অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सन्मानाने जगण्याचा हक्क

सन्मानाने जगण्याचा हक्क

केरळमधील कालिकत शहरातील महिला कामगारांनी १ मे २०१४ च्या कामगार दिनाच्या दिवशी एक नाविन्यपूर्ण आंदोलन सुरु केले होतं. ‘इरीक्कल समर’ (बसण्याचा/विश्रांती घेण्याचा हक्क) ह्या नावाने सुरु झालेल्या ह्या आंदोलनात शहरातील सुमारे १००० दुकानांमध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करणार्‍या महिला ‘पेंकुट्ट’ (Penkuttu) ह्या संघटनेच्या माध्यमातून सामील झाल्या होत्या. यामध्ये उच्चभ्रू भागातील साड्यांच्या आणि दागिन्यांच्या दुकानांपासून ते एस.एम.स्ट्रीट वरील कपड्याच्या छोट्या दुकानांपर्यंत अनेकांचा समावेश होता. दिवसभर उभं राहून काम करावं लागणार्‍या महिलांचं हे आंदोलन हा या महिलांच्या सन्मानाने जगण्यासाठी चालू असणार्‍या लढ्यामधील एक टप्पा होता. या आंदोलनाची माहिती देणारा हा लेख.

पेंकुट्ट (महिलांचे संघटन) सन २०१० पासून कालिकत शहरात काम करणार्‍या असंघटित महिला कामगारांच्या हक्कांसाठी लढत आहे. संघटनेच्या अध्यक्ष विजी ह्यांच्या म्हणण्यानुसार ‘पेंकुट्ट’ ही इतर संघटनांपेक्षा वेगळी आहे. ह्या महिलांना आर्थिक फायदा मिळणं महत्वाचं आहेच, पण ‘पेंकुट्ट’च्या केंद्रस्थानी ह्या महिलांना रोजगाराच्या ठिकाणी माणुसकीचे हक्क मिळावेत आणि सन्मानाने काम करता यावं ही संकल्पना आहे. प्रस्थापित कामगार चळवळीमध्ये नेहमीच कामगारांच्या आर्थिक मागण्यांवर अधिक भर दिला जातो आणि त्यामुळेच ‘पेंकुट्ट’ची भूमिका त्यांच्यापासून वेगळी ठरते. जे. देविका ह्यांनी www.kafila.orgवर प्रकाशित झालेल्या Peeing in Peace and the revival of labour activism in Kerala या लेखात म्हंटल्याप्रमाणे ‘पेंकुट्ट’ मधील महिला कामगारांनी लिंगभेदाच्या मुद्याकडे लक्ष वेधून कामगार चळवळीला एक नवीन स्वरूप दिले आहे.

शहरामध्ये झपाट्याने वाढत चाललेल्या ह्या उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. साधारण २००५ नंतरच्या काळात ह्या दुकानांमधून महिला कामगार काम करताना दिसू लागल्या. विजींनी १९९४ सालीच एस.एम.स्ट्रीट वर आपलं टेलरिंगचं दुकान सुरु केलं होतं. त्यानंतर १० एक वर्ष इथल्या दुकानांमध्ये काम करणार्‍या महिला अगदी थोड्या होत्या. त्यांनतर मात्र शहरातल्या आणि आजूबाजूच्या गावांमधल्या महिला हळूहळू इथे कामाला यायला लागल्या. ह्यातील बहुतेक महिला ह्यापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या नव्हत्या. आता कुटुंबाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी, घरातील कामाची जबाबदारी सांभाळत, लांब प्रवास करून त्या रोज शहरात कामाला येतात. फारसे शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य नसणार्‍या ह्या महिलांना उपलब्ध असणारे पर्याय फार थोडे आहेत. आणि त्यांच्या ह्या परिस्थितीचा फायदा अर्थातच भांडवलदारांना मिळतो. उशिरापर्यंत काम करणे, विश्रांती घेण्याची परवानगी नाही, स्वच्छतागृहाची सोय नाही आणि त्याबरोबरीने मिळणारा तुटपुंजा पगार अशा परिस्थितीत ह्या महिला काम करत आहेत. ह्या असंघटित क्षेत्रात काम टिकून राहण्याची सुरक्षितता नाही आणि महिलांना त्याचा चटका अधिक बसतो. गर्भार महिलांना त्यांचे काम सोडून देण्यावाचून काही पर्याय राहत नाही. मोठ्या दुकानांमध्ये निदान त्यांना सहाव्या महिन्यापर्यंत काम करण्याची परवानगी मिळते, पण छोट्या दुकानांमध्ये तर एखादी महिला गर्भार असल्याची माहिती मिळाली की तिला कामावरून काढून टाकण्यात येतं.

