरोग्य चांगले तो आशावादी असतो आणि जो आशावादी असतो, त्याला सर्व काही मिळविता येते’, अशी अरबी भाषेतील म्हण आहे. मनुष्याला आशावादी राहून जगण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे.

 

पहा : आरोग्य अधिनियम; आरोग्यभुवन;आरोग्यविज्ञान.

काळदाते, सुधा

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate