महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
खादी व ग्रामोद्योगांना उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची १९६० मध्ये स्थापना झाली. हे मंडळ सेवासंघटना या स्वरूपात व ना नफा-ना तोटा या तत्त्वावर काम करते. खादी उत्पादन आणि काही अजिबात नष्ट झालेल्या, काही उतरती कळा लागलेल्या व इतर काही अशा २२ उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांची पुनर्बांधणी करण्याची विशिष्ट जबाबदारी मंडळावर टाकलेली आहे. मंडळाने बंद पडण्याच्या मार्गावरील काही व्यवसायांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सुव्यवस्थित करण्याची मोठी कामगिरी केली आहे. मंडळाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य सबंध देशात चामडे, मृत्पात्री, हातबनावटी कागद, बांबू व वेतकाम आणि तेल गाळणे या ग्रामीण उद्योगांत अग्रेसर आहे. यांव्यतिरिक्त मंडळ खादी, पॉलिएस्टर खादी, लोकर, रेशीम, मधमाशा पाळणे, नीरा, साधा व ताडीचा गूळ, धान्ये व डाळी ह्यांवर प्रक्रिया, अखाद्य तेले व साबण, खडूच्या कांड्या, फळांवर प्रक्रिया व डबेबंद करणे, सुतारकाम, लोहार काम, ॲल्युमिनियमची भांडी, औषधी वनस्पती, डिंक, आगपेट्या, काथ्या, लाख व गोबर-वायू संयंत्रे इ. उद्योगांना साहाय्य करते व या संबंधात पुढील प्रकारची विनिर्दिष्ट कार्ये करते : (१) ग्रामीण शिल्पी व कारागीर यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण व आर्थिक साहाय्य देणे; (२) त्यांना हत्यारे व साहित्य पुरविणे आणि त्यांच्या उत्पादनाची विक्री होण्याला मदत करणे, यांसाठी मंडळ अनेक विक्री केंद्रे चालविते; (३) प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षार्थ्यांना विद्यावेतन देणे; (४) संशोधन करुन ग्रामीण उद्योगांच्या उत्पादनात सुधारणा घडविणे व त्यांची उत्पादकता वाढविणे; (५) कारागिरांची रोजगार हमी योजना कार्यान्वित करुन त्यांना हत्यारे, इतर सामग्री तसेच कर्ज मिळवून देणे.
पेंढारकर, वि. गो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश