অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुद्धिनाशात्प्रणश्यति

बुद्धिनाशात्प्रणश्यति

बुद्धिनाशात्प्रणश्यति
भ्रष्टाचाररुपी भस्मासुराची तीन प्रमुख अंगे असतात. कायीक,वाचीक आणि मानसिक. एखादी परस्त्री किंवा परपुरुष पाहिल्यानंतर मनात कामवासना जागृत होणे व मनातल्या मनातच त्या कामवासनेची पूर्ती करणे,हे झाले भ्रष्टाचाराच्या मानसिक अंगाचे एक उदाहरण.असे भ्रष्टाचार अदृष्य स्वरुपात घडतात. यानंतर येतो वाचीक भ्रष्टाचार. एखाद्याची कामाची फा‌ईल मंजूर हो‌ऊनही अजून साहेबांची सही व्हायची आहे,असे जेंव्हा सांगितले जाते, तेंव्हा तो असतो वाचीक भ्रष्टाचाराचा एक नमुना. असे भ्रष्टाचार दृकश्राव्य स्वरुपाचे असतात. अशा भ्रष्टाचारासोबत मानसिक भ्रष्टाचारही गुप्त स्वरुपात असतोच. तिसरे आणि मुख्य अंग आहे,कायीक भ्रष्टाचार. या भ्रष्टाचारात भस्मासूराची तीनही अंगे कमालीच्या एकोप्याने काम करतात. कधीकधी कायीक भ्रष्टाचार मनाच्या नकळत घडतात किंवा मनाविरुद्ध केले जातात. परंतू अशा घटना क्वचितच आढळतात. मनात जागृत झालेली कामवासना वाट्टेल ते करुन ती शारिरीक पातळीवरुन शमविणे ,हा झाला लैंगिक भ्रष्टाचार. मनात पैशांची लालसा ठे‌ऊन आधीच साहेबांची स्वाक्षरी झालेली फा‌ईल लाच मिळाल्यानंतरच संबंधीताला देणे,हा झाला आर्थिक भ्रष्टाचार. आज या दोन्ही प्रकारच्या भ्रष्टाचारांनी मानवी जीवनाची सर्व अंगे नास‌ऊन टाकली आहेत. कधी आर्थिक भ्रष्टाचारासाठी लैंगिक भ्रष्टाचार तर कधी लैंगिक भ्रष्टाचारासाठी आर्थिक भ्रष्टाचार असेही घडते. बहुतेक वेळा दोन्ही प्रकारचे भ्रष्टाचार एकमेका सहाय्य करु अशाच स्वरुपाचे असतात.भ्रष्टाचाराचे इतरही अनेक प्रकार आहेत. आर्थिक व लैंगिक भ्रष्टाचार सर्वव्यापी हो‌ऊ पहात आहेत आणि म्हणूनच त्यांची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे. या दोन्ही आणि इतर सर्वच प्रकारच्या भ्रष्टाचारांची जननी आहे बौधिक भ्रष्टाचार,बुद्धीभ्रष्टता.  दुर्दैवाने रोगाच्या मूळ कारणांचा विचार न करता दिसणार्‍या लक्षणांवर वेगवेगळ्या औषधोपचारांची ॲलोपॅथिक चर्चा सर्वत्र होताना दिसते. परंतू रोगाच्या मूळ कारणांचा बंदोबस्त करणार्‍या आयुर्वेदिक उपाय योजनांचा कुणीही विचार करीत नाही. बुद्धी भ्रष्ट झाली की मन भ्रष्ट होते आणि त्यातुनच पुढील सर्व अनर्थ ओढवतात. मन भ्रष्ट झाले की भ्रष्ट आचार-विचार,भ्रष्ट आहार-विहार व भ्रष्ट संस्कार व्यक्तीचा संपूर्ण ताबा घेतात. मन अधिकच भ्रष्ट होत जाते. असे भ्रष्ट मन मातृप्रेम-मातृभाषा, राष्ट्रभक्ती-राष्ट्रभाषा, राष्ट्रीय-सामाजिक जबाबदारी, व नैतिक-मानवी मूल्यांचा विचारही करु शकत नाही. किंबहुना,या सार्‍या बुरसटलेल्या कल्पना आहेत असे त्याला वाटते व या सार्‍यांचा असे मन तिरस्कार करु लागते. अशी बुद्धीभ्रष्ट व्यक्ती मग कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करताना जराही शरमत नाही. सर्व समस्यांचे मूळ कारण आहे बुद्धीभ्रष्टता.

सोमनाथ देविदास देशमाने,

अहमदनगर,

९७६३६२१८५६.

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate