यंत्रमाग व्यवसायात अनेक अडचणी, आव्हाने उभी असताना, इचलकरंजीसारख्या यंत्रमाग नगरीत यंत्रमाग व्यवसायाचा कोणताही वारसा नसताना खामकर टेक्सटाईल्सने केवळ चार वर्षात यश मिळवले आहे.
खामकर टेक्सटाईल्सच्या मालक सुनीता उदय खामकर यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी चार वर्षांपूर्वी एखादा उद्योग उभारण्याचा विचार केला. त्यांचे पती उदय खामकर व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. त्यांनी पत्नीला भक्कम पाठिंबा दिला आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विचारांना दिशा दिली.
चार वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रचे जवळपास 20 लाख रुपयांचे कर्ज खामकर दांपत्याने घेतले. तसेच, आयडीबीआय बँकेचेही आर्थिक सहकार्य त्यांना लाभले. त्यातून जवळपास 4 हजार चौरस फूट जागा त्यांनी घेतली. त्यामध्ये 36 लूमचे बांधकाम केले. पहिल्या वर्षी 24 लूम आणि दुसऱ्या वर्षी उर्वरित 8 लूम त्यांनी घेतले. आज खामकर यांच्याकडे 11 कामगार आहेत.
खामकर यांची जुळी मुले त्यांची प्रेरणा आहेत. भविष्यात त्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण घेता यावे, यासाठी आतापासून पैसा उभारावा, यासाठी हा कारखाना त्यांनी सुरू केला. पहिले वर्ष या व्यवसायातील धडे गिरवण्यातच गेले. सर्व गोष्टी नवीन होत्या. अगदी प्राथमिक गोष्टीही शिकावयाच्या होत्या. पण, नंतरची गेली 3 वर्षे मात्र त्यांचा व्यवसायात चांगलाच जम बसला आहे.
इचलकरंजीसारख्या घरटी यंत्रमाग कारखाने असणाऱ्या ठिकाणी खामकर यांच्या व्यवसायाची उलाढाल जवळपास एक कोटीपेक्षा जास्त होत आहे. याबद्दल सुनीता खामकर म्हणाल्या, आम्ही तयार सूत विकत घेतो. आणि त्यातून आमच्या कारखान्यात महिन्याला 18 ते 19 हजार मीटर कापडाची निर्मिती होते. त्याचा वापर मुख्यतः कॉटन साडी बनविण्याकरिता होतो. एका ताग्याचे वजन 5 हजार 800 ग्रॅम असते. त्यामध्ये 93 ते 94 मीटर कापड असते. त्यासाठी आम्ही 40 नंबरचे सूत वापरतो. तर कांडीला 7 नंबरचे सूत वापरतो. आमचा कपडा 50-54 चा असतो.
या यशाचे गमक म्हणजे आम्ही कामगारांना आमच्या घरातील सदस्यच मानतो. त्यामुळे आमच्याकडे सुरवातीला लागलेले कामगार आजही टिकून आहेत. त्यांचे आम्हाला पूर्ण सहकार्य लाभते. आम्ही आमच्या कामगारांच्या सुख-दुःखात सामील असतो. आम्ही आमच्या कामगारांचा विमाही काढला आहे, असे सुनीता यांनी सांगितले.
भविष्यात आणखी रॅपिअर, एअर जेट लूम असे परदेशी बनावटीचे लूम आणण्याचा मानस खामकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे कापड निर्मितीचा वेग वाढेल तसेच मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे त्यांना वाटते.
लेखिका -संप्रदा द. बीड करप्र.जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर
स्त्रोत : महान्यूज