অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘कारागृहात कीर्तनाचा जागर’ संवेदनशील मित्रांचा आगळा उपक्रम

‘कारागृहात कीर्तनाचा जागर’ संवेदनशील मित्रांचा आगळा उपक्रम

अहमदनगर जिल्ह्यात माध्‍यम क्षेत्रात ‘पत्रकार महाराज’ म्‍हटले की एकच नाव समोर येते ते म्‍हणजे पत्रकार महेश महाराज. पत्रकारितेप्रमाणेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग हे त्‍यांचे वैशिष्‍ट्य आहे. आजू-बाजूला नकारात्‍मक गोष्‍टी घडत असल्‍या तरी त्‍यातील सकारात्‍मक बाबींवर लक्ष केंद्रीत करुन त्‍यांना प्रकाशझोतात आणण्‍याचे काम ते करीत असतात. त्‍यांच्‍यातील या सकारात्‍मक उर्जेमुळेच ते प्रशासनातील नवीन अधिकाऱ्यांचेही सहजतेने मित्र बनतात. लेखणी आणि वाणी या दोन्‍ही साधनांचा वापर समाजहितासाठी करण्‍यावर त्‍यांचा भर असतो.

गेल्‍या पाच वर्षांपासून पत्रकार महेश महाराज हे ‘जागर उपक्रम’ राबवत आहेत. या उपक्रमाला अरुण पुंडे वकिलांचे सहकार्य लाभत आहे. ‘जागर उपक्रम’ म्‍हणजे राज्यातील विविध कारागृहात जाऊन वारकरी कीर्तनाद्वारे बंदीजनांच्या मानसिक परिवर्तनाचा प्रयत्न करणे. अविचारामुळे मोलाचा मानवजन्म वाया घालणे खेदजनक आहे. चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र चुकांची पुनरावृत्ती करणे हे पाप होय. सुधारणा व पुनर्वसनाची संधी ही न्याय व्यवस्था व कारागृह विभाग बंदीबांधवांना उपलब्ध करुन देतो. या संधीचा लाभ घेवून सदाचार, सन्मार्गाची कास धरा. परिवर्तनाचा संकल्प करा, न्यायव्यवस्थेने सुनावलेली सजा सुधारण्याची संधी मानून कारागृह साधनेची जागा बनू दे, असे आवाहन महेश महाराज देशपांडे बंदीबांधवांना करत असतात. कारागृह विभागाच्या "सुधारणा व पुनर्वसन" या ब्रीदवाक्यास अनुसरुन मागील पाच वर्षांपासून ‘जागर’ या उपक्रमांतर्गत पत्रकार महेश महाराज देशपांडे व अरुण पुंडे वकील हे दोघे राज्यातील विविध कारागृहात जाऊन वारकरी कीर्तनाद्वारे बंदीजनांच्या मानसिक परिवर्तनाचा प्रयत्न करीत आहेत.

दोघेही वंशपरंपरेने वारकरी संप्रदायातील आहेत. दोघेही कीर्तनकार म्‍हणून गेल्‍या 31 वर्षांपासून राज्यातील विविध गावात संपन्न होणाऱ्या प्रतिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवा करीत आहेत. महेश महाराज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील तर पुंडे वकील कर्जत तालुक्‍यातील राशीन गावचे रहिवाशी.

कारागृहात जाऊन जात, धर्म, पंथ, वर्गभेदरहित माणुसकीची, सदाचाराची शिकवण देणाऱ्या सर्वधर्मीय संतांच्या विचारांचा कीर्तनातून जागर केला जातो. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम’ असा नामघोष करतानाच "अल्ला तुही तू - मौला तुही तू", "वाहे गुरु का खालसा -वाहे गुरु की फतेह", "बुध्दं शरणं गच्छामि" चा गजर करीत बंदीजनांच्या सद्सदविवेक बुध्‍दीस साकडे घालतात. कीर्तनातून ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, मुक्‍ताबाई, एकनाथ, नामदेव, चोखोबाराय, सावताबाबा आदी संतांचे मराठी अभंग गातानाच कबिराचे दोहे, मिराबाईंची पदे, गोस्वामी तुलसीदासांची चौपाई, हिंदी-उर्दूतील कव्वाली आळविली जाते. सर्वधर्मीय संतांच्या चरित्रातील कथाभाग सांगून प्रबोधन केले जाते.

‘दो आँखे बारा हाथ’ या चित्रपटाचा उल्लेख करीत "सुधरा रे भावांनो" अशी आर्त साद घातली जाते. बंदीवासात साने गुरुजींनी लिहिलेल्‍या ‘श्‍यामची आई’, पं. जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ‘गुब्बारे खातिर’ या ग्रंथ निर्मितीचा आवर्जून उल्लेख केला जातो. घरी आई, वडील, बायको, मुलं वाट पहात असून चुकीचा पश्‍चाताप करा, न्यायव्यवस्थेने सुनावलेली सजा स्वीकारून परिवर्तनाच्या मार्गावर पाऊल टाका, असे भावनिक आवाहन केले जाते.

पोटतिडीकेने व आर्ततेने केलेले जागराचे आवाहन ऐकून कारागृहात बंदीजन या कीर्तनात अनेकवेळा गहिवरतात. कायदा मोडणारे हात कीर्तनातील भजनानंदात टाळी वाजवीत तल्लीन होतात. अनेकांच्या डोळ्यांतून आसवे पाझरतात...तीच प्रायश्चिताची खूण. संतविचारावर श्रद्धा ठेवून सदाचारी झाला तर ‘वाल्याचा वाल्मिकी’ होतो, हा इतिहास आहे. त्याची वर्तमानात पुनरावृत्‍ती व्‍हावी यासाठीच पत्रकार महेश देशपांडे महाराज व पुंडे वकील ‘कारागृहातून किर्तनाचा जागर’ हा उपक्रम एखादा वसा उचलावा त्‍याप्रमाणे राबवत आहेत.

नगर उपजिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, वरिष्‍ठ तुरुंगाधिकारी शामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीजनांसाठी महेश महाराज देशपांडे यांचे हरिकीर्तन नुकतेच संपन्न झाले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, राजाभाऊ महाराज म्हेत्रे, विष्णुपंत म्हेत्रे यासह कारागृहाचे कर्मचारी व बंदीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या

‘आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा॥

सकाळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुध्द करा॥

हित ते करावे देवाचे चिंतन। करोनिया मन एकविध॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार। करा, काय फार शिकवावे॥

या उपदेशपर अभंगावर महेश महाराज यांनी निरुपण केले. ते म्हणाले, घडलेल्या चुकांविषयी पश्‍चाताप मानला तर परिवर्तन होणे शक्य आहे. न्याय व्यवस्थने सुनावलेली सजा ही सुधारणेची संधी समजा. संतविचारांचा अंगीकार कराल, तर कारागृह परिवर्तनाची पंढरी ठरेल. वाममार्गाचे "वार"करी होण्यापेक्षा संतविचाराचे वारकरी व्हा.

सुमारे दोन तास महेश महाराज यांनी ज्ञानेश्‍वर, तुकाराम, सावता बाबा, कबीर यांच्या अभंग रचनेचे प्रमाण देत कीर्तन केले. तसेच व्यवहारातील दाखले देत विठुनामाचा गजर आणि संतविचाराचा जागर केला. टाळ-मृदुंगाच्या निनादात टाळी वाजवित हरिनामाच्या गजरात कारागृहातील बंदीजन तल्लीन झाले होते. या कीर्तनास निवृत्तीबाबा चोपदार, धनंजय एकबोटे, केदार देशपांडे यांनीही सेवा बजावली.

‘कारागृहात किर्तनाचा जागर’ या उपक्रमाविषयी बोलतांना महेश महाराज म्‍हणाले, स्वर्गीय ग. स. तथा बाळासाहेब देशपांडे (जामखेड) व स्वर्गीय श्रीधर पुंडे गुरूजी (राशिन) यांच्या प्रेरणेतून मी आणि अ‍ॅड.अरुण महाराज पुंडे गेल्‍या पाच वर्षापासून विभिन्न कारागृहात बंदिस्त असणाऱ्या बंदीजनांच्या वैचारिक परिवर्तनासाठी हा उपक्रम निःशुल्क राबवत आहोत. नगर उपजिल्हा कारागृहात तत्कालीन अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी 2012 साली गणेशोत्सवात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यातूनच या उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पुढे दिवाळी निमित्त कारागृहात हरिकीर्तन केले. त्यानंतर राज्यातील पैठण खुले कारागृह (जि. औरंगाबाद ), येरवडा (पुणे), हर्सूल (जिल्‍हा औरंगाबाद ), बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर या कारागृहात बंदीजनांसाठी कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. गुन्हेगारीच्या वाटेस लागलेली पावले संतविचाराने परिवर्तनाच्या दिशेने वळावीत. आजचा बंदीजन भविष्यात देशाचा सुजाण नागरिक व्हावा. या एकमात्र उद्देशाने ‘जागर’ या उपक्रमाचे आयोजन कारागृह विभागाच्‍या "सुधारणा आणि पुनर्वसन" या ब्रीदवाक्यास अनुसरुन करीत आहेत. राज्यभरातील सर्व कारागृहात कीर्तन करण्याचा आम्‍हा दोघांचा मानस आहे. कारागृह हे सजा सुधारण्याची संधी व साधनेची जागा बनू दे, हीच त्यांची भावना आहे.

पत्रकार महेश महाराज- मोबाईल 9420946463

लेखक : राजेंद्र सरग

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate