অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी...!

खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी...!

महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकास कार्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सन 1962 मध्ये स्थापना केली आहे. ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी, खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क, स्थानिक साधन संपत्तीचा वापर करुन ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची ही संक्षिप्त माहिती…

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे सूक्ष्म उद्यम उभारण्यासाठी पहिल्या पिढीच्या उद्योजकांना सक्षम बनविणारी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यान्वित असलेली प्रधानमंत्री रोजगार योजना व खादी आयोगाची आर.ई.जी.पी. मार्जिन मनी योजना या दोन्ही योजना एकत्रित करुन ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती, किमान सातवी पास व्यक्ती रुपये 5 लाखांच्या वरील प्रकरणासाठी पात्र, स्वयंसहाय्यता बचत गट पात्र, 1860 च्या सोसायटी नोंदणी कायद्यान्वये रजिस्टर्ड झालेल्या संस्था, 1960 च्या सहकारी कायद्यान्वये नोंदणी झालेल्या सहकारी सोसायट्या, 1950 च्या सार्वजनिक विश्वस्त कायद्यान्वये नोंदणी झालेल्या संस्था, एक कुटुंबांतील पती किंवा पत्नी एकच व्यक्ती लाभधारक होऊ शकते. या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रकल्प मर्यादा ही उत्पादन युनिट / उद्योग रुपये 25 लाखांपर्यंत, सेवा उद्योग रुपये 10 लाखापर्यंत आहे.

अर्थसहाय्याचे स्वरुप- लाभार्थ्यांची वर्गवारी 1) सर्वसाधारणसाठी स्वगुंतवणूक 10 टक्के, अनुदानाचा भाग 25 टक्के, बँक कर्ज 65 टक्के , लाभार्थ्यांची वर्गवारी 2) विशेष ( अनु. जाती/ अनु.जमाती /इमाव/महिला / माजी सैनिक / शारिरिक दृष्ट्या अपंग / एनईआर / डोंगरी आणि सीमा भागातील धरुन स्वगुंतवणूक 5 टक्के, अनुदानाचा भाग 35 टक्के, बँक कर्ज 60 टक्के ही योजना जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोग या तिन्ही यंत्रणेमार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे - रेशनकार्ड , मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, लोकसंख्या, उद्योग नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक) , शैक्षणिक दाखले (टि.सी./ सनद /प्रवेश निर्गम उतारा), जातीचे प्रमाणपत्र (असल्यास), उद्योगाचे अनुभव / प्रशिक्षण प्रमाणपत्र, उद्योगास आवश्यक हत्यारे - अवजारे , मशिनरीचे दरपत्रक ( कोटेशन) , ज्या ठिकाणी उद्योग प्रस्तावित होणार आहे त्या जागेचा पुरावा (नमुना नं. आठ व सातबारा) तसेच जागा स्वत:ची नसल्यास जागा मालकासोबत केलेला करार पत्रक, बांधकाम असल्यास मंजूर प्लान व इस्टिमेट (इंजिनिअर) व बांधकाम परवानगी (ग्रामपंचायत), विज उपलब्धता दाखला (एम.एस.ई.बी), उद्योगास आवश्यक परवाने घेण्याची जबाबदारी उद्योजकाची राहील, प्रकल्प राशी रुपये एक लाखाच्यावर असल्यास प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट), शासनाने विहीत केलेले शपथ पत्र रुपये शंभरच्या बाँडवर नोटरी करुन देणे .

विशेष घटक योजना

शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत कलम 11 अ अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकातील दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्याकरिता मंडळ राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभधारकांना त्यांच्या ग्रामोद्योगाच्या उभारणीकरिता त्यांच्या गरजेइतपत वित्तसहाय्य वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देते. या कर्जावर मंडळामार्फत विशेष केंद्रीय साहाय्यातून दहा हजार रुपयापर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के पैकी कमी असणारी रक्कम लाभधारकास अनुदान स्वरुपात मंजूर करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे - रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक दाखले (टि.सी. / सनद / प्रवेश निर्गम उतारा), जातीचे प्रमाणपत्राची प्रमाणित सत्यप्रत, चालु आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (प्राधिकृत अधिकारी यांचे) ( उत्पन्न मर्यादा शहरी भाग 51 हजार 500 रुपये व ग्रामीण भाग 40 हजार 500 रुपये), संबंधित महामंडळाचे प्रमाणपत्र (अनुदानाचा लाभ घेतला नसल्याचे), उद्योगास आवश्यक हत्यारे-अवजारे, मशिनरीचे दरपत्रक (कोटेशन) , ज्या ठिकाणी उद्योग प्रस्तापित होणार आहे त्या जागेचा पुरावा (नमुना नं. 8 , 7/12 , घरपट्टी , टॅक्स पावती), तसेच जागा स्वत:ची नसल्यास जागा मालकासोबत केलेला करार पत्रक, उद्योगाचे अनुभव / प्रशिक्षण प्रमाणपत्र. प्रतिज्ञापत्र (रुपये 20/- कोर्ट फी लावून नोटरी केलेले).

