त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक खांबावर स्वच्छतेचा संदेश प्रदर्शीत करण्यात आला होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पहात होते. थोड्याच वेळात अंबारी रंगाचे दिवे असलेल्या दोन गाड्या ग्रामपंचायतीजवळ आल्या. ग्रामस्थ स्वागतासाठी पुढे सरसावले…..आधी कामाची जागा दाखवा, बाकी नंतर…पाहुण्यांनी सांगताच स्वागतासाठी तयार असलेल्यांची थोडी निराशा झाली.
जवळच एका मातीच्या झोपडीजवळ सगळी गर्दी गेली. शौचालय बांधण्यासाठी पांढऱ्या मातीने आखणी केली होती. पाहुण्यांनी टिकाव हातात घेऊन सरळ खोदायला सुरूवात केली. इतरांना गर्दी कमी करण्याच्या सूचना…..कलेक्टर हायेती..सोबत शिओबी…साहेब हातात ग्लोव्हज घाला…मधूनच सूचना….होऊ दे एक दिवस हाताला फोड कसे येतात ते देखील पाहू, पाहुण्यांचे उत्तर……
गावातील निराधार महिला मंदाबाई जाधव यांच्या घरी शौचालय बांधण्याचे काम सुरू झाले. पाहुणे होते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर. हागणदारीमुक्त गाव मोहिमेला गती देण्यासाठी एक चांगला संदेश जावा यासाठीचा हा प्रयत्न. त्याचा परिणामही चटकन दिसला. गावातील पुरुष - महिला श्रमदानासाठी पुढे सरसावले.
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. पालघर आणि नाशिकच्या सीमेवरील आदिवासी गाव असलेल्या या गावात एकूण 307 कुटुंबांपैकी 100 कुटुंबांनी शौचालय बांधले आहे. मजुरांची उपलब्धता नसल्याने आणि साधनसामुग्री तालुकास्तरावरून आणावी लागत असल्याने शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर श्रमदानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी गावात आले.
शौचालयासाठी आवश्यक चार फूट खोल खड्डे खोदण्याचे काम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार महेंद्र पवार, गट विकास अधिकारी एम.बी.मुरकुटे , सरपंच कल्पना जाधव यांनीदेखील श्रमदानात सहभाग घेतला. श्री. शंभरकर आणि श्रीमती संगमनेरे हे शौचालय बांधण्यासाठी खर्च करणार असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून विधवा असलेल्या मंदाबाईंना आर्थिक मदत होणार आहे.
शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी श्रमदानाद्वारे पुढाकार घ्यावा, असे आवाहन राधाकृष्णन बी यांनी केले. श्री.शंभरकर जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधीक स्वरुपात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगताना फेब्रुवारी 2018 पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखविला.
राज्यात पुण्याखालोखाल नाशिक जिल्ह्याने शौचालय बांधण्यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी 75 हजार शौचालय उभारण्याचे जिल्ह्याला उद्दीष्ट असताना 95 हजार 893 शौचालय उभारण्यात आली आहेत. 400 गावांचे उद्दीष्ट असताना 451 गाव हागणदारीमुक्त झाले आहेत. पुढील वर्षी 640 गावाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी गावात श्रमदानासाठी आल्याने नागरिकांचा उत्साह वाढला असून येत्या महिन्याभरात उर्वरीत घरात शौचालय बांधले जाईल. गरज असेल त्या ठिकाणी ग्रामस्थ श्रमदान करतील, असे सरपंच श्रीमती जाधव यांनी सांगितले. ग्रामस्थांमध्ये श्रमदानामुळे उत्साह निर्माण झाला असून येत्या महिन्याभरात गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नागरिकांनी केला. हागणदारी मुक्तीसाठी गाव खऱ्या अर्थाने कामाला लागले.
लेखक - डॉ.किरण मोघे
स्त्रोत - महान्युज