देवी, उज्वला, आणि जेसी ह्या एका मोठ्या सिल्क साड्यांच्या दुकानात काम करणार्‍या तीन महिला कामगार त्यांना येणार्‍या, अडचणी सांगत होत्या. कामाची असुरक्षितता आणि कमी पगार ह्या समस्या तर त्यांना आहेतच, पण त्याचबरोबरीने कामासाठी द्यावे लागणारे तास खूप जास्त असल्याने त्यांना मुलांसाठी अजिबात वेळ देता येत नसल्याची त्यांची तक्रार सगळ्यात मोठी होती. ह्या महिला आता घराबाहेर पडून काम करायला लागल्या असल्या तरी घरातील कामाची विभागणी होत नसल्याने महिलांना दोन्ही कामांचा बोजा उचलावा लागतो. आमचा दिवस सकाळी ४ ला सुरु होतो आणि रात्री १२ वाजता संपतो. आणि हे रोजच चालू असतं. रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा परिणाम त्यांच्या सुरक्षिततेवरही होतो. खरेदीचा सीझन चालू असला की दुकानातून निघायला रात्रीचे ९ वाजून जातात. अशा वेळी रस्त्यावरून जाताना बर्‍याचदा येणारे जाणारे पुरुष त्रास देतात. कॉमेंट पास करतात. बाईकवर किंवा गाडीत येऊन बस, तुला घरी सोडतो असं म्हणतात. आमचे कामाचे तास कमी व्हावेत ही आमची मुख्य मागणी आहे. प्रस्थापित कामगार चळवळीमध्ये पगारवाढ आणि कामाची सुरक्षितता ह्यावर अधिक भर दिला जातो. त्याच्याशी तुलना करता कामाचे तास कमी करण्याची मागणी करणारी ही भूमिका निश्चित वेगळी आहे.

देवी, जेसी आणि उज्वलासारख्या अनेक महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी संघटित करण्याचं काम ‘पेंकुट्ट’ने केलं आहे. २०१० ला पाहिलं आंदोलन ह्या महिलांनी केलं ते ‘लघवीला जाण्याच्या हक्कासाठी’. प्रत्येक शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कामगार महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची ह्या आंदोलनाची मागणी होती. नियमाप्रमाणे प्रत्येक इमारतीत कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणं ही बिल्डरची जबाबदारी आहे. परंतु दुकानदारांकडून स्क्वेअर फुटामागे मिळणारं भाडं जास्तीत जास्त मिळवण्यासाठी ह्या नियमाला धाब्यावर बसवलं जातं. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी ठेवण्यात आलेल्या जागांवर ड्रेनेज बंद करून टाकून दुकानं तयार करण्यात आली आहेत. ह्यामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी काय त्रास होतो, ह्याचा कोणताही विचार केला गेलेला नाही. कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने एक तर १०-१२ तास तसंच काम करायचं, शक्य असेल तर रस्त्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृचा वापर करायचं, त्यासाठी परवडत नसतानाही जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खायचं, एवढेच पर्याय या महिलांसमोर असतात. काही वेळेला अशा वेळी नियमापेक्षा मोठा ब्रेक घेतला म्हणून त्यांना दुकानदाराची बोलणी खावी लागतात किंवा काही वेळा त्यांना कामावरून काढून टाकण्याचे प्रकारही घडले आहेत.

स्वच्छतागृहांचा प्रश्न महिलांसाठी मोठा होताच. त्यातच एक घटना अशी घडली की एका महिलेला सार्वजनिक स्वच्छतागृहाची देखरेख करणार्‍या पुरुषाने, तिच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने आत जाण्यास मनाई केली. त्याचे न ऐकता ती आत गेली म्हणून नंतर तिला देखरेख करणारा आणि मॅनेजर ह्या दोघांकडूनही अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. ह्या घटनेनंतर स्वच्छतागृहांच्या मागणीचा मुद्दा अधिक प्रकर्षानं समोर आला.

‘पेंकुट्ट’ ने शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच महिलांना स्वच्छतागृहांची सोय करून दिली जावी अशी मागणी केली. व्यापारी संघटनेने ह्या मागणीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यातील काही लोकांनी तर ‘बायकांना लघवीलाच जायचं असेल तर त्यांनी घरी बसावं’ आणि ‘एवढीच अडचण असेल तर स्वतःला एक नळी आणि पिशवी बसवून घ्या’ अशा प्रकारच्या अश्लील आणि असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्या. ह्याचे तीव्र प्रतिसाद स्त्री संघटनांमध्ये उमटले आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणार्‍या इतर संस्था-संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. ह्या आंदोलनाला प्रसारमाध्यमांमध्येही प्रसिद्धी मिळाली.

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या मागण्यांची सरकारला दखल घ्यावी लागली आणि काही प्रमाणात ह्या महिलांच्या मागण्या मान्यही झाल्या. इ-टॉयलेटस नावाची पैसे टाकून स्वतः वापरण्याची सार्वजनिक स्वच्छतागृहे नजीकच्या परिसरात उभारण्यात आली. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतींमध्ये स्वच्छतागृहे केली आहेत अथवा नाहीत ह्याची तपासणी करण्यासाठी हेल्थ इन्स्पेक्टर्सची नेमणूक करण्यात आली. अर्थात संघटनेचा लढा अजूनही चालूच आहे. कारण त्यावेळी बांधून दिलेली स्वच्छतागृहे अपुरी आहेत आणि हेल्थ इन्स्पेक्टरची नेमणूक केलेली असली, तरी त्याठिकाणी भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप आहे. अनेक ठिकाणी अजूनही दुकानांमध्ये स्वच्छतागृहे बांधून घेतलेली नाहीत.

संघटनेने नुकतंच जे आंदोलन केलं होतं ते कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी/विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळावा ह्यासाठी. कामाच्या दिवसभराच्या वेळात जेवण्याचा अर्धा तास आणि आणखी एकदा १० मिनिट असे दोन ब्रेक त्यांना मिळतात. ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण वेळ दुकानामध्ये त्यांनी उभं राहावं अशी अपेक्षा असते. दुकानात ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेर्‍यामधून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येतं आणि त्या विश्रांती घेताना आढळल्या तर त्यांना बोलणी तर खावी लागतातच पण त्याचबरोबर कधी पगारात कपातही होऊ शकते.

महिलांच्या प्रश्नांविषयी असणारी अनास्था आंदोलनाला दिल्या जाणार्‍या प्रत्युत्तरांमधून अगदी स्पष्ट होते. महिला आयोगाच्या एका प्रतिनिधीने तर एकदा म्हंटले होते की दिवसभर ह्या महिला चांगल्या एसी दुकांमध्ये काम करतात, मग ह्यांना काय अडचण आहे? अजूनही दिवसभर उभं राहून करण्याचे हे काम किती कष्टाचे आहे हे मान्य केले जात नाही. दिवसभर उभं राहून काम केल्यामुळे पाठ आणि पाय दुखणे, डोकेदुखी, पाळीच्या काळातील त्रास, गर्भाशयाला सूज अशी अनेक दुखणी मागे लागल्याचं ह्या महिलांनी सांगितलं.

संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला कामगार ह्यांच्या परिश्रमांना आता थोडं फार यश मिळू लागलं आहे. त्यांच्या ह्या आताच्या आंदोलनानंतर अनेक दुकानांमध्ये वेळोवेळी बसून विश्रांती घेण्याची ह्या महिलांची मागणी मान्य करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये संघटनेच्या कार्याला प्रसिद्धी मिळू लागल्यामुळे त्यांचा विषय लोकांसमोर यायला लागला आहे. ह्या दोन संघटनांनी मिळून कालिकत शहरातील राजकारणाला एक वेगळं स्वरूप द्यायला सुरुवात केली आहे. ह्या संघटना प्रस्थापित डावे आणि कामगार संघटना ह्यांना हे दाखवून देत आहेत की दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ह्या क्षेत्रातील असंघटित महिला कामगारांचे प्रश्न विचारात घेतल्याशिवाय इतर बदल होणे कठीण आहे. सध्या त्यांचे स्वरूप लहान असून त्याचा आवाका कालिकत शहरापुरता मर्यादित आहे. परंतु दलित आणि स्त्री संघटनांशी संवाद वाढवून आपला आवाका वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
त्यांचा लढा लांब पल्ल्याचा आहे आणि त्यांचे विरोधक सामर्थ्यवान आहेत. सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी जोडलेल्या युनियन ह्यांचे दुकानदार आणि व्यापारी संघटना ह्यांच्याशी हितसंबंध असल्याने ह्या महिलांचे प्रश्न उचलून धरण्यात त्यांना रस नाही. त्यामुळेच ‘पेंकुट्ट’ आणि त्यातीलच काही सदस्यांनी नव्याने स्थापन केलेली एएमटीयू ­(Asanghaditha Meghala Thozhilali Union (A­MTU)) ह्या संघटनांचा ह्या महिलांना माणुसकीने आणि सन्मानाने जगता यावे ह्यासाठी सुरु केलेला हा लढा वेगळा ठरतो.

(हा लेख कालिकत शहरातील पेंकुट्ट आणि एएमटीयू ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ह्यामध्ये संघटनेच्या विजी, शफिक, लिजूकुमार, आणि संघटनेच्या सभासद असणार्‍या काही महिला कामगार ह्यांचा समावेश होता. रिया आणि संगीता ह्यांनी भाषांतरासाठी आणि ‘केएसएसपी’, कालिकतच्या आनंदी ह्यांनी ह्या भेटीचे नियोजन करण्यासाठी जी मदत केली त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.) -----


सीमा कुलकर्णी
seemakulkarni2@gmail.com
अनुवाद : स्नेहा भट
bhatsneha@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate