অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतरस्त्यांमुळे कृषी विकास

शेतरस्त्यांमुळे कृषी विकास

प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार आणि रस्त्यांशिवाय विकास कसा होणार, याच विचारातून मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्‍यात महसूल प्रशासनाच्या पुढाकारातून शेतरस्त्यांची मोहीम राबविली गेली. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून सुमारे 122 गावांतील 145 किलोमीटर रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. त्याकरिता थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल दोन कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली, त्यावरूनच ही या भागासाठी लोकचळवळच झाल्याचे स्पष्ट होते.

लोकवर्गणीसाठी सरसावले हजारो हात


शेतरस्ते ही गावातील अत्यंत पायाभूत सुविधा असते. मात्र अनेक वेळा त्यावर अतिक्रमण झाल्याच्या समस्या तयार होतात. काही वेळा शेतरस्ते एका व्यक्‍तीला चालण्यापुरतेही नाहीत, अशी परिस्थिती तयार होते. सर्वांत मोठी अडचण तयार होते ती शेतमालाच्या वाहतुकीची. या परिस्थितीत बदल व्हावा याकरिता बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे तहसीलदार निर्भय जैन यांनी पुढाकार घेतला. आपल्या सहकाऱ्यांसमवेत शेतरस्त्यांसंदर्भाने गावोगावी जाणीवजागृती मोहीम राबविली. त्याचे दृश्‍य परिणाम अल्पावधीतच दिसू लागले. शेतरस्त्यांमुळे विशेषकरून पावसाळ्यात शेतमालाची वाहतूक सुलभ होणार, हा विचार परिसरात पोचला. बघता बघता अनेक गावांमध्ये शेतरस्त्यांकरिता आवश्‍यक लोकवर्गणीसाठी हजारो हात सरसावले. त्यातून आज मेहकर तालुक्‍यात दहा राजस्व मंडळांमधील एकूण 161 गावांपैकी 122 गावांमध्ये शेतरस्ते पूर्णत्वास गेले आहेत. हे थोडेथोडके यश नव्हे.

तालुक्‍याची माहिती केली संकलित


कामास सुरवात करण्यापूर्वी मेहकर तालुक्‍यातील शेतरस्ते, त्यांची अवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या आदी माहिती सुरवातीला घेण्यात आली. त्यानंतर त्या त्या गावात जागृती करण्यात आली. कायद्याचा आधार न घेता सर्वसहमतीने या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून होत होते. सामंजस्याने या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. एका गावाने पुढाकार घेतल्यानंतर कायद्याचा मुद्दाच समोर येण्याची गरज उरली नाही. अनेक गावांतील ग्रामस्थांमध्ये शेतरस्त्यांसाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होत ही लोकचळवळ झाली.

अंजनी राजस्व मंडळात तेरा किलोमीटर रस्ते


अंजनी बु. राजस्व मंडळात वर्षभरात सुमारे पाच रस्त्यांचे काम करण्यात आले. नऊ किलोमीटर रस्त्यांसाठी सुमारे आठ लाख रुपयांची लोकवर्गणी उभी झाली. सुमारे 317 शेतकऱ्यांना वहिवाटीची सोय या माध्यमातून झाली. याच मंडळातील उकळी-सुकळी गावात पाच किलोमीटरचे चार रस्ते मोकळे करण्यात आले. त्याकरिता तब्बल तीन लाख रुपयांची लोकवर्गणी संकलित झाली. याचा लाभ आज सुमारे 400 शेतकऱ्यांना होत आहे. उकळी-सुकळीचे सरपंच समाधान नवले, सामाजिक कार्यकर्ते आर. के. बोरे, मंडळ अधिकारी संजय देशमुख, तलाठी पंजाब मेटांगळे यांनी त्यासाठी मदतीचा हात दिला.

कळंबेश्‍वर ग्रामस्थांनी केला विक्रम


प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळंबेश्‍वर ग्रामस्थांनी लोकवर्गणीसाठी पुढाकार घेतला. कळंबेश्‍वर ते दुधाळा हा सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता करण्याचा विक्रम या ग्रामस्थांनी केला. त्यासाठी थोडीथोडकी नव्हे, तर पाच लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. अल्पावधीतच हे कार्य तडीस गेले. आज 135 शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होत आहे. बंडू कोपरघट, विष्णू मगर मंडळ अधिकारी बालाजी अनमोर यांनी या रस्त्याचा श्‍वास मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती केली. विक्रमी लोकवर्गणी व साडेतीन किलोमीटरचा रस्ता केल्याबद्दल खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांनी प्रातिनिधीक स्वरूपात कोपरघट व मगर यांचा या कार्याबद्दल गौरव केला.