कारागीर रोजगार हमी योजना

ग्रामीण भागात विखुरलेल्या कारागीरांना संघटित करुन रोजगार उपलब्ध करुन गटस्तरावर शासनाच्या सहकार्याने 1960 च्या सहकार कायद्यान्वये राज्यात एकूण 311 विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना केली आहे. या संघामध्ये आतापर्यंत 5 लाख 81 हजार 48 सभासद नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या ग्रामोद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारा कर्ज पुरवठा हा ग्रामोद्योग संघाच्या माध्यमाद्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून नाबार्डच्या पुनर्वित योजनेतंर्गत संकलित व मध्यम मुदत स्वरुपात सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करुन दिला जातो. गट संस्थेतील अनु. जाती व नवबौध्द घटकातील कारागिरांना जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक यांनी वैयक्तिक कर्ज उपलब्ध करुन दिल्यास त्या कर्जवर मंडळामार्फत विशेष केंद्रीय सहाय्यातून 10 हजार रुपयापर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के पैकी कमी असणारी रक्कम उद्योजकास अनुदान स्वरुपात मंजुर करण्यात येते. उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, आवश्यक त्याठिकाणी संघामार्फत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात . त्याचप्रमाणे सभासदामार्फत उत्पादीत केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या संस्थामार्फत तसेच मंडळामार्फत मदत केली जाते.

मधमाशापालन

अनादीकाळापासून मधाचा अन्न व औषध म्हणून उपयोग होत आला आहे. पोळे जाळून, पिळून मध गोळा करण्याच्या परंपरागत पध्दतीमुळे मधमाशांचा व पोळ्याचा नाश होत होता तसेच मध खराब प्रतीचा व लवकर खराब होणारा होता. सन 1946 साली मंडळाचे महाबळेश्वर येथील मध माशापालन केंद्रामध्ये आधुनिक संशोधन केल्यामुळे मधमाशा व पोळ्यांचा नाश होत नाही पोळ्या पुन्हा वापरता येतात व फक्त उद्योगापासून काढला जाऊन उच्च प्रतीचा शुध्द अहिंसक मध मिळतो. मध उद्योगापासून मिळणारे उत्पादन व उपयोग मध, मेण, विष, पराग, रॉयलजेली आदी.

मध शरिराला अत्यंत उपयुक्त घटक असून ती रक्तामध्ये त्वरित मिसळतो त्यामुळे कार्यशक्ती वाढते. मधात अनेक प्रकारच्या जीवनसत्वे असून आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधामध्ये उपयोग केला जातो. मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे मेणबत्या यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच दारु गोळा उत्पादन, शाई वंगण, छपाई काम प्लास्टिक रंगकाम इत्यादीमध्ये उपयोग केला जातो. विष- मधमाशा फुलातून मकरंद बरोबरच परागही गोळा करुन पोळ्यात साठवितात त्याचा उपयोग मधमाशा स्वत: खाण्यासाठी करतात. त्यामुळे भूक वाढविण्यासाठी, कार्यक्षता वाढविण्यासाठी रक्तदाब कमी करण्याच्या औषधामध्ये त्याचा उपयोग होतो. रॉयलजेली- कामकरी मधमाशांच्या डोक्यातील ग्रंथीमधून हा पदार्थ स्ववतो त्याचा उपयोग भुक, वजन वाढविण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणासाठी , यौवन टिकविण्याकरिता करतात.

मधमाशा आणि परागीभवन- मधमाशापालनामुळे शेती पिकांची फळपिकांची फुलशेतीचे उत्पादनामध्ये परागीभवनामुळे उत्पन्नापेक्षा 40 टक्क्यापर्यंत वाढ होते, असे प्रयोगाअंती सिध्द झाले. त्यामुळे वरील बाबींचा विचार करता मधमाशापालन शेतीला अत्यंत महत्वाचा पूरक उद्योग असून शेतकऱ्यांना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा उद्योग आहे.

प्रशिक्षण

खादी आयोगामार्फत अथवा आयोगाने पुरस्कृत केलेल्या संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातून निवडक ग्रामोद्योगाच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.

मंडळाच्या कार्यकक्षेत येणारे खनिज संपत्तीवर आधारित उद्योग- ग्रामीण कुंभार उद्योग, चुना उद्योग, दगड फोडणे-कोरणे , खडी करणे, नक्षीकाम करणे, दगडापासून बनविलेल्या उपयुक्त वस्तु, दगडी पाट्या व पेन्सिल तयार करणे, प्लॉस्टर ऑफ पॅरिस तयार करणे, भांडी साफ करण्याची पावडर , सरपणापासुन कोळसा तयार करणे, सोने, चांदी, खडे शिंपले व कृत्रिम धातुपासून दागिने तयार करणे, रांगोळी तयार करणे, लाखेच्या बांगड्या बनविणे, रंग रोगण, वानिष, डिस्टेंपर बनविणे, काचेची खेळणी उत्पादन, सजावटीसाठी काच कापणे, डिझायनिंग, पॉलिश करणे, रत्ने कापणे .

वन संपत्तीवर आधारित उद्योग- हातकागद उद्योग, आगपेटी उद्योग, आगरबत्ती उद्योग, वाख उद्योग, गोंद उद्योग, वेत व बांबू उद्योग, काथ उद्योग, पेपर कप्स प्लेटस व कागदाची, वह्या तयार करणे, वाळ्याचे पडदे व केरसुणी तयार करणे, वन उत्पादने सकलन व प्रक्रिया व पॅकिंग उद्योग, फोटो उद्योग, लाख तयार करणे.

शेतमालावर आधारित उद्योग- धान्यडाळी प्रक्रिया, पापड उद्योग, ग्रामीण तेल उद्योग, गुळ खांडसरी उद्योग, नीरा ताडगुळ उद्योग, मधुमाक्षिका पालन उद्योग, औषधी वनस्पती , फळ भाजी प्रक्रिया व परिक्षण उद्योग, तरटी चट्या आणि हार तयार करणे, काजू प्रक्रिया , द्रोण उद्योग व पत्रावळी तयार करणे, तागापासून वस्तू बनविणे (वाख उद्योग) , मका व रागीवरील प्रक्रिया, शेवया उत्पादन , विद्युत चलित पीठ गिरणी, डाळे तयार करणे, तांदळाची साले काढणे, भारतीय मिष्टान्न उत्पादन, मेन्थॉल तेल, दुग्धजन्य उत्पादने तयार करणे, पशुचारा कुक्कुटखाद्य उत्पादन , रसवंती खाद्यपदार्थ स्टॉल युनिट.

पॉलीमर व रसायनांवर आधारित उद्योग- ग्रामीण चर्मोद्योग, अखाद्य तेल व आंघोळीचा साबण, रबराच्या वस्तू तयार करणे, रेक्झीनपासून वस्तू पी.व्ही.सी इ. वस्तू , शिंग व हाडे यांच्या हस्तदंती वस्तू, मेणबत्ती कापूर व लाख तयार करणे, प्लास्टिकची पार्सल तयार करणे, टिकल्या बिंदी बनविणे, मेहंदी तयार करणे , सुगंधी तेल तयार करणे, शाम्पु तयार करणे, केशतेल निर्मिती , धुण्याचे साबण व पावडर तयार करणे, फिनाईल उत्पादने, लिक्विड हॅन्डवॉश, सॅनेटरी क्लीनर.

सुतार काम , लोहार काम, ॲल्युमिनियम उद्योग, गोबर गॅस प्लॉट योजना, पेपर पिन्स, क्लिप्स, सेप्टी पिन्स स्टीव्ह पिन्स आदी तयार करणे, शोभेचे बल्ब, बाटल्या तयार करणे, छत्री जोडणी करणे, सुर्य व वायु उर्जाची उपकरणे तयार करणे, हाताने पितळेची भांडी तयार करणे, हाताने तांब्याची भांडी तयार करणे, हाताने काश्याच्या वस्तू तयार करणे, पितळ तांब आणि काश्याच्या वस्तू तयार करणे, रेडियो काम कॅसट प्लेअर उत्पादन, रेडियो कॅसट प्लेअर उत्पादन, रेडिओ कॅसट रिकॉर्डचे उत्पादन स्टॅबिलायझरचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स घड्याळाचे उत्पादन , लाकडावर कोरीव काम व फर्निचर तयार करणे, कल्हाई करणे, मोटार वाईडिंग , तारेच्या जाळ्या , लोखंडी ग्रील्स बनविणे, हातगाड्या छोट्या सायकल रिक्षा आदी बनविणे संगीत वाद्य तयार करणे.

वस्त्रोद्योग- खादी (सुती, रेशीम, लोकर) , पॉलीवस्त्र (खादी व्यतिरिक्त) , लोकवस्त्र, होजिअरी, शिवणकाम आणि तयार करणे , बाटिक वर्क, खेळणी व बाहुल्या बनविणे, सुताच्या व लोकरीच्या गुंड्या, लाची तयार करणे, भरतकाम , कापडावरील भरतकाम (पंचवर्क) , वैद्यकीय पट्या बनविणे, स्टोव्हच्या वती बनविणे.

सेवा उद्योग- धुलाई , केस कापणे, नळकाम, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची दुरुस्ती , डिझेल इंजिन्स व पंपसेटची दुरुस्ती , टायर दुरुस्ती , किटक नाशक, लाउडस्पीकर ध्वनीवर्धक यंत्रे भाड्याने देणे, बॅटरी चार्जिंग, कलात्मक फलक रंगविणे, सायकल दुरुस्ती दुकान, गंवडी काम, ढाबा (मद्य विरहीत), चहा स्टॉल, आयोडीनयुक्त मिठ , बँड पथक , ग्रामोद्योग सेल डेपो , खादी ग्रामोद्योग आयोगाच्या यादीतील कोणताही उत्पादन / सेवा उद्योगातून ग्रामीण भागातील उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, कारागिर यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करुन देणे हा मंडळाचा उद्देश आहे.

- विवेक डावरे

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate