जून १९७९ पर्यंत एकूण १३ कारखान्यांची ३४,४९८ हेक्टर जमीन महामंडळाकडे आलेली असून त्यापैकी ३,१९४ हेक्टर जमीन पूर्वीच्या पट्टाकारांना महाराष्ट्र शेत जमीन (धारणा जमिनीवर कमाल मर्यादा) कायदा, १९६१–१९७० मध्ये त्याची दुरुस्ती झाल्यावर त्याप्रमाणे परत करण्यात आली आहे. महामंडळाने १९७८–७९ या वर्षात ६,८९७·४ हेक्टरांवर उसाची लागवड केली होती. तसेच खरीप, रबी व उन्हाळ्यातील पिकांखाली ७,७११·३ हेक्टर जमीन होती. यामध्ये बीजोत्पादन, नेहमीची अन्नधान्ये, चारा आणि हिरवी खते यांसारखी पिके होती. १९७८–७९ च्या ऊस गाळण्याच्या हंगामात महामंडळाने ६,४०,६१७ मे. टन ऊस आठ खाजगी व पंधरा सहकारी साखर कारखान्यांना पुरविला होता.
महामंडळाचे व्यवस्थापन १९७८–७९ मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व्यवस्थापन संचालक व इतर १५ सदस्यांच्या शासननियुक्त संचालक मंडळाकडे होते. परंतु १९८१–८२ सालासाठी त्याचा आकार अध्यक्ष, व्यवस्थापन-संचालक व इतर दोन सदस्य एवढाच करण्यात आला होता.
महामंडळाची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. जून १९७९ अखेर महामंडळाला एकंदर संचित तोटा ०·९२ कोटी रु. होता. जून १९८० अखेर तो २·२० कोटी रु. झाला. उसाच्या किंमतीचे नियंत्रण, खते, मजुरी इत्यादींवरचा लागवडीचा वाढता खर्च व साखर कारखान्यांकडून फार मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ थकबाकी राहिल्याने काढाव्या लागलेल्या कर्जावरचे व्याज, अशी याची प्रमुख कारणे आहेत. जून १९७९ अखेर तीन वर्षांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीची रक्कम १·०६ कोटी रु. होती.
देशपांडे, स. ह.; पेंढारकर, वि. गो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/21/2020