शेलगावात दोन किलोमीटरसाठी अडीच लाख वर्गणी


शेलगाव देशमुख ते वरूड हा दोन किलोमीटरचा रस्ता अडीच लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून झाला. 115 शेतकऱ्यांना याचा फायदा आज होत आहे. सामाजिक कार्यकर्ते एकनाथ खरात यांनी त्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

देऊळ गावमाळी राजस्व मंडळात साडेपाच किलोमीटर रस्ता


मेहकर तालुक्‍यातील देऊळगावमही राजस्व मंडळही लोकविकासाच्या या चळवळीपासून दूर नव्हते. गावाने तळप विहीर ते नांद्रा या तीन किलोमीटर रस्त्यासाठी तीन लाख रुपयांची वर्गणी गोळा केली. 65 शेतकऱ्यांची सोय या माध्यमातून झाली. सावंगी विहीर ते गुंज हा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यातून झाला. त्याकरिता दीड लाख रुपये वर्गणी संकलित झाली. 100 शेतकरी त्याचा वापर आज करीत आहेत.

शेंदला गावाने केला विक्रम


शेंदला ते पिंप्रीमाळी, शेंदला ते गौंडाळा, शेंदला ते मारोतीपेठ अशा तीन रस्त्यांची कामे लोकवर्गणीतून करण्यात आली. एकरी 500 रुपयांप्रमाणे शेतकऱ्याने वाटा द्यावा, असे ठरले. तंटामुक्‍ती मंचाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणारे बैल जखमी होतात, बैलगाड्यांचे नुकसान होते, ही समस्या दूर करण्यासाठी हा खटाटोप होता. जिल्हा बॅंकेचे निरीक्षक गणेश रहाटे, किशोर रहाटे, सरपंच संजय रहाटे यांनी गावात प्रबोधन केले. शेंदला ते पिंप्रीमाळी रस्त्याचे खडीकरण करण्याचे नियोजित आहे. पिंप्रीमाळी परिसरात पाच फुटांचा रस्ता 25 फूट, तर गौंडाळा हा 10 फुटांचा रस्ता 44 फुटांपर्यंत विस्तारला आहे. सुरवातीला काहींनी या विस्तारीकरणाला विरोध केला, मात्र त्यांना शेतरस्त्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांनी या कामास होकार दिला. मारोतीपेठ रस्तादेखील दहा फुटांचा होता. त्याची रुंदी आज 25 फुटांवर पोचली आहे. दहा लाख रुपयांपेक्षा अधिक लोकवर्गणी करण्याचा विक्रम या गावाच्या नावे नोंदविला गेला.

जनावरांची झाली त्रासातून सुटका

मंडळ अधिकारी संजय देशमुख यांनीदेखील या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. मेहकर ते सांगाळी नाला हा रस्ता गेल्या 100 वर्षांपासून अरुंद होता. त्यावरून पावसाळ्यात बैलगाडी नेल्यास जुंपलेले बैल चिखलात फसल्यामुळे दगावल्याचे प्रकार घडले. सांगाळीचे सरपंच गजानन सावंग यांनी या रस्त्याला नवसंजीवनी दिली. मेहकर ते नेमसापूर या रस्त्याची अवस्थादेखील अशीच काहीशी होती. या रस्त्यांनीदेखील मोकळा श्‍वास घेतला.

राजकीय हस्तक्षेप टाळला


अंजनी बु. गावातदेखील या मोहिमेने लोकचळवळीचे रूप घेतले. सुमारे सात ते आठ रस्ते ग्रामस्थांनी मोकळे करण्याचे प्रस्तावित केले. रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी लोकप्रतिनिधींना बोलाविण्याचा काहींचा विचार होता, परंतू राजकीय हस्तक्षेप टाळण्यात आला. त्याउलट समस्त ग्रामस्थांचा सहभाग वा लोकचळवळीलाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले. मेहकर तालुक्‍यातील विविध गावांतील नागरिक अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे एक झाल्यामुळेच शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होण्यास व रस्ते मोकळे होण्यास मदत झाली. शेवटी गाव करी ते राव काय करी, हेच या शेतरस्त्यांच्या मोहिमेने सिद्ध केले. 

संपर्क ः निर्भय जैन
तहसीलदार, मेहकर 
मो. 9822295601
राजाभाऊ पाटील 
शेंदला, ता. मेहकर 
मो. 9420814444
बंडू कोपरवट 
कळंबेश्‍वर, ता. मेहकर 
मो. 9657392709
डॉ. भरत अल्हाट 
अंजनी बु., ता. मेहकर 
मो. ८००७३७७९९७

 

लेखक : विनोद इंगोले

माहिती संदर्भ :अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate